भुईकोटांचे शिलेदार भाग २ – किल्ले परांडा (Udgir And Paranda Fort Trek Part -2)

भुईकोटांचे शिलेदार च्या पहिल्या भागात आपण किल्ले उदगीर पहिला आता वळूयात दुसऱ्या भागाकडे आणि सफर करूया किल्ले परींड्याची अथवा परांड्याची.
आधी मी सांगितल्याप्रमाणे ११ मार्चला  रात्री उशिरा पोहोचल्यावर झोपून मग सकाळी ६ वाजता उठून अंघोळ वगैरे उरकून (हो ह्या ट्रेक मध्ये अंघोळ केली. कारण मंगल कार्याच्या सभागृहात राहत होतो त्यामुळे सर्व सोयी होत्या) पहिले गाठले जवळचे सोलापुरातील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर.  तेथे भगवान श्री सिद्धेश्वर म्हणजे अर्थात शंकरांचे दर्शन घेऊन तेथील प्रसन्न वातावरणात फेरफटका मारला , खूप बरे वाटले. फेरफटका मारत असतानाच फॅन्ड्री चित्रपटातील प्रसिद्ध काळी  चिमणी(मूळ नाव माहित नाही पक्ष्याचे) दृष्टीस पडली .
असो सकाळी साधारण ८ च्या दरम्यान सोलापूरहून परांडया कडे प्रस्थान केले. सोलापूर ते परांडा हे अंतर साधारण १०५ किमी.  इतके आहे .आम्ही १०.३० ते ११.०० च्या सुमारास सकाळी परांड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो.
भुईकोट किल्ला आहे म्हंटल्यावर खंदक आलाच … ह्या किल्ल्याला पण मोठा आणि रुंद खंदक आहे . मला हा खंदक पाहिल्यावर असे वाटले कि हाच किल्ला परदेशात असता तर तेथे नक्कीच पाणी भरून कारंजे अथवा रंगीत मासे टाकून त्यास वेगळी झळाळी दिली गेली असती ,पण प्रत्यक्ष मी मात्र प्लास्टिक युक्त घाण, गटार पाहत होतो . दुर्दैव!!! आणखी काय पण नंतर वरती मी म्हंटल्याप्रमाणे आलेला विचार पण मी काढून टाकला कारण आपल्याकडे असे केले तरी कारंजे तोडणे , उगाच बिनकामाचे मास्यांना पावाचे तुकडे खायला घालणे ,थुंकणे  असले बिनबुडाचे प्रकार झाले असते त्यामुळे तो पण विचार मी झटकून किल्ल्यात प्रवेश केला .  किल्ल्याच्या आत आपण खंदकावर बांधलेल्या दगडी पुलातून प्रवेश करतो .
पहिल्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उदगीर प्रमाणेच येथेही  विशिष्ट कमानीने आपले स्वागत होते . पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूस छोटेखाने पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे व नंतर लगेच डावीकडे दुसरा दरवाजा लागतो हा दरवाजा भव्य आहे.  दरवाजातून आत शिरल्यावर आपल्याला तटबुरुज लागतात ज्यावर व्याल कोरले आहेत आणि ह्या बुरुजांना सज्जे पण आहेत, हा बुरुज पाहिल्यावर मला देवगिरी किल्ल्यातील बुरुजांची आठवण आली  त्या किल्ल्यावर असेच बुरुज आहेत.

पहिले प्रवेशद्वार

कमानी

बुरुजावरील व्याल शिल्प

पुढे गेल्यावर आपण तिसऱ्या दरवाजातून प्रवेश केल्यावर पुन्हा एक बुरुज लागतो ज्याच्या वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत . मी पायऱ्यांनी वरती गेलो आणि तटबंदी न्याहाळली ती न्याहाळत असतानाच तटबंदीवर आत मला हत्ती शिल्पं  दिसले , मला असे वाटते कि ते बहुदा वेगळ्या दगडावर कोरले गेले असावे आणि  नुकतेच डागडुजी करताना ते जोडले असावे.

बुरुजातून बाहेर आलेली तोफ

चौथे  प्रवेशद्वार

                                                    बुरुजावरील तटबंदीमधील हत्ती शिल्पं
शिल्प  बघून खाली उतरल्यावर बुरुजांमधून बाहेर आलेल्या तोफा आपले लक्ष वेधून घेतात , बुरुजाच्या डाव्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी  असलेल्या देवड्या दिसतात . येथून पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या चौथ्या भव्य दरवाज्यातून प्रवेश करतो ते थेट मुख्य किल्ल्यात . चौथ्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी फारसी भाषेत शिलालेख कोरला आहे.  दरवाज्याच्या कडेला खाली साखळी लटकलेली आज पण दिसते साखळीला हाताळल्यावर आणि तिथे वजन पाहता ह्या दरवाजाच्या वर जेव्हा लाकडी दरवाजा असेल तेव्हा तो किती मजबूत असेल ह्याची जाणीव होते.

