दक्षिण प्रवेशद्वार बेळगाव रेंज ट्रेक – भाग ३ ((South Entrance Belgaum Range Trek Part-3)

बेळगावातील मध्यवर्ती भागातील जुन्या हनुमान मंदिराच्या बाजूला असणाऱ्या दुमजली इमारतीत  मुक्काम करून दुसऱ्यादिवशी आम्ही सडा किल्ला पाहायला निघालो.ज्या मंदिरात मुक्काम केला ते मंदिर संपूर्णतः लाकडी व बघण्यासारखे आहे . मंदिरातील मारुतीची मूर्ती  पण सुंदर आहे.असो सकाळी ८.३० च्या सुमारास बेळगाव वरून सडा किल्ल्यास जायला प्रस्थान केले.सडा किल्ला बेळगाव पासून ५९ किलोमीटर अंतरावर आहे.किल्ल्याकडे जाताना लालबुंद मातीतील कच्या रस्त्याने  प्रवास होतो. किल्ल्याकडील पायथ्याचे गाव खूप छोटे आहे आणि गावातील घरे पाहून कोकणाची आठवण येते.

                                          मुक्काम केलेल्या परिसरातील हनुमान मंदिर
गावात शिरल्यावर समोर घराच्या बाजूने पायऱ्यांच्या साहाय्याने किल्ल्यावर पोहोचायला मोजून १० मिनिटे लागतात.खरे तर मला वाटते हा किल्ला गावाच्या सरहद्दीपर्यंत पसरलेला असावा परंतु काळाच्या ओघात येथे वस्ती झाली असावी.पायऱ्या चढल्यावर वाटेत पडका बुरुज लागतो.बुरुज पाहून सरळ पुढे गेल्यावर किल्ल्यावरील एकमेव वाडा लागतो.वाडा बऱ्यापैकी मोठा आहे.

                                                                पायऱ्यांचा मार्ग

                                                                               बुरुज

                                                                              वाडा

                                                                 वाड्याचा अंतर्भाग

वाड्याच्या खालची बाजू हि महाराष्ट्र सीमेकडे जाते पण तिथे न जाता उजव्या बाजूला जावे.ह्या किल्ल्यावर झाडीचे प्रचंड साम्राज्य असल्याने काळजी घ्यावी.चालत गेल्यावर तुटक पायऱ्या व दगडांच्या साहाय्याने उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण आत शिरतो. दरवाजाच्या बाजूला तटबंदी  व पहारेकऱ्यांच्या देवड्या सुद्धा आहेत .दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या बाजूला कमान लागते ह्या कमानीतून खालील गाव व आजूबाजूचा संपूर्ण प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.टेहळणीसाठीचीच बहुदा हि खिडकी असावी. कमान  पाहून उजव्या  बाजूला वळावे व सावकाश चिंचोळ्या मार्गाने दगडावर चालून किल्ल्यावरील बुरुजावर जाता  येते.बुरुजाच्या आजूबाजूला तटबंदी आहे परंतु झाडीमुळे ती दिसत नाही.बुरुजावर तोफ  ठेवली आहे.

                                                                         प्रवेशद्वार

                                                               टेहळणी कमान

बुरुज 

                                                                       देवड्या
बुरुजावरून सुंदर परिसराचा आस्वाद घेऊन मी खाली उतरलो आणि परतीच्या मार्गी लागलो.ह्या किल्ल्यावर एक विहीर पण  आहे परंतु खूप झाडी असल्या कारणाने बघता आली नाही.मात्र हि विहीर पाहताना वाटेत एक गमतीशीर गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे हि वाट जेथून सुरु होते तिथूनच्या उजव्या बाजूचा भाग हा महाराष्ट्रात मोडतो व डावीकडचा भाग कर्नाटकात. हे सुचवणारा सिमेंटचा खांब लावलेला आहे.अशा प्रकारे आल्या वाटेने पुन्हा किल्ल्याच्या माळरानावर आलो येथे सुद्धा एक पडका  बुरुज पाहायला मिळाला.

                                                          सीमांचे माहिती दर्शक खांब

किल्ला पाहून झाल्यावर गावाच्या सुरुवातीलाच एका घरासमोर पुरातन चावीच्या आकाराची  विहीर पाहायला मिळते.अशीच एक विहीर बदलापूर जवळील देवळाली गावात आहे. विहिरीत उतरायला १८ पायऱ्या आहेत.ह्या विहिरीला ठराविक अंतरावरती कमानी आहेत.विहीर अत्यंत रेखीव आहे आणि दोन स्तरावर विभागली गेली आहे .विहीर पाहून दुपारच्या सुमारास आम्ही बेळगावास परत निघालो ट्रेक मधला शेवटचा किल्ला पाहण्यासाठी अर्थात बेळगाव चा किल्ला पाहण्यासाठी.

