नाशिक आणि त्या पुढील पट्ट्यातील अगदी गुजरात सीमेपर्यंत किल्ल्यांच्या साखळ्या आहेत. ह्या साखळ्यांमध्ये भौगोलिक स्थानानुसार तसेच व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी बहुतांश किल्ले बांधले गेले आणि एक प्रकारची लष्करी ठाणी निर्माण झाली.ह्याच मार्गावर असलेले काही किल्ले हे अध्यात्मिक दृष्टीने सुद्धा महत्वाचे आहेत. आज आपण मनमाड पट्ट्यातील असेच ४ किल्ले पाहणार आहोत जे लष्करी दृष्ट्या महत्वाचे आहेतच परंतु , तेवढेच त्यांचे अध्यात्मिक स्थान महत्वाचे आहे.नेहमीप्रमाणे मी ट्रेकक्षितिज संस्थेतर्फे किल्ले अंकाई- टंकाई- कात्रा- मेसणा हे चार किल्ले पाहणार होतो परंतु काही कारणाने मेसणा ऐवजी मनमाड मधील गोरखगड आम्ही पाहिला.अंकाई टंकाई हे दोन किल्ले अजंठा-सातमाळ डोंगर रांगेत येतात. दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी पायथ्याचे अंकाई गाव गाठावे. अंकाई किल्ला नावाचे रेल्वे स्थानक हि आहे परंतु ते किल्ल्यापासून २ किलोमीटर अंतरावर असल्याने आणि फक्त पॅसेंजर गाड्या थांबत असल्याने तसे गैरसोयीचे आहे.स्वतःचे वाहन असल्यास केव्हाही उत्तम. आदल्या दिवशी रात्री प्रवास सुरुवात करून सकाळी अंकाई गावात पोहोचलो. किल्ल्यावर अगस्ती ऋषींचे स्थान असल्याने, तसेच दोन्ही किल्ल्यांवर पुरातत्व खात्याने भरपूर काम केले आहे आणि अजूनही काम चालू आहे त्यामुळे पायरी मार्गाने दोन्ही किल्ल्यांवर जाता येते. अंकाई किल्ला जास्त प्रसिद्ध असल्याने ह्या किल्ल्यावर शाळेच्या सहली आणि लोकांची वर्दळ जास्त असते त्यामुळे सर्वप्रथम अंकाई किल्ला सकाळी लवकर पहावा.आम्ही सकाळी ७.३० ला किल्ला चढायला सुरुवात केली. अंकाई किल्ला चढण्याआधी सर्वप्रथम टंकाई किल्ल्याच्या पोटात खोदलेल्या जैन लेण्या पहाव्यात.लेण्यांचा काळ साधारण १० व्या ते १२ व्या शतकातला वाटतो.अंकाई-टंकाई डोंगरांच्या प्राचीनत्वाचा हा सर्वात पहिला पुरावा आहे.लेण्या अत्यंत सुंदर कोरल्या आहेत.लेणी समूहातील एका लेणीत इंद्राणी मातेच्या अथवा काही ठिकाणी उल्लेखकेल्याप्रमाणे अंबिका ह्या जैन देवतेच्या मूर्तीला भवानी मातेचे रूप दिले गेले आहे.लेण्यांमध्ये यक्षाची मूर्ती कोरली आहे.लेण्यांच्या काही छतांवर कमळ पुष्प आणि उजव्याबाजूकडील एका लेण्याच्या चौथऱ्यावर हत्तीची शिल्प कोरली आहेत. लेण्या पाहून डावीकडील अंकाई किल्ला चढायला सुरुवात केली.

