इतिहासाला बोलते करणाऱ्या साहित्यांमध्ये ऐतिहासिक दस्तावेज ,ऐतिहासिक पत्रे , वेगवेगळ्या गावातील कुलकर्णी अथवा देशपांड्यांच्या तंट्यांचे निवाडे अथवा महजर ह्यांचा समावेश होतो.अर्थात हे सर्व प्रकार कागदपत्रांच्या अथवा हस्तलिखितांच्या प्रकारात मोडतात, परंतु ह्याचबरोबर जेव्हा आपण शिलालेख , ताम्रपट तसेच विविध ऐतिहासिक वास्तू पाहतो तेव्हा त्यांचा सुद्धा ऐतिहासिक पुरावा म्हणून काही अपवाद वगळता विचार करावा लागतोच. आणि कुठल्याही राज्यव्यवस्थेचा तसेच महसुलाचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा त्यामध्ये नाणी , त्यांची परिमाणे आणि त्या संबंधी असलेल्या नोंदींचा म्हणजे चलनव्यवस्थेचा समावेश होतो.प्रस्तुत लेखात मी चलनव्यवस्थेचा भाग असलेल्या टांकसाळीबद्दल बोलणार आहे. टांकसाळ म्हणजे अशी जागा जिथे नाणी पाडली जातात.थोडक्यात कच्च्या धातूपासून (चांदी,सोने ,पंचधातू ) ते सुबक अशा रेखीव गोल नाणे तयार करण्यासाठीचा छोटेखानी कारखाना म्हणजे टांकसाळ. माझ्या पाहण्यात आलेल्या रायगड आणि चांदवड ह्या दोन टांकसाळींपैकी मी चांदवड टांकसाळीबद्दल विस्तृत पणे माहिती देणार आहे.
चांदवड अथवा चांदोर हे नाशिक पासून ६४ किलोमीटर अंतरावर असलेलं तालुक्याचे ठिकाण आहे. प्राचीन काळात नाशिक-सुरत , अथवा दिल्ली – नाशिक हा मार्ग चांदवड वरून जात असल्याने ह्या मार्गाला व्यापारी दृष्ट्या खूप महत्व होते.त्यातच गुलशनाबाद अर्थात नाशिक हे मुख्य ठिकाण इथून जवळ असल्याने भोगोलिक दृष्ट्या हा मार्ग कुठल्याही राजकीय शाही ला अत्यंत महत्वाचा होता.त्यासाठीच चांदवड चा किल्ला हा प्राचीन काळी बांधण्यात आला ज्याचा उल्लेख चंद्रादित्यपुर असाही सापडतो.चांदवड किल्ल्यावरच माचीच्या खाली चांदवड टांकसाळ आपल्याला आजही पाहायला मिळते.किल्ल्यावर ४०*३० फूट उंचीची टांकसाळीची इमारत म्हणून एका पडीत वास्तूचे अवशेष दाखवले जातात.
ह्या टांकसाळीचा जन्म पेशवाईच्या काळातच झाला असावा असे एकंदरीत ऐतिहासिक संदर्भांवरून समजते. इ.स १७५० साली मल्हारराव होळकरांना चांदवडची सरदेशमुखी अहमदशाह बहादूर याने बहाल केली. त्यानंतर साधारण इ.स १७५९ ला एका ब्राह्मणास टांकसाळ स्थापण्याचा परवाना देऊन हि टांकसाळ सुरु केली गेली. पुढे १७६९ सालच्या अगोदर टांकसाळ पुन्हा बंद झाली परंतु तुकोजी होळकरांनी माधवराव पेशव्यांकडून परवाना मिळाल्यावर पुन्हा ती चालू केली.ह्या परवान्याविषयी माधवराव पेशव्यांच्या रोजनिशीत दिलेली माहिती अशी –
“चांदवड येथे खरा माल होत नसल्याने हि टांकसाळ बंद केली गेली व ती पुढे तुकोजी होळकरांच्या विनंतीवरून सुरु केली (सन १७७२-१७७३). परंतु ह्या टांकसाळीचा खर्च सरकारातून द्यावयायचा नाही असे ठरले. टांकसाळीस लोखंड , कोळसे ,खार , चिंच लागत असे.”
हि टांकसाळ थेट इ.स १८०० पर्यंत किल्ल्यावर आज जिथे टांकसाळीची जागा आहे तिथेच चालू होती परंतु नंतर इ.स १८०० सालीच टांकसाळीच्या अधिकाऱ्यांमध्ये मतभेद झाल्याने टांकसाळ चांदवड शहरात स्थलांतरित करण्यात आली.पुढे १८२९ पर्यंत टांकसाळ अगदी सुरळीतपणे चालू होती नंतर मात्र १८२९ साली चांदी व १८३० साली ताम्र नाणी पाडण्याचे काम बंद करून टांकसाळ कायमची बंद करण्यात आली.