                                         सडा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली पुरातन विहीर

संध्याकाळी ४ च्या सुमारास आम्ही बेळगावला पोहोचलो.बेळगावचा किल्ला हा भुईकोट प्रकारात मोडतो.किल्ला सध्या मिलिटरी च्या अखत्यारीत येत असल्याने अत्यंत सुस्थितीत आहे. ह्या किल्ल्याच्या पण बाहेर भुई किल्ल्यांच्या शिरस्त्याप्रमाणे खंदक खोदले आहे.त्या पुढे सरकारी कचेऱ्या व अंबाबाई आणि गणपती मंदिरआहे.   पुढे कमानी  सदृश्य प्रवेशद्वार आहे.किल्ल्यात छायाचित्रणाला बंदी आहे.किल्ल्यात शिरल्यावर बऱ्याचश्या वास्तू ह्या नष्ट झाल्या आहेत.किल्ल्यात  लष्कराचे भरती केंद्र आहे व मोठे मैदान सुद्धा आहे. मैदानापासून सरळ व नंतर उजवीकडे वळल्यावर किल्ल्याची तटबंदी थोडीफार दिसते ह्याच परिसरात किल्ल्यावरचा बुरुज  आहे परंतु वेळेअभावी मला तिथे जात आले नाही . पण सध्यातरी किल्ल्यात असणारे मुख्य  आकर्षण म्हणजे १२ व्या शतकातील जुनी  जैन मंदिरे आणि हिंदू मंदिरे ह्याला \’कमल बसदी\’ म्हणतात.आता ती कशी आहेत काय आहेत हे मी काही वर्णन करत नाही नुसती छायाचित्र पाहूनच तुम्हाला अंदाज येईल आणि त्या काळातल्या कलाकारांना कुर्निसात करावासा वाटेल.एवढेच सांगेल कि ह्यातील एका मंदिरातले दगडी झुंबर म्हणजे स्थापत्य कलेचा अत्यंत सुंदर असा नमुना आहे.

                                                                 किल्ल्याचे प्रवेशद्वार

                                                                      कमल बसदी

                                                                               झुंबर

                                
दुर्दैवाने वेळेअभावी आम्हाला अजून काही अवशेष आहेत का शोधून पाहायचे होते परंतु मिलिटरीचे सुद्धा बंधन असल्याने मुख्य भाग बघून किल्ल्यातून बाहेर आलो आणि समाधानी मनाने बेळगाव स्टेशन गाठुन  परतीचा प्रवास सुरु केला. 
किल्ल्यांच्या इतिहासाबद्दल-
सडा किल्ला- सध्यातरी सडा किल्ला हा चोर्लाघाटावर व कर्नाटक गोवा सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी होता इतकेच आपण भोगोलिक परिस्थितीनुसार म्हणू शकतो.परंतु किल्ल्यावरील वास्तू आणि आवाका बघता इतिहासाच्या पानांना जर नवसंजीवनी मिळाली तर कदाचित आणखी माहिती प्रकाशात येऊ शकते तूर्तास तरी एवढ्या माहितीवर थांबावे लागेल.     
बेळगाव चा किल्ला- बेळगाव किल्ल्यातील \’कमलबस्ती\’ ह्या मंदिर समुहांमुळे एवढे निश्चित आहे कि हा किल्ला इ.सणाच्या १२ व्या शतकापासून अस्तित्वात आहे.मराठ्यांचा संदर्भ पाहिला तर ह्या किल्ल्याने भरपूर घटना पहिल्या आहेत. त्यातील लक्षणीय म्हणजे शिवभारतात उल्लेख केल्याप्रमाणे निजामशाही चा शेवट होत होता हे जेव्हा दिसत होते तेव्हा शहाजीराजांनी ती  पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा आदिलशाही सरदार खवासखान, रणदुल्लाखान ,मुरारपंत  सुद्धा मोघलांचा निजामशाहीवर व पर्यायाने दक्षिणेवर अंकुश बसू नये म्हणून  शहाजी राजांच्या ह्या निर्णयाशी सहमत होते परंतु शेवटी शहाजीराजे हिंदू असल्याने  त्यांच्या व खवासखानाच्या  विरोधात दुसऱ्याच एका आदिलशाही सरदाराने अर्थात मुस्तफाखानाने महंमद आदिलशाहाचे कान भरण्यास सुरुवात केली आणि हे खवासखानास कळताच त्याने मुस्तफखानास बेळगावच्या ह्या किल्ल्यातच कैद केले होते.परंतु पुढे शेवटी बादशहाने खवासखानचा भर दरबारात खून करवून मुस्तफाखानास बेळगावच्या किल्ल्यातून कैदेतून सोडवले व शहाजी राजांच्या धोरणावर वरवंटा फिरला गेला.  

दुसरा उल्लेख अजून सापडतो तो पेशव्यांच्या कर्नाटक स्वारीतला. पेशव्यांच्या शकावलीत उल्लेख असल्याप्रमाणे दिनांक १ जानेवारी १७५७ साली श्रीमंत नानासाहेब पेशवे व भाऊसाहेब श्रीरंगपट्टणच्या स्वारीस निघाले.व हि स्वारी यशस्वी करून तहात ३६ लक्ष देण्याचे कबुल करून श्रीमंत मे च्या मध्यामध्ये पुन्हा पुण्यास येण्यास निघाले. परत येताना नवाब सावनूरकराला तहात बेळगावचा किल्ला दिला होता परंतु तो सध्या युसूफ बेग नावाच्या किल्लेदाराकडे होता तो त्याजकडून दिनांक ३ मे १६५७ साली हस्तगत करून त्याचा बंदोबस्त करून ठरवल्याप्रमाणे सावनूरकरास देऊन श्रीमंत पुण्यास परतले.बेळगावचा हा भुईकोट असा बऱ्याच ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. जसे आपल्यासमोर ससंदर्भ इतिहास येईल तसे आपल्याला ह्या घटना आणखी स्पष्ट रित्या समजून घेता येतील.  

ऐतिहासिक संदर्भ- कवी परमानंदकृत शिवभारत आणि कौस्तुभ कस्तुरे लिखित सकलराजकार्यधुरंधर सदाशिव भाऊ -राफ्टर पब्लिकेशन्स. 
   
   

2 thoughts on “दक्षिण प्रवेशद्वार बेळगाव रेंज ट्रेक – भाग ३ ((South Entrance Belgaum Range Trek Part-3)

Leave a comment