डोंबिवलीहून रात्री ११ वाजता निघून पहाटे ५.३० ला पाचाड ला पोहोचलो.नाश्ता वगैरे करून पुढे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गाडी रस्त्याजवळ उतरलो मात्र अप्पा आम्हाला चीत दरवाजाच्या पायरी रस्त्यामागे न नेता महाराज ज्या मार्गाने गडावर यायचे त्या नाणे दरवाज्यामार्गे नेणार होते.नाणे दरवाज्याचा मार्ग हा चित दरवाज्याच्या थोडा पुढे आहे व तो सहसा शत्रूला न कळवा ह्या हेतूने निर्माण केला असावा .सकाळी ७ च्या सुमारास नाणे दरवाज्याच्या दिशेने प्रयाण केले.ह्या मार्गाबाबत अप्पांनी सांगितलेली माहिती म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी रायगडवाडी ला पोहोचल्यावर महाराज उतरून पुढे पालखीत बसून महत्वाच्या व्यक्तींसोबत नाणे दरवाज्यामार्गे रायगडात प्रवेश करत.पण ह्या मार्गाने त्यांच्याबरोबर महत्वाच्या व्यक्ती आणि अंगरक्षकच येत.
नाणेदरवाज्याकडे जायचा मार्ग नाणेदरवाजा
नाणेदरवाज्याचे छप्पर उडालेले आहे मात्र कमान पूर्णतः शाबूत आहेत नाणेदरवाज्याला लागून मोठा बुरुज आहे.हा दरवाजा पण गोमुखी बांधणीचा आहे. दरवाज्याच्या दोन्ही बाजूस देवड्या आहेत त्यातील एका देवडीत मारुतीची वीरश्री स्वरूपातील मूर्ती आहे . नाणेदरवाज्यात शिरताना स्वर्गात फिरल्यासारखे भासत होते कारण ढग खाली उतरून अक्ख्या मार्गात ये जा करत होते आणि आजूबाजूचा परिसर पावसाच्या बारीक सरींनी बहरून आलेला.इथून पूढे गेल्यावर कच्चा दगडांचा मार्ग लागतो ह्या मार्गाने आपण समांतर असलेल्या पायरीमार्गाला भेटतो जो चित दरवाज्याचा मार्ग आहे.चित दरवाज्याच्या मार्गावर मिळण्याआधी आपण वाळसुरे खिंडीतून जातो. इथून थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला मदार मोर्चा म्हणून जागा लागते इथे सहसा कोण जात नाही कारण कोणाला माहित पण नाही आहे कि इथे मदार मोर्चा नावाची चौकीची जागा आहे.ह्या ठिकाणी एक दगडी चौथरा आहे आणि बाजूलाच काही दगडाचे अवशेष आहेत जे देवीच्या मंदिराचे आहेत असे अप्पांच्या सांगण्यावरून कळले.मदारमोर्च्याच्या डाव्याबाजूला आपल्याला टकमक टोक दिसते.
टकमक टोकाचे विहंगम दृश्य पाहून पुढे निघालो ,पायरी मार्गाने चढत असताना दोन महाकाय बुरुजांनी स्वागत केले.बुरुजाला वळसा घातल्यावर दिसला तो महादरवाजा ज्यातून आम्ही मुख्य किल्ल्यात प्रवेश करणार होतो.गोमुखी पद्धत असल्याने अजिबात कळत नव्हते कि पुढे दरवाजा आहे.
गोमुखी बांधणी महादरवाजा
महादरवाज्या वरती शरभ शिल्प आहेत. दरवाज्यातून आत शिरल्यावर दोन बुरुज आणि तटबंदी लागते हे बुरुज शिर्क्यांनी बांधले आहेत असे समजले जेव्हा किल्ला रायरी च्या नावाने ओळखला जात होता.
तटबंदीची सुरेख बांधणी
पुढे चालत गेल्यावर आपल्याला पुढील वास्तू लागते ती हत्ती तलाव आणि हत्ती तलावाच्या समांतर थोडे उंचावरती हनुमान टाके आहे ज्यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे.हि समांतर टाके किंवा तलाव बांधण्याची पद्धत पूर्णपणे दर्शवते कि महाराज पाण्याच्या एक एक थेंबाबाबत किती जागरूक असतील,कारण वरतून आलेले पाणी वाहत पुन्हा खालच्या टाक्यात साठवले जाई. टाके पाहून उजव्या बाजूला वळल्यावर आपण पोहोचतो ते शिरकाई देवीच्या मंदिरापाशी. हे मंदिर शिवकाळातील आहे.मंदिर छोटेखानी आणि अत्यंत देखणे आहे. देवीची मूर्ती अष्टभुजाधारी आहे.मंदिराच्या मागे सती शिळा ठेवलेल्या आहेत.अप्पांच्या मते हि सतीशिळा पुतळा राणीसाहेबांची असावी परंतु ह्याला सध्यातरी लिखित पुरावा नाही.
