सफर सातारा-फलटण मधील गढ्यांची-भाग २

फलटणला विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी सातारा – फलटण भागातील गढ्यांची सफर चालू ठेवली. पहिलं ठिकाण सरसेनापती प्रतापराव गुजरांचे जन्मगाव भोसरे गाठले.गावात प्रतापरावांचे स्मृतिस्थळ आणि तसेच त्यांचा वाडा आहे.वाड्याची अर्धी तटबंदी काळ्या दगडांची होती. वाडा बाहेरून बघून गावाचा निरोप घेताना एक छान सुंदर दृश्य पाहायला मिळाले. आपण सर्वानी आपल्या लहानपणी मराठीच्या पुस्तकात एखाद्या धड्यात गावाचे चित्र पाहिले असेल ज्यात गावातील लोक एखाद्या मंदिराच्या समोरच्या पारावर बसून छान गप्पा मारत आहेत.अगदी तसेच दृश्य मला भोसरे गावात पाहायला मिळाल. नुकताच हनुमान जयंतीचा गावात उत्सव संपन्न झालेला आणि उत्सवाच्या एकंदर हीशोबा संबंधी सर्व गावकरी गप्पा टप्पा मारत होते. ते दृश्य पाहून टिपिकल गावाचा अनुभव आला.

प्रतापरावांचे जन्म स्थान असलेला वाडा

असो , पुढच ठिकाण आमचे औंध हे गाव होते. औंध गाव प्रसिद्ध आहे ते औंधच्या पंतप्रतिनिधी घराण्यामुळे.औंध गावात शिरल्यावर पंतप्रतिनिधींचा भव्य वाडा आहे. ह्याच वाड्याच्या बाजूला यमाई देवीचे सुंदर मंदिर आहे. ह्या मंदिराला खालचे यमाई देवीचे मंदिर म्हणतात, कारण गावाबाहेर टेकडीवर अजून एक यमाई देवीचे मंदिर आहे. त्या मंदिरास वरचे यमाई देवीचे मंदिर म्हणतात.पंतप्रतिनिधींचा वाडा दुरुस्तीच्या कारणामुळे फक्त लांबून पाहता आला. वाडा ओझरता पाहून बाजूच्या यमाई मंदिरात शिरलो.मंदिरात गेल्यावर मी पेशवाईच्या काळात आहे असा मला भास झाला.लाकडी सभामंडप , त्याला साजेसे झुंबर असा काहीसा मंदिराचा साज होता. हे सर्व पाहिल्यावर त्यावर कळस म्हणजे देवीची प्रखर तेज असणारी मूर्ती. मूर्ती पाहून माझे पण प्रसन्न झाले.ह्या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आवारात असणारी दीपमाळ. असे म्हंटले जाते कि हि दीपमाळ महाराष्ट्रातली सर्वात उंच दीपमाळ आहे. मंदिराचे मुख्य दगडी प्रवेशद्वार पण सुंदर आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस छान मुर्त्या आहेत. फक्त त्यांना द्वारपाल म्हणायचे का नाही हे मला अजून कळले नाही . त्यासाठी मूर्ती शास्त्रात शिरावे लागेल.मंदिर पाहून आता आम्ही वरच्या यमाई देवीचे मंदिर पाहायला निघालो.

यमाई देवी मंदिर औंध

मंदिराचा अंतर्गत भाग

यमाई देवी

दीपमाळ

पंतप्रतिनिधी वाडा

वरचे यमाई देवीचे मंदिर हे संपूर्ण काळ्या पाषाणात बांधून काढले आहे. संपूर्ण मंदिराला दगडी तटबंदी आणि बुरुज बांधले आहेत. मंदिराला कमान असलेला दरवाजा आहे, तसेच दरवाजाच्या खालच्या बाजूस व्याल, शरभ, कमळपुष्प कोरले आहे. मंदिर उत्कृष्ट रित्या बांधून काढले आहे. तसेच मंदिराच्या मागच्या बाजूने आजुबाजुचा डोंगराळ प्रदेश तसेच औंध शहर दिसते.मंदिर पाहून खाली उतरलो . भवानराव अथवा बाळासाहेब पंतप्रतिनिधी ह्यांनी त्यांच्या संग्रही खूप वस्तू तसेच जुनी चित्र जमवलेली आणि ह्या वस्तू सध्या उत्तम अवस्थेत भवानी संग्रहालयात जतन केलेल्या आहेत. संग्रहालयात रामायण , महाभारताशी निगडित सुद्धा तैलचित्र जपून लावलेली आहेत. जरूर भेट द्यावी असे हे ठिकाण. बाळासाहेबांनी उत्तम ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी जपून ठेवला आहे.

