राण्यांचे महाल
शौच्च कुप
सरकारी कार्यालयांच्या वास्तू
दासींच्या घरांचे अवशेष
ह्या वास्तू पाहून झाल्यावर आपण पोहोचतो ते किल्ल्यातील एका महत्वाच्या वास्तूकडे ती म्हणजे अर्थात महाराजांच्या महालाकडे .महाराजांचा महाल हा पाहताक्षणी भव्य अथवा मोठा वाटू शकतो परंतु नीट पहिले असता प्रवेशद्वार ते शेवटच्या भिंतींच्या मध्ये विभाजन केले गेले आहे.कारण जी भिंत आपल्याला दिसते ती राजसभेची मागची बाजू आहे.महाराज राजसभेत मागच्या दरवाज्याने जात आणि ते खरेही वाटते कारण ज्या दरवाज्यातून महाराज राजसभेत जायचे त्या दरवाज्याला बाजूने नक्षीकाम केले आहे अर्थात आता मात्र तो दरवाजा बुजवलेला आहे. महाराजांच्याच बाजूला युवराज संभाजी राजांचा महाल आहे.महाल पाहिल्यावर एक मात्र जाणवते आपले राजे जे मराठ्यांचे सर्वेसर्वा होते छत्रपती होते त्यांचे निवासस्थान किती साधे होते.महालाच्याच बाजूला महाराजांच्या स्नान संध्येची जागा आहे.हे पाहून आपण जिथे गडावर नाणी पडली जायची त्या टांकसाळ च्या वास्तू कडे येऊन पोहोचतो.ह्या वास्तूच्या मागे मनोरे दिसतात.टाकसाळ पाहून सरळ राजभवनाकडे जायचे वाटेत खलबतखाना म्हणजे गुपित मसलतीची जागा लागते ह्या ठिकाणी तळघरात जाण्यासाठी एक छोटा चोर दरवाजा आहे , अप्पांच्या मते हि खलबतखान्याची जागा नसून महत्वाचा खजिना अर्थात सोने नाणी ज्याला आपण आजच्या भाषेत Treasuryअसे म्हणू शकतो ती जागा आहे कारण मी स्वतः दरवाज्यातून खाली उतरलो तर फार फार तर एक किंवा दोन माणसे तिथे राहू शकतात.मात्र हा दरवाजा खलबतखान्याच्या एका कोपऱ्यात तळघरात आहे त्यामुळे खलबत मुख्य खोलीत देखील होऊ शकते असे मला वाटते बाकी शेवटी इतिहास जाणे.
महाराजांचा वाडा
अंघोळीची जागा
टाकसाळ
खलबत खाना
खलबत खाना पाहून पुढे सरळ जायचे बाजूला तटबंदीच्या लगत काही वस्तूंचे अवशेष दिसतात हे बहुधा कागदपत्र ठेवायची जागा असावी.हे पाहून आपण राजसभेत पोहोचतो जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला.समोरच महाराजांचा बैठकीतील पुतळा मेघडंबरीत बसवला आहे.समोर भव्य प्रवेशद्वार आहे व त्यावरती नगारखाना आहे.नागारखान्यावर कमलपुष्प आणि शरभ शिल्प कोरले आहे. आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूस देवड्यांची व्यवस्था केली आहे.नगारखान्याच्या आधी राजसभेत एक मोठा खडक आपल्याला दिसतो ह्याच खडकावर महाराजांना विविध नद्यांच्या पाण्याचा अभिषेक घालण्यात आला. नगारखाना ओलांडून पुढे डावीकडे वळायचे तेव्हा आपण होळीच्या माळावर पोहोचतो येथे सध्या महाराजांचा सिहांसनाधिष्ठ पुतळा उभारला आहे.पुतळा पाहून आम्ही सरळ न जात डाव्या बाजूनेच खाली उतरून मुक्कामाच्या ठिकाणी जेवायला गेलो.तेव्हा दुपारचे जवळपास दीड वाजले होते.
मेघडंबरीतील महाराजांचा पुतळा
नगारखाना
होळीच्या माळावरील शिवरायांचा पुतळा
जेवण करून झाल्यावर अर्ध्या तासाच्या वामकुक्षीनंतर परत एकदा आम्ही अप्पांसोबत गड फिरायला सुरुवात केली.जिथे आम्ही राहत होतो ती जागा होळीच्या माळाच्या उजव्या बाजूला खाली होती तिथूनच सरळ पुढे चालत आल्यावर आपल्याला काही समाध्यांचे चौथरे लागतात ह्या समाध्या मोरोपंत पिंगळे व येसाजी कंक ह्यांच्या होत.तिथूनच पुढे सरळ गेल्यावर वाडेश्वर मंदिराच्या अलीकडे मोरोपंतांच्या वाड्याचे अवशेष सापडतात.हे पाहून सरळ चालत आल्यावर किल्ल्यावरील जगदीश्वर मंदिरानंतचे प्रसिद्ध असलेले वाडेश्वर मंदिर लागते.वाडेश्वर मंदिर हे चौरस आकारात बांधलेला छोटेखानी मंदिर आहे परंतु त्यावरचा कळस हा उध्वस्त अवस्थेत आहे.वाडेश्वर मंदिराच्या समोर कुशावर्त नावाचा तलाव बांधला आहे.
मोरोपंतांचा वाडा
श्री वाडेश्वर मंदिर
कुशावर्त तलाव
क्रमशः
गडावरील काही वास्तूंसंबंधी टीप- रायगडावरती छोट्या मोठ्या मिळून किमान ३५० वस्तू असाव्यात असे श्री अप्पा परब व तसेच अनेक इतिहासकारांचे मत आहे.त्यातल्या बऱ्याच मुख्य वस्तू आपणास माहित आहेत उदा:गंगासागर तलाव ,जगदीश्वर मंदिर,राणीवसा इत्यादी.परंतु मी काही वास्तूंचा वर उल्लेख केला आहे उदाहरणार्थ मोरोपंतांचा वाडा किंवा येसाजी कंक ह्याची समाधि इत्यांदिबंद्दल माहिती हि तशी उपलब्ध नाही जी काही माहिती मला समजली ती श्री अप्पांच्या गड फिरताना सांगितलेल्या माहितीवरून समजली.त्यासाठी श्री अप्पा परब ह्यांचे किल्ले रायगड स्थळ दर्शन हे पुस्तक आवर्जून वाचा कारण अप्पांनी १० वर्ष आयुष्याची रायगड संशोधनात घालवली आहेत.परंतु तरीही एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून आपण संशोधन करून आणखी पुराव्या निशी ह्या वास्तूंच्या सत्यतेची तपासणी करणे तितकीच गरजेची आहे आणि त्यासाठीच अप्पांसारख्या ज्येष्ठ इतिहासकारांची पुस्तके व्याख्याने आपल्याला कामी येतील. ह्या वास्तूंचे चौथरे आणि काही भिंती उभ्या असल्या तरी त्या दुर्लक्षित आहेत त्यामुळे त्याचेही संवर्धन होणे गरजेचे आहे.
संदर्भ- रायगड स्थळ दर्शन – श्री.अप्पा परब














