दक्षिण प्रवेशद्वार बेळगाव रेंज ट्रेक – भाग १ (South Entrance Belgaum Range Trek Part-1)

दक्षिणेचे प्रवेशद्वार नक्की कुठले ह्याची मला कल्पना नाही परंतु बेळगावचे भौगोलिक स्थान आणि तेथील आसपासच्या किल्ल्यांचे स्थान  बघता बेळगाव ला दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणायला हरकत नाही असे वाटते. बेळगाव च्या रेंज मध्ये ६ किल्ले पाहण्याचा योग आला.किल्ले अतिशय आटोपशीर परंतु पाहण्यासारखे आहेत .हे सर्व किल्ले पाहताना मी कायम महामार्गांवरच फिरलो असे वाटले कारण सर्व किल्ल्यांना जायचा मार्ग हा महामार्गांना जोडलेला होता.

असो, ठाण्याहून हुबळी एक्सप्रेस ने बेळगाव साठी संध्याकाळी ७. १५ वाजता  प्रस्थान केले आणि सकाळी ८ वाजता  बेळगाव ला पोहोचलो. नाश्ता करून ९.३० च्या सुमारास बस ने पहिला किल्ला किल्ले वल्लभगडाकडे कूच केले. बेळगावपासून अदमासे ५६ किलोमीटर वर वल्लभगड आहे.दुर्गवीर प्रतिष्ठान मोठ्या हिरीरिने हा किल्ला सांभाळत आहेत .किल्ल्यावर जाण्यासाठी जास्त पायपीट करावी लागली नाही कारण किल्ला गाडीरस्त्याने जोडलेला आहे.किल्ल्यावर पोहोचण्याआधी तटबंदी आणि बुरुज दृष्टीक्षेपात येतात.आणि प्रवेशद्वाराधी  प्रथम लागते ते गावदेवी मारगुबाईचे मंदिर.मंदिराचे बांधकाम नवीन आहे.मंदिरासमोर दीपमाळ आहे. मंदिराला वळसा घातल्यावर गडाचा मोठा बुरुज आपले स्वागत करतो बुरुजावर सध्या चुन्याने अथवा पांढऱ्या रंगाने  मावळ्यांचे वीर आवेशातील चित्र काढले आहे.बुरुजाला लागून प्रवेशद्वार आहे जे प्रथम दर्शनी दिसत नाही.हीच गोमुखी रचनेची खासियत आहे.

                                                   किल्ल्याचा प्रथमदर्शनी बुरुज

                                                                      प्रवेशद्वार व बुरुज

                                                                        प्रवेशद्वार
किल्ल्यातून आत गेल्यावर प्रथम लागते ते गडावरील हनुमान मंदिर ह्यातील मारुतीची मूर्ती वीरश्री स्वरूपात आहे .मूर्ती अत्यंत देखणी आणि काळ्या पाषाणातील आहे. ह्या मंदिराच्या बाजूलाच सामानगडावर असलेल्या भुयारासारखेच भुयार आहे जे वल्लभगडावर असलेल्या मोठ्या विहिरीजवळ जाऊन मिळते असे सांगितले
जाते.भुयारात ठराविक अंतरावर जाऊ शकतो कारण खाली अंधार व त्यात वटवाघुळांचा  वावर आहे.भुयार पाहून परत वरती यायचे आणि सरळ मार्गाने गडफेरीला सुरुवात करावी. पूर्ण गडावर तटबंदीचे पडझड झालेले अवशेष पाहायला मिळतात.त्याचबरोबर किल्ल्यावर वाड्यांचे आणि बऱ्याचश्या इमारतींच्या पाऊलखुणा दिसतात.

                                                                       भुयार

                                                         मारुतीची मूर्ती किल्ले वल्लभगड

किल्ल्याच्या टोकावर पोहोचल्यावर उजव्या बाजूला वळावे येथे किल्ल्यावरील आणखी एक मोठा बुरुज लागतो ,हा बुरुज पाहून सरळ जाण्याआधी खाली उतरावे.खाली उतरल्यावर आपल्याला मोठी गुहा लागते जेथे शंकराची पिंड ठेवली आहे ज्याला सिद्धेश्वर देवालय असे म्हणतात .ह्या गुहेत पण वटवाघुळांचा वावर आहे. गुहा पाहून वर यायचे, वर आल्यावर पुरातन शिवकाळातील शंकराचे मंदिर पाहायला मिळते. मंदिर पाहून सरळ चालत जायचे व मध्यभागी गेल्यावर किल्ल्यावरील सर्वात मोठी विहीर लागते जिचा वरती मी उल्लेख केला आहे.हि विहीर पाहिल्यावर सामानगडाची आठवण आली. अश्याच आणखी २ ते ३ छोट्या विहिरी गडावर आहे .विहीर पाहिल्यावर उजवीकडे वळल्यावर पाण्याचे टाके लागते .ह्या पाण्याच्या टाक्यासमोर  किल्ल्यावरील प्रथमदर्शनी बुरुजावर भगवा फडकवलेला दिसतो आणि  मुख्य प्रवेशद्वार दिसते. येथे आपली गडफेरी पूर्ण होते.

