ट्रेकर्स ची पंढरी किल्ले हरिश्चंद्रगड भाग २ (Harishchandra Gad Fort Part-2)

साधारण दुपारच्या सुमारास मी मागील भागात सांगितल्याप्रमाणे हरिश्चन्द्रेश्वर मंदिर परिसरात आलो. ह्या परिसरात आल्यावर सगळा थकवा गेला आणि मी तुम्हाला खात्रीने अनुभवाने सांगू शकतो कि संपूर्ण मंदिर परिसरात अत्यंत दैवी स्पंदने अनुभवायला येतात.मी महाशिवरात्रीच्या २ दिवसाआधी गडावर असल्याने गर्दी तर होतीच पण तेवढेच वातावरण भक्तिमय होते. गेल्या गेल्या भूक लागलेलीच आणि समोर आला तो महादेवाचा महाप्रसाद!!!!.अत्यंत झणझणीत तिखट कोबीची भाजी , भात आणि शेवटी राजगिरा लाडू असा बेत होता.महाप्रसाद खाऊन मी मंदिर बघायला सुरुवात केली. हरिश्चंद्रेश्वर मंदिराची पडझड झाली असली तरी मंदिर दिमाखात पौराणिकतेची आणि ऐतिहासिकतेची साक्ष देत उभे आहे.हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर किर्तीमुखाची ३ ते ४ शिल्प ठेवलेली आहेत.तसेच प्रवेशद्वारा शेजारी द्वारपाल कोरले आहेत.मंदिरावरील काही शिल्प झिजले आहेत तसेच दोन्ही बाजूपैकी पश्चिमेकडीन प्रवेशद्वाराचे दोन्ही खांब थोडे झिजले आहेत.मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला उत्कृष्ट हत्ती शिल्प कोरले आहेत.मंदिराचा कळस त्यावरील कळसाची झीज झाली असली तरी कळस पूर्ण शाबूत आहे. माझ्या सहकारी मित्राकडून आणि काही गावकऱ्यांकडून समजले कि ह्या कळसाकडे आतील मार्गातून वर जाता येते परंतु तूर्तास आता हा मार्ग बंद आहे.गाभाऱ्यात चौकोनी शिळेवर चार छोटे लिंग कोरले आहेत आणि त्याच्या बाजूला नव्याने शिव लिंग ठेवले आहे.

मंदिर परिसरात प्रवेश करताना दिसणारे हरिश्चंद्रेश्वर मंदिर. (नुकतेच सोलार पॅनल मंदिर परिसरात लावले आहेत तेहि छायाचित्रात दिसत आहेत)
हरिश्चंद्रेश्वर मंदिर (केदारेश्वराच्या गुहेसमोरून हा फोटो काढला आहे)
कीर्तिमुख

खांबाच्या बाजूला असणारे हत्तीशिल्प

आपण मंदिरात जिथून प्रवेश करतो त्याच्या समोरच्या प्रवेशद्वारासमोर बहुदा पूर्वेकडील प्रवेशद्वारासमोर नंदीची मूर्ती दिसते. नंदीवर कोरीव काम केले आहे पण ते आता झिजले आहे. नंदीच्या उजव्या बाजूला उध्वस्थ मूर्ती ठेवली आहे.नंदीच्या मागे दोन गुहा आहेत त्यातील एका गुहेत एक छोटेखानी चौकोनी भुयार आहे. ह्या भुयारात चांगदेवांनी तप केले अशी गावकऱ्यांमध्ये श्रद्धा आहे.हे भुयार पाहून बाजूला पाण्याचे उत्तम टाके आहे.संपूर्ण मंदिर परिसराची तहाण हे पाण्याचे टाके भागवते. ह्या टाक्यातील पाणी अत्यंत थंडगार आहे. मंदिरात येण्याआधी आम्ही लिंबू सरबत प्यायले होते ते एवढे थंडगार का लागले त्याचे गुपित मला टाक्यातील पाणी पिऊन समजले. असे टाक्यातले स्वच्छ आणि थंड पाणी मी ह्या आधी तरी प्यायलो नव्हतो.टाक्याच्या उजव्या बाजूला म्हणजे मंदिराच्या बहुदा दक्षिणेकडे सिद्धविष्णू महामंदीर आहे.आत गाभाऱ्यात फक्त चौथरा आहे. मंदिरावरील नक्षीकाम उत्कृष्ट आहे आणि उत्तम अवस्थेत आहे.सिद्धमंदिरा बाजूला छोटी गुहा आहे.सिद्धविष्णू मंदिरासमोर गणेशाची शेंदूर लावलेली सुपरिचित मूर्ती ठेवली आहे.मूर्ती पाहून हि बहुदा नंतर आणून ठेवलेली असावी असे वाटते.गणपतीची मूर्ती अत्यंत देखणी आहे, जरी शेंदूर फासला असला तरी तिचे सौंदर्य कमी झाले नाही आहे.

