ऑरेंज रेंज ट्रेक भाग १ (भिवागड-मन्सर-नगरधन-Bhivagad,Mansar & Nagardhan Fort)

ब्लॉग ला ठेवलेल्या नावावरून एव्हाना तुम्हाला कळले असेलच मी कुठल्या शहराबद्दल बोलतोय … अर्थातच  आपले संत्र्यांचे शहर नागपूर बद्दल. नागपूर पासून पुढे काही किलोमीटर च्या पट्ट्यात अतिशय सुंदर किल्ले पाहावयास मिळतात.पण नगरधन आणि रामटेक सोडल्यास इतर किल्ल्यांना कोणी भेट देत नाही.
असो तसा हा पट्टा बघायला गेला तर समृद्ध आहे आणि वाहतुकीच्या दृष्टीने सर्व मार्गांनी जोडलेला आहे.
दुरांतो एक्सप्रेसने रात्री निघून २५ जानेवारीच्या सकाळी नागपूर ला पोहोचलो. आणि दिवसातला पहिला किल्ला भिवागड कडे प्रस्थान केले.सध्या हा किल्ला भिमसेन कुवारा ह्या नावाने स्थानिक ओळखतात. भिमसेन कुवारा हा कोणी एक संत पुरुष होता असे स्थानिक गावकऱ्यांकडून समजले.ह्या किल्ल्यावर भिमसेन कुवाराच्या पादुका  आणि एक छोटेखानी मंदिर असल्याने किल्ल्यावर आणि पायथ्याजवळ लोकांची वर्दळ असते.नागपूर पासून भिवागड ४६ किलोमीटर वर आहे. दंतकथेनुसार पायथ्यावर असणाऱ्या मंदिरापासून  भिमसेन हा ३ पावलांमध्ये गडावर पोहोचला त्यातले पहिले  पाऊल मंदिराच्या पुढे असलेल्या चौकोनी विहिरीजवळ , दुसरे पाऊल वाटेत असणाऱ्या ओढ्याजवळ तर तिसरे पाऊल हे किल्ल्यावर असणाऱ्या मंदिरात ठेवलेल्या पादुका होय.

                                                       पायथ्याचे भिमसेन कुवाऱ्याचे मंदिर
मंदिरापासून मळलेल्या वाटेनं थोडा खडा चढ चढून साधारण १५ मिनिटांत आपण किल्ल्याच्या एका बुरुजाजवळ पोहोचतो.बुरुज दगडांवर दगड ठेवून रचला आहे.हा बुरुज चौकोनी आहे आणि किल्ल्यावरील इतर बुरुज पण चौकोनी आहेत. बुरुज पाहून आपण किल्ल्यावरील भिमसेन कुवाऱ्याच्या  मंदिराजवळ पोहोचतो.मंदिर हे छोटेखानी आहे त्यावर पत्र्याची शेड बांधली आहे. मंदिरात भिमसेनाच्या पादुका आहेत आणि एक दगड आहे दोघांनाही शेंदूर फासला आहे.पादुकांच्या बाजूला शिवपिंडी आणि त्रिशूल ठेवला आहे.गडमाथ्याच्या मागे पेंच धरणाचे बॅक वॉटर असल्याने अतिशय छान गार वारा वाहत असतो आणि त्यामुळे हा परिसर रम्य वाटतो.ह्याच वाटेने डाव्या बाजूला चालत राहिल्यावर चौकोनी बुरुज आणि तटबंदी लागते.  बुरुज पाहिल्यावर लगेच ओळखता येत नाही कि हे बुरुज आहेत .किल्ल्याच्या खाली राणी महाल नावाची वास्तू आहे तिथे जाण्यासाठीच्या वाटेत एक दरवाजा लागतो. दाट वाढलेल्या झाडींमुळे आम्ही हा दरवाजा पाहू शकलो नाही आणि राणीमहाल पाहण्यासाठी बोटीने जावे लागते.त्यामुळे आल्या पाऊली मागे फिरून आम्ही गड फेरी संपवली.

