मारुती मंदिर व विहीर
महादेव मंदिर सदाशिव गड
किल्ल्याची सध्या निघा राखणाऱ्या तरुणांची मावळा प्रतिष्ठान नावाची संस्था आहे त्यातील एका संस्थेच्या सभासदाने आम्हाला गड फिरवला ,त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या गडावरील बुरुजांची संख्या हि २० च्या पुढे आहे. परंतु दुर्दैवाने सध्या एकाही बुरुजाचे अवशेष पहायला मिळत नाहीत. सरळ चालत गेल्यावर डावीकडे गेल्यावर आपल्याला टोकावर भगवा फडकावलेला दिसतो त्या भगव्याच्या समोर डाव्या बाजूला पाण्याची २ टाकी आहेत आणि कड्या लागत पाण्याची ३ टाकी आहेत जिथे जाण्यासाठी कातळात पायऱ्या खोदल्या आहेत.हे अवशेष बघून आपण परत मागे फिरून सरळ चालत गेल्यावर किल्ल्याच्या महादेव मंदिराजवळ पोहोचतो.महादेव मंदिराच्या मागे म्हणजे गड चालून येताना माथा गाठल्यावर डाव्या बाजूला विहीर आहे ह्या विहिरीत जायला पायऱ्यांची सोय आहे. मुख्यतः हा किल्ला टेहळणीसाठीच असावा असे गडावरील भोगोलिक परिस्थिती आणि इतिहासात पण कमी उल्लेख असल्याने वाटते. सदाशिव गडाची फेरी पूर्ण करून आम्ही गड सकाळी ९ वाजता उतरलो आणि निघालो पुढील किल्याकडे तो म्हणजे विलासगड .
विलासगडावर जाण्यासाठी आपल्याला जावे लागते येडेनिपाणी ह्या गावात , विलासगड हा येडेनिपाणी गावाजवळ आहे . पण हा किल्ला विलासगड ह्या नावाने न ओळखता किल्ल्याच्या थोडा आधी असलेल्या मल्लिकार्जुन महादेव मंदिरामुळे मल्लिकार्जुन गड म्हणून ओळखला जातो. ह्या मंदिरामुळेच किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्यांची सोय आहे.साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण मल्लिकार्जुन मंदिराच्या आवारात प्रवेश करतो.मंदिराआधी दोन कमानी असलेली एक इमारत लागते.इथेही मंदिराला कलर मारल्याने मूळ सौन्दर्य कळून येत नाही.मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर भैरवनाथाचे मंदिर आहे, भैरव नाथाच्या मंदिराच्या बाजूला भांडारगृह आहे. भैरवनाथाच्या मंदिरासमोर प्रांगणात दोन दीपमाळा आहेत व त्याच्या बाजूला नगारखाना आहे. भांडारगृहाच्याच बाजूला लेण्यात कोरलेले मल्लिकार्जुन मंदिर आहे , मी वर सांगितल्याप्रमाणे कलर दिल्याने मंदिराचे मूळ सौन्दर्य झाकोळले गेले आहे.ह्या लेण्याला ७ खांब आहेत.मंदिरात शिवलिंग व सर्पशीळा आहे.मंदिरातीळ प्रवेशद्वाराच्या समोर गणपतीची मूर्ती खांबाला टेकून ठेवली आहे.मल्लिकार्जुन मंदिर पाहून बाहेर आल्यावर वरती नगारखान्यात बाहेरून पायऱ्यांनी जाता येते , नगारखान्याच्या तळाला नंदी आहे.
मल्लिकार्जुन मंदिर
मल्लिकार्जुन मंदिर
शिवलिंग
हे सर्व पाहून भैरवनाथाच्या डावीकडून मूख्य गडावर जायला पायऱ्या आहेत.पायऱ्यांच्या आधी आपल्याला जमिनीत चुन्याचा घाणा अर्धा पुरलेला दिसतो. पुढे पायऱ्यांच्या वाटेने आपण गडमाथ्यावर पोहोचतो.आणि समोर एक शेड लागते त्या शेड मध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे , शेडच्या बाजूला दगडी चौथऱ्यावर श्रीकृष्ण मंदिर आहे. मंदिरासमोर हजरत चाँद बुखारी बाबा ह्यांचा दर्गा आहे. ह्या दर्ग्याचे सेवक हे जाधव घराण्यातील आहे असे तेथील सेवकाकडून कळाले. ह्या दर्ग्याच्या पुढे दगडी इमारत आहे जिला दोन कमानी आहेत.
श्रीकृष्ण मंदिर
दगडी इमारत
ह्याच्या पुढे पूर्व टोकाला विशेष अवशेष नाहीत म्हणून मागे परत आलो आणि श्रीकृष्ण मंदिराजवळ पोहोचलो. तिथून पुढे डोगरसोंड उतरल्यावर पाण्याचा पाईप लागतो. तिथून सावकाश खाली उतरल्यावर आपल्याला पाण्याचे टाके लागते ह्या टाक्यात उतरायला पायऱ्या आहेत , हे पाहून तिथूनच सरळ गोलाकार वळसा घातल्यावर आपण मल्लिकार्जुन मंदिराजवळ पोहोचतो.इथेच किल्ल्याची गडफेरी पूर्ण होते. हा किल्ला उतरून आम्ही पाय वळवले ते थेट ट्रेकच्या शेवटच्या किल्ल्याकडे अर्थात किल्ले बहादूरगड.
