बागलाण रेंज ट्रेक भाग ३ – (किल्ले हरगड)

साल्हेरच्या मन मोहून टाकणाऱ्या अनुभवानंतर दुसऱ्या दिवशीचा दिवसातला दुसरा किल्ला हरगड सर करायला मुल्हेर गावाकडे मार्गस्थ झालो. साल्हेरवाडी ते मुल्हेर साधारण ४० मिनिटांचे अंतर आहे. आम्ही साधारण १२ वाजेपर्यंत मुल्हेर ला पोहोचलो. गावात श्री .शुक्ल काकांकडे जेवणाची उत्तम सोय होते. आम्हाला किल्ला सर करायचा असल्याने काकांकडून डबा भरून सर्वानी हरगड किल्ल्याकडे मोर्चा वळवला. हरगड , मुल्हेर, मोरा ह्या तिनही किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव मुल्हेरच आहे. किल्ल्याकडे जाताना एक भलेमोठे पार असलेले झाड लागते. खरं तर अगदी पायथ्यापर्यंत गाडी जाते परंतु आमचे दुर्दैव मधला रास्ता खचल्याने झाडापासून साधारण १५ मिनिटांपर्यंत आम्हाला चालत जावे लागले.(हि गोष्ट डिसेंबर २०२२ ची आहे त्यामुळे आत्ता बदल असू शकतो). आमचा वाटाड्या येणार नसल्याने थोडी पंचायत झालेली परंतु सर्वानी हरगड करायचाच हा निर्धार करून चालायला लागलो. नशिबाने एक काका मुल्हेर आणि मोराच्या खिंडीपर्यंत येण्यासाठी तयार झाले. उन वाढत होते त्यामुळे थोडी पंचाईत झाल्यासारखे झाले. परंतु सर्व खंदे ट्रेकर्स असल्याने कोणीही नकारात्मक बोलत नव्हते. हरगड अजून खूप दूर होता आणि मला खूपच उंच वाटत होता. आपला कस लागणार ह्या तयारीने पहिला चढ चढायला सुरुवात केली.

पायथ्यापासून दिसणारा हरगड

सुरुवातीच्या पट्ट्यात मुल्हेर माची पर्यंत नवीन पायऱ्या आणि नवीन बुरुज बांधले आहेत. हा पट्टा गाठायला अर्धा तास लागतो. इथे पोहोचेस्तोवर पुढचा चढ काय असणार ह्याचा अंदाज आला होता. इथून सरळ पुढे गेल्यावर मुल्हेर माचीचे पर्यायाने मुल्हेरचेच पहिले प्रवेशद्वार लागते. इथून डावीकडचा रस्ता मुल्हेर किल्ल्याकडे जातो. समोर गणेश मंदिर दिसते . गणेश मंदिरासमोर छोटा तलाव होता. तलावासमोर साल्हेर च्या गंगासागर तलावाप्रमाणे पाण्याची पातळी मोजण्यासाठी दगडी खांब रोवला आहे.इथून सरळ पुढे जायचे म्हणजे उजव्या बाजूने जायचे मग आपण हरगडाकडे चालायला लागतो. वाटेत उजव्या बाजूला पुरातन रामाचे मंदिर लागते. रामाच्या मंदिरावाचे शिल्पकाम अत्यंत देखणे आहे.

श्री राम मंदिर

मंदिर पाहून सरळ चालत राहिल्यावर काही अंतराने खिंड लागते. खिंडीसमोर हरगड दिमाखात दिसतो. इथून हरगडचा सुंदर कोरलेला एकमेव दरवाजा पाहायला मिळतो.खरंतर खिंडीतून सरळ वाटेने ह्याच दरवाजातून आपण प्रवेश करू शकतो , परंतु आमच्याबरोबर वाटाड्या म्हणून आलेल्या काकांनी हि वाट कठीण आहे आणि खूप घसाऱ्याची आहे असे सांगितले तसेच दरवाजा लागण्याआधी बरीच पडझड सुद्धा झाली आहे. त्यामुळे शक्यतो हि वाट टाळावी.इथून पुढे अजून लांबचा पल्ला राहिलेला.सुदैवाने काकांनी गडापर्यंत येण्याची तयारी दर्शवली त्यामुळे आम्ही जरा निर्धास्त झालो. कारण लगेच वाट सापडण्यासारखी नव्हती.पुढे सरळ चालत गेल्यावर मोठे शेत लागते ह्या शेताच्या उजव्या बाजूने जंगलात शिरून पायवाटेने गडाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या घळीत जायचे आणि तिथून गडाच्या उध्वस्त प्रवेशद्वारातून गडावर आपला प्रवेश होतो.परंतु हि घळ गाठायला बराच वेळ लागतो आणि वाट दमछाक करणारी आहे. साधारण ३ च्या सुमारास हरगड च्या २ उध्वस्त प्रवेशद्वारा पार करून गडावर पोहाचलो. पोहोचल्यावर जेवून गडफेरी करायला सुरुवात केली.ज्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आत आलो त्या दरवाज्याला तटबंदी सुद्धा पाहायला मिळते . गडमाथा विस्तीर्ण आहे. सर्वात पहिले गडावरचे शिव मंदिर पाहायला मिळते. शिव मंदिर पाहून सरळ चालत राहायचे वाटेत मारुतीची मूर्ती पाहायला मिळते. ह्याच मूर्तीच्या उजव्या बाजूला थोडे तटबंदी आणि चौथऱ्यांचे अवशेष पाहायला मिळतात.

