दुर्लक्षित किल्ले सिंदोळा

माळशेज – जुन्न्नर-नगर पट्टा हा बेलाग दुर्गांनी वेढला आहे. इथे दिमाखाने उभे असलेले डोंगर त्यांच्या राकटपणाची साक्ष आपणास देतात. माळशेजचा पुढचा भाग हरिश्चंद्रगड , तसेच नाणेघाट ह्यांमुळे खूप प्रसिद्ध आहे. हरिश्चंद्रगडाच्या प्रसिद्धीमुळे वर उल्लेख केलेल्या पट्ट्यात असणारा एक किल्ला हा जवळ जवळ विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे. काही किल्ल्यांवर महत्वाच्या घटना न घडल्याने ते दुर्लक्षित होतात आणि काही वेळा सर्वभक्षी काळ त्यांना भक्ष करतो. हा दुर्लक्षित राहिलेला किल्ला म्हणजे किल्ले सिंदोळा. हरिश्चंद्रगडाकडे जाणाऱ्या खुबी फाट्यापासून १.५ किलोमीटर अंतरावर करंजाळे अथवा करजाळे गावाजवळ नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूस हा किल्ला आहे. किल्ला पाहताक्षणी लगेच दिसून येत नाही.

दुरून दिसणारा सिंदोळ्याचा डोंगर

किल्यावर जाणारी वाट तशी मळलेली आहे. चढाई सुरु केल्यावर साधारण आपण अर्धा तास सपाटीवर चालतो आणि मग उजवीकडे वळून किल्ल्यावरच्या डोंगरसोंडेच्या वाटेकडे जाऊ लागतो. वाट तशी सोपी असली तरी नवखे असल्यास वाटाड्या घेऊन जावे. सपाटीवर पोहोचल्यावर उजवीकडे चालत राहायचे साधारण १० ते १५ मिनिटांत आपण झाडीत जाणाऱ्या वाटेवर येतो. इथे दिशादर्शक म्हणून दगडाला चुना फासला आहे. मध्ये दिशादर्शक बाणही दर्शविलेले दिसतात. इथून साधारण पुन्हा १५ मिनिटांच्या चढाईनंतर आपण किल्ल्याच्या डोंगरसोंडेच्या पायथ्याजवळ येतो. किल्यावर झाडांचे प्रमाण अजिबात नसल्याने दुपारच्या उन्हात किल्ला चढण्याचे टाळावे. डोंगरसोंडेवर चालत राहिल्यावर आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी वळसा घालून जावे लागते. डोंगरसोंडेवरुन चालल्यानंतर थोडा चढ चढल्यावर आपण किल्ल्याच्या उजव्या बाजूला असलेल्या घळीजवळ पोहोचतो. इथून दरी डाव्याबाजूला आणि किल्ला उजव्या बाजूला ठेवत वळसा घालून जायचे.

किल्ल्यावर जाणारी डोंगरसोंड

वळसा घालण्याचा मार्ग खूप निमुळता आहे आणि किल्ल्यावर वावर कमी असल्याने झाडीचे आणि कोवळ्या गवताचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे जाताना सावधपणे जावे. साधारण २० एक मिनिटांत आपल्याला किल्ल्यावर जाणारी मुख्य घळ दिसते. घळ उभी सरळसोट आहे परंतु, सावकाश गेल्यास तशी दमछाक होत नाही. घळीच्या शेवटी उजव्या बाजूस आपल्याला चौकोनी गुहा पहायला मिळते. तसेच, काही तुटलेल्या पायऱ्यांचे अवशेष देखील पहायला मिळतात. किल्ल्याच्या ह्या भागातच सावली अनुभवता येते. सावली असल्याने आम्ही सर्व ट्रेकर्सनी थोडा हलका नाष्टा केला आणि गडावर प्रवेश केला. गडावर प्रवेश करताना डाव्या बाजूला बुरुज आणि तटबंदीचे अवशेष तसेच उजव्या बाजूला कोनाड्यात गणपती कोरलेला पहायला मिळतो. ही सर्व रचना पाहता निश्चित ह्या ठिकाणी गडाचा दरवाजा असणार असे वाटते. गडप्रवेश केल्यावर आपल्याला मारुतीच्या मूर्तीचे उध्वस्त अवशेष पहावयास मिळतात. इथून पुढे गडाच्या डाव्या बाजूला जाताना आपल्याला तटबंदी आणि बुरुजांचे अवशेष पहायला मिळतात. गडावर फारसा वावर नसल्याने प्रचंड रानगवताची वाढ झाली आहे. गडाच्या टोकावरती सात टाक्यांचा समूह आहे. टाक्यांतील पाणी पिण्याजोगे नाही.

गडावर कोरलेला गणपती

तटबंदीचे अवशेष

टाक्यांव्यतिरिक्त गडावर इतर विशेष अवशेष तसे पहायला मिळत नाहीत. कदाचित रानगवताखाली अवशेष लुप्त झालेली असण्याची शक्यता आहे . उध्वस्त अवशेषांच्या खुणा तसेच छोटेखानी मंदिराची खूण म्हणून त्रिशूळ उभा केलेला मला दिसला . गडाचा माथा खूप निमुळता आहे. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर भगवा फडकवला आहे. गड छोटा असल्याने अर्ध्या तासात फिरून होतो. आल्या वाटेने पुन्हा आपण गडउतार होऊन परतीच्या प्रवासाला मार्गस्थ होऊ शकतो. गड लहान असला तरी, आजूबाजूला दिसणारे चावंड, हडसर ,हनुमंतगड ह्या किल्ल्यांची दृश्य तसेच आजूबाजूचा राकट परिसर,आणि अंगातली रग जिरवणारी भटकंती आपल्याला विलक्षण अनुभव देऊन जाते.

गडाच्या इतिहासाबद्दल- सिंदोळा किल्ला जसा प्रत्यक्षात दुर्लक्षित राहिला आहे तसाच तो इतिहासाबाबतीत सुद्धा दुर्लक्षित राहिला आहे. आपणास विशेष काही संदर्भ किल्ल्याबाबतीत सापडत नाहीत. माळशेज -जुन्नर ह्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कदाचित किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी.

Leave a comment