                                                                शिव मंदिर

                                                                   सिद्धेश्वर देवालय

                                                                          विहीर
वल्लभगडाच्या अप्रतिम सफरीनंतर आम्ही थेट निघालो होन्नूर किल्ल्याकडे.सुंदर अश्या हिडकर डॅम च्या पुढ्यात होन्नूर किल्ला आम्हाला दिसला.हा पूर्ण किल्ला लाल माती आणि दगडांनी बांधला गेला आहे.हिडकर डॅमच्या कार्यालयापर्यंत जाणाऱ्या गाडी रस्त्याने होन्नूर किल्ल्याला पोहोचता येते.डॅम च्या समोरच रस्त्याने १० मिनिटात गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. प्रवेशद्वार गोमुखी , परंतु  उध्वस्थ अवस्थेत आहे.प्रवेशद्वाराच्या बाजूला २ भक्कम बुरुज आहेत.पूर्ण किल्ला तटबंदीला फेरा मारून बघावा कारण किल्ल्यावर बाकी अवशेष नाही. एक बुजलेले टाके पाहावयास मिळते. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज बऱ्यापैकी शाबूत आहेत.हिडकर डॅमच्या परिसरात भरपूर पक्षी पाहायला मिळतात  जसे वेडा राघू , भारद्वाज , इत्यादी.

                                                                       होन्नूर किल्ला

                                                                    उद्धवस्त प्रवेशद्वार
होन्नूर किल्ल्या नंतर हिडकर डॅम च्या सानिध्यात झाडाखाली आम्ही जेवण उरकून दिवसातला तिसऱ्या किल्ल्याकडे म्हणजे काकती किल्ल्याकडे निघालो.होन्नूरहुन काकती ४० किलोमीटर अंतरावर आहे.गावातल्या दुतर्फा घरांच्या बाजूला असणाऱ्या रस्त्याने आपण काकती किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो.किल्ल्यावर जायला व्यवस्थित  सिमेंटच्या पायऱ्या आहेत.किल्ल्यावर खरे तर काहीतरी विशेष प्रकल्प राबवण्याचा येथील प्रशासनाचा हेतू होता असे वाटते, कारण किल्ल्यावर मागच्या बाजूस पवनचक्क्या, तसेच खांब दिवे बसवलेले आहेत.  किल्ला पाहायला आटोपशीर आहे. दोन मोठे बुरुज आणि तुरळक तटबंदीशिवाय किल्ल्यावर काहीही पाहायला मिळत नाही.दोन्ही बुरुज दगडांवर दगड रचून बांधण्यात आले आहेत.किल्ल्यावर वाढलेल्या झाडीमुळे बाकी काहीहि पाहता येत नाही. 

                                                       काकती किल्ल्यावरील बुरुज तटबंदीसह

                                               बुरुज बांधताना  दगडांवर दगड रचलेली योजना

काकती किल्ला पाहायला २० मिनिटे पुरतात
(क्रमशः:)

गडांच्या इतिहासाबद्दल-

वल्लभगड- वल्लभगडा च्या बांधणीचे श्रेय जाते शिलाहार राजा भोज दुसरा ह्याच्याकडे. शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये हा किल्ला स्वराज्यात आणला.व त्या नंतर शाहू महाराजांनी ह्या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. हा किल्ला १६८८ साली मोगलांच्या ताब्यात गेलेला.मात्र मराठयांनी पुन्हा १७०१ साली किल्ला ताब्यात घेतला.पुढे दोन गाद्या  झाल्यावर ह्या किल्ल्याचे अधिकार करवीरकर छत्रपतींकडे राहिले. करवीरकरांनी हा किल्ला तसेच भीमगड,पारगड,कलानिधीगड हे सर्व किल्ले सदाशिवराव भाऊंना जहागीर म्हणून १४ मे १७५३ साली दिल्याची पेशवे शकावलीत नोंद आहे.सदाशिव भाऊंचे व बहुदा नानासाहेबांचे पण पाय  ह्या गडाला लागले आहेत.

होन्नूर चा किल्ला – नानासाहेब पेशव्याच्या काळात बऱ्याचदा दक्षिण स्वाऱ्या झाल्या मग त्या कोणा मोठ्या शत्रूचा बंदोबस्त असो अथवा महसूल वसुलीसाठी असो. त्यापैकीच एका दक्षिण मोहिमेत पेशव्यांच्या शकावलीत असलेल्या नोंदीप्रमाणे \”२० मार्च १७५३ ला श्रीरंगपट्टणाहून कूच करून फाल्गुन वद्य १ मंगळवार रोजी होळी हुन्नर किल्ला मोर्चे बसवून सर केला.व पुढे धारवाड केला सर करून कर्नाटकचे उर्वरित काम करून श्रीमंत पावसाळ्यात पुण्यात आले\”. होळी हुन्नर म्हणजेच हा होन्नूरचा किल्ला.

काकतीचा किल्ला-    काकतीच्या किल्याबद्ल इतिहास मौन बाळगून आहे बहुदा हा किल्ला भोगोलिक परिस्थिती बघता टेहळणीसाठी वापरात असावा.

इतिहास माहिती सौजन्य  –   वल्लभगडावरील इतिहास माहितीदर्शक फलक व सकलराजकार्यधुरंधर सदाशिव भाऊ- कौस्तुभ कस्तुरे ,राफ्टर पब्लिकेशन्स.           

8 thoughts on “दक्षिण प्रवेशद्वार बेळगाव रेंज ट्रेक – भाग १ (South Entrance Belgaum Range Trek Part-1)

Leave a reply to Meghan Petkar Cancel reply