मंदिराभोवती ठेवलेली गणेशाची सुबक मूर्ती
ज्या ठिकाणी चांगदेवांनी तप केले ती संभाव्य जागा
मंदिर सभोवतालच्या गुहा

हे सर्व पाहून आम्ही गुहेत विश्रांती घ्यायची ठरवली . ट्रेकिंग च्या गप्पा मारता मारता झोप कधी लागली समजले नाही. झोपेत तंबोऱ्या सदृश हलकीशी ताण मला ऐकू येत होती ज्याने माझे मन प्रसन्न होत होते.माझ्या सहकारी ट्रेकर ने मला हे वाद्य म्हणजे ब्रह्मवीणा आहे असे सांगितले . तसेच, ती पुढे मला हे पण म्हणाली कि महाशिवरात्रीच्या दरम्यान प्रत्येक प्रहरात आलटून पालटून हि ब्रह्मवीणा वाजविली जाते. वाजवणे म्हणजे अर्थात एक छोटीशी ताण खेचली जाते. आधीच मंदिराभोवतीची स्पंदने अप्रतिम त्यात ब्रह्मविणेचे आल्हाददायक स्वर कानी पडत होते मी माझ्या आनंदाचे शब्दांत वर्णन नाही करू शकत.असो, थोडीशी विश्रांती घेऊन कोकणकड्याला जायचे असल्याने आम्ही सर्व मंदिराच्या मागे असणारी विलक्षण सुंदर केदारेश्वर गुहा अथवा मंदिर पहायला गेलो. हरिश्चंद्रेश्वर मंदिरामुळे मी वरती म्हंटल्याप्रमाणे आधीच तुम्ही भारावून जाता आणि त्यात केदारेश्वर गुहा तुम्हाला अजून वेगळ्या विश्वात नेऊन ठेवते. साधारण चबुतऱ्यापासून ७ ते ८ फूट उंच शिवपिंड ह्या गुहेत आहे (छायाचित्र पहा). शिवपिंडीभिवती ४ खांब आहेत त्या ४ खांबांपैकी ३ खांब पूर्णपणे तुटले आहेत फक्त एक खांब शाबूत आहे.पिंड पाण्याने पूर्णपणे वेढली आहे आणि हे पाणी बारा महिने २४ तास असतेच असे सांगितले जाते. शिवपिंडीच्या डाव्या बाजूला शिवपुजणाचे शिल्प कोरले आहे . शिल्पात सुद्धा शिवपिंड कोरली आहे.तुम्ही जर ह्या मंदिराचे स्वरूप पहिले तर हि एक गुहाच आहे हे मंदिराचे खांब पाहून तुम्हाला जाणवेल.एकंदर ६ खांब ह्या मंदिराच्या दर्शनी भागात दिसतात.केदारेश्वर मंदिर पाहून मंदिराच्या आजू बाजूचा परिसर पाहायला सुरुवात केला.मंदिराभोवती खूप छोटी छोटी मंदिरे आहेत पण त्या व्यतिरिक्त एक वास्तू आपले लक्ष वेधून घेते ती म्हणजे पुष्करणी. हि पुष्करणी संपूर्ण काळ्या दगडात बांधून काढलेली आहे.पुष्करणीच्या मागे चौदा विविध आयुधे धारण केलेल्या विष्णूंची मंदिरे आहेत . ह्यातील बहुतांश मुर्त्या ह्या चोरीला गेल्या आहेत आणि काही मुर्त्या पुष्करणी साफ करताना काढलेल्या गाळात सापडल्या , ज्या सध्या हरिश्चंद्रेश्वर मंदिर सभोवतालच्या एका गुहेत ठेवल्या आहेत. .पुष्करणीत कृपया उतरू नये ती दिसायला खोल वाटत नसली तरी खूप खोल आहे.