डावीकडचा अंकाई आणि उजवीकडचा टंकाई

जैन लेण्यांची काही क्षणचित्रं


भवानी माता
थोड्या पायऱ्या चढल्यावर दोन अभेद्य बुरुज आपले स्वागत करतात.उजवीकडे वळल्यावर पहिल्या गोमुखी धाटणीचा दरवाजा लागतो.दरवाज्यातून आत शिरल्यावर नेहमीप्रमाणे देवडी पहायला मिळते. इथून डावीकडे वळल्यावर वरती दोन आणखी बुरुज दिसतात आणि त्यांच्या खाली गुहा कोरलेल्या पहायला मिळतात.आपण प्रत्यक्ष ज्या दरवाज्यातून आत शिरतो त्या दरवाजाच्या डावीकडील बुरुजावर खरे तर उभे असतो.इथून अंकाई गाव तसेच किल्ल्याच्या तटात असलेल्या फांज्या आणि जंग्या ह्यांच्या रचना पहायला मिळतात . एखाद्या किल्ल्याच्या बुरुज आणि तटबंदीच्या रचना नीट पाहण्यासाठी अंकाई किल्ल्याचा तट अतिशय उपयुक्त आहे. हे सर्व पाहिल्यावर पुढे कातळ लागतो त्या कातळावरून पुढे गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो .हा दरवाजा पार केल्यावर आपण अष्टकोनी बुरुजांतून आत शिरतो. खरं तर हा एक दरवाजा असला तरी आपण दोन चौकटींतून प्रवेश करतो. इथे सुध्या डावीकडे देवड्या आहेत आणि थोडे पुढे गेल्यावर एक लेणं लागते.लेण्यांच्या आत मूर्ती कोरलेली आहे. परंतु संपूर्ण लेण्यात वटवाघुळांचा वावर आहे. लेण्यांच्या प्रवेशद्वारावर दोन मुर्त्या कोरल्या आहेत. बहुदा ते जय- विजय असू शकतात.हे सर्व पाहून पुढे थोडा डावीकडे वळल्यावर तीन दरवाजे एका मागोमाग लागतात आणि ह्यातील तिसरा दरवाजा पार केल्यावर थोड्या मोकळ्या जागेत आपण येतो आणि इथून खाली तटाची आणि बुरुजांची व्यवस्थित रचना पहायला मिळते.पुढे उजवीकडे वळसा घालून आपण किल्ल्याच्या सहाव्या दरवाज्यातून आत शिरतो.हा दरवाजा पार केल्यावर लहान चौकटीत शेंदूर फासलेली मूर्ती दिसली. मी मूर्ती बद्दल तिथे बसलेल्या गावकऱ्यांना विचारले तेव्हा त्यांनी हि मूर्ती मुंजादेवाची आहे असे सांगितले.

पहिले प्रवेशद्वार

पहिल्या प्रवेशद्वाराजवळ असलेले दोन अभेद्य बुरुज

दुसरा दरवाजा पार केल्यावर डावीकडे पहायला मिळणारे लेणं

तिन एका रेषेत असणाऱ्या दरवाज्यांतील पहिला दरवाजा

मुंजादेव
मुंजादेव पाहून शेवटच्या सातव्या दरवाज्यातून आपला गडाच्या मुख्य भागावर प्रवेश होतो. प्रवेश झाल्यावर समोरच एक छोटे पाण्याचे टाके लागते आणि त्याच्या समोर दोन गुहा पहायला मिळतात.एका गुहेस जी लेणी सदृश आहे त्यास सीता गुंफा बोलले जाते. त्यातील एका गुहेचा सध्या गुरं बांधण्यासाठी वापर केला जातो.इथून सरळ चालत जायचे थोड चालल्यावर अगस्ती ऋषींचा आश्रम लागतो.आश्रम म्हणजे खरं तर ही एक गुहा आहे. गुहेला नवीन प्रकारात सजवले आहे. गुहेत अगस्ती ऋषींची , दत्ताची, भवानी मातेची, शिव-पार्वती ची मंदिरं आहेत. काही साधू देखील येथे राहतात. मुनींचा आश्रम पाहून सरळ चालत गेल्यावर किल्ल्याचे मुख्य अवशेष असलेल्या भागात आपण प्रवेश करतो. सर्व प्रथम एक मोठे पाण्याचे टाके लागते . टाक्याच्या मध्ये समाधी बांधली आहे. हि समाधी अगस्ती ऋषींची मानली जाते. ह्या बांधीव टाक्यांस काशी तळे म्हंटले जाते. समाधी पाहून पुढे गेल्यावर मोठा बांधीव तलाव आहे.तलावाच्या काठावर दोन टाकी आणि शिवलिंग कोरले आहेत.इथून पुढे गडाच्या सर्वात टोकाला चौकोनी आकारात असलेल्या भव्य वाडा दिसतो. वाड्याच्या तीन बाजूस चौकोनी बुरुजांच्या आकारात सज्जे बांधले आहेत ज्यावर चढून आपण गडावरून दिसणारा मनमाड कडे जाणारा रस्ता तसेच रेल्वे मार्ग पाहू शकतो.इथून आजू बाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.अगस्ती ऋषींच्या गुहेच्या वरती एक टेकडी आहे जो गडाचा सर्वोच्च माथा मानला जातो. परंतु तिथे ध्वजा व्यतिरक्त पाहण्यासारखे काही नाही. वाडा पाहून आम्ही सर्व जणांनी थोडी किल्ल्याच्या इतिहासावर चर्चा केली आणि टंकाई च्या दिशेने मार्गस्थ झालो.

