ऑरेंज रेंज ट्रेक भाग – ३ (अंबागड आणि सीताबर्डी किल्ला )

रामटेक किल्ल्याखालील अंबाला सरोवराजवळ फेरफटका मारून आम्ही सर्व ट्रेकर्स निघालो नागपूरमधल्या आड वाटेवर असणाऱ्या अंबागडावर .तुम्ही जर नागपूर फिरलेल्या कोणाला विचारलं कि अंबागड माहित आहे का तर बहुतांश उत्तर नाही असेच येईल.तसे ह्या गडाला पोहोचायला जाणारा रास्ता हा अंबागड ह्या गावाच्या अनवट मार्गावरून आहे आणि तसे गुगले बाबा पोहोचवतात बरोबर नकाश्यानुसार परंतु तो रस्ता किल्ल्याच्या पायथ्याशी जात नाही असा आम्हाला अनुभव आला.असो,गावात बस शिरल्यावर २६ जानेवारी असल्यामुळे छोट्या शाळांतून आणि अंगणवाडीतून प्रभातफेऱ्या निघाल्या होत्या.ते पाहून मनस्वी छान वाटले.ह्या गावात शिरल्यावर शेणाने सारवलेले  घरांतील अंगण,त्याच अंगणात गाई आणि वासरे व इतर पाळीव प्राणी छान सकाळचे कोवळे ऊन घेत आहेत असे अप्रतिम टिपिकल गावाचे रूप पाहायला मिळाले.गाव खूप स्वच्छ आणि नीटनेटके वसलेले वाटले.गावाच्या शेवटाकडे जाण्याआधी उजव्या बाजूला आत जंगलात पाईप लाईनच्या समांतर एक वाट थेट किल्ल्याकडे घेऊन जाते.गावात हनुमान मंदिरात जाणारी वाट विचारून पण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते.हनुमान मंदिराजवळ आल्यावर समोरच किल्ला चढायला पायऱ्या बांधल्या आहेत त्यामुळे किल्ल्यावर जाणे सोपे झाले आहे.पायऱ्या चढून साधारण २० मिनिटांत आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो.प्रवेशद्वार आधी दोन खंदे बुरुज आपले स्वागत करतात.किल्ला पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने चांगल्या अवस्थेत आहे.प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे आहे.प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला तीन छोट्या कमानी कोरल्या आहेत आणि वर कमळपुष कोरले आहे.प्रवेशद्वाराच्या आत शिरल्यावर पहारेकरांच्या देवड्या लागतात.देवड्यांच्याच थोड्या पुढे डाव्या बाजूने बुरुजावर जाता येते.बुरुजावर जंग्या आणि वरच्या बाजूला चर्या आहेत. 

                                                                  प्रवेशद्वाराधीचे बुरुज

                                                                         प्रवेशद्वार 

बुरुज पाहून खाली उतरायचे आणि सरळ तटबंदीच्या मार्गाने चालत राहायचे वाटेत मोठी विहीर लागते जिच्यातील पाणी खराब आहे. विहिरी पासून सरळ सुद्धा आपण चालत जाऊन किल्ल्याला फेरी मारु शकतो ह्या वाटेत ३ बुरुज तटबंदीलगत लागतात ,परंतु तसे न करता विहिरीच्या बाजूनेच एक पायवाट सरळ बालेकिल्ल्यावर घेऊन जाते त्या मार्गाने जावे.वरती आल्यावर रामटेक प्रमाणेच कमान असलेली विहिर लागते जी पूर्णपणे सुकली आहे.विहिरीच्याच पुढे सुकलेले कोठार आहे.कोठार पाहून झाडीतून वाट काढत पुढे गेल्यावर मुख्य बालेकिल्ला आणि त्यावरील उद्धवस्त महालांमध्ये आपण पोहोचतो.ह्या महालात चोरदरवाजा सुद्धा आहे.भुयाराच्या उजव्या बाजूला बुरुज आहे त्यावरील चर्या पडल्या आहेत.महाल पूर्णपणे पडीक झाला आहे.परंतु पडक्या भिंती , कमानी आणि खोल्यांचे थोडेसे अवशेष सुद्धा पूर्ण वाडा कसेल ह्याची कल्पना देतो.

                                                                       विहीर अथवा तलाव 

                                                               कमान आणि विहीर 

                                                              पडके महाल 

                                                                     पडके महाल 

                                                                     चोरदरवाजा 
वाड्याचे उध्वस्थ अवशेष पाहून खाली आलो कि उजव्या बाजूने एक पडका  दरवाजा लागतो जिथून आपण बालेकिल्ल्याच्या खाली येतो.खाली आल्यावर समोर चौकोनी बुरुज आहे त्यावर जाऊन आजूबाजूचा परिसर न्याहाळता येतो.खाली उतारण्याआधी उजव्या बाजूने कोपऱ्यातून उतरून चोरदरवाज्याने पण चौकोनी बुरुजावर जाता येते परंतु मला ते उतरल्यावर समजले. इथून पुढे तटबंदीवरुन चालत राहायचे आणि मग आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो.वाटेत डाव्या बाजूला बालेकिल्ल्याला असलेली तटबंदी दिसते आणि बालेकिल्ला पण दिसत राहतो.इथे आपली गडफेरी संपते.पायथ्यापाशीच्या हनुमान मंदिर परिसरात वानरांची खूप टोळकी असतात त्यामुळे गाडी आणली असेल तर सामान गाडीत व्यवस्थत ठेवावे.  