हरिश्चंद्रेश्वर मंदिर परिसरातील पुष्करणी
केदारेश्वर मंदिर
शिवपुजनाचे शिल्प
केदारेश्वर गुहा अथवा मंदिर दर्शनी भाग

पुष्करणी पाहून मी मोर्चा वळवला तो मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या गुहांकडे. ह्या गुहांच्या वर तारामती शिखर आहे ,म्हणजेच तारामती शिखराच्या पोटात ह्या गुहा कोरल्या आहेत. गुहा प्रशस्थ आहेत आणि राहण्याची सोय ह्या गुहांमध्ये होऊ शकते.ह्या गुहेंमधील एका गुहेत गणेशाची सुमारे साडे आठ फूट उंच सुंदर गणेश मूर्ती कोरलेली आहे. ह्या गणेशाच्याच आजू बाजूला इतर गुहा आहेत. काही गुहांची पडझड झाली आहे.ह्या गुहेच्या समोर उभे राहिल्यावर डावीकडून वर जाणारी वाट तारामती शिखराकडे घेऊन जाते. मी तारामती शिखरावर गेलो नाही.गुहा पाहून सर्वात शेवटचा मोर्चा वळवला तो किल्ल्यावरील दुसरे आकर्षण अर्थात कोकणकड्याकडे!!!!.हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून कोकणकड्यावर जायला १५ ते २० मिनिटे लागतात.४ वाजता कड्यावर पोहोचलो आणि सर्व प्रथम भास्कर दादांच्या घरी जाऊन तिथे टेन्ट भाड्याने विकत घेऊन थोडा वेळ आराम केला. साधारण पाच ते साडे पाच च्या सुमारास कोकण कडा बघायला पोहोचलो आणि पोहोचताक्षणी थक्क झालो. पहिले तर धडकीच भरली. मी इतके कडे, डोंगर रांगा पहिल्या पण ह्या कड्याइतका रांगडा , रौद्र , बेलाग कडा मी आजवर पहिला नाही आणि पुढे पाहिलं असे वाटत नाही .निसर्गाचे विहंगम तसेच रौद्र रूप मी किमान २० मिनिटे नुसते “आ” वासून पाहत बसलो. कोकणकड्याची सरळ धार साधारण १५०० फूट एवढी भरते तसेच उंची पायथ्यापासून साधारण ३५०० ते ४००० फूट एवढी भरते. कोकणकडा अर्धगोल आकारात आहे.कोकणकड्याच्या आसपास बरीच शिखरे आहेत. आजोबा पर्वत सुद्धा आपल्याला येथून दिसतो. कोकणकड्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे जर तुमचे नशीब जोरावर असेल तर तुम्हाला येथे इंद्रवज्र म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य पावसाळ्यात पाहायला मिळते.कर्नल साईक्स ह्याने त्याला इसवी सण १८३५ मध्ये इंद्रवज्र दिसल्याची नोंद केली आहे.काही ट्रेकर खाली वाकून कडा पाहताना दिसत होती माझ्यात ती हिम्मत झाली नाही आणि कोणी हे साहस करू नये हेच आवाहन करेन.

तारामती शिखराच्या पोट असणारी एक गुहा
गुहेत कोरलेली सुंदर मूर्ती

कोकणकडा

सूर्यास्त व्हायला लागला तसे आम्ही पाचही जण शांत बसून गप्पा मारत होतो.आमच्याबरोबर आमचा सहावा ट्रेकक्षितिज संस्थेतील मित्र पण नेमका कड्यावर भेटला तोहि आमच्यात सामील झाला.निसर्गाचा विहंगम सोहळा डोळ्यात साठवून पाहत होतो, एव्हाना मनात भरलेली धडकीहि नाहीशी झाली.सूर्यास्त झाल्यावर सकाळी कड्याला पुन्हा भेट द्यायची हे मनाशी पक्के करून कड्याच्या पठारावर टेन्ट मध्ये आलो.कड्यावर टेन्ट मध्ये राहणे म्हणजे आणखी एक विलक्षण सोहळा आहे असे मला वाटते कारण रात्री संपूर्ण अंधार असतो शेकोट्या पेटलेल्या असतात आणि असे वाटते कि एखादी लांब कोणा मोठ्या सरदाराची छावणी पडली आहे .अशा वेळेस गार वारा अंगावर घेत टॉर्च च्या मंद प्रकाशात कड्यावर फिरण्याची मजा काही औरच.गम्मत म्हणजे एवढी गर्दी असताना कोणीही उगाच एखाद्याच्या टेन्ट समोर येऊन आवाज करणे किंवा मोक्याची जागा हेरण्याचा प्रयत्न करणे हे असले काही प्रकार तुम्हाला दिसणार नाहीत ह्याचे कारण ह्या जागेचे असलेले ट्रेकर च्या मनातील स्थान आणि वातावरणातली स्पंदन. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व जण राहतात निदान मला तरी हा अनुभव आला आहे .जेवण झाल्यावर आकाशात पडलेले चांदणे पाहत गप्पा टप्पा मारत टेन्ट मध्ये राहण्याचा अनुभव घेत झोपी गेलो.

