इंद्राई किल्ला पायथ्यापासून
कातळात खोदलेल्या पायऱ्या
ह्या पायऱ्या चढल्यावर डाव्या बाजूला वळायचे इथे पण आपल्याला साधारण १०० पायऱ्या चालून किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या बाजूला राजधेर किल्ल्यावर असलेल्या शिलालेखासारखाच आणि जवळपास त्याच मजकुराचा फार्सी शिलालेख कोरला आहे.किल्ल्यात प्रवेश केल्यावर बाजूलाच कातळात खोदलेल्या २ गुहा लागतात ह्या पाहून वर जावे, वर जाताना मला वाटेत गायीचे सांगाडे दिसले ह्या वरून ह्या किल्ल्यावर जनावरांचा वावर आहे हे निश्चित आहे म्हणूनच मामा सुद्धा ह्या किल्ल्यावर आम्ही कोणालापण राहायला सांगत नाही असे म्हणाले.पुढे सरळ चालत गेल्यावर काही तुटलेली शिल्प पाहायला मिळाली त्यातली काही शिल्प हि रेखीव होती. ह्या शिल्पांच्या पुढे एक बुजलेले टाके आणि एक उध्वस्त वास्तू पाहायला मिळते.
प्रवेशद्वाराआधीच्या पायऱ्या
फार्सी शिलालेख
शिल्पांचे अवशेष
हे पाहून सरळ चालत राहिल्यावर वाटेत गडाचा माथा गाठण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात, येथून वर जाऊन पुन्हा खाली यायचे आणि सरळ चालत गेल्यावर एक १८-२० गुहांची रांग लागते गुहेचे प्रयोजन काय व कशासाठी आहे ते मात्र कळत नाही. मात्र ह्या गुहा पुरातन वाटतात आणि ह्या गुहांवरून किल्ल्यावर भरपूर वर्दळ असणार हे हि जाणवले.एका सरळ रेषेत ह्या गुहा सुंदर रित्या कोरल्या आहेत.ह्या गुहा पाहून पुढे गेल्यावर पुरातन हेमाडपंती खांबाचे महादेवाचे मंदिर लागते . महादेवाच्या मंदिरासमोर नंदी आहे आणि नंदीच्या समोर बांधीव दगडी तलाव आहे.येथून मामांनी आम्हाला किल्ल्याला वळसा घालून नेले . अर्थात आल्या वाटेने पण मागे येता येते परंतु मामांनी आज चंगच बांधलेला किल्ल्याचा एक एक अंश आम्हाला दाखवण्याचा. वाट सरळ चालत जाण्याचीच होती परंतु तरीही माझ्या मते बरोबर वाटाड्या असावा.
गुहा
गुहा
महादेव मंदिर व तलाव
मंदिरातील खांब
महादेव मंदिर पाहून मामांच्या मागे आम्ही शेवटची आगळी वेगळी किल्ल्यावरची वाट पाहण्यासाठी चालू लागलो.वाटेत एका सरळ रांगेत दगडांना असंख्य छिद्र खोदलेले दिसले ज्याचे प्रयोजन नाही समजले.ह्या शिवाय काही अजस्त्र टाकी आणि गुहा पण वाटेत लागतात त्यातली एका लांब गुहा मामांच्या सांगण्याप्रमाणे ते त्या कालचे कारागृह आहे असे समजले परंतु त्याला काही लेखी आधार नाही आहे.आता किल्ल्याला जवळ जवळ वळसा घालून झालेला होता. पुढे एक सरळ वाट उध्वस्त प्रवेश द्वाराजवळ घेऊन जाते जीथून किल्ल्यावर प्रवेश होतो आणि दुसरी चोर वाट जी मी सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे किल्ल्याच्या पायऱ्या दिसताक्षणी लांब पाण्याची खोदीव टाकी दिसतात तिथे निघते.त्यासाठी सरळ न जाता उजवीकडून खाली उतरायचे खाली निमुळत्या वाटेत बाजूला एक पेशवेकालीन छोटे मंदिर बांधले आहे. ह्या मंदिरात त्रिशूल कोरलेली शिळा आणि भग्न अवस्थेतील मूर्ती दोन्ही शेंदूर फासून ठेवले आहे .हि वाट अवघड नाही आहे परंतु जपून जावे मंदिर पाहून खाली उतरून पुन्हा निमुळत्या वाटेने कधी बसून , कधी वाकून आपण टाक्यांजवळ उतरतो.मी मुद्दाम पुन्हा सांगेल कि हा किल्ला आपण जाधव मामांसोबतच बघा आणि ह्या चोरवाटेचा आनंद घ्या.
