बागलाण रेंज ट्रेक भाग – २ (किल्ले साल्हेर – Salher Fort)

सालोटा उतरायला सुरुवात करून लगेच दोन्ही किल्ल्यांच्या खिंडीत पोहोचलो. दुपारचे दीड वाजल्याने आणि ऊन चढत असल्याने न जेवता सरळ साल्हेर सर करण्याचे लीडर आणि आम्ही सर्वानीच ठरवले.मला वाटलेले खूप वेळ लागेल परंतु आश्चर्य असे कि साधारण अर्ध्या तासात मी साल्हेर च्या पायरीमार्गावर पोहोचलो होतो.समोरच साधारण ३० ते ३५ पायऱ्या चढल्यावर किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत गेल्यावर डावीकडे वळून पुन्हा पायऱ्या चढत रहायच्या. साल्हेर च्या पायऱ्या सुद्धा अगदी सालोट्यासारख्या उंच आहेत.पायऱ्या चढून पूर्ण गेल्यावर उजवीकडे वळल्यावर किल्ल्याचा दुसरा दरवाजा लागतो. दरवाजाच्या वरती नक्षीकाम तसेच वरील दोन कोनाड्यात वेगळे नक्षीकाम केले आहे.दुसरा दरवाजा पार केल्यावर कोपऱ्यात मराठी – गुजराथी मिश्रित शिलालेख कोरला आहे. ज्याचा अर्थ उमगत नाही.इथून पुन्हा आपण खड्या पायऱ्या चढून गडाच्या कमानीदार तिसऱ्या दरवाजाजवळ पोहोचतो.दरवाजाच्या दोन्ही बाजूला कमळपुष्प कोरले आहे. गडाच्या रेखीव कमानी आजही शाबूत आहेत.मी तुम्हाला खरं सांगतो साल्हेर चा एक एक अवशेष अगदी किल्ल्याच्या पायऱ्या म्हणा,अत्यंत सुंदर आणि कल्पकतेणे तेवढेच गडाच्या सुरक्षिततेचा विचार करून बांधले आहेत.

पहिला दरवाजा

साल्हेरच्या पहिल्या दरवाज्यापासून दिसणारा सालोटा

दुसरा दरवाजा

तिसरा दरवाजा

इथून पुढे सालोट्याप्रमाणेच कडा फोडून मार्ग निर्माण केला आहे.ह्या मार्गात डाव्या बाजूला बऱ्याच गुहा आणि पाण्याची टाकी आहेत. साधारण १० मिनिटांत आपण गडाच्या चौथ्या दरवाजाच्या आधी असलेला किल्ल्याचा बुरुज दिसतो तिथे पोहोचतो. इथून डावीकडे वळल्यावर आपण गडाच्या चौथ्या दरवाज्यातून प्रवेश करतो. हा दरवाजा ओलांडून आपण किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर येतो.इथून सरळ चालत राहायचे ,वाटेत काही अवशेष व चौथरे पहायला मिळतात. साधारण १० ते १५ मिनिटावर चालल्यावर काही खराब टाकी लागतात. ती पाहून थोडे पुढे आल्यावर किल्ल्यावरचा मोठा तलाव लागतो . ज्याला गंगासागर तलाव म्हंटले जाते. तलावाच्या मध्यभागी पाण्याची पातळी मोजण्यासाठी दगडी खांब रोवलेला आहे. तलावाच्या समोर कातळामध्ये दोन टाकी कोरली आहेत. तलावाच्या डाव्या बाजूला घडीव दगडांत रेणुका मातेचे मंदिर बांधले आहे. मंदिराच्या दरवाजावर गणेश आणि आत रेणुका मातेची मूर्ती आहे.मंदिराच्या सभामंडपाचे छप्पर आता राहिले नाही . मंदिर पाहून पुढे वर जायचे आणि थोडे वर गेल्यावर गडावरच्या दोन मोठ्या मुख्य गुहा दिसतात . ह्याच गुहांमध्ये आम्ही राहिलो होतो. दोन गुहांपैकी एका गुहेत मारुती आणि दत्तांच्या मूर्तीची स्थापना केली आहे.

