काही ट्रेक्स हे ट्रेकर्स साठी आव्हान असतात तर काही ट्रेक्स आव्हान पण त्याच बरोबर समाधानाची पर्वणी घेऊन येतात. अलंग-मदन-कुलंग , रायगड , राजगड ते तोरणा , हरिश्चंद्रगड इथून यादीची सुरुवात होते जे ट्रेकर्स साठी पर्वणी असलेले ट्रेक्स आहेत .कळसुबाई हे महाराष्ट्रातले उंच शिखर आहे हे आपणा सर्वाना माहित आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्याचा मान साल्हेरला जातो. साल्हेरच्याच साथीने त्याचे लहान भाऊ आपण म्हणूयात असे सालोटा ,मुल्हेर,मोरा ,आणि हरगड बागलाण पट्ट्यातले उत्कृष्ट दुर्ग आहेत. ह्या दुर्गांच्या साथीनं मी वरती सांगितलेल्या ट्रेक्स च्या यादीत एक अत्यंत सुंदर पण तेवढाच तुमची कस पाहणारा ट्रेकर्स चा आवडता ट्रेक केला जातो तो म्हणजे बागलाण रेंज ट्रेक.निसर्गाची मुक्त उधळण , बेलाग उंच किल्ले , अप्रतिम दुर्गस्थापत्य तसेच महाराजांच्या भीमपराक्रमाचा वारसा ह्या पट्ट्यातल्या किल्ल्यांना लाभला आहे.मी कित्येक वर्ष वाट बघत होतो हा ट्रेक करण्यासाठी आणि शेवटी तो योग डिसेंबर २०२२ मध्ये आला.
साल्हेर आणि सालोटा हे किल्ले उत्तरेला गुजराथमधील डांग प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण प्रदेशाच्या सीमेवर आहे.मी सर्व ट्रेकर्स ना आम्ही ज्या पद्धतीने नियोजन करून हा ट्रेक केला त्या पद्धतीने करावे माझी निश्चित खात्री आहे तुमचा पूर्ण ट्रेक व्यवस्थित आणि संस्मरणीय होईल.सर्व प्रथम आम्ही सालोटा करायचे ठरवले कारण साल्हेर ला आम्ही मुक्काम करणार होतो.सालोटा आणि साल्हेर ह्या दोन्ही किल्यांना जाण्यासाठी साल्हेरवाडी,वाघांबे,माळदर ह्या तिन्ही गावांतून वाटा आहेत. दोन्ही किल्ले चढताना किल्यांच्या मधल्या खिंडीत पहिले पोहोचावे लागते त्यामुळे सर्वात उपयोगी वाट म्हणजे माळदर गावात यायचे आणि तिथून सालोटा चढायला घ्यावा.माळदर गावाला माळदर वाडी किंवा महादरवाडी असेही संबोधले जाते.ठरल्याप्रमाणे साधारण सकाळी ८ वाजता चढाई सुरु केली . पायथ्यापासून दोन्ही किल्ले आपल्याला समोर दिसतात. समोरच सालोट्याच्या डोंगरात खोदलेल्या पायऱ्या लांबून स्पष्ट दिसतात.सुरुवातील थोडी सरळ चाल संपल्यावर चढ सुरु होतो.साधारण दीड तासानंतर आपण साल्हेर आणि सालोट्याच्या खिंडीत प्रवेश करतो. खिंडीतून साल्हेर खूप सुंदर दिसतो.सर्वप्रथम जात असाल तर वाटाड्या अवश्य सोबत न्यावा.थोडा वेळ आम्ही खिंडीत विश्रांती घेतली . खिंडीतुन वरील भागात उजव्या बाजूस वळायचे आणि निमुळत्या वाटेने सावकाश चालत राहायचे.मी गेलो तेव्हा थंडीचे दिवस असल्याने ह्या भागात दिवसा हि प्रचंड वारा वाहत होता.

