नाशिक पट्टा हा किल्ल्यांच्या साखळ्यांनी परिपूर्ण असा आहे हे आपणा सर्वांस माहित आहे.प्रभू श्री रामाचा पदस्पर्श ह्या भूमीला लाभलाय,आणि पौराणिक संदर्भाने जिथे प्रभू श्री रामचंद्र विश्रांती घ्यायचे त्या डोंगराला रामशेज म्हंटले जाते.हाच आपला सर्वांचा आवडता आणि सुपरिचित झुंजीचा साक्षीदार रामशेज किल्ला होय.सुमारे साडे पाच वर्ष मोगली फौजांना आणि मातब्बर सरदारांना सळो कि पळो करून सोडणारा अशी ह्या किल्ल्याची ओळख.रामशेज ला जाण्यासाठी नाशिक पासून साधारण १४ ते १५ किलोमीटर वर असणारे आशेवाडी गाव गाठायचे.गावातून समोरच कातळ टोपी दिसते तोच रामशेजचा किल्ला.किल्ल्यावर जाणारी वाट मळलेली आहे किल्ला डाव्या बाजूला ठेवून सुरुवातील बांधीव पायऱ्या चढून त्या नंतर मळलेल्या वाटेने सरळ किल्ला चढत जायचे.चढताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराअलीकडील राम मंदिर स्पष्ट दिसते त्यामुळे वाट चुकण्याचा संभव नाही.

साधारण ४५ मिनिटे ते १ तासाच्या चढाई नंतर आपण गुहेपाशी पोहोचतो.ह्या गुहेत शिवपिंड ठेवलेली आहे. हि गुहा पाहून सरळ गेल्यावर श्री रामाचे मंदिर लागते मंदिराच्या मागच्या भिंतीवर (जी किल्ला चढताना समोर लागते) एक शिलालेख कोरलेला आहे.ह्या शिलालेखावरचा मजकूर हा पुढील प्रमाणे आहे –
१. ।। श्री गणेशाय नम:।।
२. स्वस्तिश्री म नृपशालिवाहन शक १६८२ विक्रमनाम
३. संवत्छरे: श्रीराजा शाहूचरणि दृढभाव: पंत
४. प्रधान बाळाजि बाजिराव: सुभेदार आपा स ब (स)
५. (दा) शिव: सटवोजि मोहिते हंबिरराव
६ (फ)किर मुहहंमद कारिगर
शिलालेखाचा सारांश-शालिवाहन शकाच्या १६८२व्या वर्षी विक्रमनाम संवत्सरात छत्रपती शाहू महाराजांचे पेशवे
बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे) यांनी सुभेदार (आपाजी सदाशिव?), शेवटची ओळ लागत नाही परंतु त्याचा साधारण अर्थ सटवोजी हंबीरराव मोहिते यांच्या सहकार्याने किल्ल्याचा तट, बुरूज, दरवाजा किंवा अन्य वास्तू यांचा जिर्णोद्धार केला. हे बांधकाम फकीर मुहम्मद याने केले असा होतो.
ह्या शिलालेखावरून स्पष्ट होते कि इ.स १७६० (शके १६८२) साली किल्ला मराठ्यांकडे होता व किल्ल्याचा तट, बुरूज, दरवाजा किंवा अन्य वास्तू यांचा जिर्णोद्धार केला गेला.मंदिरात श्री राम ,लक्ष्मण आणि सीता मातेची मूर्ती आहे.मंदिर छोटेखानी आणि सुंदर आहे.मंदिराच्या डाव्या बाजूस पाण्याचे टाके आहे.हे पाहून सरळ पायरी मार्गाने चालत आपण उध्वस्त प्रवेशद्वाराने किल्ल्यात प्रवेश करतो.

किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचे दोन भाग पडतात डाव्या बाजूला आहे तो पठाराचा भाग आणि उजव्या बाजूला पाण्याची टाकी आणि उध्वस्त अवशेष असलेला किल्ल्याचा डोंगर माथा.प्रथम उजवीकडे जाण्याआधी प्रवेश द्वाराला समांतर उतरत गेल्यावर कमानी असलेला दरवाजा लागतो.मी समांतर ह्या साठी म्हणतोय कारण दरवाजा उतरल्यावर आपल्याला राम मंदिराजवळ असलेले गुहेचे छत दिसते आणि गम्मत म्हणजे ह्या छताला भोक आहे ते आपल्यला आतून स्पष्ट दिसते.दरवाज्याचे प्रयोजन बघून नक्कीच या ठिकाणी किल्ल्याला दुहेरी तटबंदी असावी असे वाटते. दरवाजा अत्यंत रेखीव आहे , दरवाजा पाहून पुन्हा मागे यायचे आणि उजव्याबाजूस सरळ चालत गेल्यावर दगडी पायऱ्या लागतात त्या उतरल्यावर आणखी एक छोटा दरवाजा लागतो आणि पुढे छोटेखानी तटबंदी लागते हि बहुदा टेहळणीची जागा असावी .इथून रामशेज खालील परिसर आणि नाशिक कडे जाणारा रास्ता पाहायला मिळतो.हे पाहून वर यायचे आणि सरळ चालत जाऊन डोंगर माथ्यावर जायचे.


गडमाथ्यावर जाताना थोडा अलीकडे चुन्याच्या घाण्याची जागा लागते ती पाहून पुढे गेल्यावर आधी काही कोरडी टाकी आणि देवीचे मंदिर लागते.मंदिर पाहून सरळ चालत राहायचे आणि माथ्याच्या टोकापर्यंत जायचे , वाटेत काही उध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात.अवशेष पाहून आपण माथ्याच्या टोकाला पोहोचतो इथे खराब टाक्यांचा समूह पाहायला मिळतो. किल्ल्यांवरच्या टाक्यांची संख्या पाहता किल्ला छोटा असून किल्ल्यावर बराच राबता असावा असे वाटते.हे पाहून परत किल्ल्याच्या पठाराच्या मार्गावर निघायचे परंतु पठारावर जाण्याआधी वाटेत टाकी लागतात त्याला समांतर एक छोटी पायवाट खाली कड्या पर्यंत जाते.इथे किल्ल्यातील गुप्त दरवाजा लागतो. काटकोनात उतरून हा चोर दरवाजा आपणास दिसतो फार फार तर २ माणसे उभे राहू शकतात एवढी जागा आहे.दरवाज्याच्या छतावर कमळपुष्प कोरले आहे.किल्ल्यावरील हा छोटेखानी गुप्तदरवाजा किल्ल्याचे मुख्य आकर्षणच म्हणायला हवे.दरवाच्याची रचना पाहून मन थक्क होते.




चोरदरवाजा पाहून सरळ किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूस यायचे इथे एक सुंदर मोठा भगवा ध्वज उभारलेला आहे. ध्वजालिकडे दोन मोठी खराब टाकी लागतात.इथे आपली गडफेरी संपते.पाऊस सुरु झाल्या झाल्या अथवा सुरु होताना जे मळभ असणारे वातावरण असते त्या वातावरणात ह्या किल्ल्यावर जरूर जावे.मराठ्यांच्या इतिहासातील एका अलौकिक झुंझीच्या साक्षीदार असणाऱ्या ह्या छोटेखानी किल्ल्याला जरूर भेट द्या.

