इंद्रनील पर्वत अर्थात किल्ले पुरंदर

शिवकाळात नुकतेच स्वराज्य जेव्हा बाळसे धरू पाहत होते तेव्हा काही किल्ल्यांचे महत्व अनन्यसाधारण असे होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या उभरत्या वयात गडकोटांचे महत्व हेरले होते. त्यातच राजांनी मावळ प्रांतात आपल्या साथीदारांच्या मदतीने हळू हळू आपली पकड बसवायला सुरुवात केली होती. राजगड, तोरणा,सिंहगडासोबत एक किल्ला महाराजांनी स्वतःकडे लवकरात लवकर यावा ह्यासाठी प्रयत्न केले. हा किल्ला म्हणजे पुराणातील “इंद्रनील पर्वत ” अर्थात किल्ले पुरंदर. पुण्याच्या सासवड तालुक्यात असणाऱ्या नारायणपूर गावाजवळ पुरंदर किल्ला उभा आहे. सध्या किल्ला भारतीय सैन्याच्या ताब्यात असल्याने सैन्याचे नियम पाळून किल्ला ९ ते ५ ह्या वेळेत पाहता येतो. किल्ल्यावर छायाचित्रण करण्यास सुरक्षिततेच्या कारणास्तव बंदी आहे.

लष्कराच्या चौकीतून दिसणारा पुरंदर

आपण सासवड तालुक्यातील नारायणपूर गावाजवळ पोहोचल्यावर पुढे गाडी रस्त्याने थेट किल्ल्यावर पोहोचतो. किल्ला मुख्यतः माची व बालेकिल्ला अश्या दोन भागात विभागला गेला आहे. किल्ल्याची माची पुरंदर, महाकाळ व बावची अशी तीन विभागात तर बालेकिल्ला, खांदकडा व केदारेश्वर मंदिर असा विभागला गेला आहे. किल्ल्यावर पोहोचल्यावर सैन्याच्या चेकपोस्ट वर सुरक्षिततेच्या कारणामुळे सामानाची तपासणी केली जाते. तपासणी झाल्यावर ओळख पत्र दाखवून आपण मुख्य किल्ल्याकडे जाण्यासाठी निघतो. समोर किल्ल्याचा तासलेला कडा, उत्तुंग बुरुज आपल्याला दिसू लागतात. डावीकडे वळून सरळ चालत राहायचे. चालताना उजव्या बाजूस ब्रिटिश काळात बांधलेल्या वास्तू , बंगले ह्यांचे अवशेष दिसू लागतात. थोडं पुढे चालल्यावर पुरंदर किल्ला ज्या वीराच्या नावाने ओळखला जातो त्या वीर मुरारबाजी देशपांडेंचा वीररसातील लढाईच्या आवेशात असणारा पुतळा उभारला आहे. ह्या पुतळ्याच्या मागे त्यांचे समाधी मंदिर आहे. मुरारबाजींना मनोमन नमन केले आणि पुढे चालू लागलो.

रणझुंजार मुरारबाजींचा पुतळा

सध्या किल्ला भारतीय सैन्याच्या ताब्यात असल्याने फक्त पुरंदर माचीवर प्रवेश आहे. उरलेले दोन्ही भाग पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. मुरारबाजींचा पुतळा आणि समाधी पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूस किल्ल्याचा दरीकाठी बांधलेला उत्तराभिमुख दरवाजा पाहायला मिळतो. ह्या दरवाज्याकडे येणारी वाट कुंपण बांधून पूर्णपणे बंद केली आहे. हा दरवाजा बिनी दरवाजा म्हणून ओळखला जातो. दरवाज्याच्या आत देवड्या कोरल्या आहेत. दरवाजा पाहून पुढे गेल्यावर महादेवाचे मंदिर दिसते, मंदिराच्या पुढे उजव्या बाजूस एक विहीर लागते ह्या विहिरीस मसणी विहीर असे म्हणतात. दरवाजा पाहून थोडेसे मागे उजवीकडे वळून आल्या दिशेने म्हणजे थोडे मागे वळल्यावर पुरांदरेश्वराचे मंदिर पाहायला मिळते. इथे सवाई माधवरावांचा जिथे जन्म झाला तो वाडा आहे परंतु, माझ्या दिसण्यात काही तो आला नाही. इथून पुढे टोकाला संभाजी महाराजांचा पुतळा आणि संग्रहालय बनवले आहे. परंतु आपण तिथे न जाता किल्ल्याकडे आपला मोर्चा वळवायचा व त्यासाठी उजव्या बाजूकडील सैन्याच्या ऑफिस मध्ये मोबाईल, कॅमेरा असल्यास जमा करावे लागते . कारण सुरक्षिततेच्या कारणास्तव किल्ल्यावर छायाचित्रणास बंदी आहे. इथून पुढे सैन्याची काही घरे अथवा कार्यालय ओलांडून चिंचोळ्या वाटेने सरळ जायचे व उजवीकडे वळून बालेकिल्ल्याच्या दिशेने आपली पाऊले वळवायची.

