सांगली-कराड रेंज ट्रेक भाग १ (Sangli Range Trek Part-1)

थंडी म्हंटली कि ट्रेकर्स साठी सुगीचे दिवस !!!कारण ह्या दिवसात सर्व ट्रेकर्स जास्तीत जास्त ट्रेक्स करतात ते म्हणजे गुलाबी थंडी आणि पोषक वातावरणामुळे.मला ह्या दिवसात रेंज ट्रेक करायला खूप आवडते आणि ती एक पर्वणी असते माझ्या साठी .माझ्या ह्या वर्षीच्या थंडीतल्या रेंज ट्रेक ची सुरुवात होणार होती ती सांगली – कराड ह्या पट्ट्यातल्या ६ किल्ल्यांनी. हा ट्रेक ट्रेकक्षितिज संस्थेने आयोजित केलेला ज्या संस्थेबरोबर मी बहुतांश ट्रेक्स करतो.
आमची सुरुवात झाली ७ डिसेंबर च्या रात्रीच्या प्रवासाने.  बस चक्क वेळेत १०.३०वाजता निघाली आणि आम्ही निघालो  पहिल्या किल्ल्याच्या अर्थात गुणवंतगडाच्या पायथ्याकडील गावाकडे ते म्हणजे मोरगिरी गाव जे येते पाटण तालुक्यात आणि जिल्हा आहे सातारा .लोणावळ्याच्या मोरगिरी किल्ल्याचा आणि ह्या गावाचा काहीही संबंध नाही . डोंबिवली ते मोरगिरी हे अंतर आहे साधारण ३१६ किलोमीटर चे.बरोबर सकाळी ५.३०  ला आम्ही गावाच्या थोडे आधी  एक पूल आहे ज्या खालून नदी वाहते त्या ठिकाणी पोहोचलो.थंडी तशी नव्हती त्यामुळे पटापट प्रातर्विधीच्या मोहिमा  आटपून सकाळी ६.३० वाजता गुणवंतगडाकडे निघालो.

थोड्याच वेळेत आम्ही गुणवंतगडाच्या पायथ्याजवळ पोहोचलो. गावात भैरवनाथाचे मंदिर आहे आणि मंदिरासमोर एक तोफ उलटी पुरून ठेवलेली आहे. तसेच वीरगळ सुद्धा मंदिरासमोर ठेवलेली आहे  हे सर्व  पाहून आम्ही गडावर जाण्यासाठी व्यवस्थित मळलेली वाट आहे त्या वाटेकडे निघालो.साधारण २० मिनिटांच्या सोप्या चढाईनंतर आपल्याला  कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात बहुदा हाच गडाचा प्रवेश द्वार असावा,पण प्रवेशद्वाराचे अवशेष मात्र काही दिसत नाही. ह्या पायऱ्या चढून थोडे उजवीकडे गेल्यावर आपण किल्ल्याच्या मध्यभागी  प्रवेश करतो.

                                        पायथ्यावरुन दिसणारा गुणवंतगड
मध्यभागी पोहोचल्यावर सकाळची वेळ असल्याने दाट धुक्याने स्वागत केले ,अप्रतिम असे ते दृश्य होते असे वाटत होते कि आम्ही ढगांमध्ये आहोत. असे दृश्य दिसल्याने आम्ही लगेच क्लीका क्लीकी करून फोटो काढले आणि वळलो  डाव्या बाजूकडे चालायला.वाटेत काही पडक्या वास्तू असल्याच्या खुणा सापडतात परंतु गवत  वाढल्याने नीटसे कळत नाही. पुन्हा मागे येऊन उजव्या बाजूला गेल्यावर पाण्याचे खोदीव टाके लागते.ह्याच खोदिव टाक्याच्या पुढे भगवा झेंडा लावला आहे व माहिती दर्शक फलक लावला आहे. किल्ल्याच्या दोन्ही टोकांकडून पूर्ण आजूबाजूचा प्रदेश व्यवस्थित दिसतो त्यामुळे निश्चित ह्या किल्ल्याचा उद्देश टेहळणी साठी असावा असे वाटते.  बाकी किल्ल्यावर कोरड्या छोटया  तलावाचे अवशेष सोडून इतर काही अवशेष नाही.

                                          किल्ल्यावर दाट धुक्याने केलेले स्वागत
गुणवंतगडाची छोटीशी गडफेरी पूर्ण करून आम्ही निघालो पुढच्या किल्ल्याकडे तो म्हणजे किल्ले दातेगड!!!