दुरून दिसणारी चोरवाट
चोरवाटेत लागणारे मंदिर
चोरवाटेत लागलेले छोटेसे प्रवेशद्वार
खाली आल्यावर खोदीव टाकी पाहून पुढे येऊन पुन्हा मूळ पायऱ्यांपाशी येऊन माझी गडफेरी संपली तब्बल २ ते २.३० तास हा गड आम्ही सर्व ट्रेकर्स नि मनमुराद भटकून घेतला.
चोरवाटेतुन जातानाचा माझे मित्र निनाद विलनकर ह्यांनी काढलेला छोटासा व्हीडिओ
गडाच्या इतिहासाबद्दल –
इंद्राई किल्ल्याचा प्रामुख्याने इतिहास कळतो तो किल्ल्यातील प्रवेशद्वाराच्या शिलालेखामुळे.मी ह्या ब्लॉग च्या पहिल्या भागात राजधेर किल्ल्याच्या इतिहासाच्या माहितीत शिलालेखाबद्दल लिहिलेले आहे.तेच मी पुन्हा इथे सांगेल कारण समान अर्थाचेच शिलालेख अलावर्दीखानाने इंद्राई आणि राजधेर तसेच चांदवड किल्ल्यावर पण कोरले आहेत.हा शिलालेख ४ फूट * २ इंच * २ फूट * ९ इंच ह्या मापात कोरला आहे.त्यात इंद्राई किल्ला घेल्याची तारीख १६ शव्वाल अर्थात १४ मार्च १६३६ मध्ये घेतला असे लिहिले आहे.ह्याच प्रकारचा शिलालेख धोडप किल्ल्यावर पण आहे.ह्या किल्ल्याबरोबर इतर किल्ले घेतल्याचा उल्लेख शिलालेखात आहे इतर किल्ले म्हणजे कोळधेर-राजधेर -चांदवड -रवळ्या-जावळ्या-मार्कंड्या-कण्हेरी-अहिवंत-अचला आणि रामसेज. थोडक्यात १६३६ ह्या वर्षात नाशिक व चांदवड भागातले बरेचसे किल्ले अलावर्दीखान ह्याने घेतल्याचे स्पष्ट होते.
त्याचबरोबर किल्ल्यावरील महादेवाचे मंदिर अर्थात त्याचे प्राचीनत्व सिद्ध करते. तसेच किल्ल्यावर असणाऱ्या गुहा ह्या कदाचित व्यापारी राहण्याच्या जागा सुद्धा असू शकतात.कारण इंद्राई ,राजधेर आणि चांदवड हे किल्ले उत्तरेतून दक्षिणेत येताना वाटेत लागणाऱ्या चांदवड घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी बांधले असावेत हे इथल्या भौगोलिक स्थान आणि आजुबाहुला पट्ट्यात येणाऱ्या कोळधेर,चांदवड इत्यादी किल्ल्यांच्या स्थानावरून स्पष्ट होते.शिवकाळात किल्ल्याचा उल्लेख उपलब्ध नाही त्यामुळे बहुदा हा किल्ला मुघलांकडे असावा.
इतिहास साभार – राजा शिवछत्रपती खंड १ – गजानन भास्कर मेहेंदळे पृष्ठ ५५८ तळटीप ३६३.












छान , जिज्ञासा पुर्ण करणारे लिखाण केलेत ,शुभेच्छा 💐💐
LikeLike
धन्यवाद सर
LikeLike