भूलभुलैया गुमटारा उर्फ घोटीवडा गड (Gumtara Fort Or Ghotivada Fort Trek)

साधारण ३ महिन्यांच्या दीर्घ अंतरानंतर ट्रेकला जात होतो आणि ते हि ऑक्टोबर हीट मधे. गुमटारा हा तसा  अपरिचित गड परंतु इतिहासकार श्रीदत्त राऊत असणार म्हणून मी हा मुद्दाम आधीच म्हणजे जुलै च्या सुमारासच बुक केलेला.कारण श्रीदत्त  दादाचा इतिहासाचा अभ्यास आणि व्यासंग अप्रतिम आहे .१४ ऑक्टोबर ला सकाळी ठरल्या वेळेप्रमाणे ६.३० वाजता कल्याण ने बस प्रवास सुरु केला. दुगाड हे गडाच्या पायथ्याचे गाव परंतु आम्ही गेलो ते मोहोली गावातून जी अत्यंत वळसा घालून जाणारी वाट आहे पण असे म्हणतात कि दुगाड पेक्षा कमी दमछाक करणारी वाट ह्या गावातून जाते मात्र मला हि सुद्धा दमछाक करणारीच वाटली अर्थात ऑक्टोबर हीट मुळे!!!

कल्याण पासून  गुमटारा गड ३६ किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे पोहोचण्यास कमी वेळ लागला आम्ही  ८ वाजता बरोबर आम्ही मोहोली गावात पोहोचलो.गावातल्या सरपंचांच्या घरी पोह्याचा अप्रतिम नाश्ता करून  साधारण ९.१५ च्या सुमारास श्रीदत्त दादा आणि आम्ही सर्वानी ओळख परेड नंतर गड चढायला सुरुवात केली. 
ह्या ट्रेक मध्ये एक गोष्ट श्रीदत्त दादाकडून शिकलो ती म्हणजे कुठल्या हि गडावर किंवा त्या पट्ट्यात फिरताना आजूबाजूच्या परिसराची पण माहिती घेणे आवश्यक आहे , गडकोट बांधण्यामागे किंवा तो नांदता का आहे हे तिथल्या आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीवर पण अवलंबून असते. गुमटारा भोवतीचा परिसर हा पूर्णपणे भाताची पिके घेतलेल्या शेतीने वेढलेला आहे.आणि तेवढेच  हा  गड दाट जंगलाने वेढलेला आहे.  पूर्वीच्या काळी ह्या गावातून मिळणारे उत्पन्न हे वसई परिसरापेक्षा नक्कीच जास्त असणार तेही भाताच्या शेतीमुळे हे  श्रीदत्त दादाच्या बोलण्यातून कळले. पण ह्या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष खूप आहे हे मला जाणवले आणि इतिहासात पण ह्याची नोंद आहे ती मी ऐतिहासिक माहिती लिहिताना नमूद करेल.   

                                          गावातून दिसणारा गुमटारा (डावीकडील डोंगर)
प्राथमिक सोप्या पायपिटनंतर आपल्याला एक पहिला मोठा खडा चढ लागतो जो खूप दमछाक करणारा आहे , आणि नंतरची वाट पण तशीच कधी नुसती सरळ तर कधी खडा  चढ असणारी आहे. ह्या वाटेने आपण डोंगराला वळसा घालतो हे सहज कळते .  पण एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे कृपया करून दुर्गा मित्रांनी ५ पेक्षा अधिकच्या समुहाशिवाय आणि वाटाड्या शिवाय ह्या किल्ल्यावर जाऊ नये,वाट चुकून जंगलात हरवण्याची  दाट  नाही मी म्हणेल १००  टक्के शक्यता आहे. आणि ह्या किल्ल्यावर तशी घटना नुकतीच घडली आहे ज्या मध्ये मनुष्य हानी झाली आहे . आपण पूर्ण वेळ अगदी किल्ला डोळ्या समोर येईस्तोवर जंगलातूनच जात राहतो ,
ह्या जंगलात बांबू ,केळीची  आणि सागाची झाडे आहेत. केळीची झाडे तर पदोपदी दिसतील आणि अत्यंत उंच झाडे आहेत. ३.३० तासाच्या दमछाक करणाऱ्या चढानंतर आम्ही किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश केला जिथे आपल्याला बुरुज लागतो आणि बाजूलाच तटबंदीचे अवशेष दिसतात.

