असो ते मी सांगेलच पुढे थंडीने काय झाले ते. रात्री १०.३० वाजता डोंबिवली हुन प्रस्थान केले ते पहिल्या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाकडे म्हणजे पिंपळा किल्ल्याच्या पायथ्याच्या गावी.पिंपळा किल्ल्याचे पायथ्याचे गाव म्हणजे मळगाव बुद्रुक, पिंपळा गावापासून किल्ला लांब आहे.पहाटे ४.३० ला आम्ही पोहोचल्यावर सकाळी ६.३० पर्यंत बसमधून बाहेर पडायची कोणाची पण हिम्मत नाही झाली इतकी थंडी होती. शेवटी ६.३० ला उजाडल्यावर आजूबाजूच्या छोट्या काड्या , लाकडं आणि चाऱ्याच्या साहाय्याने ड्राइवर ने शेकोटी पेटवली तेव्हा कुठे बरे वाटले. नाश्ता व इतर सोपास्कार आटपून साधारण ८ च्या सुमारास पिंपळा किल्ल्याकडे आम्ही सर्व निघालो.गावातून चालत जाताना सूर्यफूल व कांद्याची शेते दिसली.सूर्यफूल इतके सुंदर आणि टवटवीत दिसत होते कि ते पाहून मन प्रसन्न झाले.गावात किल्ल्याला जाण्याच्या मार्गावर एक धारण लागते तिथूनच डावीकडे जाणारी वाट किल्ल्यावर घेऊन जाते.डावीकडे वळल्यावर सरळ थोडासा चढ लागतो ज्यावर खूप मोठे दगड आहेत .साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण एक डोंगर पार करून पठारावर येतो.जो डोंगर आपल्याला समोर दिसत असतो त्याच डोंगराच्या मागे पिंपळा किल्ला आहे.पठारावर पोहोचल्यावर आपल्याला पिंपळा दृष्टीक्षेपात येतो.
कांद्याची शेती
पठारावरून दिसणारा पिंपळा
पठार चढून छोटेसे टेकाड पार केल्यावर पिंपळा हा त्याच्या कातळटोपीसकट एकदम जवळ दिसू लागतो. इथूनपुढे थोडी कसोटी असते कारण वाट सोपी असली तरी घसरडी आणि वळणावळणाची असल्याने थोडा वेळ लागतो.मी चढताना सांभाळूनच चढलो कारण नुसते चढायचे नव्हते तर वाऱ्याचा झोत सुद्धा अंगावर घेत चढायचे होते.ह्या ठिकाणी आणि किल्ल्यावर मी त्याचा वेग अनुभवला त्याला काही तोड नाही.खूप थंडगार पण तितकाच बोचरा असा हा अनुभव होता.घसरडे चढ चढल्यावर उजव्या बाजूला वळल्यावर समोर साल्हेर हा त्याच्या टोकामुळे सहज ओळखता आला.इथून सरळ गेल्यावर आपण किल्ल्याच्या मोठ्या नेढ्यापाशी पोहोचतो जे महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेढे आहे.नेढ्याच्या खाली दोन पाण्याची टाकी लागतात. टाकी बघून नेढ्याच्या मधोमध उभा राहिलो पण खरं सांगतो २० सेकंदापेक्षा जास्त उभे राहवेना इतका वारा होता कशीतरी फोटोसाठी पोझ देऊन फोटो काढला आणि नेढ्यातून खाली उतरून कट्टयावर बसलो.
पिंपळा वरून दिसणारा साल्हेर
पाण्याची टाकी
नेढे
इथून पुढे किल्ल्याला नेढ्या पर्यंत वळसा घालता येतो पण त्या साठी सांभाळून जावे लागते.नेढ्याच्या मागील बाजूस प्लास्टर करून देवीचे चित्र रंगवले आहे व त्या मागे एक शिलालेख आहे. हे सर्व पाहून आल्या मार्गाने पुन्हा नेढ्याजवळ यावे.परंतु पुन्हा सांगतो मागच्या बाजूस जाताना काळजी घ्यावी वाट ढासळलेली आणि छोटी आहे उगाच उत्साह जास्त न केलेला बरा.नेढ्यात आल्यावर डाव्याबाजूला किल्ल्याच्या गडमाथ्यावर जाण्यासाठी वाट आहे जिचे सुरुवातिचे दगड थोडे ढासळले आहेत पण व्यवस्थित चढता येते. चढल्यावर आपण माथ्यावर पोहोचतो जिथे आणखी ३ पाण्याची मोठी टाकी आहेत.हे पाहून पुन्हा खाली येऊन आपली गडफेरी संपते.
