सफर बिदर- बसवकल्याणची भाग १

आता पर्यंत भरपूर डोंगर दऱ्या आणि किल्ल्यांची भटकंती झाली, पुढेहि होईलच. आपल्या महाराष्ट्राने आणि देशाने भटकंतीसाठी अमाप वारसे आपल्याला दिलेलेआहे.मला स्वतःला हि वारसास्थाळे तेथील इतिहास तसेच सामाजिक गोष्टी ,खाद्यसंस्कृती जाणून घ्यायची विशेष आवड आहे.भारताच्या दक्षिण भागाला इतिहास आहे हे सर्वश्रुत आहे. मराठ्यांची पावले पार दक्षिणेच्या टोकापर्यंत गेलेली. त्यामुळे मराठ्यांच्या पाऊलखुणा जाणून घेण्यासाठी दक्षिण वारी करणे अवश्य आहे. त्याअनुशंगानेआज आपण सफर करणार आहोत ह्याच दक्षिण प्रदेशातील कर्नाटक राज्यातील बिदर आणि बसवकल्याण भागाची. ह्या दोन्ही शहरांत मी दोन दिवस मनमुराद भटकलो.बिदर आणि बसवकल्याण हे स्वतंत्र किल्ले असले तरी ह्या दोन शहरांत भरपूर इतिहास आणि आवर्जून पाहण्यासारखी स्थळे विखुरली गेली आहेत.कल्याणहुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लातूर – बिदर एक्सप्रेस पकडून सकाळी ७.३० ला बिदर ला पोहोचलो.ट्रेकक्षितिज संस्थेतर्फे आयोजन असल्याने स्टेशन समोर बस लगेजच हजर होती.आल्या आल्या आमच्या ड्राइव्हर ने मराठी -कानडी मिश्रित मराठी वाक्य हाणल्यावर समजले आपण दक्षिणेत पोहोचलो.

पहिले सर्वप्रथम बिदर गेटवे हॉटेल मध्ये पोहोचलो जिथे आमची राहण्याची सोय केलेली . हॉटेलवर फ्रेश होऊन थोडा वेळात बिदर किल्ल्याच्या दिशेने प्रस्थान केले. वाटेत आम्हाला दोन ठिकाणी थांबा घ्यायचा होता. एक जिथे बहामनी सुलतानांचे मकबरे बांधलेली ती जागा आणि दुसरे म्हणजे झरना अथवा झरणी नरसिंह मंदिर.बिदर पासून साधारण ३ ते ५ किलोमीटर वर हे मकबरे आहेत. तुम्ही जेव्हा पण जाल तेव्हा ड्राइव्हर ला आधीच सांगून ठेवायचे, मग तो हि सर्व स्थळं आपल्याला दाखवतो. आम्ही साधारण १० एक मिनिटांत अष्टुर जे बिदर पासून ३ किलोमीटर अंतरावर आहे तिथे पोहोचलो . ह्याच ठिकाणी बहामनी सुलतानांचे हे मकबरे बांधले आहेत. खरं तर वाटेत ठीक ठिकाणी बिदर मध्ये विखुरलेले ऐतिहासिक अवशेष दिसून येतात. फक्त डोळे उघडे ठेवायचे. जिथे मकबरे बांधले आहेत ते एक मोठे विस्तीर्ण मैदान आहे. मकबरे ठराविक अंतरावर समान पद्धतीने बांधण्यात आले आहेत.ह्यात अनुक्रमे खालील बादशहांचे मकबरे पाहायला मिळतात ते असे (एखादे नाव राहून गेले असण्याची शक्यता आहे )- सुलतान अल्लाउद्दीन शाह ,सुलतान अल्लाहुद्दिन शाह – द्वितीय , सुलतान हुमाँयू , सुलतान मुहम्मद शाह , सुलतान मुहम्मद शाह-३ इत्यादी. ह्यातील सर्वांची नावे मार्क केलेली नाहीत. काही निवडक फोटो मी खाली देत आहे. एक महत्वाची गोष्ट तुम्ही जेव्हा अल्लाहुद्दिन शाह ह्याचा मकबरा पाहाल तेव्हा वरती निळ्या रंगाच्या फरश्या लावलेल्या दिसतील तर माझा असा आधी समाज झालेला कि पुरातत्व खात्याने आकर्षकपणाआणण्यासाठी त्या लावल्या असाव्यात मात्र नंतर कळले कि त्या मूळ पर्शिअन फरश्या आहेत. कदाचित पर्शिअन शब्दावरूनच आपण फरश्या बोलायला लागलो का ? देव जाणे.

