जलदुर्ग खांदेरी-उंदेरी

महाराष्ट्राला लांब असा समुद्र किनारा लाभला आहे. कोकण किनारपट्टी हा त्यातील महत्वाचा भाग. इथल्या सागरी मार्गाने पाश्चिमात्य देशांना भुरळ घातली आणि ह्या जलमार्गाने ब्रिटिश , पोर्तुगीझ , फ्रेंच आणि अबेसिनियातून आलेले सिद्धी भारतामध्ये व्यापाराच्या निमित्ताने येऊ लागले.पुढे हेच व्यापारी भारताचा अविभाज्य भाग बनण्याचा प्रयत्न देखील करून लागले. खरंतर साधारण १२ व्या शतकापासून मुघल सत्ता भारतात रोवली गेली होती, परंतु तरीही एकाही बादशाहला असे नाही वाटले कि सागरी आरमार उभे करावे. सागरी मार्गाचे महत्व कळले ते एकाच महापुरुषाला ते म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज.पाश्चिमात्य देश हे खूप धूर्त आहेत त्यामुळे ज्याचे आरमार त्याचाच समुद्र हे महाराजांनी अचूक ओळखले.ह्या प्रगल्भ विचारांतूनच महाराजांनी कल्याणच्या खाडीत आपल्या आरमाराचा श्री गणेशा केला. परंतु नुसते आरमार असून फायदा नाही तर किनारपट्टीवर वचक ठेवण्यासाठी किल्ले सुद्धा बांधले गेले पाहिजेत हेही महाराज जाणून होते. जंजिरा किल्ला हा सागरी किल्ल्याचे महत्व काय ह्याचे उत्तम उदाहरण होते.महाराज हे नीट जाणून होते आणि त्यातूनच पुढे त्यांनी काही सागरी किल्ले बांधले तर काहींची डागडुजी केली. आज आपण भेटणार आहोत अशाच दोन जलदुर्गाच्या जोडगोळीला ज्यातील एक महाराजांनी बांधला आहे. हे दोन किल्ले म्हणजे महाराजांनी बांधलेला खांदेरी आणि जंजिऱ्याच्या सिद्दींनी बांधलेला उंदेरी.सर्वप्रथम आपण खांदेरी बद्दल जाणून घेऊ

किल्ले खांदेरी

थळ ला पोहोचल्यावर खांदेरी आणि उंदेरी हे दोनही किल्ले दिसतात.इंग्रजी पत्रांमध्ये अनुक्रमे ह्या किल्ल्यांची नावे हेनरी आणि केनरी अशी येतात.बोट पकडून साधारण २० मिनिटांत ते अर्ध्या तासात किल्ल्याजवळ पोहोचलो. सकाळची भरतीची वेळ असल्याने बोट वाऱ्यामुळे लाटांवर अगदी स्वार होऊन वर खाली होत होती.किल्ल्याला सध्या कान्होजी आंग्रे द्वीप असेही म्हंटले जाते.किल्ल्यावर बांधलेल्या धक्क्यावर पोहोचल्यावर उजव्या बाजूने किल्ला फिरायला सुरुवात करावी.पहिला बुरुज पार केल्यावर लगेच वेताळाचे मंदिर लागते. गावातील कोळी बांधवांची ह्या वेताळावर खूप श्रद्धा आहे.मंदिरात आत इंग्रज काळातील घंटा अडकवली आहे, जिच्यावर वर्ष १८९१ कोरले आहे. मंदिराच्या भिंतीवर “स्वान साहेब ह्याने शंभर रुपये देऊन हे मंदिर बांधले तारीख १२ मे १८६७ असे लिहिले आहे. ह्यास लिखित पुरावा आहे का ते शोधावे लागेल”. मंदिर पाहून तटबंदीवर चालायला सुरुवात करावी. सर्वप्रथम एक बुरुज लागतो ज्यावर दोन तोफा ठेवल्या आहेत.पुढे सरळ चालत गेल्यावर एका बुरुजाच्या खालून तटात छोटा दरवाजा कोरला आहे. दरवाजातुन खाली उतरून मी किल्ल्याची दगडावर दगड रचून केलेली तटबंदीची रचना न्याहाळली.किल्ल्याच्या टोकाला बुरुजासमोर पाण्याचे एक तळे पाहायला मिळते व तळ्यात तुळशी वृंदावन सदृश्य बांधकाम केले आहे.