चौथा दरवाजा

दुपारी पोहोचल्यावर सर्व प्रथम जेवून घेतले आणि वेळ असल्याने थोडा आराम करून साधारण ४.३० च्या सुमारास परशुराम मंदिराकडे प्रस्थान केले.मंदिरावर जायला परत साधारण २० ते २५ मिनिटांचा ट्रेक करावा लागतो. हा छोटासा वेळ आपला सय्यम पाहत असतो. साधारण २० मिनिटांत परशुराम मंदिरावर पोहोचलो. मंदिरावर पोहोचल्यावर सुसाट वाऱ्याने आमचे स्वागत केले. मंडळी मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही असा वारा वाहत होता. जॅकीट , मंकी कॅप असून सुद्धा वारा प्रचंड लागत होता अनु हुडहुडी भरत होती. विचार करा सूर्यप्रकाश असताना हि हालत होती , समजा पहाटे किंवा रात्री ह्या ठिकाणी असतो तर ? मला नाही वाटत तग धरू शकलो असतो. असो आम्ही सर्व अक्षरशः मंदिरापाशी बागडत होतो आणि प्रचंड थंडीत वातावरणाचा निसर्गाचा आस्वाद घेत होतो.मी एक नक्की सांगतो साल्हेर चा सर्वोच्च माथा तुम्हाला सर्व विसरायला भाग पडतो की तुम्ही कोण आहात, काय करता . अशी नशा आहे इथल्या हवेत.

रेणुका माता मंदिर

गंगासागर तलाव

आम्ही राहिलो ती गुहा

माझे स्वतःचे आणि ग्रुप बरोबरचे फोटो काढून झाल्यावर मी आणि माझा मित्र कुशल परशुराम मंदिरात आत शांत बसलो कारण वारा खरंच झोंबत होता. मंदिरात शांत डोळे मिटून बसलो आणि खरंच सर्व विसरून गेलो. मंदिरात दोन पादुका आणि काही मूर्ती ठेवल्या आहेत.थोड्या वेळाने बाहेर येऊन सूर्यास्त अनुभवला आणि पाऊले गुहेकडे वळवली. खाली गेलो तेव्हा मस्त चहा चुलीवर गरम होत होता. अंधार पडल्यावर आम्ही सर्व चुलीच्या साक्षीने गप्पा टप्पा करत बसलो. ह्या दरम्यान पण थंडी एवढी वाजत होती कि स्लीपिंग बॅग अंथरायला आणलेली चादर सुद्धा अंगावर घेतली.साल्हेरच्या गुहेत संध्याकाळचा अंधार पडल्यानंतरचा जो वेळ मी व्यतीत केलाय माझ्या मित्र आणि मैत्रिणींबरोबर तो मी कधीच विसरू शकत नाही.हे क्षणच तुमचे आयुष्य समृद्ध करतात. वेगवेगळे किस्से सांगणारे अवलिये ह्या ट्रेक ला होते (त्यात मी पण होतो बरं !!!). चुलीवर फक्कड जेवण आमचे गाईड काका करत असताना आमच्या गप्पा रंगून गेल्या. थोड्या वेळाने गावातून पोळ्या घेऊन एक मुलगा आला आणि मग पोटभर जेवलो.जेवायला मोठी पोळी , मिक्स कडधान्याची भाजी ,लोणचे , भात , वरण असा फक्कड बेत होता. साल्हेर वरून तारांचे समूह पण व्यवस्थित न्याहाळता आले.झोपण्याआधी बहुदा कुठल्याही गडावर राहिलो तर हा आमचा सर्वांचा कार्यक्रम असतोच.जेवून झाल्यावर थोड्याच वेळात झोपी गेलो.एक तुम्हाला सांगून ठेवतो साल्हेर ला थंडीत राहणार असाल तर स्लीपिंग बॅग आणि सर्व बेडींग व्यवस्थित आणा. शिवाय गुहेला एक खिडकी आहेत ती तुम्हाला बॅग लावून बंदिस्त करावी लागतेच नाहीतर तुम्ही झोपूच शकत नाही इतका वारा असतो.सकाळी लवकर उठून नाश्ता करून साल्हेर चे उरलेले अवशेष पहायला सुरुवात केली.