गडाच्या इतिहासाबद्दल – रामशेज हा किल्ला १६३५ साली शहाजहान ने स्वारी केली तेव्हा मोघलांकडे होता हे धोडप , राजदेहेर ह्या किल्ल्यांवर असणाऱ्या शिलालेखांवरून कळते.तेव्हा रामसेज किल्ल्याबरोबरच त्या पट्ट्यातील चांदवड, धोडप , इंद्राई, राजदेहेर इत्यादी किल्ले अलावर्दीखान तुर्कमान ह्याने घेतले असे शिलालेखात कोरले आहे.रामशेजवर औरंगजेबाने शहाबुद्दीनखान ह्याची नियुक्ती केली , तसेच त्याच्याबरोबर राव दलपत आणि इतर बुंदेले सरदार सुद्धा होते.प्रारंभी बुंदेले व त्यांच्या सरदारांचा किल्ल्यावरील ५०० ते ६०० लोकांच्या शिबंदीसमोर काही टिकाव लागला नाही.त्यातच मे १६८२ साली संभाजी महाराजांनी रुपाजी भोसले व मानाजी मोरे ह्यांना वेढा फोडण्यासाठी पाठवले त्यावेळी शहाबुद्दीन खानाच्या सैन्याबरोबर तुंबळ युद्ध झाले आणि मोगलांना माघार घ्यावी लागली.ह्या विजयाने किल्ल्यावरील शिबंदीत जोर चढला.शहाबुद्दीन खानाकडून काही एकट्याने होत नाही म्हंटल्याबर औरंगजेबाने बहादुरखानास शहाबुद्दीन च्या मदतीस कुमक देऊन पाठवले.शहाबुद्दीन ने किल्ल्याला वेढा घालणे , सुरुंग लावणे , मोर्चे बांधणे , दमदमे तयार करून वर चढवणे हे सर्व प्रयत्न केले पण किल्लेदारासमोर त्याचे काही चालेना.शिवाय खानाने केलेल्या दुसऱ्या कडक हल्ल्यात राजा राव दलपतराय ह्याला दगड लागला त्यामुळे मोगलानी पुन्हा माघार घेतली. शेवटी बादशहाने शाबुद्दीनखानाला परत बोलावले व जुन्नर ला पाठवले आणि वेढ्याची जबाबदारी खानजहान बहादूर कोकलताश ह्या एकट्यावर आली.
कोकलताश ने तर आणखी नवीन योजना आखली त्याच्या योजने प्रमाणे किल्ल्याच्या एका बाजूला हल्ला करायचा म्हणून तोफा दारुगोळा त्या बाजूस आणून हशमांनी आणि सैन्याने जमवाजमव करून गर्दी करून आवई उठून द्यायची आणि दुसऱ्या बाजूस किल्ल्याच्या जिथे शिबंदी नाही किंवा कमी आहे तिथे काही निवडक सैनिकांनी जाऊन किल्ल्यावर हल्ला करायचा. परंतु किल्लेदार इतका हुशार होता कि त्याला हि योजना कळली व त्याने सुद्धा आपल्याला जस काय माहित नाही असे दाखवून मुद्दाम दुसऱ्या बाजूने येणाऱ्या मोगली गटावर हल्ला करण्यासाठी आलेल्या सैनिकांना सडकून काढून मोगलांच्या योजनेवर अक्षरशः पाणी फिरवले. अजून कहर म्हणजे सैन्याने कोण्या एका तांत्रिकाला पकडून आणले आणि तो म्हणाला कि मला १०० तोळे वजनाचा सोन्याचा साप द्या मी तो मंत्रून हातात घेईल मग कुठलीही अडचण न येता तुम्ही किल्ल्यात प्रवेश करू शकाल.एके दिवशी ह्या तांत्रिकाला आघाडीवर ठेवून मोगली सैन्य येताना मराठ्यांना दिसले आणि मराठ्यांनी दगडांचा मारा गोफणीने सुरु केला, ह्या माऱ्यात तांत्रिकाला दगड लागला त्यात तो साप उडाला आणि तांत्रिक जागच्या जागी कोसळला हे पाहून मोगली सैन्याने माघार घेतली.ह्या पराभवाने संतापून औरंगजेबाने कोकलताशला पण पुन्हा बोलवून घेतले आणि वेढा उठला.त्यानंतर संभाजी महाराजांनी किल्लेदाराचे कौतुक करून त्याची बदली एका प्रमुख किल्ल्यावर केली.पुन्हा बादशहाने कासीमखान किरमाणी नावाच्या सरदाराला किल्ला घेण्यासाठी पाठवले पण त्याच्याकडून सुद्धा काही झाले नाही.अशाप्रकारे सण १६८७ पर्यंत किल्ला भांडला आणि शेवटी फितुरीनेच तो मोगलांकडे आला.
मी हि झुंज स्थलाभावी फार थोडक्यात सांगितली ,ह्या लढाईवर सविस्तर लिहिण्यासारखे आहे.थोडक्यात काय माझा एक एक एक एक वर्ष लढू शकतो हे महाराजांचे वाक्य रामशेज आणि मराठ्यांनी सार्थ केले.
संदर्भ- ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – डॉ. सदाशिव शिवदे ,तारीखे दिल्कुशा ह्या भीमसेन सक्सेना च्या ग्रंथाचा श्री. सेतुमाधवराव पगडी ह्यांनी केलेला मराठी अनुवाद – मोगल आणि मराठे , तसेच ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ६ मधील अखबार