वेताळ मंदिर

तटबंदी आणि तोफा

तळे पाहून समोर नव्याने बांधलेल्या पायऱ्यांच्या साहाय्याने वर चढून किल्ल्यावर असलेले ब्रिटिशकालीन दीपगृह पहायला गेलो.वरती दिपगृहाच्या सर्वोच्च भागापर्यंत गेलो. तिथे दिपगृहाच्या अधिकाऱ्यांनी दिपगृहाच्या काम करण्याच्या पद्धतीवर माहिती दिली.दिपगृहाच्या बांधकामावर ब्रिटिश स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतो.इसवी सण १८६७ साली हे दीपगृह ब्रिटिशांनी बांधले.दीपगृहावरून खांदेरी किल्ला आणि आसपासच्या समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. दिपगृहाच्या खाली छोटेखानी बाग केली आहे. बागेच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला ब्रिटिश बनावटीच्या तोफा ठेवल्या आहेत.बाग पाहून खाली उतरून डावीकडे वळायचे आणि किल्ल्याच्या मुख्य धक्क्याकडे जाण्यास पुन्हा वळायचे. वाटेत एक खडक पाहायला मिळतो ज्याच्यावर काही मोजक्या जागेत छोट्या दगडाने मारल्यावर भांड्यांच्याआवाजासारखा आवाज येतो.हा खडक पाहून पुन्हा किल्ल्याच्या मुख्य वाटेवर आलो . इथे वाटेत मारुतीचे मंदिर लागले आणि एक तोफ ठेवलेली दिसली.इथे आपली खांदेरी किल्ल्याची गडफेरी संपते.

दीपगृह

भांडीसदृश आवाज येणार दगड

खांदेरी किल्ला पाहून पुन्हा बोटीत बसलो आणि उंदेरीकडे मार्गस्थ झालो. खांदेरी आणि उंदेरी मध्ये तसे जास्त अंतर नाही. साधारण २० मिनिटांत उंदेरीला पोहोचलो. उंदेरीला धक्का नसल्याने सर्वांना उतरवणे म्हणजे एक मोठे काम असते आणि उतरायला जरा वेळही लागतो.उतरून समोरच आपल्याला किल्ल्याचे प्रवेशद्वार पाहायला मिळते.प्रवेशद्वाराची कमान आजही शिल्लक आहे. ह्या किल्ल्यावर खांदेरी सारखी वर्दळ नसते त्यामुळे किल्ल्यावर गवताचे खूप साम्राज्य झाले आहे.खांदेरीपेक्षा उंदेरी लहान आहे. आत शिरून डाव्या बाजूला वळलो तटबंदीचे अवशेष लगेच दिसू लागले. तटबंदीला लागून थोड्या अंतरावर एक तलाव लागतो. पुढे आणखी गेल्यावर उजव्या बाजूला गवतात लपलेली वाड्याची जोती आणि वाड्याचा दरवाजा पाहायला मिळतो.थोडे आणखी पुढे गेल्यावर आणखी एक मोठा तलाव लागला. ह्या तलावात उतरायला पायऱ्या कोरल्या आहेत. पायऱ्या उतरताना कोनाड्यात एक कमान कोरली आहे. ह्या कमानीवर नक्षीकाम केले आहे. इथे एवढी झाडी झाली आहेत कि एका झाडाचे खोड अशा पद्धतीने पसरले आहे कि त्याने दरवाजाचे स्वरूप घेतले आहे.तलाव पाहून आत किल्ल्याच्या दुसऱ्या भागात आपण प्रवेश करतो. इथे बुरुजांवर तोफा ठेवलेल्या आहेत. काही तोफा ह्या नंतर नव्याने बनवलेल्या गाड्यांवर ठेवल्या आहेत.

