भुईकोटांचे शिलेदार भाग १- किल्ले उदगीर (Udgir And Paranda Fort Trek Part -1)

 माझा पहिला ब्लॉग लिहून झाला , खूप छान प्रतिक्रिया मला लाभल्या त्यामुळे मला आता लिहिण्याची अजून प्रेरणा मिळाली आहे .आणि त्या प्रेरणेतूनच मी हा पुढचा ब्लॉग लिहितोय ज्याचे नाव मी ठेवलंय भुईकोटांचे शिलेदार!!!

भुईकोटांचे शिलेदार नाव ठेवण्यामागे एकच  कारण आहे,कारण जे दोन भुईकोट मी नजीकच्या काळात पहिले ते एका योध्दयासारखे  मला भासले आणि तेही रांगडे योद्धे.मी मुद्दाम दोन भागात हा ब्लॉग लिहितोय म्हणजे विस्तृतपणे लिहिता येईल.हा सुद्धा ट्रेक मी ट्रेकक्षितीज संस्थेतर्फेच केला.९ मार्च २०१८ ला रात्री आम्ही डोंबिवली वरून सोलापूरकडे निघालो .सोलापूर हुन पुढे आम्ही लातूर मार्गे औसा किल्ला आणि मग उदगीर किल्ला करणार होतो ,पण वेळेचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने आणि काही \’punctual \’ व्यक्ती वेळेवर न आल्याने  निघायला उशीर झाला आणि आम्ही सोलापूरलाच उशिरा म्हणजे सकाळी ६ च्या ऐवजी सकाळी ८.३० ला पोहोचल्याने पहिले उदगीर किल्ला करायचे ठरवले. मी एक मात्र मुद्दाम सांगेल  लातूर व त्या पुढच्या पट्ट्यात फिरताना कृपया करून २ ते ३ दिवस मुद्दाम काढा कारण हे किल्ले बहुतेक ९ ते ५ ह्या वेळेतच पहाता येतात आणि घाईने पाहण्यासारखे हे किल्ले नाहीत.

सोलापूरला एका मंगल कार्याच्या सभागृहात आमच्या राहण्याची सोय केलेली होती. तिचे पोहोचल्यावर  ट्रेक लीडर ची आज्ञा (तासाभरात तयार होण्याची) ऐकून आम्ही  आमचा प्रवास  ९.३० ला सकाळी  सोलापूर पासून उदगीरकडे सुरु  केला .ह्यावेळेस आमच्या बस ड्राइवर ने मोलाचे काम केले कारण रात्रभर बस चालवून आणि पुन्हा लगेच एक तासा  भराच्या अंतराने बस चालवणे आणि तेही ५ते ५.३० तास हे सोपे काम नाही .उदगीर ला जाताना वाटेत तुळजापूर लागले आई तुळजा भवानी ला नमस्कार केला मनातच आणि पुढचा प्रवास सुरूच ठेवला. कंटाळा तसा आला नव्हता पण पाठीने हळू हळू बोंब मारायला सुरुवात केली होती , असो वाटेत औसा गावाच्या आधी रसरशीत कलिंगडावर आम्ही सर्वांनी ताव मारला आणि प्रवास चालू ठेवला. अशाप्रकारे डोंबिवली -सोलापूर-औसा -लातूर-उदगीर असा  ५८९ किलोमीटर चा फार \’लहान प्रवास\’ पूर्ण करून आम्ही दुपारी ३ वाजेच्या सुमारास उदगीर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो .

                                                          डोंबिवली ते उदगीर प्रवासाचा मार्ग
   प्रवेशद्वाराजवळ आल्यावर समोर मी वरती म्हंटल्याप्रमाणे रांगडा उदगीर किल्ला आणि त्याचे रांगडे बुरुज  समोर उभे दिसले .किल्ल्याचे समोरील आणि इतर बुरुज आजही चांगल्या अवस्थेत आहे ,आणि किल्ल्याला मोठे  खंदक आहे .किल्ल्याच्या दर्शनी बुरुजांवर शरभ शिल्प कोरले आहे .किल्ल्यात शिरल्यावर आपल्याला पहिले प्रवेशद्वार लागते ज्याचा दरवाजा लोखंडी बसवला आहे. पुढे गेल्यावर दुसरे प्रवेशद्वार लागते ज्याच्या कमानी सुंदर आहेत. इथून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला वळल्यावर दोन प्रवेशद्वार आपले लक्ष वेधतात प्रवेशद्वारावरील  कमानी अतिशय सुंदर प्रकारे साकारल्या आहेत , त्यातील पहिल्या प्रवेशद्वारातुन  आत शिरल्यावर डाव्या आणि उजव्या बाजूला  दगडी फुलांचे शिल्प भिंतीत कोरले आहे.ह्या दोन प्रवेशद्वारांमध्ये  थोडी मोकळी जागा आहे ज्यावर छप्पर नाही आता हे का नसेल? त्याचे उत्तर सोपे आहे सुरक्षितता !!!शत्रू जर आत शिरलाच तर वरून दगड -धोंडे टाकून त्यावर आक्रमण करता यावे म्हणून हि योजना . दुसऱ्या प्रवेशद्वारावर सुंदर दगडी नक्षीकाम केले आहे.