                                                                  दगडी घडीव बुरुज

                                                            भिमसेन कुवारा मंदिर

                                                                     पेंच बॅकवॉटर
भिवागड पाहून आम्ही पुढचा किल्ला नगरधन पाहण्यासाठी निघालो .नगरधन किल्ल्याच्या वाटेत नुकतेच काही वर्षांपूर्वी उत्खननात प्राचीन अवशेष सापडले होते ते पाहण्याचा योग ट्रेकक्षितिज संस्थेमुळे आला.हि जागा मन्सर ह्या गावात आहे.भिवागड पासून ते  मन्सर ३१ किलोमीटर अंतरावर आहे.हे अवशेष दोन टेकड्यांवर सापडले आहेत त्यातल्या एकाच टेकडीवर वेळे अभावी जाऊ शकलो. मन्सर हे वाकाटक ह्या वंशातल्या राजांची राजधानी होती, इथले अवशेष प्राचीन विटांनी बांधलेल्या शिवमंदिराचे , तसेच विविध स्तूप ह्यांचे आहेत असे समजले.अवशेष नीट निरखून पहिले असता पायऱ्या , कोनाडे पाहायला मिळतात. वाकाटकांचा  राजा प्रवरसेना दुसरा ह्याची राजधानी प्रवरपूरा म्हणजे हिच प्राचीन जागा होय.तसेच मी वर सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या टेकडीवर जिला हिडिंबा टेकडी म्हणतात तिथे बुद्ध स्तूप आणि मंदिरांचे अवशेष असल्याचे  इथे लावलेल्या माहिती फलकावरून कळले.हे अवशेष ख्रिस्तपूर्व ५ व्या  शतकातले आहेत.एक अनमोल ठेवा पाहायला मिळाल्याचे मला समाधान वाटले.वाकाटकांच्या ह्या प्राचीन ठेव्याची काही छायाचित्र खास तुमच्यासाठी…

                                                           मन्सर प्राचीन अवशेष

 पुन्हा ह्या जागी येऊन हिडिंबा टेकडी बघायची आणि आणखी वेळ घालवायचा असे ठरवून नगरधन करीता         रवाना झालो.नगरधन हा भुईकोट प्रकारात मोडणारा किल्ला असून हा सुद्धा पुरातत्व खात्याने डागडुजी करून   सुस्थितीत ठेवला आहे.मी प्रथमच पुरातत्व विभागाने व्यवस्थतीत रंगसंगतीत किल्ल्याची डागडुजी केलेली      पाहिली.नगरधन पाहिला कि हमखास तुम्हाला आठवण येणार लाल किल्ल्याची.किल्ल्याचे प्रवेशद्वार दिमाखात आणि सुस्थितीत उभे आहे.हे प्रवेश द्वार जेवढे निरखू तेवढे कमी आहे. प्रवेशद्वाराला दोन्ही बाजूला ४ कोनाडे आहेत आणि चारही कोनाड्यांच्या कमानींचे नक्षीकाम वेगवेगळे आहे. एका कोनाड्यात द्वारपाल ,दोन कोनाड्यात  फुलदाण्या आणि एका कोनाड्यात कमळपुष्प कोरले आहे. प्रवेश द्वाराच्या मध्यावर रेखीव  गणपतीची मूर्ती आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूस कमळपुष्प कोरले आहे. गणपतीच्या मूर्तीच्या खाली मत्स्य शिल्प आहे. सर्वात वरती अधिक च्या चिन्हासारखं शिल्प कोरले आहे व त्याच्या वरती कोनाडे आहेत.अधिक चिन्हाच्या शिल्पाखाली नीट निरखून पहिले तर ध्यानस्थ माणसाचे शिल्प कोरले आहे आणि त्याच्या बाजूला सांकेतिक चिन्ह कोरले आहे.असे हे नगरधन किल्ल्याचे समृद्ध प्रवेशद्वार आहे.त्याचबरोबर तटबंदीत पण काही चिन्ह आणि छोट्या मुर्त्या कोरल्या आहेत हे  निरखून पाहिल्यावरच समजते .  

                                                         नगरधन किल्ला तटबंदीसह

                                                                        प्रवेशद्वार      

                                                       तटबंदीच्या चर्यां मधील  शिल्प
प्रवेशद्वार पाहून आत गेल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला मिळतात.इथून उजवीकडे वळल्यावर किल्ल्याचा दुसरा दरवाजा लागतो ज्याला प्रथम प्रवेशद्वारासारखेच ४ कोनाडे कोरलेत आणि ह्याही कोनाड्यांना कमानी आहेत.गणपतीची मूर्ती सुद्धा मध्यभागी कोरली आहे.फक्त पहिल्या दरवाजाला नसलेले शरभ शिल्प आणि हत्ती शिल्प ह्या दरवाजाच्या वरती कोरले आहेत .दरवाज्यातून आत गेल्यावर किल्ल्याची भव्यता जाणवते.इथून जिन्याने मी वर गेलो आणि किल्ल्याच्या अर्ध्यापर्यंत म्हणजे भुयारी देवीचे मंदिर असलेल्या जागेपर्यंत तटबंदीवरुन फेरी मारायचे ठरवले.जिन्याने वर गेल्यावर पीराचे थडगे असलेले  दिसले.किल्यावर असलेले चौकोनी , अष्टकोनी बुरुज दिमाखात उभे आहेत.ट्रेकक्षितिज च्या वेबसाईट वरील नकाशानुसार किल्ल्याला ७ बुरुज आहेत.मी अर्ध्यातून खाली उतरून उध्वस्त प्रवेशद्वारातून आत शिरलो आणि थेट भुयारी देवीच्या मंदिरात पोहोचलो.मंदिरात दरवाजा बंद असल्याने खाली आत जाता आले नाही.भुयारी देवीच्या मंदिरात पायऱ्यांनी जावे लागते आणि मंदिर बाजूलाच विहीर सुद्धा आहे.मंदिराच्या मागच्या बाजूला तीन कमानींचे दालन आहे आणि दालनाच्या खाली चोरदरवाजा आहे जो किल्ल्याच्या बाहेर जातो. सध्या ह्या दालनात किल्ल्यावर पुरातत्व खात्याने त्यांना काम करताना किल्ल्या बाहेर व किल्ल्यात सापडलेल्या  अवशेषांचे छायाचित्र प्रदर्शन तसेच डागडुजी आधी व नंतर किल्ला कसा दिसतो ह्यातले फरक दर्शवनारी छायाचित्र लावली आहेत.