उंदेरी प्रवेशद्वार

पाण्याचे तळे

किल्ल्याच्या ह्या भागात देखील काही इमारतींची जोती पाहायला मिळतात व त्याच सोबत तुळशीवृंदावन बांधलेले पाहायला मिळते.तटबंदीवरुन पूर्ण फिरून किल्ल्याला फेरफटका मारला. किल्ल्याच्या उत्तर भागातील दोन बुरुज आणि त्यांच्या आसपासची तटबंदी ढासळली आहे. हे दोन बुरुज नव्याने डागडुजी करून वसवले तर कदाचित किल्ल्यात पावसाळ्यात आत पाणी शिरणार नाही.आल्या मार्गाने परत मागे फिरलो, खूप दिवसापासून ह्या जोडगोळी किल्ल्यांना भेट देण्याची इच्छा होती ती पूर्ण झालेली.खास करून उंदेरी , कारण असे समजलेले कि उंदेरीवर कोणी जास्त जात नाही.उंदेरीचे अवशेष जे गवतात लपले आहे ते संवर्धन करून बाहेर काढणे गरजेचे आहे.उंदेरी पाहून थोडा वेळ असल्याने आम्ही अलिबाग जवळ असलेल्या कनकेश्वर मंदिराला भेट दिली. मंदिर डोंगरावर आहे. वरती जाण्यासाठी पायऱ्यांची सोय करण्यात आली आहे. मात्र इथे उन्हाचे जाण्याचे टाळावे. मंदिर तसे जुने परंतु त्याला रंग देऊन नवे रूप देण्यात आले आहे. मंदिर परिसरात काही छोटी प्राचीन मंदिरे आणि पाण्याचे एक कुंड आहे.महादेवाचे मंदिर अतिशय सुंदर आहे आणि इथली पिंड सुद्धा सुबक आहे.मंदिर पाहून खाली उतरलो आणि सुंदर आठवणी घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो.

किल्ल्यावर असणाऱ्या तोफांपैकी एक तोफ

वाड्याचे अवशेष

कनकेश्वर मंदिर

मंदिराच्या आवारात असणारी इतर छोटी प्राचीन मंदिरं

गडांच्या इतिहासाबद्दल
बेट पाहिले आणि महाराजांनी लगेच किल्ला बांधला असे खांदेरी बाबतीत झाले नाही आहे. इ.स १६७२ साली महाराजांच्या नजरेत हे बेट आले आणि त्यांच्या “व्हिजनरी” नजरेने इथे किल्ला बांधायचाच असे ठरवले.परंतु काही राजकारणामुळे महाराजांनी तेव्हा किल्ला बांधणीचे काम सोडून दिले. साधारण ७ एक वर्षांनी १६७९ साली किल्ला बांधण्याचे ठरवले आणि त्यांची माणसं बेटावर पाठवली.ऑगस्ट १६७९ मध्ये मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना त्याच दरम्यान इंग्रजांनी हे बेट सोडून जावे असे त्याला सांगितले अर्थात त्याकडे मराठ्यांकडून सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. साधारण सप्टेंबर आणि ऑकटोबरच्या पहिल्या आठ्वड्यापर्यंत इंग्रजांनी त्यांची जहाजे पाठवून नाकेबंदीचे प्रकार चालू ठेवले, परंतु त्याचा फारसा काही उपयोग त्यांना झाला नाही. दौलतखानाने ह्या दरम्यान किल्ल्यावर काम करणाऱ्या शिबंदीला साहाय्य करण्यासाठी सरंक्षक पथक पाठवले. दिनांक १८ ऑक्टोबर १६७९ रोजी मराठ्यांच्या आरमाराने इंग्रज नाकेबंदी पथकावर हल्ला केला ह्या अचानक झालेल्या हल्ल्याने इंग्रज नवीन पथक बिथरले गेले. ह्या हल्ल्यात सर्वात शेवटी इंग्रजांच्या रिव्हेंज आणि डव्ह गुराब मागे होत्या पैकी डव्ह गुराब मराठ्यांनी पळवली.

