मनमाड पट्ट्यातल्या अंकाई आणि टंकाई किल्ल्यांची सफर आपण केली. खरं तर त्या दिवशीचे नियोजित किल्ले आमचे झाले होते ,परंतु अधिकचा किल्ला झाला तर ट्रेकर साठी ती बाब सोने पे सुहागा असते.आमचा मित्र ऋषिकेश सकाळपासून आपण जवळच असलेला गोरखगड करूयात असे म्हणत होता.लीडर शी आम्ही बोलून ठरवले आणि गोरखगड साठी निघालो. खरं तर दुपारचे तीन वाजत आलेले त्यामुळे थोडं आव्हानात्मक होते कारण किल्ल्याच्या वाटेत एकहि झाड नव्हते.गोरखगडावर जास्त अवशेष नाहीत, पण तरी किल्ल्याचे अस्तित्व हे गोरक्षनाथांच्या गुहेमुळे अथवा आपण ध्यानकक्षामुळे म्हणूयात पाहण्यासारखे आहे.किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी जाऊ शकते. गडाच्या पायथ्याशी मोठे वडाचे झाड आहे.वडाचे झाड पाहून मला तो एखादा तपस्वी वाटला.वडाच्या झाडापासून सरळ थोड्या वाटेपर्यंत पायऱ्या आहेत.तिथून सरळ झेड पद्धतीने चालत राहायचे आणि साधारण ३५ ते ४० मिनिटांत गडाच्या गुहेच्या मार्गापर्यंत पोहोचतो. तिथून सरळ जाऊन डावीकडे वळून आपण गोरक्षनाथांच्या समाधी मंदिरापर्यंत पोहोचतो.

पायथ्यापासून दिसणारा गोरखगड

गोरक्षनाथ समाधी मंदिर

गुहा

पायथ्याला दिसणारा वटवृक्ष
गुहेपासून पुढे वाट खूप निमुळती आहे त्यामुळे थोडे सांभाळून जावे.उजव्या बाजूला वळल्यावर गुहा लागते. इथून पुढे मात्र शक्यतो प्रस्तरारोहणाचे साहित्य असल्यास वर जाऊ नये. तसेही वरती भगव्या झेंड्याशिवाय अवशेष नाही असे मला समजले.जेव्हा तुम्ही प्रवेश करता आणि गुहेत पाहता तेव्हा एक सुखद धक्का बसतो.गुहेतील पाणी आरशासारखे स्वछ आहे. आपले प्रतिबिंब अतिशय सुस्पष्ट पाण्यात दिसते.आम्हा सर्वांना भर उन्हात गड चढल्याचे सार्थक वाटले. गुहेतून समोरच्या बाजूला उभे राहून उत्तम छायाचित्र काढता येतात.जर तुम्ही सूर्य मावळतीच्या तासभर आधी आलात तर आणखी उत्तम.गुहेत गोरक्षनाथांची मूर्ती ठेवली आहे. गुहेत मनसोक्त वेळ घालवून गड उतार झालो.एव्हाना संध्याकाळ झाली होती.दिवसभराच्या ट्रेकिंग मुळे जोराची भूक लागलेली होती.मस्त पोटभर जेवून मंदिरात झोपण्याऐवजी गावकऱ्यांनी बिबट्याचा वावर असल्याने एका घराचे काम चालू होते त्याच्या टेरेस मध्ये झोपण्यास जागा दिली आणि शिवाय चटई वगैरेची मदत पण केली. मस्त चांदणे डोळ्यासमोर ठेवून झोपी गेलो.

