चांदवड रेंज ट्रेक- भाग ३ (चांदवडचा किल्ला-Chandwad Fort)

मागील भागात म्हंटल्याप्रमाणे इंद्राई किल्ला पाहून  दुपारी ४ च्या सुमारास जेवून आम्ही चांदवड च्या पायथ्याशी राहायला निघालो.राजधेरवाडी ते चांदवड अंतर साधारण १० किलोमीटर चे आहे. आमची सर्वांची निवासाची व्यवस्था अहिल्याबाई होळकरांनी जिर्णोद्धार केलेल्या  रेणुका मातेच्या मंदिरातील धर्मशाळेत केलेली होती. मंदिराच्या प्रसन्न वातावरणात राहणार असल्याने एक वेगळीच  ऊर्जा आलेली.मंदिराच्या माहितीबद्दल मी वेगळे सविस्तर लिहीन कारण  मंदिराचा इतिहास तसा मोठा आहे .मंदिरापासून चांदवड किल्ल्याचा डोंगर आपल्याला समोरच दिसतो.त्या दिवशी राहून सकाळी दुसऱ्या दिवशी लवकर उठून चांदवड किल्ल्याकडे आम्ही निघालो.मंदिरापासून चांदवड किल्ला लांब नाही.आणि ह्या भागात किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या चंद्रेश्वर महादेव मंदिरामुळे वर्दळ असते त्यामुळे गाडीरस्ता हि व्यवस्थित पायथ्यापर्यंत जातो.

                                                              रेणुका माता चांदवड

                                                                     मंदिर परिसर

पायथ्याला पोहोचल्यावर चंद्रेश्वर मंदिर लागते. मंदिर हे तसे पुरातन आहे हे  नीट न्याहाळल्यावर कळते.मंदिराच्या आवारात एक उत्कृष्ट वीरगळ आम्हाला बघायला मिळाली तसेच अनेक  पुरातन अवशेष विखुरुन ठेवलेले दिसले. मंदिरावर अप्रतिम असे कोरीव काम आणि शिल्पकाम केले आहे.परंतु दुर्दैवाने मंदिराला बाहेरून डिस्टम्पर कलर आणि आतून ऑइलपेंट दिल्याने त्याची सर्व शान लयाला गेलीय. मंदिर पाहून पुढे गेल्यावर खरी चांदवड किल्ल्याकडे वाटचाल सुरु होते.सर्वप्रथम एक दगडी भिंत लागते ह्या भिंतीवर ३ गणेश शिल्प कोरली आहेत त्यातल्या दोन  गणपतींना शेंदूर फासला आहे.भिंतीला लोखंडी दरवाजा आहे व आत कातळ गुहा आहे. बाहेर एक छोटे पाण्याचे टाके आहे.हे पाहून पुढे गेल्यावर बांधिव गोल दगडी तलाव लागतो .तलावाच्या डावीकडे एक मोठी समाधी आहे आणि त्याच्या  बाजूला दगडी चौथऱ्यावर ७ थडगे बांधले आहेत.ह्या थडगी आणि समाधीं  बद्दल माहिती मात्र उपलब्ध नाही.

                                                     दगडी भिंत आणि गणेश शिल्प

                                                                     समाधी       

                                                                           ७ थडगी

                                                                       चंद्रेश्वर मंदिर

                                                    चंद्रेश्वर मंदिराच्या आवारातील वीरगळ

                                                चंद्रेश्वर मंदिराच्या आवारातील वीरगळ मागचा भाग
थडगी पाहून सरळ गडाच्या चढाईस सुरुवात करावी , चढाईच्या मध्यात आपल्याला टाकसाळीचे अवशेष पाहायला मिळतात आणि हि टाकसाळ किल्ल्याच्या डाव्या बाजूला मध्यावर आहे. त्यामुळे चढाई डाव्या बाजूने चालू ठेवावी टाकसाळीच्या दिशेने. साधारण २० ते २५ मिनिटांत आपण टाकसाळीच्या ठिकाणी पोहोचतो.   फार कमी किल्ल्यांवर टाकसाळी असण्याचे उल्लेख आढळतात.सध्याच्या घडीला टाकसाळीचे चौथरे व एक उध्वस्थ प्रवेशद्वार व तिन्ही बाजूचे  छप्परवजा अवशेष बाकी आहेत.टाकसाळीचे बांधकाम शिवकालीन दगडी घडणीचे आहे परंतु मधेच पेशवेकालीन विटांचे पण पाहायला मिळते. ह्याचा अर्थ वेळोवेळी टांकसाळीची डागडुजी केलेली दिसते.टाकसाळ पाहून पुन्हा आपला मार्ग उजवीकडे ठेवून चालत राहायचे.ह्या मार्गाने आपण किल्ल्यावरील गडमाथ्याच्या कड्याखाली पोहोचतो जेथे एक भक्कम बुरुज आहे व त्याखाली तटबंदीचे दगड विखरुन पडलेले दिसतात.वाटेत काही खोदीव पायऱ्या हि पाहायला मिळतात.

