नाशिक -आडवाटेवरील किल्ले भाग – २ (Nashik Unknown Route FortsTrek Part-2)

भिलाईच्या वेगळ्या घसरड्या अनुभवानंतर आम्ही थकलेले सर्व जीव पुन्हा अंगात त्राण आणून निघालो दिवसातल्या शेवटच्या किल्ल्याकडे म्हणजे प्रेमगिरी किल्ल्याकडे.प्रेमगिरी साठी कळवण गावापासून ५ किलोमीटर वर असणारे एकलहरे गाव गाठायचे. पेमगिरी आणि प्रेमगिरी हे दोन्हीही वेगळे किल्ले आहेत ह्याची नोंद घ्यावी.संध्याकाळच्या ५.१५ वाजता आम्ही आशेने हा किल्ला चढून अंधारातच खाली उतरावे लागेल ह्या तयारीनेच निघालो.परंतु आमचे दुर्दैव असे कि ह्या किल्ल्यावर जायला दोन वाटा आहे पैकी एक वाट गावाच्या मुख्य रस्त्यावरून आत जाऊन डावीकडे वळून सरळ खडा चढ  चढून जावी लागते (ज्या वाटेने  आम्ही गेलो) आणि दुसरी वाट सोपी अशी थोडी फिरून रस्त्याच्या बाजूंची शेतं पार करून  तिथून सरळ जायचे व डावीकडे वळायचे .कृपया करून सरळ खडा चढ असलेल्या वाटेने जाऊ नये हि वाट घसरडी आणि खडतर आहे.दुसऱ्या वाटेने जावे जी शेतं पार करून जाता येते.जाताना वाटाड्या जरूर घ्यावा.मी ७५% वाट पार केलेली मात्र नंतर आमच्या लीडर नेच निर्णय घेतला कि सर्वांनी परत मागे फिरायचे  कारण चढ हा खडा होता आणि तिथून पुन्हा अंधारातून मागे येणे त्रासदायक झाले असते.नाईलाजाने आम्हाला परत फिरावे लागले , आमच्यापैकी फक्त ४ जण पुढे गेली आणि त्यांना अंधारातून काट्या कुड्यातून वाट काढून येईपर्यंत ८ वाजले.

                                                                          प्रेमगिरी    
परंतु उपलब्ध जी माहिती मला आमच्या चौघा  मित्रांकडून मिळाली त्यावरून व त्यांनी काढलेल्या फोटोज वरून  किल्ल्यावर सुरेख पाण्याची टाकी आणि हनुमान मंदिर आहे.ह्या मंदिरात गावकऱ्यांची ये जा असल्याने मी आधी म्हणालो तसे दुसरी वाट सोपी आणि मळलेली आहे.गडावर पाण्याच्या टाक्या व मंदिराशिवाय इतर अवशेष नाहीत.दुसऱ्या वाटेने किल्ल्यावर जाताना कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात.

                                                                हनुमान मंदिर

                                                                  हनुमान मंदिर

प्रेमगिरी बघू न शकल्याने वाईट तर वाटले पण तो निर्णय पण योग्य होता.रात्री ९ च्या सुमारास मुक्कामाच्या चौल्हेर  किल्ल्याच्या पायथ्याच्या गावी वाडी चौल्हेर ला पोहोचलो.जेवून साधारण १०.३० ला झोपून सकाळी ६ वाजता कडकडत्या थंडीत उठून तयारी करून सकाळी ८ च्या सुमारास शेवटचा किल्ला चौल्हेर कडे निघालो. आदल्या रात्री ३ अंश सेल्सिअस तापमानामुळे sleeping बॅग, त्यावर गोधडी , कानावर कॅप घालून पण काही उपयोग नाही झाला एवढी थंडी होती.
असो,चौल्हेरकडे पाहिल्यावर शेवटपर्यंत आपल्याला दरवाजा कुठे आहे ते दिसत नाही. ह्या किल्ल्याच्या सर्वोच्च टोकापर्यंत जाता  येते . मळ्याच्या मागून किल्ल्यासाठी वाट आहे .वाट तशी सोपी आहे, पण तरीही प्रथम जात असताना  वाटाड्या घेऊन जावे.वाटेत प्रथम आपण छोट्या  डोंगराला वळसा घालून मुख्य किल्ल्या खालच्या टेकाडापाशी पोहोचतो.इथून पुढे सरळ चढत जायचे , वाटेत चिंचेचे झाड लागते .इथून पुढे थोडे सरळ चालून मग डोंगर डावीकडे ठेवून उजवीकडे चालत राहायचे , वाटेत पुन्हा घसारा लागला हो हा चौथा किल्ला  ट्रेकचा आणि त्यावर पण मला घसारा लागला.खर भीती पडण्यापेक्षा पण जर पाय सरकून लचकला किंवा दुखावला जाण्याची जास्त भीती होती.असो साधारण २० मिनिटात आपण रेलिंग लावलेल्या ठिकाणी पोहोचतो.इथून सरळ चालत गेल्यावर शेवटी कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि देखणा दरवाजा दिसल्यावर जो काय आनंद झाला तो मी नमूद नाही करू शकत.

