कोल्हापूर पट्ट्यातल्या आणखी ३ किल्ल्यांची सफर आपण मागील भागात केली आता वळूयात कोल्हापूर पट्ट्यातील ट्रेक मधल्या शेवटच्या २ किल्य्यांकडे. पारगड पाहून सकाळी ९ वाजता आम्ही कलानिधी गडाकडे निघालो ज्याला कलानंदीगड असे पण म्हणतात कारण ह्या किल्ल्याचा आकार बसलेल्या नंदीसारखा दिसतो म्हणून. महाराष्ट्राचे लाडके लेखक पु.ल.देशपांडे ह्यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते आणि त्यांचे पूर्वज गडाचे किल्लेदार होते असे कळले.गाव अतिशय शांत आणि सुंदर आहे.ह्या गावात उसाचे खूप मळे आहेत.गावातल्या शेतांच्या बाजूनेच किल्ल्याकडे मळलेली वाट आहे.मळलेल्या वाटेने आपण गावातल्या डांबरी रस्त्यावर येतो इथून पुढे थोडे झाडीतून मार्ग काढल्यावर चढाई सुरु होते.चढाईच्या आधी लाल माती टाकून रस्त्याचे काम चालू होते.साधारण ३० मिनिटाच्या सोप्या चढाईनंतर गडाचा प्रवेशद्वार व बुरुज लागतो.प्रवेशद्वार देखणे आहे प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मागचा भाग जिथे दूरधवनी टॉवर आहे आणि समोरचा भाग जिथे किल्ल्यातील मुख्य अवशेष दिसतात. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस २ मंदिरे दिसतात एक आहे भवानी मातेचे आणि दुसऱ्या मंदिरात शिवलिंग आणि भैरवाची मूर्ती आहे.ह्या मंदिरासमोरील काळ्या पाषाणातील गणेशाची मूर्ती अत्यंत रेखीव आहे.
प्रवेशद्वार
शिवमंदिर
गणेश
ह्याच मंदिरांपैकी एका मंदिरासमोर रेखीव तुळशी वृंदावन आहे. हे सर्व पाहून थेट डाव्या बाजूने गडाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली आणि गडाची तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहे हे दिसले.पुढे जाऊन उजव्या बाजूला वळल्यावर काही पडक्या वास्तूंचे अवशेष दिसतात.ह्या वास्तूंच्या पुढे दोन बुरुज लागतात ज्यावर जाता येते त्यातील दुसरा बुरुज ढासळला आहे.हे पाहून मी गडाच्या प्रवेशद्वारापाशी जाण्याआधी गडाच्या मध्यभागी असलेली मोठी विहीर पहायला गेलो , विहिरीचा आकार खूप मोठा आहे ह्या विहिरीने सामानगडाची आठवण करून दिली .
बुरुज
विहीर
विहीर पाहून मी प्रवेशद्वाराच्या समोर आल्यावर तिथे एक तोफ दिसली.तोफ पाहून गडाच्या मागच्या भागातल्या दूरसंचार टॉवर कडे गेलो.येथील तटबंदी व्यवस्थत शाबूत आहे.टॉवर च्या शेजारीच गडावरील पुरातन वाडा लागतो.वाडा पाहून व तटबंदी न्याहाळून कलानिधीगडाची छोटेखानी गडफेरी मी संपवली.
जुना वाडा
कलानिधीगडाची गडफेरी संपवून आम्ही सर्व गावात आमचा ट्रेकर मित्र वरुण च्या मित्राकडे जेवलो आणि ट्रेकमधला शेवटचा आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गंधर्व गडाकडे निघालो. गंधर्व गडावर पण वस्ती आहे त्यामुळे सर्व अवशेष लोप पावले आहेत.गंधर्व गडावर वरपर्यंत रस्ता जातो, गडावर गेल्यावर पहिले लागते ते नव्याने बांधलेले देवचाळोबा चे मंदिर.इथून पुढे सरळ गेल्यावर आपण डावीकडे वळायचे आणि पुन्हा सरळ जाऊन शेतांमध्ये पोहोचतो जिथे किल्ल्याची तटबंदी दिसते ह्या तटबंदीमधे मध्ये खाचा आणि कमानी आहेत.अक्ख्या तटबंदीत एक बुरुज शाबूत असलेला फक्त मला दिसला.ह्या व्यतिरिक्त गडावर विशेष अवशेष नाहीत.शेतांमध्ये टोमॅटोची शेती केलेली दिसली. दुर्दैवाने एवढुश्या छोट्या गडफेरीवर समाधान मानून माझा ट्रेक संपला आणि रात्रीच्या महालक्ष्मी एक्सप्रेसने मी कल्याण ला सकाळी आलो.
देवचाळोबा मंदिर
गंधर्व गडावरील अवशेष
बुरुज
गडांच्या इतिहासाबद्दल
कलानिधीगड – कलानिधी गड शिवरायांनी बांधला एवढाच काय तो उल्लेख सध्यातरी सभासद बखरीतून आपल्याला मिळतो.त्या खेरीज गडाच्या इतिहासाबद्दल माहिती सापडत नाही.
गंधर्वगड- हाही किल्ला सभासद बखरीनुसार महाराजांनी बसविलेल्या १११ किल्यांपैकी १ होय.२८ जुलै १६८७ च्या सुमारास काकती निर्यातीचा देसाई व हुके परगण्याचा देसाई आलगौडा ह्यांनी मोगलांच्या वतीने गंधर्व गड घेतल्याचा उल्लेख आहे. सदाशिव भाऊ कर्नाटक मोहिमेदरम्यान काही काळ ह्या किल्ल्यावर मुक्कामास होते.
इतिहास साभार – ट्रेकक्षितिज संस्था वेबसाईट (www.trekshitiz.com)








