किल्ले चंदन – वंदन

सह्याद्रीची डोंगररांग हि बऱ्याचश्या व्यापारी तसेच मोक्याच्या लष्करी ठाण्यांमधून गेली आहे. त्यामुळे काही ठिकाणी अगदी मोक्याच्या जागा , ज्या लष्करी दृष्ट्या खूप महत्वाच्या आहेत अशा ठिकाणी बऱ्याच जोड डोंगरांवर जोडकिल्ले बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात. आज अशाच किल्ल्यांमधील दोन जुळी भावंड किल्ले चंदन – वंदन ची आपण सफर करूयात. पुणे-सातारा मार्गावर असलेले किकली गाव जे इथे असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. ह्याच गावापासून पुढे असलेल्या बेलमाची गावाजवळ चंदन – वंदन हे जोड किल्ले आहेत.बेलमाची गावाचे दोन भाग पडतात एक वरची बेलमाची आणि एक खालची बेलमाची, त्यापैकी वरच्या बेलमाची वरून दोन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी संयुक्त वाट आहे.हा परिसर पाण्याने तसेच रस्ते मार्गाने सधन आहे.किल्ल्याच्या पायथ्याशी मंदिर आहे. इथे पाण्याची सोय होऊन जाते. मंदिरापासून समोरच दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी अर्ध्या वाटेवर पायऱ्या बांधल्या आहेत. पैकी वंदन गडावर जाण्यासाठी बऱ्यापैकी पायऱ्या बांधून झाल्या आहेत. पायथ्यापासून समोर दिसणारा किल्ला म्हणजे वंदन तर डावीकडे दिसणारा चंदन.

पायथ्यापासून दिसणारा डावीकडचा चंदन गड आणि उजवीकडचा वंदन गड

किल्ला चढायला सुरुवात करायला पायरी मार्गानेच करावी. थोडा चढ चढल्यावर वंदन गडाच्या दिशेला एक छोटेखानी मंदिर बांधलेले पाहावयास मिळते. परंतु त्या मार्गाने न जाता डावीकडे वळून चालत राहायचे. वाट तशी मळलेली आहे परंतु वाटाड्या असल्यास उत्तम.मळलेल्या वाटेने आपण ठराविक उंचीवर आल्यावर सरळ चंदन गडाकडे चालत राहायचे . थोडे अंतर पार केल्यावर डावीकडे वळायचे. डावीकडे वळल्यावर लांबून चंदन गडाचा उत्तुंग बुरुज आपल्याला दिसतो.परंतु बुरुजावर जायला वळसा घालावा लागतो.डावीकडे वळल्यावर थोडे अंतर पार केल्यावर उजवीकडे वळायचे. उजवीकडे वळल्यावर गडाच्या जुन्या पायऱ्या दिसू लागतात आणि समोरच चंदन गडाचा महादरवाजा दिसू लागतो. आमच्याबरोबर वाटाड्या म्हणून आलेल्या मुलाने आम्हाला असे सांगितले कि हा दरवाजा मातीच्या ढिगाऱ्याखाली बुजला होता परंतु तेथील स्थानिक दुर्गमित्रांनी मिळून सर्व माती काढून तो प्रवेशासाठी खुला केला. त्याने आम्हाला सध्या चाललेल्या कामाची सुद्धा माहिती दिली. खरंच ह्या दुर्गमित्रांचे कौतुक करावे तेवढे कमी. महादरवाज्याच्या बाजूला दोन बुरुज आहेत. दरवाजाच्या डाव्या बाजूस गणेश कोरला आहे. पुढे गेल्यावर डावीकडे वळल्यावर गडाचा दुसरा दरवाजा पाहायला मिळतो जो गोमुखी बांधणीचा आहे. दरवाजाच्या वरती फार्सी शिलालेख कोरला आहे. आत शिरल्यावर देवड्या पाहायला मिळतात. देवड्या पार करून किल्ल्यात शिरल्यावर चुन्याच्या घाण्याची जागा पाहायला मिळते.आता आपला प्रवेश मुख्य किल्ल्यात झालेला असतो.