पुन्हा दिनांक १७ नोव्हेंबर १६७९ रोजी असेच इंग्रज आणि मराठ्यांमध्ये युद्ध झाले. ह्या युद्धत डोव्ह युद्ध नौकेत पकडलेल्या खलाश्यांना मराठ्यांनी सागरगडावर कैद केले.आपल्यासमोर मराठ्यांचे काही चालत नाही हे पाहून इंग्रजांनी जंजिऱ्याच्या सिद्दीची मदत घेतली.मराठे एका बाजूला सिद्धी आणि दुसऱ्या बाजूला इंग्रज असे दुहेरी आक्रमण थोपवत होते.मराठे सिद्धीला पण जुमानत नाही हे पाहून त्याने उंदेरी बेटावर किल्ला बांधायला सुरुवात केली.दरम्यान खांदेरी जर सिध्दीने घेतला तर तो आपल्याजवळ ठेवेल हा सिद्धीचा डाव इंग्रजांना कळू लागला म्हणून त्यांनी खांदेरीच्या आक्रमणाचा जोर कमी करून तहासाठी बोलणी सुरु केली. २४ जानेवारी १६८० साली शेवटी इंग्रज आणि मराठयांमधे तह झाला. त्या पूर्वी डिसेंबर १६८० मध्ये युद्धबंदीची घोषणा इंग्रजांकडून केली गेली.हा तह झाल्या नंतर किल्ला मराठ्यांकडेच राहिला. पुढे ८ मार्च १७०१ साली सिद्धी याकूत खानाने खांदेरी वर हल्ला केला परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. १७१८ साली इंग्रजांनी कॅप्टन बून ह्याच्या नेतृत्वाखाली खांदेरी मोहीम सुरु केली परंतु त्यातही इंग्रजांना यश आले नाही.

उंदेरी १७५९ साली माधवराव पेशव्यांच्या आदेशावरून रघुजी आंग्रेंनी घेतला.इ.स १७८१-८२ साली किल्ल्याच्या कोठीची मोजदाद केल्याची नोंद पेशव्यांच्या रोजनिशीत आहे.१७९९ साली जयसिंग आंग्रेंच्या पत्नी सकवारबाई ह्यांनी किल्ल्यावर हल्ला करून किल्ला ताब्यात घेतला परंतु पतीच्या सुटकेचे अमिश दाखवून इंग्रजांनी सकवारबाईंकडून किल्ला हस्तगत केला आणि उलट जयसिंग आंग्रेंचा वध करून सकवारबाईंना कैदेत टाकले. १८१८ साली खांदेरी इतर किल्ल्यांसारखा इंग्रजांच्या हवाली गेला तो कायमचाच आणि बहुदा उंदेरीही तेव्हाच गेला असावा.इंग्रजांनी मात्र नंतर १८२४ साली आंग्रेंना उंदेरी परत केला , परंतु नंतर १८४० साली आंग्रे संस्थान खालसा झाल्यावर उंदेरी इंग्रजांकडे कायमचा गेला.खरं तर खांदेरी-उंदेरी वर झालेल्या लढाईचा इतिहास भरपूर मोठा आहे. परंतु विस्तारभयास्तव मी इथे थोडक्यात मांडला आहे.

इतिहास संदर्भ – शिवछत्रपतींचे आरमार – गजानन भास्कर मेहेंदळे , संतोष शिंत्रे ,सातारकर व पेशव्यांची रोजनिशी भाग ६ सवाई माधवराव पेशवे खंड २,पृष्ठ २०८,WWW.Durgbharari.com.

Leave a comment