अहमद शाह अल-वली मकबरा

सुलतान अल्लाउद्दीन शाह – द्वितीय मकबरा

हुमायू मकबरा

ह्या मकबऱ्यांमधील हुमायू चा मकबरा उध्वस्त झालेला आहे.मकबऱ्यांच्या आत कबरी बांधल्या आहेत. मकबरे पाहत असताना घुबड , पोपट व इतर पक्ष्यांचे सुद्धा दर्शन होत होते.मकबरे पाहून पुढचे स्थळ पाहण्याआधी वाटेत आणखी एक मकबरा पहायला मिळाला. ह्या मकबऱ्याचे नाव होते हजरत खलील उल्लाह मकबरा.असे म्हंटले जाते ह्या मकबऱ्यावर चिनी मातीच्या टाईल्स लावलेल्या होत्या.अर्थात त्याचे काही अवशेष हि पहायला मिळाले.मकबरे पाहून पुढच्या नियोजित ठिकाणी म्हणजे झरणा नरसिंह मंदिराकडे प्रस्थान केले. हे ठिकाण अष्टुर पासून साडे चार किलोमीटर वर आहे.ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे एका चिंचोळ्या भुयारी गुहेत जिथे कमरेएवढे पाणी असते. (माझ्या उंचीनुसार म्हणजे ६ फुटाच्या उंचीच्या माणसासाठी पाणी कमरेएवढे येते आणि पुढे जसे जसे जातो जास्तीत जास्त ते पोटापर्यंत येते. ह्या नुसार इतर उंचीच्या व्यक्तींनी अंदाज लावावा). असे म्हंटले जाते इथे पाण्याचा ओघ कायम असतो. मंदिरात नरसिंह स्वामींची पाषाणातली मूर्ती आहे.इथे मोबाईल अलाऊड नाही परंतु तरी काही लोक आत मोबाईल नेतातच. मंदिराचा अनुभव अतिशय सुंदर होता. पाणी गारेगार होते. दर्शनाने प्रसन्न वाटले. दर्शन घेऊन बाहेर आलो.आणि आवरून पुढील ठिकाण पाहायला निघालो. पुढील ठिकाण म्हणजे अर्थात बिदरचा किल्ला.

हजरत खलील उल्लाह मकबरा

बिदरचा किल्ला शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर आहे.किल्ला भुईकोट प्रकारातील असल्याने गाडी अगदी प्रवेशद्वारापर्यंत जाते. आता शहरीकरण वाढल्याने खंदकाचा काही भाग रस्त्यांमध्ये गेल्यासारखा वाटला. तसेच किल्ल्याची वेस हि आताच्या किल्ल्याच्या गेट च्या पण भरपूर पुढे असावी असे एकंदर विखुरलेल्या अवशेषांमुळे वाटले.पहिल्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर तटबंदी , उजव्या आणि डाव्या बाजूला खंदक पहायला मिळतो.पुढे गेल्यावर किल्ल्याचा दुसरा दरवाजा शेरजा दरवाजा पहायला मिळतो.शेरजा दरवाजाच्या वर शरभ सदृश्य प्राण्याचे शिल्प कोरले आहे. त्याच्या वरती निळ्या फरश्या जंग्यांखाली लावलेल्या दिसल्या. शेरजा दरवाज्यातुन आत शिरल्यावर दुतर्फा किल्ल्याची तटबंदी आहे. आपण तटबंदीवर चालत जाऊ शकतो. तटबंदीच्या कडेला बुरुजाच्या खाली छोटे छोटे नक्षीकाम केलेले पाहायला मिळते.पुढे सरळ चालत राहिल्यावर किल्ल्याचा तिसरा गुम्बद दरवाजा पाहायला मिलतो. दरवाजा भव्य दिव्य आहे.दरवाज्यातून आत शिरल्यावर डाव्या बाजूला रंगमहाल लागतो आणि उजव्या बाजूला सध्या वास्तू संग्रहालय बनवले आहे. संग्रहालयात विविध पारंपरिक मुर्त्या , नाणी जतन करून ठेवली आहेत.आता आपण किल्ल्याच्या बालेकिल्ल्याच्या जवळपास पोहोचलेलो असतो.

