हिरोजी इंदुलकर अर्थातच ज्यांनी रायगडाचे निर्माण केले हे त्यांचे नाव.महाराजांनी रायगडावरचे बांधकाम पूर्ण झाल्यावर खुश होऊन हिरोजींना आपणास काय हवे आहे असे विचारल्यावर हिरोजींनी वरील मथळ्याचा शिलालेख असल्याचा दगड बांधू द्यावा अशी विनंती केल्याची कथा इतिहासात प्रसिद्ध आहे.
बाजारपेठ
शिलालेख
ह्या शिलेखाशिवाय बाजूलाच वरच्या अंगाला संस्कृतमधील शिलालेख कोरण्यात आला आहे.हा शिलालेख पुढील प्रमाणे –
श्री गणपतये नम
: ।
प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया
श्रीमच्छत्रपते
शिवस्यनृपते
सिंहासने तिष्ठत
:।
शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे
ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ।।१।।
वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ
स्तभे
कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते ।
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो
यावन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।।२।।
ह्या शिलालेखाचा मराठी अर्थ थोडक्यात-
’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे, ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’
हा शिलालेख गडाच्या बांधकामा बद्दल माहिती आपल्याला देऊन जातो.सुदैवाने रायगड असल्याने ह्या दोन्ही शिलालेखांना अजूनतरी शेंदूर अथवा चुना फासला गेलेला नाही.ह्या शिलालेखाच्या समोर महाराजांची समाधी आहे. आणि ह्या समाधीच्या मागे दंतकथेतील वाघ्या कुत्र्याची समाधी आहे जो महारांचा आवडता कुत्रा होता असे म्हंटले जायचे परंतु ह्याला ऐतिहासिक आधार नाही.
महाराजांची समाधी
जगदीश्वराचे दर्शन घेऊन आम्ही सर्व निघालो दिवसातल्या शेवटच्या स्थळाकडे अर्थात टकमक टोक किंवा टकमक कड्याकडे .गुन्हेगारांना शिक्षा म्हणून ह्या टोकावरून खाली दरीत लोटले जाई.टकमक टोकाला जाण्याच्या मार्गात दारूगोळ्याच्या कोठाराचे अवशेष लागतात. हे दारुकोठार मुद्दाम किल्ल्याच्या दुर्गम भागात आहे कारण जर काही वाईट झाले आणि कोठाराला आग लागली तर मुख्य गडातील रहिवाशांना काही इजा पोहोचू नये ह्या साठीची हि रचना.टकमक टोकाला जाताना रेलिंग जरी लावले असले तरी वाट निमुळती असल्याने जपून जावे .पावसाळ्यात हा कडा विलोभनीय पण तेवढाच थरकाप उडवणारा वाटतो.पावसाळ्यात ऊन पाऊस आणि त्याच वेळेला ढगांचा खेळ चालू असतो.टकमक टोक पाहून आम्ही सर्व आमच्या निवासस्थानाकडे होळीच्या माळामार्गे गेलो तेव्हा माळावरील महाराजांचा पुतळा धुक्याच्या गर्दीत पण उठून दिसत होता असे वाटले महाराज निवांत शांत बसले आहेत आणि सर्व पहात आहेत.
टकमक टोकाआलीकडील दारुगोळ्याचे कोठार
टकमक टोकावरून दिसणारा ऊन- पावसाचा खेळ
दुसऱ्यादिवशी सकाळी उठून उरलेली छोटेखानी फेरी सुरु केली आणि दोन अशा वास्तू बघितल्या ज्यातील एक तर परिचित आहे आणि दुसरी मात्र मला अनमोल ठेवा वाटली.अप्पांनी मोरोपंतांच्या वाड्यावरून सरळ एका उंचवट्यावर नेले.आणि परत एक छोटेखानी झऱ्याजवळ उतरून जायला सांगितले ,तिथे पोहोचल्यावर एक दुर्लक्षित न कोणी पाहिलेली गुहा पाहायला मिळाली.चिखलाच्या साम्राज्यामुळे मी आत नाही गेलो परंतु जेव्हा गुहेचे फोटो पहिले तेव्हा अचंबित व्हायला झाले.हि गुहा म्हणजे एक छुपा भुयारी मार्गच असावा कारण आत गेल्यावर दोन मार्ग लागतात परंतु चिखल आणि दुर्लक्षतेमुळे अजून पुढे जाता येत नाही.ह्या ठिकाणी आपण रायगडाच्या पोटात असल्याचा भास होतो.
हे सर्व पाहून पुन्हा थोडे वर आल्यावर समोर पोटल्याचा आणि काळकाईचा डोंगर पाहायला मिळतो.मी गेलो तेव्हा ढग शिखरांवरती आले होते त्यामुळे समोरचे दृश्य विलोभनीय दिसत होतो.
पोटल्याचा डोंगर सर्वात पुढचा व त्याच्या मागचा काळकाईचा डोंगर
हिरकणी बुरुज
हिरकणी बुरुजावरील तोफा
रायगडावरीळ ब्लॉग्स हे थोडे मोठे आणि ३ भागात झाले आहे ह्याची मला कल्पना आहे.मात्र मी जे पहिले ते नुसते वरवरचे लिहिण्यात मजा नव्हती.हि महाराष्ट्राची शान मराठ्यांची राजधानी खरे तर खूप श्रीमंत आहे, निश्चितच तिला पूर्वी इतके वैभव नसेलहि पण जे काही आज आपण पाहतो अनुभवतो आणि मग इतिहास वाचतो तेव्हा महाराजांचा सहवास आणि ह्या वास्तूशी असलेला घनिष्ठ संबंध जाणवल्याशिवाय राहवत नाही.मग ते राजभवन असो किंवा महाराजांचा वाडा असो किंवा गंगासागर तलावाचा परिसर असो. रायगडाची हि श्रीमंती अशीच राहावी हीच जगदीश्वराचरणी प्रार्थना.
संस्कृत शिलालेख व त्याचा अर्थ WWW.TREKSHITIZ.COM ह्या वेबसाईट वरून घेतला आहे.