                                       उदगीर किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि दर्शनी भक्कम बुरुज

                                  लोखंडी प्रवेशद्वारानंतर दिसणारे परकोटाचे दोन प्रवेशद्वार सुंदर कमानींसह

  इथून पुढे गेल्यावर आपण  किल्ल्याच्या मुख्य भागात प्रवेश करतो . किल्ल्याच्या उजव्या बाजूला पुरातत्व खात्याचे कार्यालय आहे त्यावरील सज्जा अप्रतिम आहे.  तसेच एक तोफ हि दिसते. तोफेचे तोंड एखाद्या प्राण्यासारखे  आहे. इथून पुढे गेल्यावर उजव्याच बाजूला विहीर आहे , विहिरीचा आकार अष्टकोनी आहे .मी स्वतः अशी विहीर पहिल्यांदाच पहिली.

                                         किल्ल्यावरील  अष्टकोनी  अप्रतिम विहीर 
मुख्य किल्ल्यात शिरल्यावर डाव्या बाजूने वरती गेल्यावर आपण दोन कमानींतून प्रवेश करतो ते दगडी कारंज्याच्या जागी , प्रथम पाहिल्यावर कळून येत नाही हे कारंजे आहे ते.कारंजे अतिशय सुंदर कोरलेले आहे आणि त्यातून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था वाखाणण्याजोगी आहे. कारंज्याच्या पुढे परत एक कमान आहे आणि ह्या कमानीवरचे काम हे सुरेख आहे  , कमानीच्या दोन्ही बाजूला दगडी कमळपुष्प कोरले आहे आणि वरील बाजूस  मध्यभागी फारसी भाषेत चिन्ह कोरले आहे आणि उजव्या आणि डाव्या बाजूस पण फारसी भाषेतील शिलालेख आहेत पण ते अस्पष्ट आहेत. आणि मध्यभागी कोरलेल्या फारसी चिन्हाच्या खाली वाघ सदृश्य चिन्ह कोरले आहे. त्या तील  डाव्या बाजूकडील शिलालेखाचा अर्थ ट्रेकक्षितीज संस्थेच्या वेबसाइट वर  दिला आहे जो पुढील प्रमाणे   – सरवार उल्क मलिक शहाजहानच्या काळात हिजरी १०४१ रोजी फतह बुरुज जिंकला (जून १६३६), त्यावेळी मुगल खान झैनखान हा राजाचा सेवक होता. या शिलालेखाच्या चारही बाजूच्या पट्टीवर नक्षी काढलेली दिसते, पण ती नक्षी नसून कुराणातील अल्लाची नाव कोरलेली आहेत.

                                                           कारंजा आणि कमान

                                     वरती ज्या शिलालेखाचा अर्थ सांगितला आहे तो शिलालेख
कमानीतून आत गेल्यावर उजव्या बाजूस भिंतीत खाचा केलेल्या आढळतात , त्या कबुतरं ठेवण्यासाठी केलेल्या असतं  म्हणून त्यास कबुतरखाना म्हंटले जाते. कबुतर खाण्याच्या समोर सुंदर असा रंगमहाल आहे . सध्या ह्या किल्ल्यावर पुरातत्व विभागाने डागडुजी करून पिवळा रंग दिल्याने आणि आजच्या पिढीतील फार मनापासून एकमेकांवर प्रेम करणाऱ्या प्रेमी रोमिओंनी आपली नावे  लिहिल्याने (त्यांचा बहुदा गैरसमज असावा कि आपले नाव इथे लिहिल्यावर गिनीज बुकाचा बाप असलेल्या बुकात जाईल असा)त्याचे मूळचे सौन्दर्य  दिसत नाही,परंतु ह्या वस्तू बघायला मिळतात हे हि नसे थोडके.

                                                                      कबुतर खाणा

                                                                      रंगमहाल
एक गोष्ट महत्वाची म्हणजे ह्या किल्ल्यास दुहेरी तटबंदी आहे आणि बाहेरील आणि आतील दोन्ही तटबंदीवरती बुरुज आहेत .मी आलेल्या कमानीच्या मार्गावरून  मार्गाने परत थोडा खाली जाऊन त्या पैकी एका बुरुजाला  आतील भागातून असलेल्या चिंचोळ्या पायऱ्यांच्या वाटेने वरती गेलो , बुरुजावर जायला बाहेरून हि मार्ग आहे.
आणि वर गेल्यावर अप्रतिम अशी पंचधातूची तोफ ठेवली आहे ज्यावर फारसी भाषेत लेख कोरलेला आहे. तोफेच्या मागील बाजूस चेहरा कोरला आहे . तोफ बघून तर दिल खुश हो गया , कारण अशा चांगल्या आवस्थेत असणाऱ्या तोफा पाहावयास मिळत नाहीत. पण ह्या तोफेचे नाव मात्र कळू नाही शकले.