बहादूरगड खरं तर एक गढी आहे , किल्ला असे म्हणता येणार नाही.असो ,ह्या भुईकोटाच्या आधी पण खंदक खोदलेला आहे ज्यातील समोरील भाग बुजवून त्यावर रस्ता बांधला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर गणपती मंदिर बांधले आहे ज्याचे बांधकाम नवीन आहे.ह्या किल्ल्यावरील दर्शनी बुरुजांवर डागडुजीचे काम केले आहे . ह्या किल्ल्याला किमान १५ ते २० बुरुज असावेत हा माझा अंदाज आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील तटबंदीवर सफेद आणि काळ्या रंगाच्या झेंड्याचे निशाण लावले आहे , त्या बाबतील चौकशी केली असता असे कळले कि ज्यांच्या ताब्यात हा किल्ला होता त्या घराण्याचे वंशपरंपरागत ते निशाण आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर तटबंदी व बुरुज दिसतात ,बुरुजाचे काम त्यावरील विटांवरून पेशवाईच्या काळातील वाटते . पुढे आपल्याला प्रवेशद्वार लागते , प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर सर्व बालेकिल्ला गच्च झाडींनी वेढलेला आहे त्यामुळे सर्व अवशेष हे लुप्त झाले आहेत. आपण झाडीतून चालत पुढे गेल्यावर पायऱ्या असलेली विहीर लागते आणि त्या बाजूला छोटासा हौद दिसतो. त्याच हौदा शेजारी तुळशी वृंदावन दिसते. ह्याच विहिरींपुढे गेल्यावर एक चोरवाट लागते परंतु झाडीमुळे मी काही जवळ जाऊन ती बघितली नाही
बहादूरगड
विहीर
मी पुन्हा हौदाच्या बाजूने मागे फिरून उजव्या बाजूने पायऱ्यांच्या साहाय्याने एका बुरुजावर गेलो तिथून किल्ला बऱ्यापैकी दृष्टीक्षेपात येतो. संपूर्ण झाडी काढली तर नक्कीच आपल्याला लहान वाड्यांचे अवशेष मिळू शकतात.
बुरुजावरून दृष्टीक्षेपात येणार किल्ला व तटबंदी .
अशाप्रकारे आल्या वाटेने मागे फिरल्यावर प्रवेशद्वारापाशी येऊन बहादूरवाडी गडाची गडफेरी पूर्ण केली आणि पर्यायाने ट्रेकची पण सांगता झाली. कराड पासून हा किल्ला ४९ तर कोल्हापूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. परतीच्या वाटेत कराडला शिवराज ढाब्यात आमचे जेवण झाले. मस्त अक्ख्या मसुरावर भाकरीबरोबर ताव मारला. पण ह्या हॉटेल मध्ये महाराजांचा एक पुतळा बसवला आहे आणि पूतळ्यासमोर चक्क खऱ्या ताटाचा नैवेद्य दाखवला जातो, आता पुतळा कसा आहे आणि त्यावर काय लिहिले आहे ते तुम्ही वाचकांनीच बघा.
शिवराज ढाब्यातील दृश्य
गडांच्या इतिहासाबद्दल
सदाशिवगड – सदाशिव गडाचा घेरा बघता हा फक्त टेहळणीसाठी बांधला असावा असे दिसते. बाकी ऐतिहासिक कागदपत्रे ह्या किल्ल्याबाबतीत मौन बाळगून आहे.
विलासगड – सदाशिव गडाप्रमाणेच हा हि खेळला टेहळणीसाठीच बांधला असावा इतकीच माहिती कळते.
बहादूरवाडीगड- शाहूमहाराजांच्या नंतर म्हणा अथवा आधी सुद्धा मराठ्यांच्या दोन गाद्या स्थापित झालेल्या होत्या त्या म्हणजे सातारा आणि कोल्हापूर. ह्या दोन्ही गाद्यांच्या सीमेवर सुरक्षिततेसाठी माधवराव पेशव्यांनी हा किल्ला बांधला , तसेच ह्या किल्ल्याचे बांधकाम विटांवरून पेशवाईच्या काळातले आहे हे सहज कळते.हा किल्ला प्रथम सांगलीच्या पटवर्धनांच्या ताब्यात होता पुढे तो त्यांनी मुधोळकर घोरपडे ह्यांच्या कडे दिला.
इतिहास सौजन्य – ट्रेक्षितिज संस्था संकेतस्थळ. (wwwtrekshitiz.com )













सुंदर, keep it up
LikeLike
Very Informative, Good going.
LikeLike
Thanks..Pan naav disat nahiye naav jarur sangave.
LikeLike