परशुराम मंदिर

साल्हेरवाडीत उतरताना लागलेला पहिला दरवाजा

साल्हेरवाडीत उतरताना लागलेला दुसरा दरवाजा

साल्हेरवाडीत उतरताना लागलेला तिसरा दरवाजा

सर्वात प्रथम लागले ते दगडी यज्ञकुंड. खरं तर साल्हेर चा अवाका पाहता किल्ल्यावर भरपूर शिबंदी असणार आणि त्यामुळे किल्ल्यावर धार्मिक विधी नक्की होत असणार त्याचीच बहुदा हा यज्ञकुंड साक्ष देत होता.पुढे कातळात कोरलेली टाकी पहायला मिळतात .ह्यातील एका टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे.टाके पाहून सरळ चालत राहून उतरायला सुरुवात केल्यावर साल्हेरवाडीकडे उतरताना किल्याचा पहिला दरवाजा लागला .दरवाजाच्या चौकटीतुन समोर दिसणारे विहंगम दृश्य मी टिपले आणि पुढे चालू लागलो.दरवाजा उतरल्यावर डाव्या बाजूला गणेश कोरला आहे.सरळ खाली उतरल्यावर आपल्याला दुसरा आणि तिसरा असे सलग दरवाजे लागतात. एवढ्या मुबलक प्रमाणात दरवाजे फार कमी किल्ल्यावर पहायला मिळतात. तिसरा दरवाजा उतरल्यावर तटात एक गुहा कोरली आहे हे एखादे कोठार हि असू शकते.तीन दरवाजे उतरून आपण सरळ चालत राहिल्यावर किल्ल्याच्या माची परिसरात येतो.माचीत समोर आल्यावर सध्या पुरातत्व खात्याचे किल्ल्यावर काम चालू असलेले दिसले.माचीवर काही दगडी जोत्यांचे अवशेष पाहायला मिळाले. माचीच्या तटबंदीवर येऊन समोर न्याहाळले आणि धोडप चे सुंदर दर्शन दिसले. साल्हेरवरून बरेच किल्ले दिसतात फक्त ते ओळखता आले पाहिजेत आणि वातावरण स्वछ हवे.तटबंदीवर थोडे रेंगाळून पुढे चाललो आणि चौथा दरवाजा पहायला मिळाला. दरवाजा सुस्थितीत आहे. ह्या दरवाजाच्या बाजूला एक शिलालेख कोरला आहे परंतु दुर्दैवाने त्यावर इतका चुना फासला होता कि काहीच अक्षरं लागत नव्हती. दरवाजा पाहून पुढे निघालो आणि किल्ल्याचा शेवटचा दरवाजा दिसला. हा दरवाजा बुरुजात कोरला होता. तुम्ही जर साल्हेरवाडीतून चढला तर हा पहिला दरवाजा लागतो . थोडक्यात साल्हेरवाडीतून चढल्यावर मी जे वरती दरवाज्यांचे क्रम सांगितले ते उलटे होतात. इथून पुढे पायवाटेने आणि काही ठिकाणी दगडी कातळातून आपण १५ ते २० मिनिटांत साल्हेर उतरतो. उतरल्यावर एका झाडाखाली गणेशाची मूर्ती ठेवली होती. पुढे सरळ चालत आल्यावर नव्याने देवीचे मंदिर बांधले आहे. इथे काही वीरगळी ठेवल्या आहेत. हे सर्व पाहून थोडे पुढे आल्यावर ह्या किल्ल्यावरील एका लढाईत मर्दुमकी गाजवलेल्या सरदार सूर्याजी काकडे ह्यांची समाधी बांधली आहे. समाधी पाहून साधारण ११ च्या सुमारास पुन्हा साल्हेरवाडीत आलो आणि एका सुंदर अनुभूतीची सांगता झाली .अर्थात ट्रेक अजून बाकी होता आणि दुसऱ्या दिवसाचा दुसरा किल्ला आणि ट्रेक मधला तिसरा हरगड करायचा होता.(क्रमशः)