चौथ्या दरवाजातून आपण मुख्य किल्ल्यात प्रवेश करतो , आणि आपल्याला आजही सुस्थितीत असलेल्या वास्तू दिसतात . डावीकडे  पायऱ्यांच्या  सहाय्याने बुरुजावर जाण्यासाठीची सोय दिसते. मी मध्यभागी असलेल्या वस्तू न बघता बुरुजावर जाऊन किल्ल्याच्या तटबंदीवरुन प्रदक्षिणा मारून मग सर्व वास्तू  बघायचे ठरवले. पायऱ्यांवरून  वर गेल्यावर सुरुवातीलाच दिसली ती मोठी तोफ जिच्याबद्दल मी प्रवासात खूप काही ऐकले होते , ती म्हणजे पंचधातूची मलिक -ऐ-मैदान तोफ !!!! विजापूर च्या किल्ल्यावर जी अवाढव्य  तोफ आहे ती म्हणजे मुलुख मैदान  आणि हि दुसरी जी महाराष्ट आणली ती मलिक -ऐ-मैदान. असे म्हणतात हि तोफ कधी चालवली नाही गेली  म्हणजे \’टेक्निकल भाषेत \’ कधी उतरवली नाही गेली , तोफ अतिशय सुंदर आहे तोफेवर सिंहाचे शिल्प आहे त्याच्यावरील एकाचे मुंडके कापले गेले आहे आणि फारसी शिलालेख कोरला आहे. तोफेची लांबी जवळ जवळ १५ फुटापेक्षा जास्त असेल , तोफेवर ५ फारसी शिलालेख कोरले आहे  त्यातला एक तोफेच्या  तोंडावर कोरला आहे.आणि तोफेच्या मागच्या भागावर पाकळ्यांचा आकार कोरला आहे.मन प्रसन्न झाले असली सुंदर तोफ बघून.


मलिक-ऐ-मैदान तोफ

मी ठरल्याप्रमाणे तटबंदीवरुन चालू लागलो तसे चालताना प्रत्येक बुरुज आणि त्यावर ठेवलेल्या तोफा न्याहाळत होतो ,जवळपास असे म्हणता येईल कि प्रत्येक बुरुजावर एक तोफ ठेवलेली आहे. ह्याही किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे पहिला वळसा मारून उजवीकडे वळल्यावर मध्यावर पहिल्या आणि दुसऱ्या तटबंदीच्या मध्ये असलेले गणेश मंदिर दिसते .पुढे चालत गेल्यावर आपल्याला  कोपऱ्यावर असलेल्या बुरुजावर मगर तोफ दिसते जिचे तोंड मगरीसारखे आहे , हि पण तोफ पंचधातूची आहे आणि ह्या तोफेवर पण उत्कृष्ट कोरीव काम आणि शिलालेख कोरले आहे . पुढे परत असेच चालत गेल्यावर पुन्हा काही तोफा ठेवलेल्या मला दिसल्या ,त्यातील तटबंदीवरील रेषेत असणाऱ्या मधल्या बुरुजावरील तोफेवर इंग्रजी भाषेत साल १६२७ असे कोरले आहे आणि रोमन भाषेत खालील वाक्य लिहिली आहेत .
EVERHARDVS. SPLINTER. ME.  FECIT. ENGHVSÆ
ह्या शब्दांचा अर्थ मला  खरा उमगत नव्हता पण गूगल केले असता हे सांकेतिक भाषेत काही लिहिले आहे  हा माझा अंदाज खरा ठरला .एकंदर ह्या शब्दांचा अर्थ पुढील प्रमाणे –

Letter or word  Meaning and some referential cannons bearing the same inscription  Date Nationality of cannon  Illustration * 
* PH-SGA = Photo in the present SGA / PH-EA = Photo in the Editor LGA for the museum keeping the cannon
EVERHARDVS. SPLINTER. ME.  FECIT.  ENGHVSÆ  “Everhard Splinter made me in Enkuizen”.  On a bronze gun from India, cal. 4.86in, bearing also inscriptions in Persian and Assamese.  (Rotunda, Woolwich, Class II, entry 197).  Also on base ring of a bronze 24-pounder, cal. 15.7 cm, cast for Christian IV of Denmark.  (Stockholm #27) 1629 – 1640 Dutch PH-SGA


