किल्ले मल्हारगड

महाराष्ट्रात आजमितीस किल्ल्यांची संख्या जवळपास ३५० च्या घरात गेली आहे. बरेचसे किल्ले शिवकाळात बांधले गेले किंवा त्यांची डागडुजी झाली. ह्या सर्व किल्ल्यांच्या मांदियाळीत महाराष्ट्रातला सर्वात तरुण गिरिदुर्ग जर कोणता असेल तर तो मल्हारगड. असे म्हंटले जाते की मल्हारगड हा शेवटचा गिरिदुर्ग मराठा कालखंडात बांधला गेला. साधारण १७५९-६० च्या काळात सासवडच्या बाजूने पुण्यात उतरणाऱ्या दिवे घाटातील वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगड बांधला गेला. किल्ल्याचे बांधकाम पेशव्यांचे तोफखाना प्रमुख कृष्णराव पानसे व भीमराव पानसे यांनी केले. माझ्या द्रुष्टीने हा किल्ला माझ्या छान आठवणीचा साक्षीदार झाला. माझ्या आजवरच्या भटकंतीमधील मल्हारगड हा १०० वा किल्ला होता. गडभटकंतीचे छोटे बीज मी लहानपणी रोवले परंतु मध्ये मोठा काळ गेला आणि २०१६ पासून मी सक्रिय भटकंती करू लागलो. ह्या संपूर्ण भटकंती दरम्यान आलेले अनुभव न विसरण्यासारखे आहेत. असो , आता वळूयात मल्हारगडाकडे. मल्हारगडाची वाट सोनोरी गावातून सुरु होते म्हणून ह्या किल्ल्याला सोनोरीचा किल्ला असेही नाव आहे. तसेच , काळेवाडी अथवा झेंडेवाडी गावातून किल्ल्याच्या चोरदरवाजातून प्रवेश करता येतो. झेंडेवाडीतून आल्यास आपण थेट किल्ल्याच्या जवळ गाडीरस्त्यावरून पोहोचतो. मी झेंडेवाडी गावाच्या वाटेने किल्ल्याच्या चोरदरवाजातून प्रवेश केला. त्यामुळे , माझी भटकंती चोरदरवाजा ते मुख्य दरवाजा अशी असेल.

झेंडेवाडीतून दिसणारा मल्हारगड

किल्ल्याचा चोरदरवाजा

दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्याच्या छोटेखानी बालेकिल्ल्यावर आपण पोहचतो. बालेकिल्ला हा तटबुरूजांनी सजला आहे. किल्ल्याच्या तटबंदी आणि बुरुजांच्या बांधकामावर पेशवेकालीन बांधकामाची छाप दिसून येते.बालेकिल्ल्य्यात प्रवेश करण्याआधी उध्वस्त विहीर लागते आणि विहिरीच्या पुढेच खोदीव तलाव पाहायला मिळतो. विहिरीची खोली आणि तलावाचा आवाका पाहता किल्ला छोटा असला तरी पाण्याची सोय येथे मुबलक केलेली दिसते. बालेकिल्ल्याच्या आत शिरल्यावर डाव्या बाजूस एक तळघर सद्रुश्य वास्तु दिसून येते. ही वास्तू पाहून पुढे जायचे , पुढे गेल्यावर एका चौथऱ्यावर शिवछत्रपतींची प्रतिमा कोरलेली ठेवली आहे. हे पाहून पुढे गेल्यावर दोन मंदिरे पाहायला मिळतात. त्यातील एक मंदिर महादेवाचे तर दुसरे खंडोबाचे मंदिर आहे. खंडोबाच्या मंदिरामुळे कदाचित गडास मल्हारगड असे नाव पडले असावे. मंदिरांचा जीर्णोद्धार झाल्याने मंदिरं सुस्थितीत आहेत. मंदिरे पाहून थोडे डावीकडे वळल्यावर किल्ल्याचा महादरवाजा लागतो. महादरवाजा आणि दरवाज्याला लागून असणारा बुरुज सुस्थितीत आहे. दरवाज्याची कमान देखील सुस्थितीत आहे. दरवाजा पाहून डावीकडे किल्ल्याच्या झेंडेवाडी गावाकडील डोंगरसोंडेवर आणि बुरुजावर जाता येते. परंतु, मी तिथे नंतर गेलो. त्याआधी पुढची गडफेरी चालू ठेवली.

तळघरात उतरण्यासाठीचा मार्ग

बालेकिल्ल्यावरील तटबंदीचे अवशेष

किल्ल्याचा महादरवाजा (समोरून आणि बाजूने बुरुजांसोबत)

किल्यांवरील मंदिरं

पुढे सरळ चालत राहिल्यावर कातळ पायऱ्या उतरल्यावर डाव्या बाजूस वळले की सोनोरी गावातून येताना जो पहिला दरवाजा लागतो तो पहावयास मिळतो. दरवाजा आणि बाजूचे दोन्ही बुरुज शाबूत आहेत. महादरवाज्याला सध्या लाकडी दरवाजा नव्याने लावण्यात आला आहे.दरवाज्या समोर तटबंदी बांधून काढली आहे. दरवाज्यावर जंग्यांची सोय दिसून येते. दरवाजा पाहून पुन्हा मागे आलो आणि पायऱ्या चढून पुन्हा महादरवाजा पार करून तटबंदी लगत चालत झेंडेवाडी गावाकडच्या डोंगरसोंडेकडे निघालो.डोंगरसोंडेवर जाण्याकरिता तटबंदीत छोटा दरवाजा कोरला आहे. हा दरवाजा पकडून किल्ल्यावर चार दरवाजे बांधून काढले आहेत. डोंगरसोंडेवर चालत टोकापाशी गेल्यावर भगवा झेंडा फडकावलेला दिसतो. इथून झेंडेवाडी , तसेच सोनोरी गावाचा संपूर्ण परिसर दिसतो. मी नुकताच पाऊस ओसरल्यावर गेल्यामूळे परिसर हिरवागार दिसत होता. इथे माझी गडफेरी पूर्ण झाली. अतिशय आटोक्यात असणारा परंतु तितकाच सुंदर किल्ला आपले परिपूर्ण अवशेष घेऊन ताठ मानेने उभा आहे.सर्वात शेवटचा बांधलेला मल्हारगड हा गिरिदुर्ग नक्की भेट देण्यासारखा आहे.

किल्ल्याचा मुख्य पहिला दरवाजा (सोनोरी गावाकडील)

मुख्य दरवाजा तसेच बुरुज आणि तटबंदीचे दृश्य

झेंडेवाडीकडील डोंगरसोंडेवर उतरण्यासाठी खोदलेला दरवाजा

डोंगरसोंडेवरुन दिसणाऱ्या मल्हारगडाचे विहंगम दृश्य

गडाच्या इतिहासाबद्दल – मल्हारगड हा पेशव्यांच्या तोफखान्याचे सरदार कृष्णराव पानसे व भिवराव पानसे ह्यांनी इ.स १७५७ ते १७६० या कालावधीत पूर्ण केले. इ.स १७७१-७२ दरम्यान थोरले माधवराव पेशवे ह्या गडावर येऊन गेले असा उल्लेख सापडतो. तसेच किल्ल्याच्या खर्चासाठी पेशव्यांनी पानसेंना ३००० रुपयाचे वर्षासन मंजूर केल्याचे कागदोपत्री दिसून येते. इंग्रजांच्या विरुद्ध उठावात उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता.

संदर्भ – WWW.Trekshitizsanstha.com , WWW.Durgbharari.in

Leave a comment