हा झाला एकंदर टांकसाळीच्या वापरात असण्याचा इतिहास ,आता ह्या टांकसाळीत कुठली नाणी पाडली जात त्याचा आढावा घेऊयात. चांदवड टांकसाळीत चांदीची नाणी आणि ताम्र अर्थात तांब्यांची नाणी पाडली जात. ह्या टांकसाळीत पाडल्या जाणाऱ्या नाण्यांना चांदवडी रुपया आणि चांदवडी अधेल्या म्हणत. चांदवडी नाणे अथवा रुपया हे त्या काळी खूप प्रसिद्ध होते.प्रामुख्याने हि नाणी पुणे ,वाफगाव ह्या भागात जास्त व्यवहारात आणली जात आणि त्याचे मुख्य कारण होते ते म्हणजे ह्या नाण्यांचे धातू.
चांदवडी नाणे एवढे प्रसिद्ध होते कि नाण्यांचा अभ्यास करणारा प्रिंसेप ह्याच्या मते ह्या प्रकारची नाणी ग्वाल्हेर संस्थानात पाडली जात. तसेच प्रिंसेप पुढे असेही म्हणतो कि नाशिक येथील जरीपटका रुपये सुद्धा चांदवडी रुपयाचे अनुकरण आहे. चांदवडी रुपयाच्या लोकप्रियतेमुळे व त्याचा पुरवठा व्यापार करताना कमी होऊ नये ह्या साठी चाकण परिसरात एक नवीन टांकसाळ सुरु करण्यात आली आणि टांकसाळ चालवणाऱ्यास स्पष्ट आदेश देण्यात आले कि चांदवडी रुपयासारखाच रुपया व तेवढ्याच शुद्धतेचा धातू असावा. आणखी काही ऐतिहासिक संदर्भ बघता तत्कालीन इ.स १७६५-६६ सालच्या पावतीप्रमाणे त्रयंबक च्या किल्ल्याचा अधिकारी रामसिंग नरसिंह तुळपुळे यांस एक १,००,००० रुपये पाठवले गेले त्यात ५००० चांदवडी नाणी आणि १००० अधेल्या होत्या. अबॉट ने Bombay Gazetteer चा संदर्भ देऊन चांदवड टांकसाळीत नाणे कसे पाडले जायचे त्याची माहिती दिलीय ती पुढील प्रमाणे –
“सर्वात पहिले थोडी थोडी ठराविक प्रमाणातली चांदी कारागिरांकडे दिली जाई त्याचे नंतर समांतर तुकडे हे कारागीर करत व त्यानंतर त्याला गोलाकार आकार देऊन त्याचे वजन केले जात.वजन आणि आकार समप्रमाणात असावा ह्यासाठी प्रत्येक कारागिराला वजन व मापे दिली जात.टांकसाळीत ४०० कामगार होते आणि त्यांच्याकडून बनविलेल्या तुकड्यांचे आठवड्यातून एकदा व्यवस्थापकाकडून परीक्षण केले जाई.हे सर्व झाले कि पुढे ठसे उमटवण्यासाठी नाणे पुढे पाठवली जाई. ठसे उमटवण्यासाठी एक ठसा लाकडात पक्का बसवला जाई त्याला मध्ये खोल खड्डा असे ज्यामध्ये अक्षर वाटिका कोरलेली असत.चांदीचे गोल तुकडे खोल खड्ड्यात टाकले जात व दुसरा कारागीर वरचा ठसा त्यावर टाकत आणि मग तिसरा कारागीर ६ पाउंड वजनाच्या हातोड्याने मारा करत. अशाप्रकारे ३ माणसे एका तासात २००० नाणी पाडत असत. ह्यामध्ये वापरण्यात येणारा ठसा हा नाण्यांपेक्षा किंचित मोठा असे म्हणून अक्षरं कधीकधी व्यवस्थतीत उमटत नसत.” पाहिलत किती व्यवस्थित प्रकारे काम चालत असे.
तसेच १८०० साली टांकसाळीतून दहा तासांत २०००० नाणी पाडण्याची क्षमता होती .ह्या काळात ०.२५ टक्के चांदीवर कर आकारला जाई पुढे हाच कर १८२० साली ०.५२ टक्के झाला. ह्या नाण्यांचे वजन श्री बलसेकर ह्यांच्या प्रबंधात दिल्याप्रमाणे ५.५० ग्रॅम ते ११.१ ग्रॅम इतके भरते व हे वजन प्रिंसेप ने दिलेल्या सूचीप्रमाणे १७१. १० ग्रेन्स म्हणजे अर्थात ११.०९ ग्रॅम हिच्याशी जुळते. टांकसाळ हा मराठ्यांचा चलन व्यवस्थेतच अभ्यास करण्याकरता खूप मोठा विषय आहे. तूर्तास इथे फक्त चांदवड टांकसाळीचा व त्यात पाडल्या जाणाऱ्या नाण्यांविषयी माहितीचा मी उहापोह केला आहे. भविष्यात असेच कागदपत्र तपासून आपण आणखी मराठ्यांची चलन व्यवस्था आणि नाणी पाडण्याचे व्यवस्थापन अभ्यासू शकतो.
चांदवड टांकसाळीचे अवशेष