गुणवंतगडावरून दातेगड २३ किलोमीटर वर आहे.हा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतल्यावर त्याचे नाव सुंदरगड असे ठेवले होते .आपण टोळेवाडी ह्या गावामार्गे दातेगडावर गाडी रस्त्याने पोहोचतो. किल्ल्यावर जाण्यासाठीची वाट अत्यंत सोपी असून वाटेत घेरा दातेगड- सुंदरगड  असा फलक लावलेला दिसतो. साधारण १५ ते २० मिनिटाच्या सोप्या चढाईनंतर आपण किल्ल्यावर प्रवेश करतो. किल्ल्यावर सरळ चालू लागल्यावर डाव्या बाजूला तटबंदीचे अवशेष दिसतात त्यात पहारेकर्यांच्या आरामासाठी छोटी खोली केलेली दिसते.हि तटबंदी बरीच पुढे पर्यंत  गेलेली दिसते. तटबंदी पाहून आपल्याला लांबून असे वाटते कि किल्ल्यावर बाकी काही विशेष नसेल,पण इथेच खरी मजा आहे थोडे पुढे गेल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात आणि तुम्ही ह्या पायऱ्या बघणार तोच समोर लांबूनच  कातळात कोरलेली अप्रतिम गणेशाची मूर्ती दिसते. लांबून तिची उंची कळत नाही पण जवळ गेल्यावर हि गणेशाची मूर्ती जवळ जवळ ६ ते ७ फुटापर्यंत असेल. शेवटच्या  पायरीवर उभे राहिल्यावर मी म्हंटल्याप्रमाणे समोर गणेशाची मूर्ती आणि उजव्या बाजूला मारुतीची ८ ते ९ फुटापर्यंतची मूर्ती कोरलेली आहे. दोन्ही मुर्त्यांचे  कोरीव काम पाहण्यासारखे आहे.माझ्या आता पर्यंतच्या किल्ल्यांच्या सफरीत मी एवढी सुंदर गणेश आणि मारुतीची  मूर्ती  पाहिली नाही .फक्त एवढेच वाटले कि त्यांना जर शेंदूर फासले नसते तर आपल्याला अस्सल काळ्या दगडातल्या मूर्तीचे सौन्दर्य अनुभवता आले असते पण असो….
मी मगाशी म्हंटल्याप्रमाणे पायरीच्या समोर गणेश व उजवीकडे मारुतीची मूर्ती आहे आणि डावीकडे गेल्यावर मुख्य गडाचे प्रवेशद्वार लागते (मारुतीच्या मुर्तीच्या समोर). प्रवेशद्वार पण पाहण्यासारखे आहे.प्रवेशद्वाराची कमान जिथे जुळते तिथे ती तुटलेल्या अवस्थेत आहे आणि प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवड्या आहेत . प्रवेशद्वारातून खाली उतरल्यावर आपल्याला कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात.

                                                                       गणेश मूर्ती

                                                                       मारुतीची  मूर्ती

                                                                   किल्ल्याचे प्रवेशद्वार

प्रवेशद्वार पाहून पुन्हा माघारी येऊन पायऱ्या चढून गडमाथ्यावर परत यावे.आता आल्यावर आपल्याला  परत वाटते कि बहुदा अजून काही किल्ल्यावर नसावे , पण पुढे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना  असलेली विहीर आपली वाट पाहत असते. थोडे पुढे गेल्यावर आपल्याला पुन्हा कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात . पायऱ्या उतरल्यावर हि विहीर दिसते .विहिरीच्या आधी एक डाव्या बाजूला  छोटी गुहा आहे त्यात पिंड आहे व बाहेर नंदी आहे. विहीर हि खोल असावी असे अंदाजाने पाहून  वाटते. खालून आपण वर पाहिल्यावर उंच सरळसोट भिंत  दिसते.ह्याच भिंतीच्या वरच्या भागात अर्थात विहिरीच्या छतावर हत्ती कोरलेला आहे पण तो  पायऱ्या चालून परत गडमाथ्यावर आल्यावर दिसतो.

                                                   विहिरीच्या खालून दिसणारी सरळसोट भिंत

हत्तीशिल्प 

                                                           विहिरीकडे जाणाऱ्या पायऱ्या

हि सुंदर विहीर पाहिल्यावर परत गडमाथ्यावर आलो आणि थोडे पुढे चालल्यावर पाण्याच्या टाक्यांचे अवशेष लागले. गडाच्या टोकावर पण तटबंदीचे अवशेष आहेत हीच तटबंदी पाहून  मागे फिरल्यावर दातेगडाची गडफेरी पूर्ण होते.

