कल्याण वरून २२ तारखेला संध्याकाळच्या सह्याद्री एक्सप्रेस ने सर्व ट्रेकर मंडळी सकाळी ६ वाजता कोल्हापूर ला पोहोचलो. आणि तिथून मग ट्रेकक्षितिज संस्थेने सोय केलेल्या बस ने आम्ही पुढचा प्रवास सुरु केला आणि मिसळ ब्रेड चा नाश्ता करून , होय अगदी बरोबर मिसळ बरोबर आम्ही ज्या गावात होतो तेथे ब्रेड देण्याची पद्धत आहे त्यामुळे मस्त मिसळ हादडून आम्ही प्रवास सुरु केला तो रांगणा किल्ल्याकडे.
कोल्हापूर ते रांगणा किल्ला हे अंतर तसे अदमासे १७५ ते १८० किलोमीटर असावे आणि रांगण्यासाठी कोकणातून पण मार्ग जातो पण आम्ही अर्थात गारगोटी -कडगाव-पारगाव-तांब्याची वाडी-भटवाडी आणि पुढे चिक्केवाडी गाठून गड गाठला. परंतु रस्ता हा मोठ्या गाडीस अनुकूल नसल्याने साधारण चिक्केवाडीच्या
१० किलोमीटर आधीपासूनच आम्हाला पायी सुरुवात करायला लागली. छोट्या गाड्या मात्र थेट जाऊ शकत होत्या. साधारण व्यवस्थित वेगाने आम्ही हे अंतर कापून किल्ल्याच्या जवळ असणाऱ्या वाटेजवळ पोहोचलो जिथे किल्ल्याची माहिती दर्शवणारा फलक लावला होता.आणि पुढे उतरल्यावर आपण किल्ल्याच्या समोरील पठारावर पोहोचतो. आपण बहुतेक वेळा किल्ल्यावर पोहोचण्यासाठी चढत असतो ह्या किल्ल्यावर मात्र उतरावे लागते. पठारावर पोहोचल्यावर रांगणा किल्ल्याचा रांगडा बुरुज आपले स्वागत करतो ज्यावर भगवा फडकत होता. किल्ल्यावर सध्या दुरुस्तीचे काम चालू आहे. छोटेखानी पठार उतरून बुरुजाच्या डावीकडून आणखी एक छोटा बुरुज लागतो व त्या बुरुजाच्या बाजूला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते.
पठारावरून दिसणारा रांगणा व बलाढ्य बुरुज
प्रवेशद्वाराजवळील बुरुज
मुख्य प्रवेशद्वार
प्रवेशद्वार अप्रतिम आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडे वाडासदृश्य इमारत आहे. तिथून पुढे गेल्यावर उजव्या बाजूलाच आणखी एक मोठा वाडा लागतो त्यावर ऐतिहासिक निबाळकर वाडा अशी पाटी लावली आहे.पुढे सरळ चालत जाऊन डावीकडे वळल्यावर दोन प्रवेशद्वार लागतात ज्यावर नुकतेच डागडुजीचे काम केलेले दिसते. प्रवेशद्वार पार केल्यावर उजवीकडे वळल्यावर बारमाही पाणी असलेला तलाव लागतो.ह्या तलावाजवळ असंख्य गावकरी चूल थाटून वनभोजनाचा आनंद घेत होते , त्यामुळे आमच्या लीडर ने पण तलावाच्याच पुढे असलेल्या शिवमंदिरात जेवून पुढे गड पाहण्याचे ठरवले. जेवण झाल्यावर मी शिव मंदिर पूर्ण बघितले डागडुजी केल्यामुळे शिवमंदिर अतिशय देखणे दिसत होते. मंदिरासमोरचा नंदी पण कोरीव आहे .
दोन दरवाजे
तलाव
शिव मंदिर
शिव मंदिराच्या उजव्याबाजूने सरळ चालत गेल्यावर आपल्याला रांगणाईदेवीचे मंदिर लागते. मंदिरातील देवीची मूर्ती काळ्या पाषाणातली आहे ,मंदिरासमोर उंच अशी दगडी दीपमाळ आहे.दीपमाळेच्या खाली काही पुरातन शिळा ठेवल्या आहेत ज्यावर काय कोरले आहे ते नीटसे कळत नाही.रांगणाईदेवीच्या उजव्या बाजूस मारुतीचे मंदिर आहे ह्या मंदिरातली मूर्ती पण काळ्या पाषाणातली आहे . रांगणाईदेवीच्या मागील बाजूस गेल्यावर तटबंदीचे थोडेसे तुरळक अवशेष दिसतात.