बिनी दरवाजा

हीवाट मळलेली आहे त्यामुळे साधारण १५ मिनिटांच्या चालीनंतर तीन दरवाजे एका मागोमाग एक लागतात. ह्या दरवाज्यांची नावे अनुक्रमे , दिल्ली दरवाजा , गणेश दरवाजा आणि निशाण दरवाजा म्हणून ओळखली जातात. ह्यातील दिल्ली दरवाजातून प्रवेश केल्यावर डावीकडे पत्रे लावून वाट बंद करण्यात आली आहे. ही वाट कंदकडा अथवा खांदकडा बुरुजापाशी तसेच भैरव खिंडीकडे जाते. तेव्हा आपला पुढचा प्रवास हा बावची माचीवर होतो. ही माची केदार दरवाज्यापर्यंत (केदारेश्वर मंदिराच्या खालील दरवाजा) पसरली आहे.

तिसरा दरवाजा पार केल्यावर पाण्याचे एक टाके लागते तसेच, वाटेत काही उध्वस्त वास्तू दिसतात. इथून पुढे दोन वाटा फुटतात एक राजगादी टेकडी – शेंदऱ्या बुरुजाकडे तसेच दुसरी केदारेश्वर मंदिराकडे. ह्या दोनही वाटांवर पाण्याची काही टाकी पाहायला मिळतात. राजगादी टेकडीच्या अलीकडे तीन ते चार बुरुजांची माळ दिसते. मी शेंदऱ्या बुरुजाच्या बाजूला गेलो नाही कारण आम्हाला सांगण्यात आले तिकडील वाट बंद केली आहे त्यामुळे नाईलाजाने मोर्चा केदारेश्वर मंदिराकडे वळवला.

पुढे सरळ गेल्यावर थोडी चढण लागते , ही चढण पार करून नव्याने बांधलेल्या पायऱ्या चढून केदारेश्वर मंदिरावर पोहोचलो. मंदिरावर पोहोचल्यावर धुक्याने परिसर आच्छादलेला होता .मंदिर जुने असले तरी आता मंदिराचा थोडा जीर्णोद्धार झालेला आहे. केदारेश्वर मंदिराचा भाग हा गडाचा सर्वोच्च माथा. मंदिराच्या खाली कोकण बुरुज आणि हत्ती बुरुज आहे. केदारेश्वर मंदिर पाहून पुन्हा गडउतार झालो. खरंतर पुरंदर किल्ला फिरायला खूप मोठा आहे परंतु सध्या लष्कराच्या ताब्यात असल्याने जेमतेम फिरता येतो. ह्या किल्ल्यावर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काही जर्मन कैदीदेखील होते. शिवकाळापासून ते आतापर्यंत वेगवेगळे कालखंड आणि घटना पाहिलेला इंद्रनील पर्वत आजही लष्करी सेवा पुरवत दिमाखात उभा आहे.

ब्रिटिशकालीन वास्तू

किल्ल्याचा इतिहास – किल्ल्याचा इतिहास तसा खूप पूर्वीपासूनचा आहे. बहमनी मग नंतर निजामशाही आणि मग आदिलशाही असा किल्ल्याचा प्रवास झाला. इ.स १६४९ मध्ये शिवाजी राजांच्या सुरुवातीच्या आदिलशाही मुलुखावरील कारवायांमुळे आदिलशाहने फतेहखानास महाराजांवर रवाना केले. महाराजांनी ह्यावेळेस पुरंदर किल्ल्याचा लढाईसाठी वापर केला. ह्या दरम्यान किल्ला महाराजांकडे नव्हता परंतु , पुरंदरचा किल्लेदार महादजी निळकंठ ह्यांचा मृत्यू झाल्याने वारसाहक्काचा वाद निर्माण झाला होता. ह्या वादाचा फायदा घेऊन महाराजांनी गडात प्रवेश केला.फतेहखानाचा महाराजांनी बेलसर येथे पराभव केला. ह्या लढाईत पुरंदर किल्ल्याने महत्वाची भूमिका निभावली. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १६ मे १६५७ साली संभाजी राजांचा पुरंदर किल्यावर जन्म झाला.
पुरंदर किल्ला म्हंटल की आणखी एक घटना आपल्याला आठवते ती म्हणजे अर्थात पुरंदरचा सुप्रसिद्ध तह आणि त्या दरम्यान दिलेरखानाविरुद्ध झालेल्या लढाईत मुरारबाजी देशपांडेंनी दाखवलेली झुंज आणि स्वराज्यासाठी दिलेले प्राणाची आहुती.
मिर्झा राजा जयसिंगला शिवाजी राजांवर चाल करून पाठवताना औरंगजेबाने दिलेरखानाला पाठवले होते. पुरंदरला ३० मार्च १६६५ साली वेढा पडला आणि साधारण १५ दिवसांनी १४ एप्रिल १६६५ la वज्रगड मोगलांच्या ताब्यात आला. त्यानंतर पुरंदर माचीवर मराठे आणि दिलेखनाच्या मोगल सैन्यात लढाई झाली. ह्या लढाईत मुरारबाजींनी अचाट पराक्रम दाखवला परंतु त्यांचा लढाईत मृत्यू झाला. मुरारबाजींचा आवेश इतका भयानक होता की ते पाहून दिलेरखान सुद्धा चकित झाला होता. इतके होऊन सुद्धा पुरंदर मोगलांच्या ताब्यात आला नव्हता. अखेर स्वराज्याची अजून हानी होऊ नये आणि इतर कारणांसाठी मुत्सद्दी धोरणाने महाराजांनी १३ जून १६६५ ला प्रसिद्ध पुरंदरचा तह केला आणि तहात पुरंदर सकट २३ किल्ले मोघलांना दिले.