साल्हेरवाडीत उतरताना लागलेला चौथा दरवाजा

गडाच्या इतिहासाबद्दल – साल्हेर चा इतिहास हा खूप मोठा आहे.त्यावर एक स्वतंत्र ब्लॉग होऊ शकतो म्हणून विस्तारभयास्थव मी थोडक्यात इतिहास सांगतो.परशुरामांचे मंदिर आणि त्या संबंधी पुराणातील उल्लेखांमुळे किल्ल्याचा इतिहास पुराणकाळात जातो.पृथ्वीदान केल्यावर स्वतःसाठी भूमी निर्माण करण्यासाठी येथून परशुरामांनी बाण सोडून समुद्राला मागे केले असे सांगितले जाते.ह्याला पुरावा म्हणून समोर छिद्र पडलेला कंडाणा किल्ल्याचा डोंगर दाखवला जातो. किल्ल्यावरील टाक्यांवरून किल्ला सातवाहन काळातील असावा असा अंदाज आहे. इ.स १३४० मधील तारीख ऐ फिरोझशाही व ऐन इ अकबरी (१५९०) ह्या दोन्ही किल्ल्यात साल्हेर मुल्हेर चे उल्लेख येतात.शिवाजी महाराजांनी १६७० साली काढलेल्या बागलाण मोहिमेत साल्हेर ला वेढा घातला . ह्या लढाईत किल्लेदार फतेउल्लाखान हा मारला गेला आणि ४ जानेवारी १६७१ ला किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.

किल्ला ताब्यात आल्यानंतर मात्र औरंगजेब प्रचंड चिडला आणि त्याने पुन्हा किल्ला घ्यायला इखलासखान मियाना ह्याला सांगितले. हा लढा फोडायला मोरोपंत पिंगळे , व प्रतापराव गुजर पुढे आले. मराठ्यांची हि लढाई उघड्या मैदानातील लढाई होती. ह्या लढाईत मोगलांची धूळदाण उडाली. ह्या लढाईने मुघलांना मराठ्यांनी दाखवून दिले कि मराठे खुल्या मैदानातील लढाई पण जिंकू शकतात. दुर्दैवाने ह्या लढाईत महाराजांचे बालपणीचे सवंगडी सूर्याजी काकडे ह्यांना वीरगती आली.महाराज असेस्तोवर साल्हेर मराठ्यांकडे होता. संभाजी राजांच्या काळात मोगलांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात यश आले नाही. पुढे १६८६ साली लाच देऊन किल्ला मुघलांकडे आला. मुघलांनंतर तो निजामाकडे होता आणि इ.स १७९५ साली पेशव्यांकडे आला. इंग्रजांनी १८१८ साली किल्ल्याचा ताबा घेतला होता परंतु बडोद्याच्या दिवाण श्री समर्थ ह्यांनी साल्हेरची सर्व कागदपत्र दाखवल्यावर किल्ला बडोद्याच्या गायकवाडांकडे सुपूर्द करण्यात आला.

इतिहास संदर्भ- शिवपुत्र संभाजी ,डॉ.कमल गोखले पृष्ठ २१८, http://www.durgabharari.in

Leave a comment