जर  नीट वाचाल तर सरळ सरळ कळतेय ब्रॉंझ गन इन इंडिया म्हणजे भारतातील तोफ.
cal.4.86in, bearing also inscriptions in Persian and Assamese.- म्हणजे ४.८६ इंच हे तोफेच्या गोल भोकाची लांबी आहे. तोफेचा काळ १६२९ पासून दिलाय जो जवळ जवळ १६२७ ह्या कोरलेल्या काळाजवळचा आहे.आणि पर्शियन मध्ये शिलालेख कोरला आहे जे वास्तवात आहे.आणि तोफेवर एक चिन्ह कोरले आहे जे मला पोर्तुगिजांचे वाटलेले पण वर मिळालेल्या माहितीनुसार हे डचांचे आहे आणि शिवाय चिन्ह पहिले तर ते स्पष्ट होते कि ते डचांचे असू शकते . मी ह्यावर एक लेखही  वाचला आहे जो परांड्यावर ठेवलेल्या तोफेवर नाही आहे परंतु जवळजवळ सामान ठेवणीतल्या तोफांवर आहे ज्याची लिंक मी ब्लॉगच्या शेवटी देतो जरूर वाचा. ह्याचा अर्थ स्पष्ट होतो मुघलांनी ह्या आणि अशा प्रकारच्या बऱ्याच तोफा डच , फ्रेंच , पोर्तुगिजांकडून घेतलेल्या अथवा मागवल्या होत्या , आणि तोफखाना हे मुघलांचे प्रमुख अस्र होते.  (सौजन्य-गुगल आणि विकी फिबीस)          

मगर तोफ

रोमन भाषेत अक्षरं कोरलेली तोफ
असो ,पुढे गेल्यावर लोखंडी भल्या मोठ्या तोफा लागतात आणि विशेष म्हणजे कडक उन्हात पन ह्या तोफांना स्पर्श केल्यावर चटका लागला नाही जो मला पंचधातूच्या तोफेला स्पर्श केल्यावर जाणवला. पुढे शेवटचा वळसा मारून चोकोनी फेरा मारून मी खाली उतरलो आणि किल्ल्याच्या मध्यभागातील अवशेष बघायला सुरुवात केली .
त्यात पहिले मी पहिली ती सुंदर विहीर!!!!

लोखंडी तोफ
हि विहीर प्रशस्थ आहे . विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय आहे पण मला एक चोर वाट सापडली जी चिंचोळी  आहे आणि विशेष म्हणजे ह्या चोर वाटेत उतरण्यासाठी केलेल्या पायऱ्यांची बांधणी हि वेगळी आहे  म्हणजे सरळ सोट न कोरता  तिरप्या एकमेकांत पायऱ्या कोरल्या आहेत.पायऱ्यांच्या सहाय्याने  उतरल्यावर आपण विहिरीला व्यवस्थित वर्तुळाकार फेरी मारू शकतो विहिरीला अनेक कोनाडे आहेत आणि बांधकाम बघण्यासारखे आहे.

विहिरीचे कोनाडे व कमानी

विहिरीत उतरण्याची चिंचोळी चोरवाट आणि पायऱ्यांची विशेष बांधणी
विहिरीतून बाहेर आल्यावर लाल विटांनी बांधलेली इमारत आहे.हि वास्तू पाहून समोर आल्यावर हमामखाना आहे ,ज्यात अनेक सुंदर मुर्त्या ठेवल्या आहेत ज्यातील गणेशाची अप्रतिम कोरीवकाम असलेली मूर्ती पाहायला मिळते .त्याच बरोबर पाच फण्याच्या नागदेवतेची मुर्ती, गद्धेगळ आणि अनेक वीरगळी पाहायला मिळतात .सुदैवाने वीरगळींना आणि मूर्त्यांना अजूनतरी लाल अथवा भगवा रंग फासला नाही आहे.हमामखान्याच्या बरोबर उजव्या बाजूला दारूखाना आहे ज्यात काही छोट्या तोफा आणि त्यांचे तोफगोळे ठेवलेत . त्यातला एक तोफगोळा मी उचलून पाहिल्यावर मला अंदाज आला तोफेच्या तोंडी दिल्यावर गुन्हेगारीची काय हालत होत असेल ते. हमामखान्यात वटवाघळांचा  खूप वावर आहे त्यामुळे जास्त काळ थांबता येत नाही.