गोरक्षनाथांची गुहा

पाण्यात उमटलेले प्रतिबिंब
सकाळी उठून नेहमीप्रमाणे सर्व उरकून कात्रा किल्ल्याकडे प्रयाण केले.कात्रा किल्ल्याची वाट आणि पायथा सापडायला थोडा वेळ लागला.एकतर वाट चिंचोळी आहे. आमचा टेम्पो ट्रॅव्हलर होता म्हणून जाऊ शकलो. मोठी बस नेताना नीट मार्ग जाणून न्यावी.सर्वात महत्वाचे हा किल्ला वाटाड्या न नेता कृपया करू नये.आम्ही योग्य ठिकाणी पोहोचल्यावर वाटाड्या जो येणार होता तो ऐन वेळी न आल्याने स्वतःच वाट शोधायची ठरवली. पहिला टप्पा कपिल मुनींच्या आश्रमाचा होता इथूनच पुढे गडाकडे वाट जाते हे माहित होते. कपिल मुनींचा आश्रम सरळ आपणास दिसतो तिथ पर्यंत छोटा चढ करून पोहचल्यावर आश्रमाच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्याने गडावर वाट जाते. कपिल मुनींचा आश्रम म्हणजे एक गुहा आहे. आश्रमात मुनींची मूर्ती आहे. सध्या ह्या आश्रमात एक साधू राहतात त्यांचे नाव राजू बाबा तेच सर्व आश्रमाची देखभाल करतात.आश्रम अतिशय स्वछ आणि सुंदर ठेवला आहे. आश्रमाच्या पटांगणात लिंबू, सीताफळ अशी झाडे लावली आहेत.तसेच गुहेच्या बाजूला सुंदर सुग्रण पक्ष्याची घरटी पाहायला मिळाली. गुहा पहायला नंतर यायचे ठरवून पुढे मार्गस्थ झालो. कपिल मुनींच्या आश्रमाच्या मागे एक डोंगर आहे परंतु तो किल्ला नव्हे तर ह्या डोंगराच्या बाजूला असणारा डोंगर म्हणजे कात्रा किल्ला.ह्या दोन डोंगरांच्या घळीत पोहोचलो म्हणजे तिथून किल्ल्याला जायला वाट आहे.परंतु काही केल्या प्रचंड झाडी वाढल्याने घळीत पोहोचायला वाट सापडेना.आमचा आवाज बहुदा राजू बाबांना गेला असावा आणि ते स्वतःहून आम्हाला किल्ल्यावर न्यायला आले. किल्ल्यावर जाण्यासाठी डोंगराच्या खालून सरळ पायवाटेवरून झाडीतून राजू बाबांनी घळीत एक मोठे झाड दिसते तिथपर्यंत पोहोचवले.किल्ला अनवट वाटेचा आणि कोणी फिरकत नसल्याने प्रचंड झाडी वाढलेली त्यामुळे समोर वाट असून आम्हाला सापडली नाही.घळीत पोहोचल्यावर तिथून सरळ किल्याच्या खालून ढोरवाट किल्ल्याच्या दरवाज्याकडे जाते.खरं तर हि वाट उभं राहून जाण्याची आहे परंतु झाडीचे साम्राज्य एवढे वाढले होते कि एक पॅच अक्षरशः रांगत जाऊन पार करावा लागला.रांगून जाण्याचा पॅच संपल्यावर मोठे दगड चढून आपण गडाच्या उध्वस्त प्रवेश द्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो.प्रवेश करण्याआधी जुन्या पायऱ्या दिसतात.किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे अवशेष आज शिल्लक नाहीत.

कात्रा किल्ला

पायऱ्या
गडावर फारसे काही अवशेष नाहीत परंतु जे आहेत ते आज गडाचे ऐतिहासिकपण तसेच प्राचीनता सिद्ध करत आहेत. गडावर तीन ते चार पाण्याची टाकी आहेत (हा आकडा जास्त हि असू शकतो).प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला चालत गेल्यास हि टाकी दिसतात.तसेच गडावर काही जुन्या गुहा आहेत परंतु झाडींचे प्रचंड साम्राज्य झाल्याने एक गुहा आम्ही फक्त पाहिली.हि गुहा नक्कीच शिवकालीन मला नाही वाटली ती प्राचीन असावी असा अंदाज आहे.गुहा पाहून परत मागे आलो आणि राजू बाबांनी गडाच्या सर्वोच्च भागावर नेले जिथे सध्या भगवा झेंडा फडकावला आहे.राजू बाबांनी गडावर काही झाडे लावली आहेत असे त्यांनी सांगितले आणि ते गडावर कधी वाटले तर येत असतात.सर्व पाहून मग गड उतार व्हायला सुरुवात केली.उतरताना मला आणि माझा मित्र ऋषिकेशला आनंदाचा धक्का बसला कारण मी आणि ऋषिकेश एकत्र असताना आमचे आवडते लाडके जाधव मामा ह्यांची आम्ही कायम मिमिक्री करत असतो आणि आठवण काढत असतो. ते एका ग्रुप ला घेऊन कात्रा किल्ला चढत होते. मामांनी आम्हाला ओळखले आणि थांबण्याचा आग्रह केला. त्यांना आम्ही सांगितले पण कि मामा आम्ही तुमची नेहमी आठवण काढतो.मामांशी थोडा संवाद साधून गड उतार व्हायला लागलो. येताना झाडींतून रांगत यायला लागल्याने उतरताना राजू बाबांनी थोड्या वरच्या पट्ट्यातून उतरवले. हि वाट पण तशी चिंचोळीच त्यामुळे राजू बाबांनी चढताना बहुदा आणले नसावे.अर्ध्या तासात पुन्हा कपिल मुनी आश्रमात पोहोचून गुहेच्या बाजूला पाण्याचे छोटे टाके होते तिथे पोहोचलो. पाणी अतिशय उत्तम थंडगार पिण्यालायक होते.

