किल्ले सागरगड

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची मुहूर्तमेढ रोवली हे आपणास सर्वश्रुत आहे. पुढे सरखेल कान्होजी आंग्रेंनी मराठा आरमाराच्या पराक्रमाचा कळस केला. इंग्रज , पोर्तुगीझ , सिद्धी , फ्रेंच सर्वांना जेरीस आणण्याचे काम सरखेल आंग्रेंनी केले.महाराष्ट्राला लाभलेल्या कोकण किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी शिवरायांनी खांदेरी ,सिंधुदुर्ग , कुलाबा सारखे किल्ले बांधलेच परंतु , काही किल्ल्यांची पुनर्रचना केली. महाराजांच्या गडकोटांनी सागरी किनारपट्टीचे संरक्षण केले. बरेच दुर्ग प्रेमी अलिबाग जवळील कुलाबा किल्ला अथवा थळ जवळील खांदेरी -उंदेरी किल्ल्यांना भेट देतात परंतु , त्यांना हे माहित नसते कि अलिबाग जवळ जंगलात एक गिरिदुर्ग आजही आपले पडते अवशेष घेऊन उभा आहे . ज्याने सागरी सीमांवर लक्ष ठेवण्याचे महत्वाचे कार्य केले. ह्या किल्ल्याचे नाव म्हणजे सागरगड उर्फ खेडदुर्ग होय.सागरगड नाव असले तरी हा जलदुर्ग नव्हे तर , गिरिदुर्ग आहे. सागरगडावर जाण्यासाठी अलिबाग च्या अलीकडे असणारा खंडाळे गाव गाठायचे. ह्या गावात पोहोचल्यावर मुख्य रस्त्याने स्थानिकांना सागरगडाची वाट विचारून छोट्या पक्क्या रस्त्याने पुढे गेल्यावर आपले खाजगी वाहन अथवा बसने आल्यास बस पार्क करावी. पार्क करताना पावसाळ्यात जात असल्यास कृपया करून मातीचा अंदाज नीट घ्यावा कारण, आमची बस मातीत अक्षरशः रुतली गेली. नंतर जेसीबी आणून बसला खेचून बाहेर काढावे लागले. खरंतर किल्ल्याच्या थोड्या आधी माचीवर एक वाडी वसली आहे आणि तिथपर्यंत चार चाकी नक्कीच जाऊ शकते परंतु, वाडीवर जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाल्याने पावसाळा वगळून इतर ऋतूत आपण आपली चार चाकी वाडीपर्यंत आणू शकता. आमची बस असल्याने आणि पावसाळ्यात किल्ला पाहत असल्याने आम्ही गावात असणाऱ्या पक्क्या रस्त्याजवळ बस लावून पुढे चालायला सुरुवात केली.

साधारण अर्धा- पाऊण तासाने आपण वाडीच्या आधी लागणाऱ्या सिद्धेश्वर मंदिराजवळ पोहोचतो. मंदिराजवळ माकडांचा खूप वावर असल्याने मंदिरात गेल्यावर खाण्याचे पदार्थ शक्यतो काढण्याचे टाळावे.मंदिरापासून सरळ चालत राहिल्यावर साधारण अर्ध्या तासानंतर प्रथम आपण माचीवर असणाऱ्या वाडीत पोहोचतो.इथे थोडीफार पोटपूजा करून सरळ पुढे चालत राहायचे. वाटेत किल्ल्याच्या खालून वाहणारा धोधाणे धबधबा पाहायला मिळतो.पावसाळ्यात गेल्यास पायाखाली असंख्य खेकडे आणि चिखलाचे साम्राज्य असते त्यामुळे आरामात नीट चालावे.वाडीपासून साधारण २० मिनिटांच्या अंतरात आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. मी प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो तेव्हा तुफान पाऊस पडत होता त्यामुळे प्रवेशद्वाराचा साधा फोटो सुद्धा काढता आला नाही.सागरगडाचा आवाका मोठा आहे परंतु , गडाची एक बाजू पूर्ण झाडीने व्यापल्याने तिकडचे अवशेष पाहता येत नाही. पहिल्यांदा येणार असाल तर गावातून गाईड घेऊन जावे.प्रवेशद्वार संपूर्ण ढासळलेला आहे. परंतु प्रवेशद्वाराजवळचे दोन्ही बुरुज अजूनही सुस्थितीत आहे. किल्ल्यात गेल्यावर बऱ्याच ठिकाणी जांभ्या दगडात केलेले बांधकाम पाहावयास मिळते.