बिदर किल्ला – मुख्य प्रवेशद्वार

शेरजा दरवाजा

गुंबद दरवाजा

संग्रहालयाच्या पुढे डाव्या बाजूला हजारकोठरी हि वास्तू पाहायला मिळते.हजारकोठारीचा उपयोग आणीबाणीच्या प्रसंगी केला जाई. म्हणजे शत्रूने जर आक्रमण केले तर तर शाही कुटुंब ह्या कोठरीत जमा होऊन, इथे असणाऱ्या भुयारी मार्गाने किल्ल्याच्या बाहेर जाई. हे भुयार मी नाही पाहिले , परंतु बिदर जिल्ह्याच्या संकेत स्थळावर ह्याची माहिती दिलेली आहे.हजार कोठरी च्या समोर भारताचा भव्य दिव्य ध्वज मानाने फडकताना दिसला. इथून पुढे आत गेल्यावर एक विस्तीर्ण उद्यान केले आहे. उद्यानाकडे जाण्याआधी उजव्याबाजूस पाहिल्यास किल्ल्यात उत्खनन करताना मंदिरे , मुर्त्यांचे सापडलेले उध्वस्त अवशेष ठेवलेले आढळले. खरंतर हा पुरावा आहे कि ह्या ठिकाणी बरीदशाहीच्याआधी हिंदू राजांनी राज्य केले असावे.अवशेष पाहून उद्यानात गेल्यावर समोर तर्कश महाल पाहायला मिळतो. तर्कश महालाच्या आत जाता येत नाही.तसेच तर्कश महालाच्या बाजूला उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला सोळा खांब असलेली प्रसिद्ध सोलाह खंबा मस्जिद पहायला मिळते. मशिदीच्या हि आत जाता येत नाही.ह्या उद्यानाच्या मधोमध कारंजा आहे.

हजारकोठरी

तर्कश महाल

सोलाह खंबा मस्जिद

मशिदीचे खांब

एव्हाना आपण किल्ल्याच्या मधोमध आलेलो असतो. इथूनपुढे किल्ल्याच्या बऱ्याचशा वास्तू उध्वस्त अवस्थेत आहेत.उद्यानाच्या पुढे रस्ता बंद केलेला आहे. त्यामुळे पुढचा किल्ला पाहण्यासाठी जिथे भारताचा झेंडा आहे तिथे यायचे आणि उजव्या बाजूला (येताना डाव्याबाजूने) चालत जायचे. थोडं चालत गेल्यावर किल्ल्याच्या उर्वरित वास्तू दिसू लागतात. हे किल्लयाचे आता शेवटचे टोक आहे.सर्व प्रथम पाहायला मिळतो तो दिवाण -ए- आम अर्थात सामान्य लोकांसाठीचा दरबार. थोड्या फार भिंती आणि जोते सोडल्यास महालाचे बाकी अवशेष शिल्लक नाहीत. दिवाण -ए- आम पाहून पुढे गेल्यावर कोपऱ्यात एक वास्तु दिसते. हा सुद्धा एक महालच आहे. ह्या महालाला तख्त महाल म्हणतात.थोडक्यात ह्या महालाचा उपयोग नवीन सुलतान जेव्हा गादीवर येत असेल त्यावेळेस केला जात असावा. हे दोन्हीही महाल दरवाजे लावून बंद केलेले आहेत. परंतु आपण दरवाज्यातून व्यवस्थित आतला भाग पाहू शकतो.तख्त महाल च्या पुढे आणखी एक दरवाजा आहे. ह्या दरवाज्यातून सरळ आत गेल्यावर समोर भव्य बुरुज लागतो.विशेष म्हणजे संपूर्ण किल्ला लाल दगडात आहे परंतु हा बुरुज काळ्या दगडात आहे. म्हणून ह्या बुरुजाला स्थानिक काळा बुरुज म्हणतात. ह्या बुरुजावर आणखी एक आकर्षण म्हणजे इथे ठेवलेली भव्य धातूची तोफ.संपूर्ण धातूची हि तोफ पाहण्यासारखी आहे.खरंतर इथे किल्ला संपत नाही. बुरुजावरून नजर फिरवल्यावर आपल्याला किल्ल्याचा आवाका समजतो. बुरुजापासून पुढे सुद्धा किल्लयाची तटबंदी आहे. परंतु आता इथे थोडे अतिक्रमण झालेले मला दिसले.त्यामुळे विशेष तसे पुढे पाहण्यासारखे काही नाही. काळा बुरुज पाहून आपली गडफेरी संपते.