चंदन महादरवाजा

दुसरा दरवाजा आणि दरवाज्यावरील फार्सी शिलालेख

इथून पुढे चालत गेल्यावर तटबंदीचे दगड एकमेकांवर रचून ठेवलेले दिसतात. हे बहुदा दुर्गमित्रांनी केले असावे. परंतु उजव्या बाजूला दिसणारी तटबंदी हि पूर्वीच्या काळातली जशीच्या तशी आहे. त्यानंतर पुढे उध्वस्त वाड्याचा चौथरा पाहायला मिळतो. चौथरा पाहून पुढे गेल्यावर थोडी पडझड झालेले कोठार पाहायला मिळते. इथून पुढे वाटेत भग्न अवशेष आपल्याला दिसतच राहतात. कोठार पाहून पुढे निघालो आणि शिववंदनेश्वर मंदिराजवळ पोहोचलो. ह्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम दुर्गमित्र करत आहेत अशी माहिती मिळाली.मंदिर पाहून किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाकडे चालत राहायचे ,वाटेत दोन दर्गे पाहायला मिळतात. ह्यातील पहिल्या दर्ग्यावर फारसीत शिलालेख कोरला आहे. दुसऱ्या दर्ग्याच्या समोर विहीर आहे आणि विहिरीच्या मागे एक पीर आहे. ह्या दर्ग्याच्या अवतीभवती तुरळक तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात.बरेचसे भटके माहिती अभावी इथेच गडफेरी संपवतात , परंतु इथून पुढे टोकाला किल्ल्याचा तिसरा दरवाजा , तसेच तट फोडून तयार केलेला पायरीमार्ग कोणी पाहत नाही.

कोठार

उध्वस्त वाडा

आमच्या नशिबाने आम्हाला तो पाहता आला. दुसऱ्या टोकाला सरळ चालत जायचे आणि थोडे उतरल्यावर पायऱ्या लागतात . तट फोडून हा पायरीमार्ग कोरला आहे.पायऱ्या उतरल्यावर सुंदर दरवाजा पाहायला मिळतो. दरवाज्याभोवती दोन बुरुज बांधले आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूस एक छोटेखानी भुयार लागते . माझ्या अंदाजानुसार ते नंतरच्या काळात बुजवले गेले आहे.भुयार पाहून चंदन गडाची गडफेरी पूर्ण होते.आल्या वाटेने आम्ही परत गडउतार झालो आणि वंदन गडाची वाट पकडली.
वंदन गडाकडे जाताना पुन्हा मुख्य मळलेल्या वाटेवर आल्यावर सरळ चालत राहायचे आणि जे छोटे मंदिर आपल्याला चंदन चढताना दिसले त्या दिशेने चालत राहायचे. मंदिराजवळ आल्यावर पुन्हा सरळ चालून इथून दोन प्रकारे वंदन गडावर जाता येते. एक जो पायरी मार्ग बनवला आहे त्या मार्गाने किंवा थोडा उभा चढ असलेल्या मार्गाने. पायरी मार्ग खूप वळसा घालून जावे लागते तर उभ्या चढणीची वाट घसाऱ्याची आहे. जर तुमचे ट्रेकिंग शूज चांगले असतील तर ह्या वाटेने जाण्यात हरकत नाही अथवा थोडा वळसा घालून जावे. आम्ही सर्व ऊन वाढत होते त्यामुळे उभ्या चढणीची वाट निवडली. साधारण २० मिनिटांत आम्ही वंदन गडाच्या मुख्य द्वारापाशी पोहोचलो. दरवाज्याची तटबंदी आणि बुरुजच आज अस्तितवात आहेत. दरवाजाच्या पुढील भागात कमान असलेली देवडी दिसली.

तिसऱ्या दरवाज्याकडे जाण्याचा पायरी मार्ग

तिसरा दरवाजा

संभाव्य चोर दरवाजा

वंदन गड बुरुज

दरवाजाच्या आत गेल्यावर सर्वप्रथम लागते ते शिवमंदिर. ह्या मंदिराच्या पुढे सरळ चालत गेल्यावर कोठार आणि त्या पुढे शिलालेख असलेली कमान आहे. ह्या कमानीच्या पुढे मशीद बांधली आहे. तसेच गडाचा दरवाजा हा चंदन गडाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेच्या दिशेला आहे. परंतु उन्हाच्या प्रचंड झळीमुळे मी पुढे गेलो नाही. चंदन गडावर आणखी छोटे छोटे अवशेष आहे असे ट्रेकक्षितीज संस्थेच्या संकेतस्थळावरून समजले. त्यामुळे वंदन गडाला पुन्हा एकदा हुकलेले मोजके अवशेष देण्यासाठी मी नक्की भेट देईन.तूर्तास माझी गडाची फेरी मशीद पाहून संपली होती. येताना चंदन आणि वंदन गडाच्या संयुक्त वाटेवर असणारे छोटे मंदिर पहिले आतील मंदिरातील मूर्ती बहुदा भैरवाची असावी. गड उतरून जेवून आम्ही किकली गावातील प्रसिद्ध भैरवनाथाचे मंदिर पाहिले. मंदिराची छायाचित्रे मी खाली दिलेली आहेत ती पाहावी. मंदिराबद्दल विस्तृत दुसऱ्या ब्लॉग मध्ये लिहीन , तूर्तास हे मंदिर हेमाडपद्धतीचे आहे आणि मंदिरातील मूर्ती अतिशय सुबक कोरलेल्या आहे. चंदन वंदन गडाला आणि मंदिराला तुम्ही सुद्धा भेट द्या.