                                                    मुख्य प्रवेशद्वाराजवळील बुरुज

                                            किल्ल्याच्या जवळून दात दिसणारे जंगल

प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूस ळल्यावर ४ खोदीव टाकी लागतात , गडावर आणखी अन्य २ टाकी आहेत आणि त्याशिवाय हि आणखी असतील पण गवतामुळे ती काही दिसली नाहीत. टाकी पाहून  पुन्हा मागे येऊन   सरळ वर थोडे चालत गेल्यात देविचे ठाणे आहे देवीच्या मूर्तीला लाल रंग फासला आहे.देवीची मूर्ती पाहून उजव्या बाजूला वळल्यावर भैरवाची मूर्ती आहे जिचे शीर नाही आहे.

                                                                     भैरवाची मूर्ती

                                                                        देवीची मूर्ती

                                                 ४५ अंशात तासून काढलेले खोदीव टाके

                                                                     इतर टाकी

बाकी गडावर विशेष काही अवशेष नाही दिसले ,कारण पुरुष भर उंचीचे गवत वाढले होते. असे म्हणतात कि बालेकिल्ल्यावर तटबंदीचे अवशेष आहेत. अशा प्रकारे घोटीवड्याची गडफेरी इथे पूर्ण होते. किल्ला पाहून झाल्यावर पुन्हा एकदा ३ तासाच्या पायपिटनंतर आम्ही गावात पोहोचलो आणि वडापाव हादडून परतीचा प्रवास सुरु केला.

किल्ल्याच्या इतिहासाबद्दल – ह्या किल्ल्याच्या ऐतिहासिक नोंदी फारशा सापडत नाही ,ऐतिहासिक संदर्भानुसार \”२४ मार्च १७३७ रोजी माहुली किल्ल्याच्या रानातून निघालेली मराठ्यांची टोळी घोटीवड्याच्या म्हणजेच गुमताऱ्याच्या रानात पहाटे येऊन पोहोचली. त्यांनी संबंध दिवस तेथेच काढला परंतु पाण्याचे दुर्भिक्ष आणि गर्मीमुळे हैराण टोळीतले २ ते ४ लोक मेलेही\”. ह्या संदर्भावरून स्पष्ट होते कि हा प्रदेश तेव्हा हि अति दुर्गम आणि पाण्याने समृद्ध नव्हता.
अजून एक ऐतिहासीक संदर्भ ह्या किल्ल्या बाबतीत सापडतो तो म्हणजे कामणदुर्ग किल्ल्याबाबत झालेला मैत्रीचा करार. हा करार पोर्तुगीझांचे किल्ल्यांचे व उत्तरेकडील प्रदेशांचे  कॅप्टन जनरल सिंज्योर मार्टिन द सिव्हैनरा द मिनेझीरा व कल्याणचे   आणि कोकणातील  किल्ल्यांचे सुभेदार श्री कृष्णराव महादेव ह्यांच्यात झाला.ह्या तहातील कलम क्रमांक ३ प्रमाणे \”मराठ्यांनीह्या युद्धात चंद्रवाडी (तांदुळवाडी),टकमक, कामणदुर्ग व बडागड ताब्यात घेतले , ह्यातला   बडागड हाच म्हणजे घोटीवडा किल्ला असावा. ह्या किल्ल्याला ह्याच्या विस्तारामुळे बडागड हि म्हणत. 
ह्या किल्ल्याबाबत सध्यातरी इतकीच माहिती उपलब्ध होत आहे , बाकी सर्व जर तर वर अवलंबून आहे.असा अंदाज आहे कि एप्रिल १६८३ साली संभाजी राजांनी केलेल्या उत्तर कोकणातील वसई -तारापूर मोहिमेत सुद्धा हा किल्ला स्वराज्यात असावा किंवा घेतला गेला असावा. येणाऱ्या काळात ह्या किल्ल्यावर अभ्यास होणे व तसेच संवर्धन होणे गरजेचे आहे अथवा हा किल्ला नामशेष होईल.
(इतिहास माहिती सौजन्य – श्रीदत्त दादाने ट्रेक मध्ये दिलेली माहिती व त्यांचेच पुस्तक 
वसई प्रांतांचे इतिहाससंपन्न दुर्गवैभव- श्रीदत्त नंदकुमार राऊत)       

Leave a comment