किल्ले आड – डुबेरा – बर्व्यांचा वाडा (श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान)(AAD and Dubera Fot Trek)

माझ्या भटकंतीच्या आजवरच्या टप्प्यात खूपदा वाटले कि जे पाहतो ते लिहावे ,आपल्या ओळखीच्या आणि अनोळखीच्या  माणसांपर्यंत सुद्धा ते सर्व पोहोचवावे  पण काही केल्या ते होत नव्हते  , टाळाटाळ होत होती (अर्थात त्याला माझा आळस कारणीभूत होता बाकी बिझी वगैरे हि सगळी अंधश्रद्धाच ). पण शेवटी मनात ठरवले आणि हा ब्लॉग प्रपंच सुरु करतोय.

आणि सुरुवात करतोय ती आता मी नुकत्याच केलेल्या आड-डुबेरा – आणि बर्व्यांचा वाडा ह्या ट्रेक ने. 
मी माझे बहुतेकसे ट्रेक हे ट्रेकक्षितीज संस्थेकडून करत असतो , ह्या ट्रेकला मी आधीच नाव दिलेले जेव्हा ह्या किल्ल्यांची माहिती ट्रेकक्षितीज संस्थेच्या साईट वर टाकली  गेली होती .

आमचा प्रवास ट्रेकच्या आदल्यादिवशी सुरु झाला म्हणजे २३ जून ला आणि आम्ही २४ तारखेला किल्ले आणि वाडा एका दिवसात करणार होतो . किल्ले आटोपशीर असल्याने ते शक्य होते . दुसऱ्या दिवशी पहाटे ४ ला आमची गाडी आडवाडी ह्या किल्ल्याच्या पायथ्यापाशी पोहोचली, आमच्या ठरलेल्या नियोजनानुसार साडेपाच वाजेपर्यंत झोपण्याची मुभा असल्याने सर्व जण गावातल्या चक्रधर स्वामींच्या मोठ्या मंदिरात एक मस्त डुलकी  काढायला पटापट स्लीपिंग बॅगा टाकून झोपू लागले, मी स्लीपिंग बॅग  काही घेऊन गेलो नव्हतो  आणि तसे पण लगेच परत उठायचे होते म्हणून मंदिरातल्या एका खांबाला टेकून शांत बसलो होतो . नंतर एका काकांनी मला झोपायची सोय करून दिली आणि मी हि मग अंग टाकले . सकाळी ५ वाजता काकड आरती मुळे जाग आली , आरती म्हणणाऱ्या व्यक्तीचा आवाज सुरेल होता आणि तो  नगारा सुद्धा छान वाजवत होता .उठून सकाळचे सोपास्कार करून  मंदिराच्या परिसरातच नाश्ता करून आम्ही सर्व ट्रेकर्सनी  आड किल्ल्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली.

                                          आड वाडीतून सभोवतालचा दिसणारा परिसर 
ट्रेक मध्ये नेहमीप्रमाणे ओळख सत्र वगैरे झाल्यानंतर गावातल्या शेतातल्या वाटेतून आम्ही आड किल्ल्याकडे निघालो. किल्ल्यावर जात असताना प्रामुख्याने  खूप पवनचक्क्या दिसतात  मला उमेश कडून मिळालेल्या माहिती नुसार पवनचक्क्यांची हि रांग  सिन्नर पासून ते जवळ पास औंध पर्यंत  पसरली आहे . किल्ल्याची वाट  सोपी आहे , पण तरीही प्रथम जात असेल तर वाटाड्या घेऊन जावे. वाटेत आपल्याला पहिले मारुतीचे मंदिर लागते , मारुती मंदिराच्या मागून आपल्याला समोरच  डुबेरा  किल्ला दिसतो.

                                          मारुती मंदिराच्या मागून दिसणारा डुबेरा  किल्ला 
इथून पुढे साधारण २० मिनिटात आपण गडमाथ्यावर प्रवेश करण्याआधी एक गुहा लागते तिला आडूबाईची  गुहा म्हणतात. ह्या गुहेत देवीच्या २ मुर्त्या आहेत.इथून पुढे १० कातीव पायऱ्या चढून आम्हाला गडमाथा गाठायचा होता पण पायऱ्यांच्या  उजव्या बाजूला काही आधार नसल्याने सुरक्षितता म्हणून आमच्याबरोबर एक्स्पर्ट टीम होती जी रोप लावण्यासाठी पुढे गेली त्यामुळे आम्ही काही ट्रेकर्स नि २० मिनिटाचा अराम केला. थोड्याच वेळात आम्ही सर्व जण एक एक करून पायऱ्यांचा पॅच चढून माथ्यावर पोहोचलो . मी पण 
सेफ्टी म्हणून रोप लावली. पॅच चढुन  गडमाथ्यावर आल्यावर सिन्नर चा परिसर आणि पवनचक्क्यांची रांग आपले लक्ष वेधून घेते. आम्ही गड फेरी सुरु केली गडावर अवशेष म्हंटले तर फारसे तसे नाहीत  , पण ह्या किल्ल्यावर वास्तव्य मात्र हमखास असणार हे गडावर असणाऱ्या १० ते १५ टाक्यांवरून दिसते . आणि विशेष म्हणजे एका टाक्यावर शरभ शिल्प होते जे बहुधा मी गडावरील दरवाजे अथवा तटबंदीवर ह्या आधी  पाहिले आहे .