वरचे यमाई देवी मंदिर

भवानी वस्तुसंग्रहालय

संग्रहालयाला भेट देऊन आम्ही नांदोशीची गढी पाहण्यासाठी मार्गस्थ झालो. नांदोशीत पोहोचल्यावर गढीच्या बाहेरच्या बांधकामाची पडझड झाली आहे.परंतु आत भरपूर अवशेष शिल्लक आहेत. गढीच्या आत गेल्यावर मुख्य वाड्याची भिंत आणि बुरुज दिसतो.वाड्याच्या तटबंदीचे काही बांधकाम विटांचे आहे.गढीमध्ये झाडी खूप वाढल्यामुळे थोडी वाट काढून अवशेष पाहावे लागतात. वाड्याच्या समोर भिंतींच्या बांधकामाचे अवशेष पाहायला मिळतात. ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते मुख्य वाड्याव्यतिरिक्त इतर गढीतील दैनंदिन काम करणाऱ्या लोकांसाठी काही खोल्या बांधल्या असावा. कारण गढीचा आकार खूप मोठा आहे. मुख्य वाड्याला पाणी जाण्यासाठी दगडी पन्हाळीची सोय केलेली दिसून येते.एवढी सुंदर गढी परंतु गढीच्या अंतर्गत भागात असलेला कचरा पाहून थोडे वाईट वाटले. असो, गढी पाहून थोडे पुढे गेल्यावर मंदिरांचा आणि समाध्यांचा समूह पाहायला मिळतो.ह्या समूहातील एका मंदिरावर अतिशय सुंदर कोरीव काम केले आहे. मंदिरावर मारुती , मोर,गरुड इत्यादी शिल्प कोरली आहेत.मंदिर पाहून थोडे पुढे गेले कि उत्तम दगडी बारव पाहायला मिळते. बारवेच्या तळाशी कमान असलेला दरवाजा आहे.गढीच्या अंतर्गत भागात चिंचेची भरपूर झाडी आहेत.

नांदोशी गढी

गढीपरिसरातील दगडी घडीव मंदिर

नांदोशीची गढी पाहून आम्ही पुढे राजाचे कुर्ले ह्या गावातील गढी पाहायला निघालो. गावात शिरताना ऐतिहासिक दगडी बांधकाम असलेले प्रवेशद्वार आपले स्वागत करते. असे म्हंटले जाते कि पूर्वी गावाला वेशीवर तटबंदी बांधलेली होती. कदाचित हे प्रवेशद्वार त्याचा पुरावा असावा. प्रवेशद्वारावर हत्ती आणि शरभ शिल्प कोरले आहे. तसेच काही वीरगळींचे दगड सुद्धा लावले आहे. गढीत प्रवेश उत्तम अवस्थेत असलेल्या प्रवेशद्वारातून होतो. आत शिरल्यावर डाव्याबाजूला वाड्याच्या भिंती आणि जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात. ह्याच वाड्याच्या पुढे विहीर बांधलेली आहे. ह्या विहिरीच्या मागे बुरुज पाहायला मिळतो.विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय आहे.हि विहीर पाहून थोडे पुढे गेल्यावर दुसऱ्या वाड्याच्या जोत्याचे अवशेष पाहायला मिळतात.ह्या गढीचे दोन भाग पडतात, त्यातील दुसऱ्या भागात एकमेव बुरुज शिल्लक आहे बाकी सर्व नवीन बांधकाम केले आहे. राजाचे कुर्ले गढी म्हणजे अक्कलकोटकर भोसले ह्यांच्या दुसऱ्या एका शाखेचे निवासस्थान होय. सध्या तिथे राहणाऱ्या विद्यमान वंशजांशी आम्ही निघण्या आधी गप्पा मारल्या आणि समजले कि शाखा इथे कशी स्थलांतरित झाली. अक्कलकोटकर तुळजाजी भोसले स्थलांतरित झाल्यापासून कुर्ले हे गाव राजाचे कुर्ले म्हणून ओळखले जाऊ लागले.राजाचेकुर्ले गावाचा निरोप घेतला आणि आमच्या दौऱ्यातील शेवटच्या साप गावातील गढीला भेट द्यायला निघालो. एव्हाना सूर्य डोक्यावर आलेला.