सागरगडाचे उध्वस्त प्रवेशद्वार

इथून दोन वाटा किल्ल्यावर जायला फुटतात. सागरगडाच्या पूर्व टोकाकडील पठाराकडे आपण ह्या वाटांनी जातो. हे पठार इंग्रजी Y अक्षरप्रमाने आहे. ह्या पठाराच्या टोकाला वांदर लिंगी सुळका आहे. सागरगडाची भटकंती खरंच पावसाळ्यात करावी. मी पोहोचलो तेव्हा तुफान पाऊस चालू झालेला. असो , तर आम्ही डावी वाट पकडली आणि किल्ल्याच्या पठाराकडे जायला लागलो. वाटेत उजवीकडच्या वाटेची तटबंदी आणि तटबंदीत खोदलेला दरवाजा लांबून दिसला. हा दरवाजा आम्ही येताना पाहणार होतो.किल्ल्यावर चालताना लाल मातीची साथ आपल्याला सतत असते. पठारावर पोहोचण्याच्या वाटेत तटबंदीचे जागोजागी अवशेष पाहायला मिळतात. थोड्याच वेळात चालत गेल्यावर आपण पठाराआधी असलेल्या छोट्या उंचवट्यावर पोहोचतो. जिथे सध्या दुर्गमित्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आणि भगवा ध्वज लावला आहे. इथूनच उजव्या बाजूने पठार अथवा आपण मुख्य बालेकिल्ल्यावर जायला वाट आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे इंग्रजी Y अक्षराप्रमाणे पठार आहे त्यामुळे आधी पठाराचा डावा भाग फिरण्याचे ठरवले.

सागरगडाचा तटबंदीत कोरलेला दरवाजा

पठारावर सुरुवात केल्यावर वांदरलिंगी सुळक्याकडे जात असताना उजव्या बाजूला तटबंदी आणि बुरुज दिसतात . सागरगडाला भरपूर बुरुज बांधले असणार हे गडाचा आवाका पाहून स्पष्ट होते. त्यातील काही बुरुज आणि तटबंदी अवशेष आपल्याला विस्तीर्ण पठारालगत पाहावयास मिळतात.पुढे गेल्यावर वाटेत छोटा तलाव पाहायला मिळतो. त्यानंतर सरळ गेल्यावर वांदरलिंगी सुळका पाहायवास मिळतो. सुळक्याच्या बाजूला पण तटबंदीचे तुरळक अवशेष आहेत.सुळक्याच्या बाजूचा भाग उताराचा असल्याने शक्यतो पुढे जास्त जाऊ नये आणि छायाचित्र काढण्याचा मोह टाळावा. इथून समोरचा परिसर आणि जंगलाचे सुरेख दर्शन दिसते.सुळका पाहून मागे यायचे आणि पठाराच्या दुसऱ्या म्हणजे उजव्या बाजूकडे जायचे (मागे फिरताना डावी बाजू ).इथे जाण्यासाठी जिथे इंग्रजी Y अक्षराचा भाग तयार झाला आहे तिथे बुरुज बांधला आहे आणि समोर कातळ कोरीव पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांच्या डावीकडे बुरुज बांधला आहे, हे बांधकाम पाहता एकंदर ह्या ठिकाणी दरवाजा असावा असे वाटते. पायऱ्या चालून वरती गेल्यावर ब्रिटिश काळात बांधलेल्या बंगल्याचे अवशेष पाहायला मिळतात आणि छोट्या समाध्यांचे अवशेष पाहायला मिळतात.बंगला पाहून सरळ चालत राहायचे , टोकाला महादेवाचे मंदिर आहे. मी गेलो तेव्हा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू होते. मंदिराच्या थोडे खाली पाण्याचे टाके आहे.टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही आहे.