महादरवाडी अथवा माळदर वाडीतून दिसणारे साल्हेर – सालोटा ( डावीकडचा साल्हेर आणि उजवीकडचा सालोटा)

साल्हेर वरून दिसणारा सालोटा (किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या आणि त्यापुढील डोंगरात खोदलेली वाट शोधा)
निमुळत्या वाटेने चालत राहिल्यावर आपण डोंगराच्या मध्यभागी येतो. इथून डोंगर खोदून कोरलेल्या पायऱ्या स्पष्ट दिसतात.पायऱ्यांपर्यंत चढून जाण्यासाठी सरळ चढत रहायचे. फक्त चढताना घसारा काही ठिकाणी असल्याने सावकाश पाऊल टाकावे घाई करू नये.सालोटा म्हणा अथवा साल्हेर म्हणा ह्या दोन्ही किल्ल्यांच्या पायऱ्या अत्यंत देखण्या आहेत. गुढघाभर उंचीच्या पायऱ्या थोडा दम काढतात.सरळ पायऱ्या चढून डावीकडे काटकोनात वळावे व सरळ चढून आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यापाशी पोहोचतो. दरवाज्यात कड्याचे मोठे दगड पडल्याने आत हळू जावे.डोक्याला दरवाज्याचा भाग लागण्याची शक्यता आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला कमळपुष्पाचे नक्षीकाम केले आहे. कमळपुष्पाच्या बाजूला चौकटीत गणपती कोरला असावा परंतु तो आता अस्पष्ट झाला आहे. आत शिरल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे टाके आहे.टाके बघून सरळ चालत राहायचे आणि उजव्या बाजूला वळावे. उजव्या बाजूला वळल्यावर जेव्हा तुम्ही समोर पाहता तेव्हा उत्तुंग देखणा साल्हेर , साल्हेर ला जाण्यासाठी डोंगरात खोदलेल्या पायऱ्या आणि किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर असणारे परशुराम मंदिर स्पष्ट दिसते. परंतु हा ट्रेलर असतो कारण खरा सिनेमा हा जेव्हा साल्हेर तुम्ही सालोट्याच्या सर्वोच्च माथ्यावरून पाहता तो नजारा आणखी सुखावणारा असतो. साल्हेर ला मनात साठवून सरळ चालत राहिल्यावर किल्ल्याचा दुसरा दरवाजा लागला. दरवाज्याच्या बाजूला जागा नसल्याने देवड्यांच्या ऐवजी दरवाजाच्या वर चक्क दगडी माळा बांधला आहे. हा दरवाजा आणि इथून पुढे जाणारी डोंगर फोडून केलेली वाट आपल्याला साल्हेर चढताना स्पष्ट दिसते. ह्या वाटेने आपण किल्ल्याला वळसा घालून जात असतो.वाटेत उजव्या बाजूला खांब टाकी पाहायला मिळतात.

कातळात कोरलेल्या पायऱ्या

किल्ल्याचा पहिला दरवाजा

किल्ल्याचा दुसरा दरवाजा

दगडी माळा
इथून उजवीकडे पायऱ्या चढून आपण किल्ल्याचा तिसरा दरवाजा पार करून गडमाथ्यावर पोहोचतो. परंतु त्या आधी सरळ चालत राहिल्यावर पाण्याची दोन टाकी कोरलेली आढळतात.टाकी पाहून तिसऱ्या दरवाज्यातून गडात प्रवेश करावा.गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर टोकावर न जाता खालून सरळ चालत राहावे. चालताना सर्वप्रथम मोठे टाके पाहायला मिळते आणि टाक्याच्या पुढेच उध्वस्थ वास्तूचे अवशेष पहायला मिळतात. हे पाहिल्यावर पुढे गेल्यावर अशाच एका उध्वस्त वास्तूत मारुतीची शेंदूर फासलेली मूर्ती पहायला मिळते.मूर्ती पाहून आता थोडं वर चढून किल्ल्याचा सर्वोच्च माथा गाठावा. इथून साल्हेर त्रिकोणी पिरॅमिड सारख्या आकाराचा स्पष्ट आणि सुंदर दिसतो. ह्या ठिकाणी फोटो काढले जात नाहीत असे शक्यच होत नाही.काहीही म्हणा साल्हेर चे रुपडे आणि त्याचा रुबाब हा काही औरच आहे.आम्ही सर्वानी मनसोक्त वाऱ्यात साल्हेर आणि आजूबाजूचा परिसर पाहून सालोट्याचा निरोप घेतला.एव्हाना दुपारचा १ वाजत आला होता आणि पुढचे आव्हान होते ते उन्हात साल्हेर चढायचे .(क्रमश:)

तिसरा दरवाजा

साल्हेर सोबत
किल्याच्या इतिहासाबद्दल – सालोट्याचा स्वतंत्र इतिहास असा नाही आहे . जो साल्हेर ला इतिहास आहे तोच सालोट्या बाबतीत आहे कारण दोघं किल्ल्यांचे स्थान बघता त्यांना समान इतिहास असावा असे वाटते .