                                             पायथ्यापासून दिसणारा चांदवड किल्ला

                                                          किल्ल्यावरील टाकसाळ

                                                          किल्ल्यावरील टाकसाळ प्रवेशद्वार
किल्ल्यावरील बुरुज अजूनहि सुस्थितीत आहे.बुरुजावरून पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या कातळ कड्याखाली येतो.येथून किल्ल्यावर जाण्यासाठी लोखंडी शिडी आणि रोप लावलेला आहे. परंतु प्रत्येकाने आपला रोप लावावा व प्रस्तरारोहणाची माहिती असल्यासच जावे.शिडीच्या उजव्या  बाजूला पाहिल्यास इंग्रजांनी त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे किल्ल्याच्या पायऱ्या उध्वस्थ केल्याचे स्पष्ट दिसते. पायऱ्यांच्या  बाजूची गुहा जी सध्या बुजली आहे त्याच बरोबर पायरी मार्गात बांधलेला कोनाडा हे पायऱ्या मार्ग असल्याची साक्ष आजही देतात.कातळटप्पा चढण्यासाठी लावलेली शिडी लोखंडी असली तरी ती तकलादू आहे तिच्या आजूबाजूला दगडं ठेवून उभी  केली आहे. तसा हा पॅच लहान आहे व सहज जाण्याजोगा आहे तरीही अडचण येऊ शकते म्हणून साहित्य आणि माहितगार माणसे जवळ असल्यासच जावे.मला वरती जायला न जमल्याने मी आणि इतर आणखी काही माझे सहकारी ट्रेकर ह्यांनी आमच्या  चांदवड मधील मित्राने आणलेल्या ड्रोन मधून गड फेरी केली.

                                                                          खोदीव पायऱ्या

                                                                              बुरुज
ड्रोन ने आणि माझ्या मित्रांच्या छायाचित्रांवरून असे समजले कि कठीण पॅच चढल्यावर आपण पायऱ्यांमार्गे उद्धवस्थ प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो.शिडीच्या अथवा प्रवेशद्वाराच्या जवळ इंद्राई आणि राजधेर किल्ल्याप्रमाणे समान मजकुराचा फारसी शिलालेख पाहायला मिळतो.हे पाहून पुढे गेल्यावर कातळ खोदीव पायऱ्या चालून पाण्याचे टाके पाहायला मिळते.इथून पुढे चालत गेल्यावर छोटेखानी पाण्याचा तलाव पाहायला मिळतो.पुढे वाड्याचे उध्वस्थ अवशेष आणि काही वास्तूंचे चौथरे पाहायला मिळतात.ह्याव्यतिरिक्त पाण्याची इतर टाकी आणि इतस्ततः  विखुरलेले अवशेष पाहायला मिळतात.हे पाहून जिथे प्रवेशद्वाराजवळच्या  पायऱ्या उध्वस्थ केल्या आहेत त्या भागाच्या वरील बाजूस आपण पोहोचतो  ह्या ठिकाणी  खोदीव पायऱ्या कोरल्या आहेत. इथे आपली गडफेरी संपते.

                                      शिडीच्या उजव्या बाजूकडील पायरी मार्गाची साक्ष देणारा कोनाडा

                                                                       प्रवेशद्वार(छायाचित्र:वरून देवरे )

                                                                         छोटा तलाव (छायाचित्र:वरून देवरे )

                                         बहुदा गडफेरी संपण्याच्या मार्गावरील खोदीव पायऱ्या (छायाचित्र:वरून देवरे )

गडावरून इंद्राई ,राजधेर ,कोळधेर हे त्याचे खंदे साथीदार,तसेच साडेतीन रोडगा ज्याला बोलतात तो डोंगर पण पाहायला मिळतो .एक समृद्ध किल्ल्यांचा प्रदेश म्हणजे हा चांदवड पट्टा म्हंटला  गेला पाहिजे. फार छान वाटले ह्या भागात भटकंती करताना.चांदवड आणि राजधेरवर ज्या प्रकारे इंग्रजांनी पायऱ्या उध्वस्त केल्यात त्यावरून एवढे निश्चित समजते ह्या पट्ट्यातील किल्ले घाटवाटांच्या दृष्टीने खूप महत्वाचे होते.हे किल्ले जरूर पहा पण वेळ आणि उसंत घेऊन.     