भैरवनाथ मंदिर, किकली

गडाच्या इतिहासाबद्दल – चंदन वंदन किल्ले जोडगोळी असल्याने त्यांचा इतिहासही एकच असावा.इ.स ११९१-९२ च्या ताम्रपटानुसार शिलाहार राजा दुसरा भोज ह्याने चंदन गडाची निर्मिती केली.किल्ला जरी भोज राजाने बांधला असला तरी किल्ल्यावरील बांधकामे आदिलशाही राजवटीत बांधली आहेत.१६५९ च्या अफझलखान वधानंतर अण्णाजी दत्तो ह्यांनी किल्ला स्वराज्यात आणला.१६८५ मधे मुघल सरदार अमानुल्लाखान याने चंदन वंदन येथे मराठ्यांवर केलेल्या हल्ल्यात २५ घोडी,२० बंदुका , २ निशाणे, आणि १ नगारा ताब्यात घेतला. १६८९ नंतर मात्र हा परिसर मुघलांच्या ताब्यात गेला.१७०१ मध्ये राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मोगल – मराठे युद्धात किल्ला मुघलांनी घेतला अशी नोंद सापडते. इ.स १७०७ मध्ये शाहू महाराजांनी वंदन गड जिंकून स्वराज्यात आणला.थोरल्या माधवरावांच्या रोजनिशीत असलेल्या इ.स १७६२-६३ सालच्या नोंदीनुसार विठ्ठलराव विश्वनाथ ह्यांच्याकडे चंदन वंदन किल्ल्यांची जबाबदारी दिली गेली होती आणि त्यानुसार त्यांना एक सनद बहाल केलेली. ह्या सनदेत सालिना ७११ रुपये स्वतःचा तसेच किल्ल्यावरील काही प्रमुख खर्च भागवण्यासाठी मोईन करार करून दिले होते.त्यांना ह्याच करार करून दिलेल्या मोईन मध्ये किल्ल्याची जबाबदारी सरकारचे नुकसान न करता सांभाळायची आहे असे सांगितले गेले होते. ह्या सनदेवरून किल्ला मराठ्यांकडे होता हे सिद्ध होतेच तसेच तत्कालीन खर्चासाठी दिली जाणारी रक्कम सुद्धा आपल्याला माहित होते.१८१८ साली इतर किल्ल्यांप्रमाणे दोनही किल्ले मराठ्यांच्या ताब्यात गेले.

नुकतेच तरुण इतिहास संशोधक श्री. राज मेमाणे ह्यांनी पेशवे दफ्तरातील अप्रकाशित कागदांचे वाचन करून महाराजांचे गडदुर्ग खंड -१ ह्या पुस्तकात किल्ले चंदन वंदन बाबतीत काही नोंदी छापल्या आहेत. त्यानुसार किल्ले चंदन वर सदर , सदर दरवाजा , अंबरखाना , जामदारखाना , बिनी दरवाजा , म्हसोबा टाके इत्यादी वास्तू होत्या. तसेच पांडुरंगाचे सिंहासन किल्ल्याहुन श्री क्षेत्र पंढरपुरास प्रत्येक वर्षी जात असे आणि त्या साठी ५० रुपयांची नेमणूक केली होती. १७८४ च्या कागदपत्रात किल्ल्यावरील एका बुरुजाचा उल्लेख पालख्या बुरुज म्हणून केला आहे.किल्यावर श्री चंदनेश्वर , श्री. पांडुरंग , श्री नरसिंह , म्हसोबा , माचीवरील श्री.मरिमा इत्यादि देवतांची ठाणी होती.
तसेच किल्ले वंदन वर चंदन प्रमाणेच अंबरखाना , जामदारखाना ह्या वास्तूंव्यतिरिक्त बेलमाचीवरील वाडा हि वास्तू होती.१७६६ सालांतील कागदांत सखाराम बोकील ह्यांच्याकडे किल्ल्याची मामलत होती.किल्ल्यावर श्री वंदनेश्वर , श्री बेलेश्वर , श्री काळेश्वरी, श्री. फिरंगाई , श्री. नरसिंह इत्यादी देवता आहे.

संदर्भ – महाराजांचे गड – दुर्ग खंड १,राज मेमाणे पृष्ठ ५९-६०,ऐतिहासिक फारसी साहित्य खंड -६ पृष्ठ ३७७ आणि ३७८,www.durgbharari.com हे संकेत स्थळ

Leave a comment