दक्षिण प्रवेशद्वार बेळगाव रेंज ट्रेक – भाग २ (South Entrance Belgaum Range Trek Part-2)

बेळगाव भागातील पहिल्याच दिवसात  ३ किल्ले पाहून झालेले आणि ठरलेल्या रुपरेषेप्रमाणे चौथ्या  किल्ल्यासाठी संध्याकाळी ४.०० च्या सुमारास प्रस्थान केले ते येळ्ळूर चा किल्ला अथवा राजहंसगडाकडे. काकती किल्ल्यापासून राजहंसगड ४० किलोमीटर अंतरावर आहे.गाडी रस्त्याने थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते.सुमारे पाऊण तासाने आम्ही सर्व किल्ल्यापाशी पोहोचलो.आणि सर्वप्रथम लक्ष वेधून घेतले ते किल्ल्याची अप्रतिम तटबंदी आणि भक्कम बुरुजांनी.किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज आजही शाबूत आहेत आणि त्यांचे व्यवस्थित प्रकारे जतन सुद्धा केले आहे.

किल्ल्यावर पोहोचताचक्षणी किल्ल्याचे गोमुखी धाटणीचे प्रवेशद्वार लागते. गोमुखी प्रवेशद्वारामुळे किल्ल्याचा महादरवाजा लगेच दिसत नाही.शत्रूला चकवण्यासाठीची केलेली हि योजना होय.किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार अत्यंत देखणे आहे.प्रवेशद्वारापासून आत शिरल्यावर पहारेकरांच्या देवड्या लागलात.प्रवेशद्वरातून किल्ल्याच्या मुख्य भागात समोरच नव्याने बांधलेले महादेवाचे मंदिर लागते.मग किल्ल्याच्या मध्यभागातील वास्तू  पाहाव्यात,प्रथम आपल्याला लागते ती पाण्याची टाकी.सध्या हि टाकी जाळीने झाकली आहे.टाकीच्या आत कमानी आहे.

                                                                 गोमुखी प्रवेशद्वार

                                                                       प्रवेशद्वार

                                                                    पाण्याची टाकी

पाण्याच्या टाकी नंतर एक वास्तू लागते ती बहुदा धान्य कोठार असावी.धान्य कोठारानंतर जी वास्तू लागते तिला काय म्हणावे ते कळत नाही, आपण जे भूलभुलैया वगैरे म्हणतो त्या प्रकारची ह्या वास्तूची रचना आहे.हे सर्व पाहून मग किल्ल्याच्या दुसऱ्या टोकावरून तटबंदीवरुन पूर्ण किल्ल्याला फेरी मारावी. तटबंदी वरून चालत सुरुवात केल्यावर खाली पायऱ्या उतरून चोर दरवाजा पाहायला मिळतो.चोर दरवाज्याला  पायऱ्या असल्याने उतरून व्यवस्थत बुरुजाच्या खाली जाता येते. चोरदरवाजाच्याच बाजूला एक छोटी खोली आहे.चोरदरवाजा पाहून पुन्हा तटबंदीवर येऊन फेरी चालू ठेवावी.महादेव मंदिराच्या मागे आणखी एक छोटेखानी मंदिर व विहीर आहे.  तटबंदीच्या  फेरी नंतर ते पाहावे .

                                                                          धान्य कोठार

                                                             भूलभुलैया प्रकारात मोडणारी वास्तू

                                                   किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज
तटबंदीवरुन पूर्ण फेरा मारल्यावर किल्ल्याच्या चोरदरवाजाच्या वरील  तटबंदीवर पुन्हा जाऊन पहिल्यांदा किल्ल्यावरून मी सूर्यास्त बघितला.सूर्यास्त पाहताना आम्ही ट्रेकर मंडळी कमालीचे शांत झालो होतो.अविस्मरणीय क्षण होता तो.सूर्यास्त पाहून अंधार झाल्यावर पुन्हा मार्गी लागलो ते बेळगाव साठी मुक्कामाला.
(क्रमशः)  

                                                                     चोरदरवाजा

                                                                        सूर्यास्त

गडाच्या इतिहासाबद्दल-

हा किल्ला रट्ट घराण्यातील कोण्या राजाने बांधला असा अंदाज आहे. पुढे आदिलशाही काळात पर्शियन सरदार आसद अली खान ह्याने किल्ल्याला मुख्य स्वरूप दीले.ह्या किल्ल्यावर ३ लढाया झाल्याची नोंद आहे.पहिली पेशवे आणि सावनूरचे नवाब , दुसरी पेशवे आणि टिपू सुलतान आणि तिसरी भिवगड व राजहंसगड ह्यांच्या सैन्यात झाली.पेशवाईच्या काळात बहुदा जास्त घडामोडी हा किल्ला व आसपासच्या प्रदेशात झाल्या असाव्यात असा अंदाज वाटतो.

इतिहास सौजन्य- ट्रेकक्षितीज संस्था वेबसाईट    

Leave a comment