सातवा दरवाजा

अगस्ती ऋषी आश्रम

काशी तळे

गडावरील मोठा तलाव

गडावरील सर्वात मोठी आणि शेवटची वास्तू म्हणजे हा वाडा
अंकाई उतरायला सुरुवात केली आणि ज्या खिंडीतून दोन किल्ले वेगळे झालेत त्या ठिकाणी पोहोचून टंकाई चढायला सुरुवात केली. टंकाई वर विशेष अवशेष नसल्याने कोण्ही फिरकत नाही. आम्ही उतरलो तेव्हा एव्हाना जवळच्या शाळेची सहल आलेली . चिमुकली पोरं एकमेकांचे हाथ पकडून गड चढत होते. त्यांच्यामधील काहींशी गप्पा मारल्या, माझ्या पाठीवर असणाऱ्या हायड्रा च्या पाईप मुळे मुलं आणि मुली कुतूहलाने बघत होते. त्यांना वाटत होते कि हा ऑक्सिजन पाईप आहे.असो,टंकाई चढायला साधारण २० मिनिटे फक्त लागली. टंकाई चढताना दोन दरवाजे आपल्याला लागतात. दरवाजा सुस्थितीत आहे. दरवाजा पाहून सरळ चालत राहायचे आणि गडावरील उध्वस्थ शिव मंदिर सर्वात प्रथम पहावे. शिव मंदिराच्या बांधणीवरुन मंदिर पुरातन असावे असा अंदाज येतो. मंदिराचे छप्पर आणि कळस आज अस्तित्वात नाही . मंदिर पाहून पुढे गेल्यावर मोठा तलाव आहे. तलाव पाहून गडाच्या सर्वात टोकाला चालत रहायचे, वाटेत पाण्याची टाकी पहायला मिळतात. सर्वोच्च टोकाला पोहोचल्यावर थोडे खाली पडक्या वास्तूचे अवशेष दिसतात. हि वास्तू कदाचित किल्ल्याची छोटी चौकी असावी. पडकी वास्तू पाहून झाल्यावर सरळ परतीचा प्रवास सुरु करावा आणि किल्ल्याच्या डाव्या बाजूच्या टोकाने चालत राहावे. चालताना बरीच पाण्याची टाकी , थोडे तटबंदीचे अवशेष आणि छोट्या उध्वस्त वास्तू दिसतात. पुन्हा दरवाज्या पाशी आल्यावर आपली गडफेरी संपते.
गडांच्या इतिहासाबद्दल – अंकाई किल्ल्यावर असणारा अगस्ती मुनींचा आश्रम तसेच गडाच्या पोटात खोदलेल्या ब्राह्मणी लेण्यांचा काळ हा बाराव्या शतकातला आहे आणि हीच बाब गडाची प्राचीनत्व सिद्ध करते.पुरातत्वतज्ञ डॉक्टर वर्मांच्या मते हा किल्ला देवगिरीचे यादव सम्राट सिंघण ह्याच्या कारकिर्दीत (१२००-१२४७) परमारांचा किल्ला दुर्गपाल श्रीधर ह्याला लाच देऊन यादवांनी घेतला.मुघल सम्राट शाहजहान ह्याचा सरदार खानजहान याने हा किल्ला १६३५ साली लाच घेऊन घेतला.पुढे हा किल्ला निजामाकडे गेला आणि १७५२ साली झालेल्या भालकीच्या तहानुसार मराठ्यांकडे आला.दिनांक ५ एप्रिल १८१८ साली कर्नल मॅकडोवेल याची तुकडी किल्ल्याजवळ गेली. त्यांनी सहा पौंडी तोफांच्या सहाय्याने पायथ्यावर हल्ला केला.तोफांचा मारा पाहून किल्लेदाराने प्रतिकार न करता किल्ला इंग्रजांच्या हवाली केला,
इतिहास संदर्भ – Gazetteer Of The Bombay Presidency Vol.xvi पृष्ठ ४१९-४२०, श्री.राजा शिवछत्रपती – भाग १ – गजानन भास्कर मेहेंदळे , पृष्ठ – ५६१ तळटीप ३७५., WWW.Durgbharari.in