चांदवड रेंज ट्रेक भाग १ [किल्ले कंचना ,मंचना आणि राजधेर- Kanchana ,Manchana And Rajdher Fort]

निजामशाही पासून ते आदिलशाही आणि  मुघलांपर्यंत  ज्या पट्ट्यात आणि मुख्यतः शिवकाळात खूप साऱ्या घडामोडी जेथे घडल्या तो पट्टा म्हणजे नाशिक-बागलाण चा. ह्याच नाशिकच्या थोडं  पुढे चांदवड भागातील डोंगराळ भागात उत्तमोत्तम किल्ले आजही आपल्या अस्तित्वासह दिमाखात उभे आहेत.त्यातील ५ किल्ल्यांची सफर मी येणाऱ्या २ किंवा ३ भागात मांडणार आहे.नेहमीप्रमाणे ट्रेकक्षितिज सोबत डोंबिवलीहून प्रवासाला सुरुवात करून पहिले दोन जोड किल्ले कंचना आणि मंचना ह्यांच्या पायथ्याच्या खेळदरी गावात  पोहोचलो.
खरं म्हणजे हे जोड किल्ले कांचन गावापासून अधिक जवळ आहे परंतु रस्ता चांगला नसल्याने आम्हाला खेळदरी गावात यायला लागले त्यामुळे उशीरही झाला. असो गावातून दोन्ही किल्ले उत्तम रित्या दृष्टीपथात येतात.
किल्ल्याला जायला असलेली वाट हि गावकऱ्यांना विचारूनच शोधावी फक्त एवढच लक्षात ठेवायचे कि कांचनाच्या सुळका हा कायम चालताना उजवीकडे ठेवायचा.आम्ही गावकऱ्यांनी सांगितलेल्या वाटेने चालू लागलो थोडा ठराविक सोपा चढ चढल्यावर छोट्या पठारावर पोहोचलो . इथे एक जुने देवीचे मंदिर आहे ज्यावर पत्र्याची शेड टाकली आहे.मंदिराचे  खांब आणि भिंत पुरातन काळातील आहे.जरी मंदिराला रंग दिला असला तरी मंदिराचे दगड आणि खांब त्याच्या पुरातन काळाची साक्ष देतात.बहुदा हे मंदिर नंतर वेगवेगळी दगड रचून नजीकच्या काळात कोणीतरी उभे केले असेल कारण भिंतींमध्ये वीरगळींची दगडं पण पाहायला मिळतात.
                                                     पायथ्यापासून दिसणारा कंचना आणि मंचना
                                                             गडावरील देवीचे मंदिर 
हे पाहून सरळ वाटेने चालत राहायचे आणि वळसा घालून उजवीकडे वळायचे.गुरांनी केलेल्या वाटेने चालत राहिल्यावर सुळक्याच्या बरोबर खाली आपण पोहोचतो.इथून झिगझॅग चाल करत करत एक सरळसोट चढ चढल्यावर कांचन किल्ल्याच्या माथ्यावर आपण पोहोचतो जिथे विशाल पाण्याची टाकी आहेत.हि टाकी पाहून समोर मंचना किल्ला आहे.टाक्यांच्या उजव्या बाजूला पायऱ्यांच्या खुणा दिसतात. त्याच्याच समोर कोनाडा असल्याची खून हि कोरलेली दिसते परंतु हि देवड्यांची खून आहे किंवा दरवाज्याची हे मात्र समजत नाही.परंतु एकंदर रचना पाहता हे उध्वस्थ प्रवेशद्वार असावे असे वाटते.कंचनावर वास्तू असल्याच्या खूप खुणा सापडतात. हे पाहून मी सरळ चालत मंचनापाशी पोहोचलो. मंचनावर सध्या काहीही अवशेष शिल्लक नाहीत. मला एकमेव दगड दिसला जो किल्ल्यावरील वास्तूचा असावा असे वाटले.परंतु मंचना सुळक्याच्या खाली तटबंदीचे अवशेष आहेत असे म्हंटले जाते. हे दोन्ही किल्ले टेहळणी साठी वापरात असले पाहीजे.