                                                                             तोफ

                                                            तोफेवरिल फारसी भाषेतील कोरीव काम

                                                              रंगमहाल आतील बाजूने .
मी नंतर बुरुजावरून बाहेरील पायऱ्यांवरून खाली उतरलो आणि जी अष्टकोनी  विहीर आधी लागली त्या ठिकाणी पोहोचलो. मला वाटले आमची गडफेरी पूर्ण झाली पण  नाही , किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाकडील काही वास्तू खुणावत होत्या (बहुदा उत्तर दिशेकडील). विहिरीच्या समोर दिवाण ऐ आम व दिवाण ऐ खास हे महाल आहेत. तसेच विहिरीच्या उजव्या बाजूस कोपऱ्यात २ मजली ४ मिनार असलेला टेहळणी बुरुज आहे ज्या वरून पूर्ण प्रदेशावर लक्ष ठेवता येते.थोडा पुढे गेल्यावर ५ सुंदर कमानी असलेला खास महाल आहे खास महालातील खांब, त्यावरील  नक्षी आणि कमानी बघण्यासारख्या आहेत. येथे सुद्धा मला वाटले कि जर तोच पिवळा रंग आणि मॉडर्न प्रेमी युगुलांची हस्ताक्षर नसती तर काय सुंदर दिसला असता हा महाल. खास महालाच्या उजव्या बाजूकडील भागात काही ढासळलेले अवशेष आहेत.

                                                                        खास महाल

आल्या वाटेने परत मी अष्टकोनी विहिरीजवळ आलो आणि आमची गडफेरी पूर्ण झाली. घड्याळ्यात ५ वाजल्याने पुरातत्व विभागाचे अधिकारी आम्हाला आता किल्ला बंद होणार आहे हे सांगत होते त्यामुळे आम्ही पटकन ग्रुप फोटो काढले आणि सोलापूरच्या आमच्या रहाण्याच्या  ठिकाणी परतीला लागलो. पुन्हा एकदा ड्राइवर च्या कृपेने  उदगीर ते सोलापूर हे सुमारे १९० किलोमीटर चे अंतर पूर्ण करून रात्री ११ वाजता सोलापूर पोहोचलो. म्हणजे ९ मार्च रात्री ११ ते १० मार्च रात्री ११ एवढ्या २४ तासात तब्ब्ल ७७९ किलोमीटर चा आमचा बस प्रवास झाला.दुसऱ्या दिवशी  आम्ही परांडा किल्ला पहिला त्याबद्दल मी पुढचा ब्लॉग लिहिलंच.
तूर्तास रजा घेतो!!!!.

किल्ल्याच्या इतिहासाबद्दल-
उदगीर किल्ला हा ११ व्या शतकात बांधला गेला असावा असा अंदाज  काही शिलालेख व कागदपत्रांमध्ये सापडलेल्या उल्लेखांनुसार वाटतो . औरंजेबाची पहिली सुभेदारी म्हणजे ई .स १६३६-१६४४ ह्या दरम्यान हा किल्ला १६३६ मध्ये शहाजीराजांचा परावभाव करून औरंगजेबाने उदगीर किल्ल्याबरोबरच औसा आणि इतर असे एकूण ७ किल्ले  जिंकून घेतले. ह्या नंतर बराच काळ हा किल्ला मुघलांकडे राहिला.ह्या किल्ल्यावर आणखी एक महत्वाची लढाई  जी ३ फेब्रुवारी १७६० ला मराठे आणि निजामामध्ये झाली. ह्या लढाईचे नेतृत्व सदाशिवराव (भाऊ) पेशवे ह्यांनी केले. ह्या लढाईत निजामाचा सपशेल पराभव झाला आणि त्याने शरणागती पत्करली.निजाम शरण आल्यावर भाऊंनी पूर्वी एका केलेल्या तहातील २५ लाख आणि आताचे ६० लाख असा ८५ लाखाचा मुलुख घेतला आणि त्या शिवाय शिवनेरी,देवगिरी,अशीरगड , सोलापूरचा नळदुर्ग आणि हेंद्राबाद व विजापूरची चौथाई असे सर्व घेऊन भाऊ पुण्यात परतले.   पुढे हा किल्ला हैद्राबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत निजामाच्या ताब्यात होता त्यामुळे त्यावरील अवशेष आजही टिकून आहेत. 
(इतिहास साभार- ट्रेक्षितिज संस्था वेबसाईट, समरधुरंधर-विद्याचरण  पुरंदरे ,पेशवाई – कौस्तुभ कस्तुरे)  

7 thoughts on “भुईकोटांचे शिलेदार भाग १- किल्ले उदगीर (Udgir And Paranda Fort Trek Part -1)

Leave a reply to Shilpa Cancel reply