ऑरेंज रेंज ट्रेक – भाग २(किल्ले रामटेक)

नगरधन किल्ला पाहता पाहता एवढा वेळ गेला कि किल्ला बंद होण्याची पण वेळ झाली हे आम्हाला समजलेच नाही.रामटेक किल्ल्याच्या थोडे खालच्या बाजूस अंबाला सरोवराजवळ आमची एका धर्मशाळेत राहण्याची सोय  केल्याने  रामटेक किल्ला पण आजच पाहायचा असे ठरले. त्यामुळे थेट बस रामटेक किल्ल्याकडे निघाली.रामटेक किल्ल्यावर सध्या तटबंदी आणि बुरुजांसमवेत मुख्यता मंदिरे असल्याने किल्ल्यापेक्षा रामटेक तीर्थक्षेत्र झाले आहे.रामटेक ला अगदी थेट पहिल्या दरवाज्याच्या पायरीपर्यंत बस जाते.पहिल्या दरवाज्यापासूनच दरवाज्याला नक्षीकाम ,कमानी  असल्याने साधारण आपल्याला अंदाज येतो कि हा किल्ला कलाकुसरीने संपन्न असेल.आत गेल्यावर उजव्या बाजूस   विष्णू अवतारातील  वराह अवताराची सुंदर मूर्ती पाहायला मिळते.मूर्ती पाहून पुढे चालल्यावर आपल्याला पहिला किल्ल्याचा बुरुज लागतो. ह्या संपूर्ण  किल्ल्याचे बुरुज तटबंदी आणि दरवाजे अगदी सुस्थितीत आहेत हि खूप समाधानाची बाब आहे.बुरुज पाहून सरळ दरवाज्यातून आत शिरल्यावर मुख्य किल्ल्यात प्रवेश होतो.

                                                                     वराह अवतार मूर्ती

                                                                       वराह अवतार मूर्ती

मुख्य किल्ल्यात आल्यावर समोर दोन बुरुज आणि तिसरा दरवाजा दिसतो.दुसऱ्या आणि तिसऱ्या दरवाजामध्ये बरीचशी  मोकळी जागा आहे. तटबंदीवरुन चालत असताना थोडा उंचवटा असल्याने तिथे जाण्यासाठी छोटा दरवाजा व पायऱ्या बांधल्या आहेत. इथे किल्ल्याच्या आतील बाजूस एक छोटी खोली बांधली आहे व त्यावर तिन्ही बाजूने नक्षीकाम केले आहे.हि बहुदा काही सामान ठेवण्याची जागा असावी कारण ह्या खोलीला दरवाजा आहे.ह्या वास्तू  वरील नक्षीकाम देखील पाहण्यासारखे आहे.

                                                            तटबंदीच्या आतील खोली

                                                                 खोलीवरील   नक्षीकाम

                                                                    खोलीवरील   नक्षीकाम 

 इथून पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा आणि दोन बुरुज पाहायला मिळतात.दरवाज्याच्या बाहेर तोफ ठेवली आहे.दरवाज्याच्या आत गेल्यावर उजव्या बाजूला पायऱ्यांच्या साहाय्याने आपण नगारखान्यावर जाऊ शकतो.इथूनच डाव्या बुरुजावर गेल्यावर किल्ल्याच्या आसपासचा परिसर तसेच नगरधन किल्ला दिसतो.जिना उतरून परत खाली आल्यावर समोर गोपुर लागते .ह्या गोपुरातून आत गेल्यावर किल्ल्यावरील मंदिरांचे समूह पाहायला मिळतात. हा गोपुर न्याहाळायलाच मला भरपूर वेळ लागला ह्या गोपुरावरील कोरीवकाम अद्वितीय आहे. सर्व शब्दात वर्णन करणे कठीण आहे.मी मोजकेच ह्यातले सांगतो.गोपुरावर गणपती ची मूर्ती सुंदर कोरलेली आहे, तसेच गणपतीच्या खाली नक्षीकाम मग नागशिल्प त्या खाली हत्ती शिल्प अशी एकंदर कोरीव कामे केली आहेत.गोपुराच्या उजव्या बाजूला मारुतीची सुंदर मूर्ती कोरली आहे.गोपुराचा  सर्वोच्च भाग दोन हेमाडपंती खांबांवर तोलला आहे.

                                                     गोपुर प्रवेशद्वार (उजव्या बाजूला मारुतीची मूर्ती)

                                                               गोपुरावरील नक्षीकाम
गोपुराच्या आत न जाता मी डावीकडे वळलो कारण तिथे सुंदर बांधीव तलाव ,विहीर मला दिसली . गोपुराच्या बाजूलाच दगडी तुळशी वृंदावन लागते.ह्या तुळशी वृंदावनात समोरच्या आणि मागच्या बाजूने प्रत्येकी ४ कमानी म्हणजे ८ कमानी कोरल्या आहेत.इथून पुढे सुंदर बांधीव तलाव पाहायला मिळतो ह्या तलावात उतरायला छोटेखानी पायऱ्या बांधल्या आहेत.मध्यभागात मेघडंबरी अथवा घुमट बांधला आहे व त्या घुमटातून खाली उतरायला पायऱ्या आहेत. पण सध्या  हा मार्ग  बंद केलाय म्हणून मी बाजूच्या छोट्या पायरीने उतरलो.खाली उतरल्यावर कोरीव कामाचा अप्रतिम नमुना पाहायला मिळाला.एका सलग लांब पट्टीत अतिशय सुबक अशी एक घटना कोरलेली पाहायला मिळते.एकंदर कोरीव काम पाहता श्री कृष्णाच्या जीवनातील प्रसंग कोरल्याचे मला वाटते , पण खात्रीशीर सांगू शकत नाही.हे सुंदर कोरीव काम डोळ्यांत साठवून तलावाच्या मागे आपल्याला शिवपिंडीच्या आकाराची विहीर पाहायला मिळते.ह्या विहिरीच्या बाजूला किल्ल्याच्या मंदिर संकुलाला लागून असलेली तटबंदी आहे आणि विहिरीच्या मागे किल्ल्याखाली जाण्याचे प्रवेशद्वार लागते.प्रवेशद्वाराच्या थोडं मागे काही पायऱ्यांच्या साहाय्याने आपण तटबंदीवर जाऊ शकतो इथून आजूबाजूचा अक्खा परिसर दृष्टीक्षेपात येतो.परिसर न्याहाळताना मला तटबंदीच्या भिंतीत शेंदूर फासलेली मारुतीची अप्रतिम कोरीव मूर्ती दिसली.