                                                     पायथ्यापासून दिसणारा चौल्हेर

                                                                कातळातील पायऱ्या

                                                                 पहिला दरवाजा
पहिला दरवाजा पार केल्यावर परत पायऱ्या लागतात आणि दुसरा दरवाजा लागतो.दुसऱ्या दरवाज्या नंतर डावीकडे काटकोनात  वळावे मग तिसरा दरवाजा लागतो तिथून पुन्हा काटकोनातच उजवीकडे वळाल्यावर चौथा दरवाजा लागतो. ह्या किल्ल्याचे चारही दरवाजे अत्यंत चांगल्या स्थितीत आहे.मी मुद्दाम चौघांचेहि फोटो देत आहेत.

                                                                   दुसरा दरवाजा

                                                                 तिसरा दरवाजा

                                                                    चौथा दरवाजा
चौथ्या  दरवाजातून आत आल्यावर डाव्या बाजूला प्रथम जावे.डाव्या  बाजूने पायऱ्यांच्या साहाय्याने वर गेल्यावर समोर किल्ल्याचे छोटे पठार लागते आणि डाव्या बाजूला नंदी आणि पिंड ठेवली आहे .नंदीच्या जवळून खाली बघितल्यास पाण्याचे मोठे टाके दिसते.हे पाहून पठारावर यावे . पठारावरून सरळ टोकाच्या दिशेने चालत गेल्यावर वाटेत दोन मोठी पाण्याची टाकी लागतात .हि पाहून सरळ टोकाला बुरुजावर जायचे.बुरुजावरून सभोवतालचा विलोभनीय परिसर दिसतो. 
हे सर्व पाहून पून्हा मागे येऊन चौथ्या दरवाजाजवळ यायचे व समोर असलेल्या कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या  साहाय्याने गडमाथा गाठायचा अर्थात पायऱ्या चढून आपण कातळटोपीच्या खालीच असतो.येथून प्रथम डावीकडे जावे तिथे पत्र्याची शेड लागते येथे एका साधूचे वास्तव्य आहे असे कळले.तिथून पुढे सिमेंट चे चौरंगीनाथाचें मंदिर बांधले आहे , मंदिरात पाषाणाची चौरंगीनाथांची मूर्ती आहे.इथून पुढे वळसा घातल्यावर लांबलचक पाण्याचे कोरडे टाके लागते ज्यात सध्या मोठी दगडं पडली आहेत.इथूनपण  किल्ल्याचा सर्वोच्च माथा गाठता येतो परंतु वाट घसाऱ्याची आणि कठीण आहे. त्यामुळे पुन्हा पत्र्याच्या शेड जवळ येऊन सरळ चालत जायचे आणि उजव्या बाजूला म्हणजे विरुद्ध बाजूला वळायचे जिथे  प्रथम खांब टाके लागते ज्याला मोती टाके म्हणतात.इथून पुढे सरळ चालल्यावर  आणखी दोन टाकी लागतात.टाक्यांच्या पुढे पुन्हा कातळात खोदलेल्या अप्रतिम पायऱ्या लागतात ज्या चढून  माथा गाठायचा .

                                                                       मोती टाके (चौल्हेर)

                                          कातळात खोदलेल्या पायऱ्या सर्वोच्च माथा गाठण्यासाठी
पायऱ्या चढल्यावर उध्वस्त प्रवेशद्वारातून आत गेलो.येथे बहुदा नक्षीकाम असलेल्या प्रवेशद्वाराच्या खांबांचे अवशेष विखुरलेले दिसले. इथूनपुढे डाव्या बाजूला उध्वस्त वास्तूचे अवशेष आहेत. ते बघून समोरच आपल्याला चोर दरवाजा बघायला मिळतो.अजूनही काही उध्वस्त वस्तू माथ्यावर आहेत परंतु झाडींमुळे तिथे जात येत नाही.उद्धवस्त वास्तूमधून पुढे गेल्यावर पाण्याची आणखी दोन मोठी रेखीव टाकी पाहायला मिळतात. टाक्यांच्या पुढे ध्वजस्तंभ लावला आहे.येथे आपली गडफेरी पूर्ण होते .इथून खाली किल्ल्यावरील पठाराचे विहंगम दृश्य दिसते (छायाचित्र खाली पहावे). हा किल्ला फिरायला कमीत कमी दीड तास लागतो.माझी सर्वाना विनंती आहे वेळ काढून हा किल्ला बघा घाईने फिरण्याचा हा किल्ला नाही .

                                           \’          गडमाथ्यावरील उध्वस्त वास्तूचे अवशेष

                                                                         चोर वाटा

                                                                        पाण्याची टाकी

                                   सर्वोच्च माथ्यवरून दिसणारा किल्ल्यावरील पठार आणि त्यावरील पाण्याची टाकी

गडांच्या इतिहासाबद्दल –

प्रेमगिरी  आणि चौल्हेर ह्या दोन्ही किल्ल्याबद्दल विशेष माहिती सापडत नाही.भिलाई हा तर नक्कीच टेहळणीचा किल्ला असावा परंतु चौल्हेर हा बहुदा ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असावा असे वाटते.
मी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतोय , माहिती मिळाल्यावर नक्की समोर आणेन.परंतु तूर्तास तरी हे दोन्ही किल्ले इतिहासाबाबतीत मौन बाळगून आहेत.  

      

One thought on “नाशिक -आडवाटेवरील किल्ले भाग – २ (Nashik Unknown Route FortsTrek Part-2)

Leave a reply to Balkrishna Shinde Cancel reply