रांगणाईदेवी मंदिर
दीपमाळ
रांगणाईदेवी
हे पाहून पुन्हा मागे येऊन रांगणाईदेवीच्या मंदिरापासून सरळ चालत गेल्यावर आणखी एक वास्तू लागते पण कसली आहे ते काही कळत नाही.हि वास्तू पाहून डावीकडे सरळ चालत गेल्यावर झाडींतून थोडा मार्ग काढल्यावर पायऱ्या असलेली विहीर लागते. विहिरीच्या बाजूला छोटी मंदिर सदृश्य वास्तू आहे.पुढे सरळ चालत गेल्यावर तलावाच्या पुढे असलेल्या वाटेवर परत येतो आणि गडाच्या दरवाज्यापाशी पोहोचतो.वास्तविक निंबाळकर वाड्याच्याच पुढे एक मोठी विहीर आहे जी मला येताना दिसली.अजून पण माची आणि बुरुजांचे अवशेष गडावर आहेत परंतु वेळ आणि वाढलेल्या झाडींमुळे आम्ही ते बघू शकलो नाही.परंतु तरीही मनसोक्त गड फिरल्याचा आनंद मात्र झाला .पुन्हा परतीचे १० किमी चे अंतर पायी कापून आम्ही बसजवळ संध्याकाळी ५ वाजता पोहोचलो आणि मुक्कामी निघालो भुदरगडाकडे.
रात्री साधारण ८ च्या सुमारास आम्ही सर्व भुदरगडावर पोहोचलो.गडावर जाण्यासाठी थेट गाडी रस्ता झाला आहे.भुदरगडासाठी पेठ शिवापूर नावाचे गाव गाठायचे.आमचा मुक्काम गडावरील भैरवनाथाच्या मंदिराबाजूला असणाऱ्या दोन पडवींमध्ये होता. मस्तपैकी डाळभात गोड शिऱ्याच्या जेवणावर ताव मारून झोपी गेलो.आणि सकाळी लवकर उठून बरोबर ७ वाजता गड फिरायला सुरुवात केली. भैरवनाथाच्या मंदिराबद्दल मी नंतर बोलतो. मंदिराच्या बाहेर आल्यावर उजव्या बाजूने गडाला गोल घेरा घालता येतो.आम्ही तशीच सुरुवात केली. उजव्या बाजूला वळल्यावर आपल्याला सर्वप्रथम शिवमंदिर लागते.मंदिराची डागडुजी केली आहे.आणि मंदिरात महाराजांचा पुतळा ठेवला आहे आणि शिवपिंडी पण आहेत. पुढे चालत गेल्यावर पडक्या वाड्याचे अवशेष लागतात इथे सुद्धा रांगण्यावर चालू असलेल्या डागडुजी प्रमाणेच डागडुजी करण्यात आली आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर अतिशय नयनरम्य असा दूधसागर तलाव लागतो ह्या तलावाचे पाणी लांबून खरेच पांढरे शुभ्र वाटते , मी एवढा प्रचंड तलाव तोही किल्ल्यावर पूर्ण भरलेला ह्या आधी कधी पहिला नाही.आणि सर्वात मजा म्हणजे ह्या तलावाभोवती असंख्य पक्षी बागडत असतात त्यामुळे छायाचित्रकारांची इथे चंगळ आहे.
शिवमंदिर
दूधसागर तलाव
दूधसागराच्या कडेला छोटी छोटी मंदिरे बांधण्यात अली आहेत.पहिले आपल्याला अप्रतिम असे शिवमंदिर लागते. सरळ गेल्यावर डावीकडे वळसा मारल्यावर गडाची तटबंदी आणि गडासभोवतालचा परिसर दिसतो.पुन्हा थोडे पुढे गेल्यावर गडाच्या तटबंदीचे अवशेष बघून परत किंचित मागे आल्यावर दूधसागराच्या मध्यभागी भवानी मातेचे मंदिर आहे ज्याची उजवी बाजू उध्वस्त झाली आहे. हे पाहून सरळ गेल्यास कोना अज्ञात व्यक्तीची समाधी बांधली आहे. हि समाधी पाहून आपण थेट तटबंदीवरुन फेरा घालून भैरवनाथाच्या मंदिराजवळ पोहोचतो.