                                                                    दुसरे प्रवेशद्वार

                                                                  भुयारी देवी मंदिर

                                                                मंदिरात जायचा मार्ग

                   मंदिर आणि बाजूला असणारी विहीर (उजवीकडे अराम करण्याचे दालन पण दिसते आहे)

हे पाहून उजवीकडे मोठे डेरेदार झाड लागते त्याच्या समांतर चालत राहायचे आणि शेवटाला एक सुंदर विहीर पाहायला मिळते.विहिरीत खाली  उतरायला पायऱ्या आहेत. विहिरीच्या वरती कमान कोरली आहे.विहिरीच्या समोरच राजवाड्याच्या चौथऱ्याचे अवशेष पाहायला मिळतात.  राजवाड्याच्या अगदी समांतर एक हौद लागतो ह्या हौदात पूर्वी कारंजा सोडलेला असावा असे वाटते.हौदात उतरायला  पायऱ्या आहेत.आणि चौथऱ्याच्या चारही कोपऱ्यात नक्षीकाम केलेले आढळते.हे पाहून मी पुन्हा किल्ल्याच्या विरुद्ध दिशेच्या तटबंदीवर चालून प्रवेशद्वारापर्यंत चालत आलो.प्रवेशद्वाराच्या वरती नगारखाना आहे आणि बाजूला दोन घुमट बांधले आहेत जे  पुन्हा लाल किल्ल्याची आठवण करून देतात.नगारखान्याच्या झरोक्यातून दूरवरचा परिसर आणि रामटेक किल्ला पण दिसतो.खरं तर आजही आपल्याला  एका डोंगरी किल्ल्यावरून दुसरा डोंगरी किल्ला पाहायला मिळतो   हि खरच विलक्षण गोष्ट आहे आणि आपल्या पूर्वजांची आणि एकंदर स्थापत्यशास्त्राची महती अधोरेखित करते.नगारखान्यावर येऊन मी गडफेरी संपवली आणि पुढचा किल्ला अर्थात रामटेक पाहण्यासाठी प्रस्थान केले.

                                                                             हौद

                                                                              विहीर

                                                                       डेरेदार वृक्ष

                                          तटबंदी आणि प्रवेशद्वारासह दिमाखात दिसणारा नगरधन
क्रमशः

गडांच्या इतिहासाबद्दल-

भिवागड- भिवागड किल्ल्याबद्दल विशेष माहिती कागदपत्रांमध्ये अजून तरी आढळली नाहीये.गडाचा विस्तार आणि भौगोलिक स्थान बघता टेहळणी साठी ह्याचा वापर होत असावा असे दिसते.

नगरधन- नगरधन किल्ल्याचा उल्लेख थेट आढळतो तो इ.स च्या चवथ्या किंवा पाचव्या शतकात.हा किल्ला वाकाटकांच्या काळात नंद राजाने बांधला असा उल्लेख सापडतो.किल्ल्यात लावलेल्या माहिती फलकानुसार नगरधन ला नंदीवर्धन असे बोलले जाई आणि ह्याचेच पुढे अपभ्रंश होऊन नगरधन झाले असावे.वाकाटकानंतर गोंड राजांनी किल्ल्याच्या जुन्या अवशेषांवर किल्ला बांधला.ह्या प्रदेशावर राष्ट्रकूटांनी पण राज्य केले आहे.तसेच नागपूरकर भोसल्यांच्या काळात नगरधन किल्ल्याची डागडुजी केल्याचे उल्लेख सापडतात.मुघल आणि शिवकाळात किल्ल्यावर कोणाची सत्ता होती ह्याची मला सध्या कल्पना नाहीये.शोध घेणे चालू आहे नक्कीच नवी माहिती समोर येईल.

इतिहास साभार – ट्रेकक्षितीज संस्था वेबसाईट , किल्ल्यांवरील माहीती फलके , आणि नागपूर शहराचा प्राचीन इतिहास हे गो.मा.पुरंदरे आणि डॉ.श.गो.कोलारकर लिखित पुस्तक.           

Leave a comment