शिरकाई देवीचे मंदिर पाहून मागे रायगड ची एक वेगळीच खासियत आहे ती म्हणजे तटबंदी , त्याला लागून असणारे मनोरे आणि समोर असणारा गंगासागर तलाव.गंगासागर तलावाचे पावसाळ्यातील दृश्य विहंगम होते.लांबूनच आम्हाला पालखी दरवाजा हि दिसत होता.पालखी दरवाज्याच्या मार्गाने फक्त राजस्त्रिया आणि दासींना प्रवेश होता असे अप्पांच्या सांगण्यावरून समजले.
मनोरे आणि पालखी दरवाजा
गंगासागर तलाव
पालखी दरवाजा
गडाच्या इतिहासाबद्दल- रायगडाचे पूर्वीचे नाव हे रायरी होते त्यामुळे महाराजांनी रायरी घेतला तो त्यांच्या जावळीच्या मोहिमेत.जेधे शकावली च्या नोंदीनुसार दुर्मुख संवत्सर शके १५७८ वैशाख मास (म्हणजेच १५ एप्रिल १६५६ ते १४ मे १६५६) चंद्रराव किलियावरून अर्थात रायरी वरून उतरले.म्हणजे महाराजांनी मे १६५६ साली रायरी घेतला व १६६८ साली राजधानी साठी आजच्या भाषेत त्याचा सर्वे करण्यासाठी आणि १६७० साली वास्तुशांतीसाठी रायगडावर आल्याची नोंद आहे.
आता वळूयात किल्ल्यावर असणाऱ्या मदारमोर्चा अथवा मदारमाची ह्या वास्तूसंबंधी असणाऱ्या नोंदींवरती.हि एक प्रकारची चौकी होती हे मी वरती म्हंटलेच होते त्यानुसार ह्या चौकीचा संदर्भ ऐतिहासिक संकीर्ण साहित्य ह्या ग्रंथातील १७७९-८० नोंदींनुसार पेशव्यांच्या नूर महंमद बाणदाराने चित दरवाज्यापाशी झुंज देऊन मदार चौकीवर बाण मारले आणि पोतनीसांची अर्थात रायगडकऱ्यांची चौकी उद्धवस्थ केली. आता अर्थात हि लढाई का झाली कशाला झाली ह्याचा काही संदर्भ मिळत नाही, मला वाटते हा बंडाचा एक प्रकार असावा कारण तेव्हा किल्ला पेशव्यांच्या हातात नव्हता हे उपरोक्त नोंदीवरून कळते.ह्याच ग्रंथात ह्याच वर्षी म्हणजे १६७९-८० दरम्यान पहाऱ्याचे बांधकाम झाले व तसेच मुसळधार पाऊस पडल्याने नुकसान झाल्याची नोंद आहे.
तुम्ही जर हि चौकी बघाल तर आज तिची अवस्था बिकट आहे आणि कोणाला माहित हि नाही कि अशी एक विशिष्ट चौकी रायगडावर अस्तित्वात आहे.ह्या चौकी चे भौगोलिक स्थान पाहता टकमक टोकाच्या खालच्या भागातून मारा करण्यासाठीची किंवा टकमक टोकाला समांतर राहून गडाखाली मारा करण्यासाठी हि चौकी असावी असे वाटते .खरं तर रायगडाची प्रत्येक अशी वस्तू खूप इतिहासाने संपन्न आहे फक्त अभ्यासूंनी इतिहास्कारांबरोबर बघून अजून लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.पुढील भागात आणखी ऐतिहासिक माहिती बघू.
क्रमशः
ऐतिहासिक संदर्भ – जेधे शकावली , ऐतिहासिक संकीर्ण साहित्य नोंद १७७९-८०, अप्पा परब लिखित रायगड स्थळदर्शन हे पुस्तक.








खूप चांगला उपक्रम मेघन जी, खूप खूप आभार तुम्ही स्वतः रायगडावर जाऊन त्याबद्दल लिहिण्यासाठी वेळ काढलात , जय जिजाऊ जय शिवराय….
LikeLike
धन्यवाद !!
LikeLike
Nice yaar
LikeLike
Thanks
LikeLike
सुरेख लेखन
LikeLike
धन्यवाद आपले नाव नाही समजले
LikeLike
सुंदर लेखांकन
LikeLike
धन्यवाद
LikeLike
फार छान माहिती.
LikeLike