शिवमंदिर
तटबंदी अवशेष
भवानी मंदिर
भैरव नाथ मंदिराच्या समोर असणाऱ्या तटबंदीवरील बुरुजावर एक दीपमाळ व तोफ ठेवली आहे .तोफेवर P हे इंग्रजी अक्षर व राणीचे मुकुट कोरले आहे. आणि ९१८ हे अंक इंग्रजीत कोरले आहे.तोफ पाहण्यासारखी आहे .ह्याच तोफेसमोरून उतरून आपण भैरवनाथ मंदिरात प्रवेश करतो मंदिर हे वेगळ्या हेमाडपंथी धाटणीचे आहे , मंदिरातील मूर्ती काळ्या पाषाणातली आहे.मंदिरासमोर दीपमाळ आहे.आणि नव्याने सभामंडपात पत्र्याची शेड लावली आहे.अशाप्रकारे आपली गडफेरी येथे पूर्ण होते.गडाचा घेरा खूप मोठा आहे खास नुसता एक दिवस काढून अजून ह्या गडावरील इतर अवशेष आपण शोधू शकतो असे वाटले.
भैरवनाथासमोरील दीपमाळ व तोफ
तोफ
भैरवनाथ मंदिर
भैरवनाथ मंदिर
किल्ल्यांच्या इतिहासाबद्दल
रांगणा – रांगणा किल्ला बांधला हा शिलाहार राजा भोजने. ई.स १४७० मध्ये महंमद गवानने हा किल्ला जिंकला.बहामनी साम्राज्याच्या ऱ्हासानंतर हा किल्ला आदिलशाहीत गेला.पुढे १६५८ साली रुस्तुम जमान ह्या विजापूरच्या सरदाराने अदिलशाहीच्याच मराठी सरदार सावंतवाडीचे सावंत ह्यांच्याकडून हा किल्ला घेतला.ह्या किल्ल्यावरची महत्वाची घटना म्हणजे छत्रपती आग्र्याच्या कैदेत असताना १६६६ साली ह्या किल्ल्याला आदिलशाहीचा वेढा पडलेला , तेव्हा या प्रसंगी स्वतः जिजाबाईंनी मोहीम काढून दिनांक १५ ऑगस्ट १६६६ रोजी रांगणा किल्ला जिंकला.पुढे वारणेच्या प्रसिद्ध तहानुसार हा किल्ला करवीर गादि कडे गेला त्यावेळी ताराबाईंचे ह्या किल्ल्यावर वास्तव्य होते आणि शाहू महाराज आणि ताराबाईंच्या संघर्षात १७०८ साली शाहू महाराजांच्या सातारच्या पक्षाने किल्ल्याला वेढा दिला , परंतु पावसाळ्यामुळे हा वेढा नंतर उठवला गेला.परंतु वेढा उठवण्याआधीच ताराबाई सिंधुदुर्ग किल्ल्यावर निघून गेल्या होत्या .ताराबाईंच्या पश्चात रामचंद्र पंत अमात्य व पिलाजी घोरपडेंनी किल्ला लढता ठेवला.करवीर अर्थात कोल्हापूरच्या दृष्टीने रांगण्याचे खूप महत्व स्वराज्यात होते.महाराजांचे जातीने किल्ल्याकडे लक्ष होते असे काही कागदपत्रांत सापडते.
भुदरगड-हा हि किल्ला बांधला तो शिलाहार वंशातीलच राजा भोज (दुसरा) ह्याने. हा हि किल्ला आदिलशाहीत बराच काळ राहिला.पुढे १६६७ मध्ये स्वराज्यात किल्ला आल्यावर महाराजांनी ह्या किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याची नोंद आहे.पुन्हा हा गड अदिलशाईत गेला होता परंतु शिवरायांनी १६७२ साली पुन्हा स्वराज्यात आणला.जिंजी वरून राजाराम महाराज परत येताना ह्या गडावर वास्तव्यास होते.अठराव्या शतकात ई.स १८४४ साली कोल्हापूर संस्थानात झालेल्या बंडात ह्या गडावरील शिबंदीने भाग घेतलेला त्यावेळी बाबाजी आयरेकर नावाच्या गडकऱ्याने पराक्रम केला.त्याला सुभान निकम व त्याच्या ३०० साथीदारांची उत्तम साथ लाभली.इंग्रजांनी ह्या वेळेस खूप तोफांचा भडीमार केल्याने किल्ल्याचा मुख्य दरवाजा व तटबंदी जमीनदोस्त झालेली होती .
इतिहास सौजन्य – ट्रेक मध्ये सांगितलेली माहिती व www .trekshitiz.com हे संकेत स्थळ.





















Mast re
LikeLike
Maja ali mahiti vachun
LikeLike
Mi Swapnil more
LikeLike
Dhanyawad
LikeLike
Dhanyawad
LikeLike
छान माहिती दिली आहेस…
LikeLike
Dhanyawad
LikeLike
छान लिहिले,शुभेच्छा💐💐💐
LikeLike
superbbbbbb
LikeLike
Thanks
LikeLike