पाण्याचे टाके

किल्ल्यावरील गुहा
किल्ला उतरेपर्यंत साधारण एक वाजलेला होता.त्यामुळे मेसणा किल्ला करायचा कि नाही ह्यावर आम्ही सर्व विचार करत होतो.त्यात जाधव मामा सुद्धा म्हणाले होते कि मेसणा वर प्रचंड झाडी वाढली आहेत. प्रवास लांबचा असल्याने मग आम्ही किल्ला टाळण्याचा निर्णय घेतला आणि त्या ऐवजी लासलगाव ची गढी बघायचा निर्णय घेतला.त्या आधी कपिल मुनींच्या गुहेत गेलो. गुहेत शांतपणे बसून राजू बाबांनी त्यांचा अध्यात्मिक प्रवास आणि पुढील आयुष्यातील त्यांच्या इच्छा तसेच कपिल मुनींबद्दल माहिती सांगितली. खूप वेळ अध्यात्मिक चर्चा करून आम्ही राजू बाबांचा निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत जेवून ठरल्याप्रमाणे लासलगाव ची गढी बघितली. मला लासलगावची गढी हा स्वतंत्र भुईकोट किल्ला वाटला . गढीत आजही तिथले रहिवाशी राहतात. काही नवीन बांधकामे झाली असली तरी जुने दरवाजे तटबंदी शिल्लक आहे. तसेच लासलगावच्या वेशीला तटबंदी असावी असे गावात शिरल्यावर वाटले.लासलगावची गढी पाहून जाता जाता सरदार विंचूरकरांचा वाडा पाहिला.संध्याकाळची वेळ झाल्याने वाडा बंद होता , परंतु तरी दरवाज्याच्या फटीतून आतला भाग आम्ही पाहिला आणि बाहेरून सुद्धा पूर्ण वाडा फिरलो.एक विलक्षण वेगळा अनुभव ह्या ट्रेक मध्ये आला. गोरखगडाची भटकंती तसेच कात्रा किल्ला चढताना आलेला अनुभव लक्ष्यात ठेवण्यासारखा होता.एकंदर हे चारही किल्ले करताना (आधीच्या भागात लिहीलेले अंकाई – टंकाई पकडून) एक मात्र स्पष्ट जाणवले कि ह्या सर्व किल्ल्यांना अध्यात्मिक इतिहास सुद्धा होता. तो पदोपदी तिथल्या वास्तूंमधून आणि दगडांमधून जाणवत होता.पुन्हा भेटूच पुढील भटकंतीत.

कपिल मुनी गुहा

कपिल मुनींची मूर्ती

आश्रम परिसर

लासलगाव गढी

सरदार विंचूरकर वाडा

जाधव मामांसोबत मी आणि ऋषिकेश
गडांच्या इतिहासाबद्दल – गोरखगड हा किल्ला टेहळणीसाठी असावा हे किल्ल्यावरील अवशेषांवरून समजते. परंतु त्या आधी तो नाथपंथाचे राहण्याचे आणि ध्यानाचे स्थान म्हणून वापरात असावा. ह्याला काही पौराणिक आधार आहे का नाही ते शोधावे लागेल. परंतु एकंदर अंकाई-टंकाई किल्याजवळचे स्थान आणि अंकाई आणि टंकाई किल्ल्यांचा काळ पाहता मनमाड मधील गोरखगडाला अध्यात्मिक पार्शवभूमी नक्की असावी.
वरती जसे मी गोरखगडाबद्दल सांगितले आहे तोच एकंदर इतिहास कात्रा किल्याला लागू पडतो. फक्त फरक नाथ पंथांऐवजी कपिल मुनींचा पौराणिक उल्लेख ह्या किल्ल्याबाबत येतो.अजून सखोल माहितीसाठी आपल्याला कागदपत्रं उजेडात येण्याची वाट पाहावी लागणार आहे. थोडक्यात हे दोन्ही किल्ले टेहळणीचे असावे असा अंदाज आहे.