                                                                      तुळशी वृंदावन

                                                                       बांधीव हौद

                                          बांधीव हौदाच्या वरती एका पट्टीत केलेले कोरीवकाम

                                                                             विहीर

                                                           तटबंदीवरील सुरेख मारुती
खाली उतरून मागे येऊन पुन्हा  गोपुराजवळ आलो आणि मुख्य मंदिर समूह पाहण्यासाठी गोपुरातून आत शिरलो.आत शिरताना हेमाडपंती खांबांचे दर्शन होते हा गोपुराचाच भाग आहे. खांबांवर आणि प्रवेशद्वारावर आणि आजू बाजूला प्रचंड कोरीव काम केलेले आहे.आत शिरल्यावर आपण मंदिर संकुलात येतो.सर्व प्रथम लागते ते लक्ष्मणाचे मंदिर, ह्या मंदीरात पण आत हेमाडपंती खांब आहेत.आणि त्या मागे आहे श्री रामाचे मंदिर.मंदिरांना अनुक्रमे श्री लक्ष्मण स्वामी व श्री रामचंद्र स्वामी अशी नावे दिली गेली आहेत.दोन्ही मंदिरातील मुर्त्या कातळातील असून सुरेख आहेत.ह्या दोन्ही मंदिरात नागपूरकर भोसल्यांनी वापरलेली शस्त्रास्त्रे ठेवलेली आहेत.राममंदिराच्या मागे उत्कृष्ट असे लक्ष्मी नारायणाचे मंदिर आहेत.ह्या तिनही मंदिरांवरचे कोरीव काम शब्दात व्यक्त करू शकत नाही इतके सुंदर आहे.दगडाचा एक छोटासा भाग सुद्धा कोरीव काम रहित दिसत नाही.ह्या तिनही मंदिरांच्या  डाव्या आणि उजव्या बाजूला छोटेखानी मंदिरे आहेत त्यातील एका देवीच्या मंदिरावरील कमलपुष्पे अगदी जवळून निरखून पाहता येतात.डाव्या बाजूला कोपऱ्यात  श्री सत्यनारायणाचे मंदिर आहे व त्या समोर मारुतीची मंदिराकडे तोंड करून असलेली मूर्ती आहे.

                                                             गोपुर हेमाडपंथी प्रवेशद्वार

                                                              श्री लक्ष्मण स्वामी मंदिर

                                                                श्री लक्ष्मण स्वामी मंदिर

                                                              श्री रामचंद्र स्वामी मंदिर

                                                              श्री लक्ष्मी नारायण मंदीर

                                                               श्री लक्ष्मी नारायण मंदीर
ह्या संपूर्ण मंदिर परिसराभोवती तटबंदी आणि बुरुजांचे संरक्षण आहे.संपुर्ण गडफेरी होईपर्यंत रात्रीचे ८ वाजले होते त्यामुळे उतरून सीता बावडी पाहायची होती ,मात्र अंधार झाल्याने फक्त फोटोवर समाधान मानावे लागले आणि लगेच अंबाला तलावाजवळची जवळची धर्मशाळा गाठली.सकाळी उठून अंबाला तलाव न्याहाळला अंबाला तलाव विस्तृत आणि मोठा आहे .तलावाच्या आसपास खूप छत्र्या आणि लहानसहान मंदिरे बांधली आहेत.
अंबाला तलाव पाहून आम्ही सर्व निघालो ट्रेक च्या शेवटाकडे आंबागड आणि सीताबर्डी किल्ला पाहण्यासाठी .

                                                                      आंबाला तलाव

                                                                      आंबाला तलाव

क्रमशः

गडाच्या इतिहासाबद्दल-

रामटेक किल्ल्याचा इतिहास हा तसा पौराणिक आहे.पुराणातल्या कथेप्रमाणे अगस्त ऋषींचा आश्रम रामगिरी पर्वताच्या परिसरात  होता.त्यांच्या धार्मिक विधींमध्ये बाधा आणणाऱ्या असुरांचा वध करण्याची  श्री रामाने शपथ घेतली.शपथेला टेक असे स्थानिक भाषेत म्हणतात.नंतर रामाने असुरांचा वध केला.रामाने घेतलेल्या शपथेमुळे रामटेक असे नाव ह्या परिसराला पडले.

मौर्य , शृंग , सातवाहन इत्यादी सत्त्तांच्या नंतर आलेल्या वाकाटकांनी ह्या प्रद्वेषावर राज्य केले (इ.स २७०  ते इ.स ५०० ) .वाकाटकांच्या मुख्य राजधानी नंदीवर्धन अर्थात नगरधन पासून रामटेक जवळ आहे.रघुजी भोसले ह्यांनी रामटेकच्या अंबाला सरोवर व तसेच गडावरील काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे.

इतिहास साभार- ट्रेकक्षितिज संस्था वेबसाईट (www.trekshitiz.com)              

Leave a comment