एक खांब तुटलेल्या अवस्थेत आहे . खांबांच्या डाव्या बाजूला एक खोदीव टाके आहे आणि उजव्या बाजूला भग्नावस्थेतील मुर्त्या कोरल्या आहेत.बहुधा बुद्ध आणि त्यांचे अनुयायी ह्यात कोरले असावे .आत गेल्यावर छोटेखानी चैत्यगृह आहे त्यातला काही भाग हा अपूर्ण कोरलेला आहे. सध्या चैत्यगृहात देवीच्या शेंदूर फासलेल्या २ मुर्त्या आणि शेंदूर फासलेल्या गणेशाची मूर्ती आहे. बाकी काही अवशेष नाहीत.
विहिरीत उतरल्यावर डाव्या बाजूला २ कोनाडे आहेत समोरच वरती मध्यभागी गणेश कोरला आहे आणि त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन मुर्त्या कोरल्या आहेत ज्यातील एकाच्या हातात क्षस्त्र आहे. गणेशाच्या मूर्तीवरील कोरीवकाम अप्रतिम आहे. गणेश मूर्ती खाली कोरीव कमान आहे. कमानीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला कमलशिल्प कोरले आहे.विहीर खूप खोल आहे आणि बारा महिने अगदी दुष्काळ असला तरी ह्या विहिरीतले पाणी आटत नाही असे गावकरी म्हणतात.
दुर्दैवाने ह्या विहिरीचा इतिहास परिचित नाही आहे म्हणूनच मी वरती शिवकालीन अथवा पेशवेकालीन म्हंटले आहे. देवळाली गाव पूर्वी घाटमाथ्यावर लक्ष ठेवणाऱ्या मार्गात यायचे , आणि शिवाजी महाराज व यांचे सैनिक बदलापुरात घोडे बदलायचे असे म्हंटले जाते त्यामुळे ह्या विहिरीचा वापर त्या दरम्यान केला गेला असावा असे वाटते. तूर्तास आपण ह्यात न पडता हा सुंदर ठेवा व त्याचे वैविध्य जतन करूयात.
(टीप :शक्यतो गावात संध्याकाळी ७ च्या आत जावे कारण येण्या जाण्यासाठी ऑटोरीकक्षेची सोय कमी आहे.)
३.गिरणारे गावातील विहीर- आपण नुकतीच वरती शिवकाळात असणाऱ्या विहिरीची माहिती वाचली , आताआपण अशीच एक वेगळ्या धाटणीतील विहीर पाहू. नाशिक पासून २० किलोमीटर अंतरावरील गिरणारे गावात हि विहीर आहे. हि विहीर देवी अहिल्याबाई होळकरांनी बांधली आहे असे गावात फलक लावला आहे.
विहिरीचे बांधकाम बघून चटकन लक्षात येते कि हिचे बांधकाम होळकरांच्या काळातील म्हणजे १७ व्या शतकातल्या उत्तरार्धातील आहे. विहीर अजून पण तत्कालीन लाल विटांमध्ये आपणास पाहायला मिळते , डुबेरे गावातील बर्व्यांचा वाडा सुद्धा अशाच विटांमध्ये बांधल्याचा दिसतो.ह्या विहिरीची पण खोली खूप आहे.विहिरीत आपण पायऱ्यांनी उतरू शकतो
उतरल्यावर दोन्ही बाजूस कोनाडे आहेत आणि समोर सुंदर कमान कोरली आहे आणि कमानी च्या समोर पण कोनाडा कोरला आहे. उतरून डाव्या बाजूस गेल्यावर आपल्याला मुख्य विहीर लागते.नाशिक जवळील रामशेज किल्ला आणि हि विहीर एका दिवसात पाहता येते. रामशेज ते गिरणारे अंतर ३४ किमी चे आहे.