उद्धवस्त प्रवेशद्वार

शिव मंदिर

मारुती

पुढे टोकाला गेल्यावर किल्ल्यावरचे मुख्य आकर्षण म्हणजे लांब लचक धातूची तोफ पाहायला मिळते. हरगडची उंची आणि स्थान पाहता हि अजस्त्र तोफ कशी आणली असेल हा संशोधनाचा विषय आहे. थोडे नीट निरखून पाहिल्यावर एक मात्र जाणवले कि कदाचित हि तोफ मोठमोठ्या लोखंडी बांगड्या जुळवून एकसंध केली असू शकते. पण अर्थात हा अंदाज आहे खात्री नव्हे. असे सांगितले जाते कि हि तोफ जंजिरा किल्ल्यावरच्या कलालबांगडी तोफेची प्रतिकृती हजारबांगडी तोफ म्हणून ओळखली जाते.तोफेच्या पट्ट्यात मुल्हेर किल्ला आलेला स्पष्टपणे जाणवतो. तोफ पाहून किल्ल्याचा चांगल्या अवस्थेत ला दरवाजा पाहण्यासाठी तोफेच्या उजव्या बाजूने सावकाश खाली उतरावे.उतरल्यावर एका मागोमाग दोन दरवाजे पाहायला मिळतात.दरवाज्याला बुरुज आणि थोडी तटबंदी आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे खिंडीतून दिसणारा हाच तो दरवाजा परंतु खिंडीतून डोंगरसोंडेवरून ह्या दरवाज्याच्या वाटेने येणे शक्यतो टाळावेच.दरवाज्यावर कमानीला सुंदर नक्षीकाम केले आहे आणि दरवाज्याच्या चौकटीतून मुलहेर किल्ल्याचे रूप अतिशय सुंदर दिसते.

किल्ल्यावरील तोफे च्या खाली असलेला व पायथ्यापासून दिसणारा दरवाजा

तोफ

मुल्हेर नाम तो सुना होगा (हरगडाच्या दरवाजाच्या कमानीतून दिसणारा मुल्हेर)

दरवाजा पाहून पुन्हा वर आलो आणि आल्या वाटेने परतीची वाट पकडली.आल्या वाटेने परत खाली उतरलो. साधारण उतरायला संध्याकाळचे ६ वाजले. गार वारा आणि थंडी सुरु झालेली. मुल्हेर ला श्री उद्धव महाराजांच्या आश्रमात राहिलो. संध्याकाळी शुक्ल काकांकडे अप्रतिम जेवणावर ताव मारून आश्रमात शांत वातावरणात आम्ही ट्रेकर्स नि गप्पांचा फड रंगवला आणि झोपी गेलो. आता वाट पाहायची होती ती तिसऱ्या दिवसाची आणि मुल्हेर- मोरागडाच्या भेटीची.बहुतेक जण हरगड नाही करत परंतु माझे स्पष्ट सांगणे आहे ट्रेकर च्या अनुभवाला कस लावणारा हा किल्ला आहे आणि तसाच तो समृद्धहि आहे. त्यामुळे अजिबात हा किल्ला वगळू नये. (क्रमशः)

किल्ल्याच्या इतिहासाबद्दल – हरगड चा ऐतिहासिक संबंध हा मुल्हेर गावाशी आणि पर्यायाने मुल्हेर गडाशी जोडला आहे. त्यामुळे मुल्हेरला जो इतिहास आहे तोच हरगडाचा जवळपास आहे. मुल्हेर गडाची ऐतिहासिक माहिती जाणून घेताना नकळत आपल्याला हरगडाची माहितीही होते. किल्ल्याला स्वतंत्र असा इतिहास सध्यातरी नाही आहे.

Leave a comment