इ. स १७४५-४६ साली कलाडगडावर बरीच वर्ष काम करणारे लोकं किल्ले पुरंदर वर पाठवण्यात आली आणि त्यांच्याजागी पुरंदरची दहा माणसं कलाडगडावर पाठवल्याची नोंद आहे. थोडक्यात अशा बदल्या त्या काळीही होत असे हे ह्या नोंदीवरून दिसून येते. त्यावेळेस त्यांना मोबदला म्हणून धान्य दिले गेले होते. धान्याची एकूण किंमत दहा मण आणि पावणे एकोणीस पायली नोंदवली गेली आहे. १७६५-६६ साली सरनोबत म्हणून बहिर्जी काळे ह्याची नेमणूक रुपये १५ दरमहा ह्या करारानुसार करण्यात आली. थोडक्यात १७६५-६६ आणि १७७५-७६ दरम्यान किल्ल्ला मराठ्यांकडे होता ही माहिती वरील नोंदींवरून आपणास कळते. पुरंदर किल्ल्याच्या इतिहासात आणखी एक विलक्षण घटना म्हणजे किल्ल्यावर दुसऱ्या महायुद्धातील जर्मन कैदी ठेवले होते. ह्या कैद्यांपैकी एक असणाऱ्या जर्मन कैद्याने किल्ल्याचे सर्वेक्षण करून त्यावर एक निबंध लिहिला होता. ह्या कैद्याचे नाव हर्मन गोऐट्झ. बहुदा त्याच्या सुटकेनंतर त्याने त्याचे जर्मन साथीदार किर्शनेर व इतर आणखी सोबत्यांसोबत सर्वेक्षण केले. हर्मन ने १९५३ पर्यंत सयाजीराव गायकवाडांच्या काळातील बडोदा वास्तुसंग्रहालयात काम केले तसेच बडोदा स्टेट म्युझिअम अँड पिक्चर गॅलरीत बुलेटिन सुरु केले ज्याचा संपादक तो १९५४ पर्यंत राहिला.पुढे दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट चे डायरेक्टर हे पद हर्मन ने भूषवले. १९५५ नंतर पुन्हा हर्मन जर्मनीत गेला परंतु भारतातील आणि इतर त्याच्या संशोधनावर मुबलक लेखन आणि पुस्तकं त्याने प्रकाशित केली. पुरंदरचा हरमन ने नकाशा बनवला ज्या मध्ये जवळ जवळ १२२ स्थळांचा उल्लेख आहे. हर्मन च्या नकाशावरुन एक वेगळे संशोधन किल्यावर होऊ शकते. असा हा परकीयांना भुरळ घालणारा पुरंदर नक्कीच पाहण्यासारखा आणि अभ्यासणासारखा आहे. खरंतर पुरंदरच्या इतिहासावर खूप काही लिहिण्यासारखे आहे पण विस्तारभयास्तव सारांश मांडला आहे.

पुरंदर किल्ल्याचा हर्मन गोऐट्झ  ने काढलेला नकाशा

इतिहास संदर्भ – PURANDHAR : ITS MONUMENTS AND THEIR HISTORY H.GOETZ Published in Annals of the Bhandarkar Oriental Research Institute, Vol. 30, No. 3/4 (July – October 1949), pp. 215-240.,

Selections From the Satara Raja’s and the Peshwa Diaries III- Balaji Bajirao Peshwa Vol. I Page-188,

Selections From the Satara Raja’s and the Peshwa Diaries IX- Peshwa Madhavrao Vol. I Page-359

WWW.Durgbharari.in

Leave a comment