                                                                 पाण्याचे टाके कंचना

                                                        कंचना वरून दिसणारा मंचना

कंचना किल्ला पाहून झाल्यावर पायथ्याच्या गावी येऊन जेवलो आणि दिवसातल्या दुसऱ्या किल्ला बघण्यासाठी किल्ल्याचे पायथ्याचे गाव राजधेरवाडी कडे निघालो.सकाळी उशिरा पोहोचल्याने राजधेरवाडीला पोहोचायला ३ वाजले. राजधेरवाडी गाव अत्यंत सुंदर आणि स्वच्छ आहे , असे पण समजले कि पाणी फाऊंडेशन च्या वॉटर कप स्पर्धेत गावाने पुरस्कार पटकावला होता. सुस्त अवस्थेत ३.३० ला किल्ला चढायला सुरुवात केली. उन्हाचा चटका खूप जाणवत होता असे वाटत होते परतावे आणि गावात अराम करावा. पण हळू हळू सावकाश सावकाश पावले टाकत किल्ला जवळ करू लागलो त्यात आमचे मनोरंजन करायला आम्हाला किल्ला दाखवणारे राजधेरवाडीतले जाधव मामा होतेच.हि जाधव मामा म्हणजे एक वेगळीच असामी ह्यांना पाहिल्यावर एखादी व्यक्ती आणि वल्लीतले पात्रच आठवते.तुम्ही काही पण विचारा मामांना पण उत्तर सरळ येणार नाही आणि सुरुवात \’हे बघा\’ पासून होणार.मामा हे बघा बोलले कि आपण मान्य करायचे ह्या क्षणी तरी आपल्याला जगातले काही समजत नाही त्यामुळे ते म्हणतील ते गप ऐकायचे.पण तरीही एक सांगतो राजधेर, इंद्राई किंवा अगदी कोळधेर म्हणा हे किल्ले मामांबरोबरच पहा एवढं मात्र नक्की.
असो साधारण ५ च्या सुमारास राजधेरचा  माथा गाठण्यासाठी नव्याने लावलेल्या शिडीजवळ पोहोचलो.ह्या शिडीच्या आधी खाली पाण्याचे भले मोठे टाके लागते टाक्याच्या समोर कमानी सदृश्य  बांधकाम पाहायला मिळते.शिडी चढल्यावर उजव्या बाजूला फारसी लिपीत शिलालेख कोरला आहे.शिलालेख पाहून सरळ कातळात कोरलेल्या पायऱ्यांच्या मार्गाने किल्ल्यावर जाता येते.वाटेत पायऱ्यांच्या मार्गात डावीकडे गुहा आहेत ह्या गुहा पहिल्या कि बौद्ध लेण्यांमध्ये आढळणारे बांधकाम आठवते आणि मला खात्री आहे ह्या गुहा पुरातन असणार.

                                            पुरातन गुहा

शिलालेख

गुहा पाहून कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या मार्गाने उद्धवस्थ प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केला.प्रवेशद्वाराच्या डाव्याबाजूला कमानीचे अवशेष सापडतात.किल्ल्यावर प्रवेश केल्यावर समोरच समुद्र किनारी पहायला मिळणारे खडकांसारखे कातळ दगड दिसतात.हेच कातळ चढून खरं उजवीकडे जाऊन अवशेष पाहून परत डावीकडे यायचे परंतु आम्हाला मामांनी मुद्दाम डावीकडे नेऊन अक्खा किल्ला फिरवून उजवीकडील भागातून परत मूळ ठिकाणी आणले आणि मला वाटते तेच योग्य आहे.डावीकडे गेल्यावर २ गुहा दिसतात ह्या गुहांमध्ये उतरायला लाकडी शिडी आहे.ह्याच मार्गाने किल्यावर फिरताना असंख्य टाकी आहेत.टाक्यांनंतर शिव मंदिर पण पाहायला मिळते. पुढे वाटेत एक वास्तू लागते जिला एक्दम छोटा दरवाजा आहे हि वास्तू म्हणजे नक्की काय आहे ते मात्र उमगत नाही.डावीकडून उजवीकडे चालायला लागल्यावर आपल्याला समोर कोळधेर आणि इतर नाशिक मधील किल्ल्यांची रांग जर धुरकट वातावरण नसेल तर स्पष्ट दिसते.