दातेगड पाहून झाल्यावर आम्ही निघालो दिवसातल्या तिसऱ्या किल्ल्याकडे तो म्हणजे वसंतगड.दातेगडावर पोहोचल्यावर काही गावकऱ्यांनी आम्हाला आल्या वाटेने परत मागे जाऊन वसंतगडासाठी न जाता तिथूनच पुढे १ किलोमीटर च्या चिंचोळ्या मार्गाने  जाऊन मग चांगला गाडी रस्ता आहे जो वसंतगडाला जातो आणि काही किलोमीटर चा प्रवास सुद्धा वाचतो असे सुचवले. पण प्रश्न होता तो बस जाईल कि नाही हा ? म्हणून मग काही ट्रेकक्षितिज चे मेंबर्स जाऊन रस्ता बघून आले आणि रस्त्यातले दगड , बाइक्स वगैरे दूर करून आम्ही सुखरूप जिथे गाडी रस्ता सुरु होतो तिथे पोहोचलो. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे कार्यालय होते आणि चांगली मोकळी जागा असल्याने तिथेच जेवायचे ठरवून आणि जेवून पुढे वसंतगडाला रवाना झालो.तळबीड हे वसंतगडाच्या पायथ्याचे गाव. आता तळबीड म्हंटले कि आपल्याला आठवते सरसेनापती हंबीरराव मोहिते!!!.
हो हे त्यांच्याच निवासाचे गाव आहे.दातेगडपासून वसंतगड ४१ किलोमीटर अंतरावर आहे. साधारण ३.३० च्या सुमारास आम्ही भरपेट जेवून आणि बस मध्ये झोपून वसंतगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. चढाईसाठी अर्ध्या वाटेपर्यंत सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या आहेत. पुढे मग पायवाट आहे,साधारण अर्धा ते पाऊण तासाच्या चढाईनंतर किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज दिसतो. जेवणानंतर लगेच चढाई केल्यामुळे थोडे थकायला झाले होते आणि त्यात अजिबात वारा नव्हता.

असो, गडमाथ्यावर आल्यावर डावीकडून तटबंदीच्या दिशेने चालू लागलो.तटबंदीचे अवशेष बऱ्यापैकी शाबूत आहेत.थोडे पुढे गेल्यावर तटबंदीतील शौचकुप पाहायला मिळते.तसेच पुढे गेल्यावर पहिला बुरुज लागतो ,बुरुजावर जायला पायऱ्यांची सोय आहे.बुरुजावरून सभोलतालचा परिसर दृष्टीक्षेपात येतो.बुरुजावरून उतरून समोरच मध्ये दोन तलाव आहेत त्यातल्या मधल्या तलावात सफेद कमळं उमलली होती. 

                                                                        शौचकुप

           
                                                                        तलाव 

तलावाच्या समोर देखील बुरुज आहे. थोडे पुढे वळल्यावर आपल्याला गडाचे दुसरे प्रवेशद्वार लागते.प्रवेशद्वार सध्यातरी शाबूत आहे .प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस मारुती कोरला आहे.प्रवेशद्वार पाहून आपण पुढे पुन्हा जिथून गड माथ्यावर प्रवेश करतो त्या दिशेस चालू लागतो ,वाटेत एक मोठा बुरुज आणि त्या पुढे समाध्यांचे अवशेष पाहायला मिळतात. इथून पुढे थोडे गेल्यावर पुन्हा  २ तलाव लागतात ह्यातील एका तलावाचे पाणी पंपाने चंद्रसेन मंदिरापर्यंत नेले आहे.ह्या किल्ल्यावर मला  वेडा रघु (Bee Eater), खंड्या (Kingfisher) इत्यादी पक्षी पाहायला मिळाले .इथून पुढे मंदिरापर्यंत जाणाऱ्या वाटेत झाडीत चुन्याच्या घाण्याचे अवशेष बघायला मिळाले .हे पाहून आपण मग चंद्रसेन मंदिराजवळ आपण पोहोचतो , मंदिराच्या समोर दीपमाळ आहे.मंदिराला सध्या कलर दिलेला असल्याने मी मंदिराचे मूळ स्वरूप कसे असेल ह्याचा अंदाज घेत होतो ( ह्या मंदिराबद्दची आख्यायिका जी trekshitiz.com ह्या साईट वर उपलब्ध आहे ती मी गडाच्या इतिहासासंदर्भात माहिती देताना मांडेल.)    