दिवाण – ऐ – आम

तख्त महाल

काळा बुरुज

तोफ

किल्ला पाहून झाल्यावर माघारी फिरताना रंगमहालाची वस्तू पुन्हा दिसली.गुंबद दरवाज्याजवळ असलेला हारंगीन महाल बिदर किल्ल्यातील सर्वोत्तम संरक्षित ठिकाणांपैकी एक आहे. हा महाल त्याच्या सुंदर लाकडी कोरीवकाम, आकर्षक मोजेक टाइल व पर्ल सजावट यासाठी प्रसिद्ध आहे. परंतू हा महाल सुरक्षा कारणासाठी बंद असतो. ह्याचे कारण असे कळले की रंगीन महालात लाकडाची तसेच पर्शिअन फरश्यांचे नक्षीकाम केलेले आहे. शिवाय काही ठिकाणी असलेले रंग आजही थोड्या बहुत प्रमाणात शाबूत आहे. त्यास नुकसान होऊ नये, परंतू तेथील कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत पूर्व परवानगी घेऊन तो पहाता येतो. सुदैवाने आम्हास ती परवानगी मिळाली. आमचे नशीबच म्हणायचे. महालात काय आहे आणि काय नाही ह्याचे लिखित वर्णन करता येणार नाही, त्यासाठी तेथेच जाऊन याची देही डोळा पाहणेच योग्य ठरेल. सोबत माहितगार असल्याशिवाय तो महाल नीट पाहता येणार नाही. तुम्ही स्वतःच त्याचे फोटो पहा आणि ठरवा. फक्त एकच सांगतो ह्या महालांत प्रामुख्याने राण्यांचे आणि त्यांच्या दासींचे वास्तव्य असायचे.

पुढील सर्व फोटो रंगीन महाल अथवा रंग महाल

बिदरचा किल्ला आम्ही अगदी मनसोक्त फिरलो. इतका कि किल्ल्याचे दरवाजा बंद होताना पण आम्ही पाहिला. किल्ला पाहून दिवसातले आणखी एक स्थळ पहायला गेलो. हे स्थळ म्हणजे एक सुंदर गुरुद्वारा. बिदर मधील श्री नानक झिरा साहेब गुरुद्वारा हि अतिशय शांत आणि रम्य जागा आहे. मी स्वतः पहिल्यांदाच गुरुद्वाऱ्यात गेलो होतो. खूप छान अनुभव होता, थोडा वेळ गप्पा टप्पा मारून आम्ही हॉटेल कडे रवाना झालो. सुंदर दिवसाची सांगता झाली.
(क्रमशः)

रंग महालाच्या वरतून दिसणारा बिदरचा किल्ला

श्री नानक झिरा साहेब गुरुद्वारा

बिदर किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास -बिदरचा किल्ला अहमद शाह वली बहमनी ह्याने बांधला. अल्लाउद्दीन बहमनी ह्याने इ.स १४२७ मध्ये गुलबर्ग्याहून बिदरकडे बहमनी सत्तेची राजधानी स्थापित केली.तत्पूर्वी जुना बिदरचा किल्ला इ.स १३२१-२२ दरम्यान तुघलकशाहीतील उलुघ खान ह्याने घेतलेला, जो पुढे सुलतान मुहम्मद बिन तुघलक म्हणून नावारूपाला आला. किल्ला बहमनी सत्तेत आल्यावर त्याची डागडुजी करून नवे रूप दिले गेले.पुढे हा किल्ला आदिलशाही ,मुघल ते अगदी हैद्राबादच्या निजामाच्या अखत्यारीत पण होता.बिदरच्या किल्ल्याला आदिलशाही काळात २८ फेब्रुवारी १६५७ ला औरंगजेबाने जेव्हा तो दक्खन चा सुभेदार होता तेव्हा वेढा घातलेला आणि पुढे २९ मार्च १६५७ ला किल्ला हस्तगत केला.औरंगजेबाने त्याच्या स्वतःच्या तत्कालीन बक्षीला १५०० घोडदळ आणि ४००० बंदुका असलेले सैनिक ठेवून सुरक्षेखातर तैनात केले.पुढे बहुतांशी किल्ला हा मुघलांकडे राहिला असे दिसते. किल्याचा दीर्घ इतिहास जाणून घेण्यासाठी फारसी साधनांचा धांडोळा घेणे गरजेचे आहे.

संदर्भ – Shivaji His Life and Times – Gajanan Bhaskar Mehendale, Forts and Palaces In India by Pramod mande- Page 182

Leave a comment