हमामखान्यातील गणेश मूर्ती

हमामखान्यातील नागदेवता  मूर्ती

दारुखान्यातील तोफा आणि गोळे

दारुखान्यातील  गोळे 
 
दारुखान्यानंतर सर्वात शेवटी मी जी वस्तू तिच्या विशिष्ठ कोरीव काम बघण्यासाठी राखून ठेवली त्या ठिकाणी जाण्यासाठी पावले वळवली. सध्या ह्या वास्तूस मशीद म्हणतात , पण खरे तर हे नक्कीच जुने मंदिर असावे आणि हे आतले हेमाडपंती खांब व एकंदर वास्तूची रचना ह्यामुळे जाणवते. ह्या मशिदीच्या चारही बाजूस चार छोटे मिनार आहेत आणि चहो बाजूंनी सुंदर असे नक्षीकाम केले आहे .मशिदीच्या बाहेरील बाजूस अप्रतिम दगडी जाळ्या कोरल्या आहेत आणि त्या खाली एक अस्पष्ट शिलालेख कोरला आहे . मशिदीत येण्यासाठी दोन छोटे दरवाजे आहे.मी मशिदीतले कोरीव काम , आणि खांबांची रचना पाहून थक्क झालो आणि गडफेरीचा शेवट केला.गडफेरीनंतर ऊन असल्यामुळे झाडाखाली सर्व ट्रेकर्स नि द्राक्ष , केक,लिंबाच्या गोळ्या , बाकरवड्या वगैरे हादडून बस मध्ये बसण्यासाठी प्रयाण केले.

मशीद

दगडी नक्षीकाम

खांबांची रचना

खांबांची रचना 
                                                      तटबंदीवरुन दिसणारी मशीद
 
दुपारी साधारण १.३० ते २ च्या सुमारास सुरु केलेला परतीचा प्रवास डोंबिवलीला रात्री १.३० वाजता संपला जो ३५७ किमी चा होता आणि पुढे मला कल्याण ला घरात पोहोचायला रात्रीचे  २.३० वाजले.तब्बल १२३६ किमी चा प्रवास बस ने अक्ख्या ट्रेकमधे आम्ही ट्रेकर्स नि  केला.हा ब्लॉग जरा मोठा झाला असेल असे काही जणांना वाटू शकेल पण हा ऐतिहासिक ठेवा विस्तृतपणे लिहावा वाचावा असाच आहे.सर्वात जास्त मला आनंद तोफेची माहिती शोधताना आणि ती  मांडताना झाला आहे ,मला खात्री आहे जे जे हा ब्लॉग वाचतील त्यांना नक्की आवडेल आणि स्वतः जाऊन हा ऐतिहासिक ठेवा अनुभवतील!!!
तोफेवरील लेख लिंक  –https://wiki.fibis.org/w/Historic_Guns_of_British_India
किल्ल्याच्या इतिहासाबद्दल- किल्ले परिंडा अथवा परांडा हा चालुक्य कालीन किल्ला असावा असा अंदाज आहे.ह्या किल्ल्यावर औरंगजेबाने त्याच्या दक्खनच्या सुभेदारीतील दुसरी कारकीर्द  म्हणजे ई.स १६५२-१६५७ च्या दरम्यान आक्रमण करून आदिलशहाकडून हा किल्ला व त्याच बरोबर कल्याणी , आणि बिदर चे किल्ले जिंकले. खरं म्हणजे हा हल्ला औरंगजेबाने कल्याणी किल्ल्यावर केलेला होता . कल्याणी जिंकल्यानंतरच्या तहात परिंडा आणि बिदर किल्ले सुद्धा देण्याच्या  व युद्धखर्च म्हणून मुघलांना १ कोटी रुपये मिळावे ह्या अटींवर शांततेचा तह झाला.
परंतु हा किल्ला औरंगजेबाच्या सुभेदारीनंतर अदिलशाहीकडे होता हे स्पष्ट होते ते १६६० साली शाईस्ताखानने केलेल्या परांड्यावरच्या हल्ल्यावरून , कारण शाइस्तेखान स्वराज्यात आल्यावर म्हणजे मे १६६० साली तेव्हापासून त्याने काही विशेष कामगिरी केली नव्हती. एक चाकण चा संग्रामदुर्ग जो लहानसा भुईकोट त्याने जिंकलेला आणि तेही  ९०० सैनिकांचे बलिदान देऊन.!!! हा किल्ला  जिंकायला फिरंगोजी नरसाळा ह्या  महाराजांच्या शूर सरदाराने झुंजवले होते हे सर्वश्रुत आहे
गालिब नावाचा आदिलशहाचा किल्लेदार मोठी किंमत देऊन परांडा द्यायला तयार झाला होता ,शेवटी  त्याच्या सर्व अटी औरंझेबाने मान्य  करून परांड्याचा ताबा घेण्यासाठी फौज पाठवली हाच काय तो शाईस्तेखानाचा दक्खनेतला दुसरा विजय.
एकंदर काय तर हा किल्ला बहुदा विना लढाया तह करून मुख्यतः आदिलशाही आणि मुघलांकडे होता  त्यामुळेच त्याचे अवशेष आजही शाबूत आहे.
(इतिहास साभार – समरधुरंधर – विद्याचरण भालचंद्र पुरंदरे)

Leave a comment