पायथ्यापासून दिसणारा माहुली किल्ला नवरा आणि नवरी सुळक्यांसह
पायवाट हि दमछाक करणारी आहे आणि तुमच्या सर्वांगाचा व्यायाम करवून घेणारी आहे.सरळ चालत मध्ये वळसा घेत आपल्याला दोनदा लोखंडी रेलिंग्स लागतात. दुसरे रेलिंग हे एका पठारावर आहे.पठारावरचे रेलिंग आले कि आपण किल्ल्याच्या शिडीच्या वाटेच्या जवळपास पोहोचतो.इथून पुढे वाट कठीण नसली तरी सावकाश जावे कारण वाट निमुळती आहे आणि एक एक पाऊल थोडे उंच टाकावे लागते.पठारापासून सरळ चढत नंतर उजवीकडे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जाण्यासाठी लावलेल्या शिडीजवळ पोहोचतो. शिडी व्यवस्थत लावली आहे परंतु तरीही एका वेळीस दोन माणसांनीच जावे आणि अर्थात न थांबता खास करून सेल्फी वगैरे न काढता सरळ वरती जावे.शिडीवर जाण्याआधी मी टेहळणी सदृश्य जागेवर बसून माहुलीचा अक्खा परिसर न्याहाळला.दोन तासाचा पूर्ण थकवा निघून गेला.
किल्ले माहुलीचा निसर्ग सर्वोच्च माथ्यावरून
शिडी चढून मी किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. येथून डावीकडे थोडी मोकळी जागा आहे तिथे सध्या भगवा झेंडा लावला आहे. माहुली किल्ला ,पळसदुर्ग आणि भांडारदुर्ग एकत्र पहिले जातात. ह्यातील माथ्यावरील भाग अर्थात म्हणजे सुळक्यांच्या डोंगर रांगेतील मध्यभाग म्हणजे माहुली किल्ला, माथ्याच्या उजवीकडील भाग हा पळसदुर्ग आणि डावीकडील भाग हा भांडारदुर्ग होय.पळसदुर्गावर जायला रोप आणि इतर प्रस्तरारोहणाचे साहित्य लागते.आम्ही माहुली आणि भंडारदुर्ग किल्ले केले. ठरल्याप्रमाणे माथ्यावर पोहोचून उजवीकडे वळायचे आणि थोडे खाली उतरून आपण गडाच्या मुख्य दरवाज्यासमोर पोहोचतो.बहुतांशी किल्ला चढताना आपल्याला दरवाजा लागतो आणि आपण किल्ल्यावर शिरतो परंतु माहुलीच्या बाबतीत आपण माथ्यावरून उतरून जाऊन दरवाजा पाहतो.कदाचित ही वाट कालौघात किंवा ब्रिटिशांनी सुद्धा नष्ट केली असावी..दरवाजाच्या बाजूला पहारेकरांच्या देवड्या आहेत. दरवाज्याची कमान तुटलेली आहे आणि दरवाज्याच्या खाली नक्षीकाम केलेले शिल्प आणि शरभ शिल्प ठेवले आहे. महादरवाज्यासमोर बुरुज आहे आणि काही तुटलेल्या पायऱ्यांचे अवशेष आहेत.
महादरवाजा
शरभ शिल्प
हे पाहून वरती आल्यावर एक छोटे तळे लागते ह्या तळ्याच्या वर सध्या महाराजांची सुरेख छोटी मूर्ती स्थापित केली आहे.येथूनच डावीकडील वाट पळसदुर्गाकडे जाते.आल्या वाटेने पुन्हा माहुलीच्या माथ्यावर आलो आणि भांडारदुर्गाकडे रवाना झालो.