पिंपळा किल्ल्यासंदर्भातल्या नेढ्याचा व त्यात वाहणाऱ्या वाऱ्याचा छोटा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा (इअरफोन्स अथवा हेडफोन्स चा वापर करा).
शिलालेख
गडमाथ्यावरील ३ रेखीव टाकी
पिंपळा किल्ल्याची गारेगार सफर करून दिवसातल्या दुसऱ्या किल्ल्याकडे म्हणजे भिलाईकडे आम्ही निघालो.भिलाई हा दगडी साकोडे ह्या गावाजवळ आहे.परंतु ह्या गावाच्या आधी साखरपाडा खिंड आपल्याला लागते त्या खिंडीच्या बरोबर उजव्या बाजूच्या डोंगरावर भिलाई किल्ला आहे.किल्ला पिंपळा सारख्याच कातळटोपीमुळे ओळखू येतो.खिंडीत पोहोचल्यावर उजव्याबाजूच्या उतरत्या डोंगरसोंडेवरुन किल्ला चढायला सुरुवात करावी. प्रथम छोटी चढाई केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची कि कायम डाव्या बाजूने चढावे उजव्या बाजूला किल्ल्याला वाट नाही आहे. माझ्या मते पहिल्यांदा जाणाऱ्यांनी वाटाड्या घ्यावा कारण ह्या किल्ल्यावरील सप्तशृंगी देवीच्या गुहेतील मंदिरामुळे उत्सवामध्ये गावकऱ्यांची ये जा असते. डावीकडून चढत चढत किल्ल्याच्या खाली असणाऱ्या पठारावरील मोठ्या झाडाच्या आश्रयाखाली जेवून घेतले.जेवल्यावर सरळ चढायला सुरुवात केल्यावर किल्ल्याच्या कातळटोपीवर जाण्यासाठी दगड रचून ठेवलेले दिसतात ते सावकाश चढून आपल्याला दोन वाटा दिसतात एक पुन्हा दगडांचीच वाट अथवा छोटी निमुळती पायवाट.दोन्ही वाटांवर खूप घसारा आहे त्यामुळे दोराची गरज नसली तरी मी मुद्दाम सांगेल जपवून जावे ,हवे तर सरळ खाली बसून जावे जर पायवाटेने जाणार असाल तर अथवा दुसऱ्या वाटेसाठी एकमेकांच्या मदतीने जावे.पायवाटेने गेल्यावर आपण कातळटोपीच्या खाली असणाऱ्या गुहेच्या खाली पोहोचतो जिथे पाण्याची मोठी २ टाकी लागतात.
पाण्याची टाकी
भिलाई
हे पाहून पुन्हा घसरड्या वाटेने आपण गुहांपाशी पोहोचतो परंतु मी तेथे गेलो नाही कारण मला वाट खूपच घसरडी वाटली.ह्याच गुहेतून पुन्हा घसरड्या वाटेनेच गडमाथा गाठता येतो परंतु येथेही जपून जावे कारण मी ट्रेक मधल्या सराईत ट्रेकर्स ना पण येथून उतरायला ३० ते ३५ मिनिटे घेतलेली पाहिली आहेत.गडमाथा छोटा आहे व माथ्यावर भगवा झेंडा लावला आहे.
सप्तश्रुंगी मातेची मूर्ती भिलाई
क्रमशः
गडांच्या इतिहासाबद्दल – हे दोन्ही किल्ले ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये सध्यातरी मूक अवस्थेत आहेत.परंतु ह्या दोन्ही किल्ल्यांचे ठिकाण आणि अवाका पाहता हे किल्ले टेहळणीचे असावेत ह्यात दुमत नाही.त्यामुळे तूर्तास आपल्याला एवढ्याच माहितीवर समाधान मानावे लागेल.










छान
LikeLike
Thanks
LikeLike
मस्त
LikeLike
धन्यवाद..
LikeLike
सुरेख…
LikeLike
छान…
LikeLike