                         गडावरून दिसणारा चंद्रेश्वर मंदिर परिसर आणि इतर दुर्गसंपदा

गडाच्या इतिहासाबद्दल- चांदवड किल्ला कधी बांधला हे अज्ञात आहे परंतु  नांदगाव येथे सापडलेल्या चालुक्य नरेश चांद्रदित्य उर्फ नागवर्धन (इ.स ६५०) यांच्या ताम्रपटात चंद्रादित्यपुर म्हणजेच चांदवड चा उल्लेख आढळतो.अशी पण आख्यायिका आहे कि अगस्ती मुनींचा आश्रम चांदवड गावाजवळील डोंगराजवळ होता एकदा त्यांना भूक लागली म्हणून त्यांनी चार रोडगे भाजले आणि  त्यावर तूप मागण्यासाठी ते गावात गेले परंतु कोणी तूप न दिल्याने त्यांनी ह्या नगरीला चांडाळ नगरी नाव दिले त्याचेच पुढे अपभ्रंश होऊन चांदवड असे नाव झाले.तसेच मुनींनी ४ रोडग्यांपैकी अर्धा रोडगा गाईला दिला आणि साडेतीन बाकीचे तिथेच सोडून दिले म्हणूनच चांदवड किल्ल्यासमोर असलेल्या डोंगराला साडेतीन रोडग्याचा डोंगर असे नाव पडले.
आणखी महत्वाचा ऐतिहासिक उल्लेख येतो तो १६३६ साली अलावर्दीखान ह्याने चांदवड परिसरातील बहुतांश किल्ले घेतले त्यामध्ये चांदवड किल्ला हि घेतला आणि इंद्राई आणि राजधेर ला कोरलेल्या शिलालेखांप्रमाणेच चांदवड किल्ल्यावर पण समान मजकुराचा शिलालेख कोरलेला आढळतो. इसवी सन १६७० ला दुसऱ्यांदा सुरत लुटल्यानंतर कांचन बारी मध्ये महाराज व दाउद खानामध्ये  जी लढाई झाली त्या लढाईची तयारी दाऊद खानाने चांदवड किल्ल्यावर केल्याचे उल्लेख आढळतात.तसेच १६८२ मध्ये संभाजी महाराजांच्या एका तुकडीने चांदवड किल्ल्यावर हल्ला केल्याचा उल्लेख सापडतो मात्र हल्ल्यानंतर काय झाले ते काही उमगत नाही.

पुढे पेशवाईत ह्या किल्ल्याचा तुरुंग म्हणून वापर होई.ह्या किल्ल्यावरची सर्वात महत्वाची वास्तू  म्हणजे किल्ल्यावरील टांकसाळ!!. फार कमी किल्ल्यांवरती टांकसाळ असल्याचे ऐकण्यात येते.नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला होळकरांना दिला आणि पुढे माधवराव पेशव्यांनी चांदोरी रुपयांची टांकसाळ सुरु केली.पुढे काही मतभेदांमुळे ए.स १८०० मध्ये हि टांकसाळ चांदवड गावात हलवण्यात आली. १८०४ साली कर्नल वॉलेस याने चांदवडचा किल्ला जिंकून  घेतला परंतु तो किल्ला लगेचच होळकरांच्या ताब्यात देण्यात आला. इसवी सण १८१८ मध्ये थॉमस हिस्लॉप याने हा किल्ला जिंकून घेतला आणि  १८२९ मध्ये चांदवड टांकसाळीतील चांदीच्या रुपयाची नाणी पाडण्याचे काम बंद करण्यात आले.१८३० मध्ये तांब्याची नाणी पाडण्याचे काम पण  थांबवण्यात आले आणि त्यानंतर टांकसाळ बंद करण्यात आली.
ह्या टांकसाळी संदर्भात जरुरी तेवढाच  थोडका उल्लेख मी केला आहे विस्तृत माहिती मी वेगळ्या ब्लॉगद्वारे पुन्हा समोर आणेल.

इतिहास संदर्भ- http://www.trekshitiz.com , आणि पेशवेकालीन महाराष्ट्रातील टांकसाळी, त्यांचे व्यवस्थापन आणि नाणी हा दिलीप प्रभाकर बलसेकर ह्यांचा पी.एच.डी साठी केलेला ससंदर्भ प्रबंध (पृष्ठ ८३,८४)

प्रबंध वाचण्यासाठीची लिंक https://shodhganga.inflibnet.ac.in/handle/10603/152340?mode=full 

6 thoughts on “चांदवड रेंज ट्रेक- भाग ३ (चांदवडचा किल्ला-Chandwad Fort)

  1. खुप छान लेख मेघन. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. अनेक शुभेच्छा.

    Like

Leave a comment