वांदरलिंगी सुळका

ह्या मंदिराच्या आवारात राहण्याची सोय होऊ शकते. इथून खरं माझी गडफेरी संपली होती . परंतु किल्ला दाखवायला आलेल्या वाटाड्याने आम्हाला मंदिरापासून परतीच्या वाटेवर आणले. आणि थोडं चालत गेल्यावर डाव्या बाजूला अगदी तटाच्या कडेला चौकोनी पाण्याचे तळे दाखवले. ह्या तळ्यात पाणी चक्क व्याघ्र मुखातून पडत होते. तळ्याचा व्याघ्रमुखाचा भाग जांभ्या दगडातील होता. तळे पाहून परतीच्या मार्गावर लागलो. मी आधी सांगितल्याप्रमाणे तटबंदीत कोरलेला दरवाजा पाहायचा राहिला होता तो गडउतार होताना पहिला. तटबंदीच्या मधोमध हा दरवाजा कोरला आहे. अशाप्रकारे दरवाजा पाहून पुन्हा उध्वस्त मुख्य दरवाजाच्या इथे पोहोचलो आणि माझी सागरगडाची गडफेरी पूर्ण झाली. खरंतर सागरगड खूप मोठा आहे परंतु काही भाग संपूर्ण जंगलाने व्यापल्याने त्या भागात जात येत नाही. मला मात्र गडफेरी करताना मजा अली कारण पावसाची दमदार साथ मला लाभली. मराठेशाहीचे विविध प्रसंग पाहिलेल्या सागरगडाला तुम्ही नक्की भेट द्या.

सागरगडाचे विस्तीर्ण पठार

व्याघ्रकुंड

गडाच्या इतिहासाबद्दल –सागरगडाचा उल्लेख निजामशाही काळापासून येतो. इ.स १५२४ मध्ये पोर्तुगीझ कप्तान सोज याने वखार बांधण्यासाठी परवानगी मागितली तेव्हा, खेडदुर्ग म्हणजेच सागरगडाचा किल्लेदार फतेहखान होता.१६६० साली शिवाजी महाराजांनी चौल प्रांत काबीज केल्यावर सागरगड स्वराज्यात आला असावा. १६६५ च्या पुरंदरच्या तहात किल्ला मोगलांकडे गेला. १६७० नंतर पुन्हा किल्ला स्वराज्यात आला व त्याचे नामकरण सागरगड झाले. १६७९ साली खांदेरी किल्ला बांधताना इंग्रजांच्या बरोबर झालेल्या लढाईत इंग्रज कप्तान फ्रान्सिस मौलीव्हेअर आणि इतर २५ सैनिकांना सागरगडावर बंदिवासात ठेवले होते. संभाजी महाराजांच्या अटकेनंतर गड सिद्धीकडे गेला, १६९५ साली कान्होजी आंग्रेंनी सिद्धीकडून किल्ला जिंकून घेतला. पुढे शाहू महाराजांच्या काळात ताराराणी आणि शाहूमहाराजांच्या मतभेदात आंग्रेंनी शाहू महाराजांची बाजू घेतली आणि किल्ला महाराजांच्याकडे सुपूर्द केला. सरखेल आंग्रेंच्या मृत्यूनंतर किल्ला येसाजी कडे गेला . त्यानंतर आंग्रे घराण्यात झालेल्या गृहकलहामध्ये मानाजी आणि येसाजी आंग्रेंच्या भांडणांत पोर्तुगीजांनी मानाजीला साहाय्य केले आणि किल्ला मानाजींकडे आला. पुढे मानाजींनी येसाजींचा सागरगडावरून कडेलोट केला. इ.स १७३८ मध्ये संभाजी आंग्रेंनी मानाजींकडून किल्ला जिंकून घेतला.त्यानंतर येसाजी आंग्रेचा मुलगा जयसिंह आंग्रे ह्यांनि १८०७ मध्ये रामजी आंग्रेंचा किल्ल्यावरून कडेलोट केला. ह्या दुर्दैवी घटनांमुळे किल्ल्याने रक्तपात सुद्धा पाहिला. इतर किल्ल्यांप्रमाणे सागरगड इंग्रजांकडे १८१८ साली गेला. इथल्या निसर्गसौंदर्यामुळे जनरल फुलर व लेसटोक रीड ह्या इंग्रज अधिकाऱ्यांनी इथे बंगले बांधले.नुकतेच तरुण इतिहास अभ्यासक श्री.राज मेमाणे ह्यांनी पेशवे दफ्तरातील दुर्ग विषयक कागदपत्रे वाचून त्यांच्या पुस्तकात किल्ल्याचे अप्रकाशित उल्लेख दिले आहेत. त्यानुसार सागरगडाला २१ बुरुज असल्याची नोंद आहे आणि त्यातील एका बुरुजाला गगन बुरुज असे नाव दिले गेलेले आढळते.हि नोंद १८०७ सालाची आहे.

इतिहास संदर्भ –इंग्लिश फॅक्टरिज इन इंडिया खंड ३ – पृष्ठ ५३-५४ , (इथे सागरगडाचा उल्लेख पूर्वीचे नाव खेडदुर्ग असा आला आहे), महाराजांचे गड- दुर्ग खंड -१ , राज मेमाणे पृष्ठ -१६,WWW.Durgbharari.in

Leave a comment