मी नुकताच श्री.केदार फाळके ह्यांचे संभाजी महाराजांची राजनीती हा ग्रंथ वाचला.तो वाचत असताना त्यांनी पृष्ठ क्रमांक १८२ वर चांदवड किल्ला व त्या खालील मंदिर आणि दीपमाळेचे ब्रिटिश चित्रकार जॉन जॉन्सन ह्याने इ.स १७९५ साली काढलेले चित्र छापले आहे.कुतूहल म्हणून मी ब्रिटिश लायब्ररी च्या संकेत स्थळावर जाऊन ते चित्र पहिले आणि त्यात टांकसाळीची इमारत अगदी बरोबर त्याच जागी दिसते आहे जिथे आज तिचे भग्न अवशेष उरले आहेत. चित्रात इमारत अगदी छोटी दिसत असली तरी ज्या दिशेला आज टांकसाळीचा दरवाजा दिसतो बरोबर त्याच दिशेला तो चित्रात हि दिसतो,तसेच आज अस्तित्वात नसलेला किल्ल्याचा दरवाजा आणि बुरुज ठळक दिसतायत.मी छायाचित्रात इमारत वर्तुळात दाखवली आहे.

संदर्भ ग्रंथांची नावे
- पेशवेकालीन महाराष्ट्रातील टांकसाळी, त्यांचे व्यवस्थापन आणि नाणी- श्री.दिलीप प्रभाकर बलसेकर
प्रबंध वाचण्यासाठीची लिंक- https://shodhganga.inflibnet.ac.in/handle/10603/152340?mode=full
- Selections from the Satara Rajas and the Peshwa’s Diaries, VII, Peshwa Madhavrao I.,Vol. II अर्थात थोरले माधवराव पेशवे ह्यांची रोजनिशी (पृष्ठ २९९ ,३०५)
- Rev. J. E. Abbott, A Preliminary studies of the Shivaraj or Chhatrapati copper coins
J.B.B.R.A. S. vol. 20,1998, pp. 109-130.

रामचंद्र तुळपुळे ह्यांच्या नावे दिलेली सनद व त्यातील चांदवडी रुपयांचा उल्लेख (थोरले माधवराव पेशवे ह्यांची रोजनिशी (पृष्ठ २९९)

तुकोजीहोळकरांनाचांदवडटांकसाळसुरुकरण्यासंबंधीदिलेलीसनदवआदेश(थोरले माधवराव पेशवे ह्यांची रोजनिशी (पृष्ठ ३०५)

जे. अबॉट ह्याच्या ग्रंथातील चांदोर अर्थात चांदवड टांकसाळ व त्यातील नाणे पाडण्याच्या पद्धतींबद्दलचा उल्लेख( Rev. J. E. Abbott, A Preliminary studies of the Shivaraj or Chhatrapati copper coins J.B.B.R.A. S. vol. 20,1998, page 122.)
मेघन, केवढं अभ्यासपूर्ण लेखन आहे रे हे!!सलाम तुला!
मला विलक्षण अभिमान वाटतो तुझा.
LikeLike
सर खरच धन्यवाद खूप प्रेरणा मिळाली आहे मला तुमच्या अभिप्रायमुळे.
LikeLike