अंबागड सोडून आम्ही ट्रेक मधल्या शेवटच्या किल्ल्याकडे अर्थात सीताबर्डी कडे निघालो. हा किल्ला आपल्या सैन्यदलाच्या अखत्यारीत असल्याने वर्षातून ३ दिवस अर्थात २६ जानेवारी , १ मे आणि १५ ऑगस्ट ला लोकांसाठी खुला असतो.पण खरं सांगायचं झाले तर ह्या कारणामुळेच किल्ल्याला अवास्तव गर्दी असते ज्यात ईतिहासप्रेमींची संख्या कमी आणि जत्रेत फिरणाऱ्यांची संख्या जास्त असते.अतिशय धक्का बुक्की करून दुपारी ३.३० च्या सुमारास किल्ल्यात प्रवेश केला. चिंचोळ्या मार्गिकेतून आपण किल्ल्याच्या मुख्य भागाकडे जात राहतो.इथून उजवीकडे वळून पूर्ण गोलाकार वळसा घालून किल्ला फिरता येतो.परंतु वळण्याआधी डाव्या बाजूला एक मोठा स्तंभ पाहायला मिळतो त्याबद्दल माहिती काढल्यावर असे समजले कि  किंग जॉर्ज पाचवा व राणी मेरी ह्या किल्ल्यात आल्याच्या आठवणीकरिता हा स्तंभ उभारण्यात आला. 

                                                        बोगद्यासारखे प्रवेशद्वार 

इथून पुढे मी म्हंटल्याप्रमाणे उजव्या बाजूला वळून बोगद्यासारखी रचना असलेल्या प्रवेशद्वारातून आपण पायऱ्यांच्या साहाय्याने किल्ल्याच्या आत शिरतो. शिरल्यावर डाव्या बाजूला नवगज अली बाबाचा दर्गा आणि मस्जिद लागते.ह्या दर्ग्यासमोर एक इमारत लागते त्यातल्या सरळ दिशेत असणाऱ्या खोलीत महात्मा गांधींना काही काळ तुरुंगात ठेवले होते परंतु गर्दी खूप असल्याने आणि वेळेअभावी आत जाऊ शकलो नाही. ह्या इमारती पाहून सरळ गेल्यावर खंदक लागतात. हे खंदक पाहून आपण सरळ चालत राहायचं वाटेत आपल्याला एक विहीर लागते.इथून सरळ गेल्यावर सैन्याची भव्य कार्यालये तसेच त्या समोर काही छोट्या तोफा ठेवल्या आहेत. ह्या छोट्या तोफा पाहून आपण किल्ल्याच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळ येतो जिथे २०१४ साली सापडलेली अजस्त्र तोफ ठेवली आहे. तोफेवर इंग्रजी अक्षरे व्ही आणि आर अर्थात व्हिक्टोरिया राणीचे संक्षिप्त रूप कोरले असावं.किल्ल्या ह्या सैन्याने आखलेल्या मार्गानेच पाहता येत असल्याने इथे गडफेरी संपते आणि नागपूरच्या प्रसिद्ध असलेल्या संत्रा बर्फी विकत घेऊन आम्ही सर्व ट्रेकर्स नि हा नागपूरचा ऑरेंज रेंज ट्रेक सफल संपूर्ण केला. 

                                                       विहीर 

                           किल्ल्यावरील सैन्याचे  असलेले बहुदा एखादे कार्यालय 

                                                           तोफ 

                                           प्रवेशद्वारातील तोफ 

                                                     प्रवेशद्वारातील तोफ 
गडांच्या इतिहासाबद्दल –
अंबागड किल्ला –गौड राजा बुलंद ह्याचा सरदार राजखान पठाण ह्याने इसवी सण १७०० च्या सुमारास हा किल्ला उभारला . पुढे हा किल्ला नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात गेल्यावर ह्याचा वापर तुरुंगासाठी केला जाऊ लागला असे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या फलकावरून समजले.तूर्तास एवढीच माहिती ह्या किल्ल्याबद्दल कळली.अजून इतिहासात ह्या किल्ल्यावर काय घटना घडल्यात ते आता येणारा काळच सांगेल.   
सीताबर्डीचा किल्ला – शितालाप्रसाद आणि बद्रीप्रसाद हे दोन यदुवंशीय राजे ह्या किल्ल्यावर राज्य करत होते त्यामुळे ह्याला शितलाबदरी असे नाव पडले पुढे ह्याचा अपभ्रंश होऊन सीताबर्डी असे नाव पडले. हा किल्ला प्रसिद्ध आहे ते इसवी सण १८१७ मध्ये नागपूरकर मुधोजी भोसले व ईस्ट इंडिया कंपनी ह्यांच्यात झालेल्या लढाईमुळे.ह्या लढाईत भोसल्यांचा पराभव झाला. असे म्हंटले जाते कि भोसल्यांचे सैन्य इंग्रजांपेक्षा कैक पटीने जास्त असून सुद्धा किल्ल्यावर कॅप्टन फिटजेराल्ड ने विजय मिळवला . परंतु ह्या घटनेला काही कादोपत्री आधार आहे का ते बघावे लागेल. इसवी सण १८५७ मध्ये टिपू सुलतानाचा नातू नवाब कादर अली आणि त्याच्या ८ साथीदारांना ह्या किल्ल्यात फाशी देण्यात आली होती. १० एप्रिल १९२३ ते १५ मे १९२३ मध्ये महात्मा गांधींना ह्या किल्ल्यात तुरुंगवास भोगायला लाग;लागला होता.        
इतिहास साभार – ट्रेकक्षितीज संस्था वेबसाईट आणि अंबागड तसेच सीताबर्डी किल्ल्यावरील माहिती फलके.  

9 thoughts on “ऑरेंज रेंज ट्रेक भाग – ३ (अंबागड आणि सीताबर्डी किल्ला )

Leave a reply to Unknown Cancel reply