                                                              गडावरील पाण्याची टाकी  

                                                             शरभ शिल्प  असलेले टाके 
नंतर गडाच्या उजवीकडून आपल्याला समोर बितनगड, अवंधा , आणि पट्टा हे गड दिसतात . थोडे पुढे चालत गेल्यावर उध्वस्त प्रवेशद्वार पाहायला मिळते त्याच्या कमानी आणि बुरुज  पूर्णपणे ढासळले आहेत . अशा प्रकारे गडफेरी पूर्ण करून आता पायऱ्यांच्या वाटेने सावकाश उतरायचे ह्या विचाराने चालू लागलो पण इथेच मात्र एक कहाणी मे ट्विस्ट आला आणि आम्हाला पर्याय दिला गेला कि आल्या पायऱ्यांच्या वाटेने  उतरून जायचे किंवा रॅपलिंग करून गुहेच्या जवळ उतरायचे मग काय भीती असली तरी रॅपलिंग चा पर्याय निवडला कारण ते करायचे होतेच शिवाय एक्स्पर्ट असल्याने ते सेफ हि होते . पहिली वेळ असल्याने मी घाबरलो नक्की पण रॅपलिंग करून खाली उतरलो आणि तो माझा अनुभव भन्नाट होता ,ह्या अनुभवाचाच फायदा मला आता पुढे होणार आहे .

                                                                  उध्वस्त  प्रवेशद्वार 

                                                                 पहिल्यांदा रॅपलिंग 
रॅपलिंग नंतर परत आम्ही गड उतरून  साधारण २० मिनिटात आडवाडीत आलो आणि  मंदिरातच जेवायचे ठरवले. पोटोबा झाल्यानंतर मग आम्ही निघालो बर्व्यांचा वाडा पाहण्यासाठी डुबेरा गावाकडे .
साधारण दुपारच्या २ च्या सुमारास आम्ही बर्व्यांच्या वाड्यात प्रवेश केला.राधाबाई म्हणजेच थोरले बाजीराव पेशव्यांच्या आई ह्या माहेरपणाला येथे आल्या होता असे म्हंटले जाते (राधाबाईंचे माहेरचे आडनाव बर्वे असे होते).
वाड्याला तटबंदी आहे आणि बांधकाम बघताच कळून येते कि हे पेशवेकालीन असावे .वाड्याच्या लाकडी कमानी,दरवाजे पाहण्यासारखे आहे , लाकडी खांबांवरील नक्षीकाम सुंदर केले आहे .सध्या वाडा  ज्यांच्या ताब्यात आहे ते लोक तेथे नसल्याने आम्हाला खोल्या मात्र बघता  आल्या नाहीत . पण बाजीरावांचे जन्म स्थान असलेला हा वाडा बाहेरून का असेना बघितल्याचा आनंद झाला .

वाडा बघून आल्यावर मला बाहेर वाड्याच्या वरच्या मजल्यावरील कमानी आणि छोटे खांब दिसले ते पाहिल्यावर पूर्वीच्या काळी हा वाडा  नांदता असताना त्याला पदडे असतील तेव्हा ते किती सुंदर दिसत असेल  हा विचार माझ्या मनात आला ,ते चित्र मनात रंगवत मग सर्वांसह डुबेरा किल्ल्याची वाट पकडली .

लाकडी खांबावरील नक्षीकाम 
वाडा बाहेरून 
साधारण २० मिनिटात आम्ही डुबेरा किल्ल्यावर पोहोचलो .किल्ल्याच्या पायथ्याशी महादेव मंदिर आहे,हे मंदिर प्रशस्थ आहे. बांधकाम मात्र आताचेच आहे . किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्यांची सोय  आहे . साधारण १५ मिनिटात आपण गडमाथ्यावर पोहोचतो ,गडावर फारसे अवशेष नाहीत दोन पाण्याची टाकी आणि सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे . मंदिरातील मातेची मूर्ती वणीच्या  सप्तशृंगी मातेच्या  मूर्तीसारखीच आहे .डुबेरा किल्ल्याच्या  विस्तारावरून ह्या गडावर पण वर्दळ असेल असे जाणवते . डुबेरा वरून सुद्धा आपल्याला आड,पट्टा ,बितनगड आणि अवंधा किल्ल्यांची रांग दिसते.

                                                             पाण्याची टाकी डुबेरा गड

                                                                 सप्तशृंगी मातेचे मंदिर 
किल्ला पाहून १० मिनटात खाली आम्ही खाली उतरलो आणि परत परतीच्या प्रवासाला लागून साधारण ८ .३०
वाजता कल्याण ला पोहोचलो .बाजीरावांचे आजोळ ,डुबेरा किल्ला  आणि आड किल्ल्यावरील रॅपलींग च्या अनुभवामुळे माझा हा ट्रेक मस्त झाला. 
किल्ल्यांच्या इतिहासाबद्दल – ह्या दोन्ही किल्ल्यांच्या इतिहासाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही , परंतु सिन्नर ह्या बाजारपेठेवरील मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्यांचा वापर होत असावा असा अंदाज आहे. 
किल्ल्यांची आणि  किल्ल्यांवर पोहोचण्याच्या वाटांच्या   माहितीसाठी www .trekshitiz.com ह्या वेबसाईट वर जावा,ह्याच आणि अजून बऱ्याच किल्ल्यांची माहिती साईट वर उपलब्ध आहे. 

12 thoughts on “किल्ले आड – डुबेरा – बर्व्यांचा वाडा (श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान)(AAD and Dubera Fot Trek)

  1. खूप छान लिहिले आहेस.. असेच लिहीत रहा वाचायला नक्की आवडेल..

    Like

  2. मेघन ंंमस्त आहे कीप इट अपअस्स ंंनविन्ं ंंनविन्ं ंंमाहिती देत रहा।

    Like

  3. Very nice presentation reg the infmn. Of the fort . Keep it up. Arrange to give more & more information & your experiences reg your trekking.O.K.All the best.

    Like

Leave a comment