सकाळी उठून पुन्हा कड्यावर फेरा मारला ह्या वेळेस कड्याच्या उजव्या बाजूस म्हणजे नळीच्या वाटेच्या बाजूने फेरफटका मारला.उजव्या बाजूस आजोबा पर्वत, सीतेचा पाळणा हि शिखरे दिसतात.फेरफटका मारून ९.३० च्या सुमारास कोकणकड्याच्या निरोप घेऊन खिरेश्वर मार्गाने उतरायला सुरुवात केली.आम्ही चढलो ती जुन्नर दरवाज्याची वाट किल्ला चढताना बालेकिल्ल्याला डावीकडून वळसा घालते तर खिरेश्वर वाट उजवीकडून येते.वाट तशी सोपी आहे परंतु काहीठिकाणी निमुळती असल्याने रेलिंग्ज लावलेले आहेत. काही पॅच शांतपणे दगडाचा आधार घेऊन उतरावे . उतरताना बॅग पाठीला असल्याने विशेषताना बॅग कुठे दगडाला घासणार नाही किंवा बॅगेची अडचण होत आहे का ते नीट पाहावे.खिरेश्वर वाट उतरताना बेलाग डोंगर आपली साथ करत असतो.साधारण सव्वा ते दिड तासात आपण बऱ्यापैकी उतरलेले असतो परंतु शेवट पर्यंत आता संपेल नंतर संपेल हेच कायम जाणवत राहते.खिरेश्वर वाटेचे जंगल सुरु झाल्यावर जंगलाच्या तोंडावर वाघाचे शिल्प शेंदूर फासून ठेवले आहे.हे शिल्प पाहून आपण जंगलातून साधारण ४० मिनिटांत खिरेश्वर च्या पायथ्याला पोहोचतो.पायथ्याला पोहोचल्यावर आम्ही गाईड कडे पोटभर जेवलो. मटकीची भाजी, चपाती, लोणचे, पापड असा साधा बेत होता. जेवून परतीच्या वाटेवर लागण्याआधी खिरेश्वर मंदिराला भेट दिली.हे मंदिर सुद्धा पुरातन मंदिर आहे. मंदिराची थोडी पडझड झाली असली तरी हरिश्चंद्रेश्वर मंदिराप्रमाणे खिरेश्वर मंदिर आपली ऐतिहासिक साक्ष आजही टिकून आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर शेषयायी विष्णू व त्यांच्या परिवाराचे शिल्प कोरले आहे. तसेच बाहेरील सभामंडप छताला सोळा शिल्पपट कोरले आहेत. मंदिराच्या कळसाची जरी थोडी पडझड झाली असली तरी कळसाची रचना आणि संपूर्ण कळस शाबूत आहे.मंदिराच्या कळसाच्या मागील बाजूस खाली एक अप्रतिम शिल्प कोरले आहे .शिल्प कसले आहे ते कळत नाही पण शिल्पातल्या मूर्तीतले भाव व्यवस्थित आजही दिसतात. मंदिराबाहेर मला पुन्हा एक काका ब्रह्मविणेवर ताण वाजवताना दिसले. मंदिराबाहेर दोन ते तीन शिवपिंडी ठेवल्या आहेत. खिरेश्वर मंदिर पाहून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि बरोबर ५ वाजता कल्याण गाठले.

वाघाचे शिल्प
खिरेश्वर मंदिर
शेषयायी विष्णू
छतावरील १६ शिल्पपट्ट्या

कल्याण गाठल्यावर पुढचे कितीतरी दिवस हरिश्चंद्रगड आणि ट्रेकच्या आठवणीत रमलेलो होतो.मी तुम्हाला खरं सांगतो रायगडानंतर जर मनावर कुठल्या किल्ल्याने भुरळ घातली असेल तर हरिश्चंद्रगडाने. गडाच्या वाटांमध्ये , गडाच्या वास्तूंमध्ये, गडाच्या आसमंतात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आहे जी तुम्हाला गडावर परत यायला साद घालते.मी अभिमानाने सांगू शकतो कि मी शिवतीर्थ रायगड नाणे दरवाज्यामार्गे आणि दैवी ऊर्जेची खाण हरिश्चंद्रगड जुन्नर दरवाजामार्गे पाहून आलो.आणि ह्या दोन्ही वाटा राजदरवाज्याच्या आहेत. ब्लॉग ला नाव ट्रेकर्स ची पंढरी मी का दिले आहे ते तुम्ही स्वतः जा पहा आणि अनुभवा तेव्हा तूम्हाला समजेलच.

आम्ही ५ जण , कोकणकडा आणि सूर्यास्त !!!