भांडारदुर्गाकडे जाताना सरळ चालत गेल्यावर मधेच डावीकडे वळावे तेथे आपल्याला राजसदर चे अवशेष पाहायला मिळतात.मी गेलो तेव्हा पावसाळा सुरूच असल्याने राजसदर दुर्दैवाने दाट झाडींनी व्यापली होती.राजसदरेच्या वाटेत आपल्याला एक सुंदर शिल्प पाहायला मिळते मला ते शिल्प छोट्या कबरीचे वाटले परंतु आकारामुळे लक्षात येत नाही कि कबर आहे अथवा आणखी काही. कबरीवर सुरेख बाण रेखाटला आहे. राजसदर पाहून परत सरळ चालने चालू ठेवल्यावर वाटेत गडावरील माहुलेश्वर महादेवाचे मंदिर लागते.सध्या मंदिर पूर्णतः उध्वस्त अवस्थेत आहे.मंदिरावरचे छप्पर उडालेले आहे मात्र चबुतरा अजून पण शाबूत आहे.मंदिराच्या चबुतऱ्याच्या खाली कमानी मध्ये एक उध्वस्त देवतेची कोरीव मूर्ती आहे, बहुदा ती मारुतीची असावी. मंदिर पाहिल्यावर लगेच डावीकडे तलाव लागतो.तलावानंतर थोडी तंगड तोड केल्यावर किल्ल्यावरील दुसऱ्या शिडीपाशी येतो हि शिडी भंडारदुर्गाच्या मुख्य माथ्यावर घेऊन जाते.भंडारदुर्गाच्या मुख्य माथ्यावर मी दोन पाण्याची टाकी पहिली जी वाटेत कल्याण दरवाजाच्या मार्गात लागतात.येथून कल्याण दरवाज्याची पाटी आपल्याला दिसते मात्र तेथे जाण्यासाठी रोप आणि गिर्यारोहणाचे साहित्य अवगत असणे आवश्यक आहे कारण हि वाट अवघड आहे.
माहुलेश्वर मंदिर
भांडारगडाच्या माथ्यावर जाणारी शिडीची वाट
कबर सदृश्य शिल्प
कल्याण दरवाज्याच्या पाटीपासून पुढे उजवीकडे वळल्यावर सरळ चालत गेल्यावर शेवटी आपण पोहोचतो ते नवरा-नवरी आणि वजीर सुळक्यांच्या समोर. लांबून दिसणारे हे सुळके जवळून अधिकच राकट आणि रांगडे भासतात. येथून माहुलीची वनराई आपले मन मोहून टाकते.ह्या सुळक्यांची नावे अशी का पडली ह्याची काही माहिती सापडत नाही.सुळके पाहून आणि आजूबाजूचा निसर्ग पाहून परतीला लागलो.वाटेत जेवून गड उतरायला सुरुवात केली.मी मुद्दाम पुन्हा सांगेन गडावर पहिल्यांदा जाताना शक्यतो वाटाड्या घ्या आणि खूप आरामात चढा त्यासाठी लवकर चढायला सुरुवात करावी आणि शक्यतो उन्हाळ्यात ह्या गडावर जाऊ नये.
नवरा नवरी सुळके आणि एकदम उजवीकडचा वजीर (फोटोत छोटा दिसतो आहे तो)
मी आणि नवरा नवरी
गडाच्या इतिहासाबद्दल-हा मूळ किल्ला कधी बांधला ते अजूनतरी कळले नाही परंतु १५ व्या शतकात हा निजामशाहीकडे होता. नंतर निजामशाही खिळखिळी होण्याच्या अवस्थेत असताना इ.स १६३५-३६ मध्ये शहाजी राजांनी बाल शिवाजी व जिजाबाईंना सुरक्षेच्या कारणामुळे स्वतःसह माहुलीला आणले. १६५८ ला महाराजांनी हा किल्ला घेतला परंतु पुन्हा १६६१ साली तो मोगलांकडे गेला , पुन्हा एकदा तो स्वराज्यात आला आणि १६६५ साली पुरंदरच्या तहात मोगलांकडे गेला. फेब्रुवारी १६७० साली खुद्द महाराजांच्या नेतृत्वाखाली आक्रमण होऊनही किल्ला हाती आला नाही परंतु मोरोपंतांनी त्याच वर्षी जुन १६७० ला किल्ला स्वराज्यात आणला. नंतर मात्र हा किल्ला स्वराज्यात फार काळ नव्हता आणि औरंगजेब दक्षिणेत आल्यावर सतत ह्या किल्ल्याच्या आसपास वेढ्याच्या अथवा लढायांच्या घटना घडल्याच्या पुष्कळ नोंदी सापडतात.
असा हा किल्ला मराठ्यांकडे ये जा ये जा करत होता तेही थेट १८३५ पर्यंत इंग्रजांबरोबर तह होईस्तोवर.सुळक्यांचा राजा माहुली आजही इतिहासाची साक्ष देत भग्नावस्थेतल्या अवशेषांसह तग धरून उभा आहे.
इतिहास साभार-ट्रेकक्षितिज संस्था वेबसाईट.










मित्रा फार सुंदर माहिती लिहिली आहे असे वाटले की आम्ही किल्ल्यावर आहोत.
LikeLike