राजाचे कुर्ले गढी – प्रवेशद्वार

गढीतील पहिल्या वाडयाचे अवशेष

दुसऱ्या वाडयाच्या जोत्याचे अवशेष

विहीर

गढीच्या दुसऱ्या भागात शिल्लक असलेला एकमेव बुरुज

दुपारी साडेबाराच्या आसपास आम्ही साप गावातल्या गढीजवळ पोहोचलो.गढीचा उत्तम दरवाजा आणि दोन बुरुज आपले स्वागत करतात. हि गढी सरदार कदम ह्यांची गढी आहे. मूळ स्वरूपात फार कमी ऐतिहासिक वास्तू पाहावयास मिळतात त्या पैकी हि साप गावातली गढी आहे.हि गढी पाहिल्यावर तुम्हाला मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध फत्तेशिकस्त, तसेच सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्या चित्रपटांची आठवण येईल. ह्या दोन्ही आणि आणखी सुद्धा काही चित्रपटांचे चित्रीकरण ह्या गढीत झाले आहे. गढीचा तटबंदीतील फांजीपर्यंतचा भाग घडीव दगडांनी तर त्याच्या वरील भाग विटांनी बांधून काढला आहे. आत शिरल्यावर आपल्याला दुमजली चौसोपी वाडा पाहायला मिळतो. समोर राहण्याच्या खोल्या आहेत.वाड्यात सद्या मध्ययुगीन काळातील वस्तू जपून ठेवलेल्या आहेत. कदमांचे विद्यमान वंशज अधून मधून इथे राहत असल्याने पूर्ण वाडा पाहायला प्रवेश नाही. वाड्याच्या समोरच्या सोप्यातून मागे गेल्यावर तुळशी वृंदावन आणि बाजूला स्वयंपाकघर आहे. स्वयंपाक घर पाहून मागे आलो आणि वाड्याच्या उजव्या बाजूला पायरी मार्गाने दुसऱ्या मजल्यावर जाता येते. वाड्याचे सर्व दरवाजे, खिडक्या त्यांच्या कमानी लाकडाचा वापर करुन बांधल्या आहेत. वरती गेल्यावर दरबार आहे. मला काहीसा हा दरबार रंगमहालासारखा भासला. दरबाराच्या पुढे आणखी एक खोली आहे. दरबार पाहून पुन्हा खाली आलो. संपूर्ण वाडयाचे खांब दरवाजे अतिशय सुंदर लाकडी बांधकामाने आणि लाकडी नक्षीकामाने सजले आहेत.संपूर्ण वाड्यावर चौफेर नजर फिरवली आणि बाहेर आलो. ह्या गढीला ६ बुरुज आहेत.वाड्याच्या मागच्या बाजूस भली मोठी सहा मोटांची विहीर आहे. खाली पायऱ्यांच्या साहाय्याने थोडे विहिरीत उतरल्यावर विहिरीच्या बांधकामाशी निगडित देवनागरी – उर्दू मिश्रित शिलालेख आहे. गढी हि विद्यमान वंशजांची खाजगी मालमत्ता असल्याने छायाचित्र कुठेही दाखवू नये असे आम्हाला सांगितले गेले.

साप गढी

साप गावातली गढी पाहून आमचा ट्रेक पूर्ण झाला.ह्या दोन दिवसाच्या सफरीतून गढी प्रकार नक्की काय आहे ते समजले. तसेच मराठ्यांच्या वेगवेगळ्या सरदारांची निवासस्थाने तसेच त्यांच्या काही विद्यमान वंशजांच्या भेटीने इतिहासातल्या काही बाबींना उजाळा मिळाला. प्रामुख्याने १८ व्या शतकात उदयाला आलेली सरंजामशाही कशा प्रकारची असेल ह्याचा एक अंदाज बांधता आला.१८ वे शतक हे मराठ्यांचे होते हे निर्विवाद सत्य आहे. मी पाहिलेल्या गढ्या अथवा वाडे हे मराठ्यांच्या काळ किती समृद्ध होता हे दर्शवते असे मला वाटले मग आज ह्या गढ्या उध्वस्त अवस्थेत का असोना.ह्या गढ्यांना पूर्व परवानगीने जरूर भेट द्यावी आणि इतिहासाची वेगळी बाजू सर्वांसमोर यावी असे मला वाटते.

Leave a comment