किल्ल्याच्या इतिहासाबद्दल– हरिश्चंद्रगडाला ऐतिहासिक तसेच पौराणिक इतिहास सुद्धा आहे. सर्व प्रथम आपण पौराणिक इतिहास पाहुयात. हरिश्चंद्रगडाचा उल्लेख अग्निपुराण तसेच मत्स्यपुराण ह्या प्राचीन ग्रंथांत आढळतो.हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूस संस्कृत भाषेत शिलालेख कोरले आहेत.त्यातील डाव्या बाजूस चक्रपाणी वटेश्वरनंदतु I तस्य सुतु विकट देऊ II अशा ओळी कोरल्या आहेत. डॉक्टर वि.भी.कोलते ह्यांनी मंदिराच्या आसपास असणारे मग ते गणेश मूर्तीच्या वरील भागात कोरलेला छोटा शिलालेख असो किंवा केदारेश्वर गुहेच्या स्तंभावर कोरलेले शिलालेख असो ह्यातील बरेचश्या शिलालेखांचे वाचन केले आहे. विस्तारभयास्तव मी सध्या येथे ते देत नाही. एक स्वतंत्र लिखाणाचा तो विषय आहे. प्रत्येक शिलालेखात असलेल्या व्यक्तीचा उल्लेख हा बहुदा मंदिरात वास्तव्य केलेल्या योगींचें अथवा भक्तमंडळींची नावे असावीत असा तर्क श्री.वि.भी.कोलते ह्यांनी लावला आहे. एकंदर मंदिर परिसर पाहता हा तर्क सुसंगत वाटतो.किल्ल्यावरील शिलालेखांत निवृत्तीनाथ , नामदेव महाराज ह्यांचेहि उल्लेख आले आहेत. आणखी महत्वाचा पौराणिक संदर्भ म्हणजे चांगदेवांनी मंदिरातल्या गुहेत तपश्चर्या करून तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला. गावकरी आजही ह्याचा उल्लेख करतात.फार कमी गडांबाबत एवढे पौराणिक उल्लेख सापडतात.

आता वळूयात किल्ल्याच्या राजकीय इतिहासाकडे. मी वरती उल्लेख केल्याप्रमाणे किल्ल्याला पौराणिक पार्शवभूमी असल्याने आणि तसेच येथील शिखरांची नावे आणि पुराणातील ग्रंथांमध्ये आलेल्या उल्लेखांमुळे किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत जोडला जातो.शिवकाळात म्हणायचे झाले तर हा किल्ला दुसऱ्या सुरत लुटीनंतर स्वराज्यात दाखल झाला. ह्या नोंदीस पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान ह्या ग्रंथात दुजोरा मिळतो .सभासद बखरीत सुद्धा ह्या गडाचा उल्लेख येतो.शाहू महाराजांच्या रोजनिशीत २०० किल्ल्यांच्या यादीत १०७ व्या क्रमांकावर हरिश्चंद्रगडाचा उल्लेख येतो.अखेरच्या इंग्रज मराठे युद्धात कर्नल साईक्स ह्याने हा किल्ला काबीज केला. ह्याच कर्नल साईक्स ला १८३५ साली इंद्रवज्र दिसले होते अशी त्याने नोंद केली आहे.इ.स १८३६ ते १८४३ दरम्यान हरिसन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने हरिश्चंद्रगड थंड हवेचे ठिकाण करण्याचा प्रयत्न केला त्याने मंदिराकडे लेण्यांजवळ एक बंगला देखील बांधला परंतु तो आगीत जळून लगेच खाक झाला. त्या बंगल्याचा चौथरा आजही गडावर पाहायला मिळतो.

ऐतिहासिक माहिती संदर्भ

Gazetteer of the Bombay Presidency: Ahmadnagar,Government Central Press, Bombay Vol. XVII page 717,718,719

महाराष्ट्रातील काही ताम्रपट व शिलालेख – वि .भी.कोलते पृष्ठ २६३

सातारकर व पेशव्यांची रोजनिशी भाग १ थोरले छत्रपती शाहू महाराज , पृष्ठ १२७ (Selections From the Satara Raja’s and the Peishawa’s Diaries, I: Shahu Chhatrapati by Rao Bahaddur Chimnaji Vad )

शककर्ते शिवराय – विजयराव देशमुख खंड २ पृष्ठ २१२

http://www.trekshitiz.com , http://www.durgbharari.in

गाईड मोबाईल नंबर – हरी , ७४९९१३०५०२
कोकण कड्यावरील टेन्ट आणि जेवणाच्या सोयीसाठी – भास्करदादा , हॉटेल कोकणकडा , ८३०८०८१९३९

Leave a comment