दगडी वास्तू

हि वास्तू पाहून जाताना बांधीव तलाव पण लागतो.मामांच्या सांगण्यावरून किल्ला जवळपास १२ एकर वर पसरला आहे.किल्याला फेरी मारून शेवटच्या मुख्य अवशेषांकडे आलो.इथे प्रथम मुघल स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना असलेली तीन कमानी असलेली दगडी बांधकामाची वास्तू लागते जिला काय म्हणावे हे मात्र कळत नाही.ह्याच वास्तूच्या समोर बुरुज पाहायला मिळतो ह्या बुरुजावरून समोर इंद्राई आणि राजधेर गावाचा संपुर्ण परिसर पाहायला मिळतो.बुरुज सुस्थितीत आहे. बुरुज पाहून आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो येथे आपली गडफेरी संपते.हा किल्ला खूप मोठा आहे आणि व्यवस्थित पाहण्यासाठी वेळ काढावा तसेच जर वाटाड्या नसेल तरी किल्ल्यावर डावीकडून फिरत फिरत उजवीकडे आलो कि हमखास किल्ला पाहून होतो.

                                                           ३ कमानी असलेली वास्तू

बुरुज

क्रमशः
गडांच्या इतिहासाबद्दल-
कंचना आणि मंचना प्रसिद्ध आहेत ते ह्या किल्ल्यांच्या परिसरात झालेल्या लढाईमुळे जिला कांचन -बारीची लढाई म्हणतात.ह्या लढाईबद्दल मी ससंदर्भ वेगळ्या ब्लॉग मध्ये लिहिलच. तूर्तास सारांशासाठी २ ऑक्टोबर १६७० ते ५ ऑक्टोबर १६७० ला सुरतेवरची तिसरी लूट घेऊन महाराज स्वराज्यात येत होते.हि माहिती कळताच दाऊदखान महाराजांच्या पाठलागावर लागला. महाराज ह्या वेळेस चांदवड भागात होते त्यांनी ताबडतोब १५००० च्या फौजेचा काही भाग (५०००) लुटीबरोबर पुढे पाठवला व स्वतः १०००० फौजेनिशी मागे राहिले.१७ ऑक्टोबर ला युद्धाला तोंड फुटले ह्या लढाईत ३००० मुघल सैनिक कापले गेले आणि दाऊदखानाचा सपशेल पराभव झाला. ह्या लढाईचे महत्व म्हणजे महाराजांनी गनिमी काव्याने युद्ध न लढता खुल्या मैदानावर १०००० फौजेनिशी मुघलांना हरवले.या युध्दाचा परिणाम एवढा मोठा झाला की, दिंडोरीचा मुघल सुभेदार सिद्दी हिलाल महाराजांना येऊन मिळाला व महाराजांनी या भागातील जवळजवळ सर्व किल्ले पुढील काळात ताब्यात घेतले. राजधेर किल्ल्याचा इतिहासात उल्लेख हा गडावर प्रवेशद्वाराआधी कोरलेल्या शिलालेखावरून कळतो.ह्या शिलालेखात असे म्हंटले आहे कि \”हिजरी सण १०४५ मध्ये शव्वाल महिन्याच्या सोळा तारखेस म्हणजे अर्थात १४ मार्च १६३६ रोजी ईश्वराचा प्रेषित अर्थात मुहम्मदाच्या कृपेमुळे आणि शहाजहान बादशहाच्या छायेखाली शूद्र सेवक अलावर्दीखान तुर्कमान ह्याने हा किल्ला ज्यांची नावे खाली दिली आहेत अशा इतर काही किल्ल्यांसह दोन महिन्यांत काबीज केला. इतर किल्ले म्हणजे अर्थात कोळधेर-इंद्राई-चांदवड -रवळ्या-जावळ्या-मार्कंड्या-कण्हेरी-अहिवंत-अचला आणि रामसेज.मी इथं सारांश फक्त सांगितला आहे.थोडक्यात हे सर्व किल्ले १६३६ साली मुघलांच्या ताब्यात गेले.आणि माझ्या अनुमानाने मुघलांआधी हे किल्ले निजामशाहीत असावे. किल्यावरील बांधकामांवरून किल्ला बहुदा मुघलांकडेच जास्त राहिला असेल. आणखी काही किल्ल्याचे त्रोटक उल्लेख मी सिलेक्टेड डॉक्युमेंट ऑफ औरंगझेब रेन ह्या ग्रंथात मुघली मनसबदारांच्या माहितीमध्ये वाचले आहेत त्यात फक्त राजधेर चा किल्लेदार एवढाच उल्लेख सापडतो.
इतिहास साभार – राजा शिवछत्रपती खंड १ – गजानन भास्कर मेहेंदळे पृष्ठ ५५८ तळटीप ३६३ , ट्रेकक्षितीज संस्था वेबसाईट आणि ,सिलेक्टेड डॉक्युमेंट ऑफ औरंगझेब रेन १६५९-१७१६.

Leave a comment