                                                                   चंद्रसेन मंदिर

                                                                        दीपमाळ

                                                               गडावरील दुसरे प्रवेशद्वार 

अशाप्रकारे मंदिर पाहिल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते, आम्ही संध्याकाळी ५.३० ते ६ च्या दरम्यान गडउतार झालो व नंतर तळबीड येथील हंबीरराव मोहिते ह्यांची समाधी पाहून सदाशिव गडाकडे रवाना झालो मुक्कामासाठी आणि तेही पाठीवर बॅगेचे ओझे घेऊन साधारण ७०० ते ८०० पायऱ्या चढायच्या बेताने .
(क्रमशः)      

           
गडांच्या इतिहासाबद्दल-

गुणवंतगड- ह्या किल्ल्याबद्दल इतिहास मौन बाळगून आहे , परंतु किल्ल्याची भौगोलिक परिस्थिती ,आकार आणि विस्तार पहाता  ह्या किल्ल्याचा वापर टेहळणी साठी होत असावा असे वाटते.

दातेगड- शिवाजी महाराजांनी हा किल्ला अफझल खान वधानंतर घेतला.व त्यानंतर गडाचे नाव सुंदरगड असे ठेवले. तत्पूर्वी  हा किल्ला पंधराव्या शतकात शिर्के घराण्याच्या ताब्यात होता , पुढे मलिक उत्तुजारने हा किल्ला शिर्क्यांकडून लढाई करून हस्तगत केला. पुढे बहामनी राज्याच्या विभाजनानंतर हा किल्ला अदिलशाहीकडे गेला. महाराजांनी हा किल्ला जिंकल्यावर किल्ल्याची जबाबदारी साळुंखे नावाच्या सरदारावर टाकली जो कि पाटण परिसरात  राहत असल्याने पुढे हे घराणे पाटणकर नावाने ओळखू लागले.संभाजी महाराजांच्या मृत्यूपश्चात हा किल्ला मुघलांकडे गेला परंतु १६८९ साली परत संताजी व पाटणकरांनी हा किल्ला परत स्वराज्यात आणला, त्या बद्दल त्यांना राजाराम महाराजांनी पाटण गावातील ३४ गावे  इनाम म्हणून दिली अशी इतिहासात नोंद आहे.

वसंतगड- हा किल्ला १२ व्या  शतकात शिलाहार राजा भोज ह्याने बांधला.१६५९ मध्ये हा किल्ला महाराजांनी स्वराज्यात आणला. अफझल स्वारीत सुलतानजी जगदाळे नावाचा सरदार अफझल खानाला मिळाला होता , त्यामुळे किल्ला जिंकल्यावर मराठ्यांनी अचानक छापा घालून त्याला ह्या किल्ल्यावर आणून त्याचा शिरच्छेद  केला. पुढे २५ नोव्हेंबर १६९९ साली हा किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव ठेवले \’किली द फतेह\’ म्हणजे यशाची गुरुकिल्ली .ह्याच संबंधी मोगल दरबाराच्या बातमीपत्रात नोंद आहे , दिनांक २५ आणि २६ नोव्हेंबर दरम्यान किल्ल्यात ह्या सर्व घडामोडी घडल्या , शेवटी २६ नोव्हेंबर च्या बातमीपत्रात रतनराव हा गडाचा किल्लेदार ह्याने जिवदानाच्या अभयावर किल्ला देण्यासंबंधी तरबियत खानाकडे  निरोप पाठवला ज्याने किल्ल्यावर मोर्चे आणि वेढा घातलेला होता .अशाप्रकारे किल्ला मुघलांकडे गेला ,किल्ल्यावर त्या नंतर धान्य साठा व दारुगोळ्यासाठी लागणारी विशिष्ट माती सापडली असल्याच्या पण नोंदी बातमीपत्रात आहे.

मी वरती गडफेरीतल्या माहीतीत वसंगडाच्या चंद्रसेन मंदिराच्या आख्यायिकाबद्दल बोललो होतो ती ट्रेक्षितिज.कॉम ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ती जशीच्या तशी पुढे मांडतो-

\’\’शुर्पणखेचा पुत्र चंद्रसेन याने या डोंगरावर शंकराची घोर तपश्चर्या केली, शंकराने त्याला खडग दिले. राम लक्ष्मण वनसात असताना या भागात आले, खडगाचे तेज पाहून लक्षमणाने ते उचलेले आणि त्याची धार पाहाण्याकरीता झाडीत चालवले. त्या ठिकाणी चंद्रसेन तपश्चर्येला बसला होता, त्याचे हात त्यामुळे कापले गेले.\’\’

पुढच्या ब्लॉग मध्ये आपण उर्वरित ३ किल्ल्यांबद्दल माहिती घेऊ. 

इतिहास सौजन्य-www.trekshitiz.com हे संकेत स्थळ आणि मुघल दरबाराची बातमीपत्रे खंड -१ संपादक सेतुमाधवराव पगडी.  




         


                                                     

2 thoughts on “सांगली-कराड रेंज ट्रेक भाग १ (Sangli Range Trek Part-1)

Leave a reply to Meghan Petkar Cancel reply