ऐतिहासिक पत्रांतून होणारे मराठ्यांच्या इतिहासातील कर्तबगार राजस्रीयांचे दर्शन (मातोश्री राधाबाई)

मराठ्यांचा इतिहास हा कर्तबगारीने ,शौर्याने तसेच पराक्रमाने भरलेला आहे हे निर्विवाद सत्य आहे.परंतु इतिहासात डोकावले तर आपणास पराक्रम गाजवणाऱ्या राजपुरुषांबरोबर राजस्रीयांचे सुद्धा कर्तृत्व काही कमी नव्हते असे दिसते.ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपति शिवाजी महाराजांच्या मातोश्री माँसाहेब जिजाऊ ज्यांचे व्यक्तिमत्व असामान्य होते.पुढील काळात सुद्धा अनेक राजस्रीयांनी लहान मोठ्या प्रमाणात राजकारणात भाग घेऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मराठेशाही एक एक पायरी पुढे नेऊन ठेवली.नजीकच्या काळात पेशवे दफ्तरातील खंडांचे वाचन करत असताना पेशवे बाळाजी विश्वनाथ आणि श्रीमंत पेशवे बाजीराव ह्यांच्या कालखंडातील पत्र वाचनात आली आणि हा छोटेखानी लेख लिहावासा वाटला.मी प्रस्तुत लेखात अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्व ज्या प्रकाशझोतात सहसा नाही आल्या परंतु एकंदर पेशवाईच्या कालखंडातील चढ उतार पाहिलेल्या श्रीमंत पेशवे बाजीरावांच्या आई मातोश्री राधाबाईंचा व्यक्तिवेध घेणार आहे.

राधाबाईंना बाळाजी विश्वनाथांमुळे राजकारण जवळून पाहता आले.पण त्याचबरोबर तेवढेच कष्ट आणि त्रास सहन करावा लागला असेल असे एकंदर दिसते. मग ते कोकणातून देशावर येतानाची परिस्थिती असो अथवा बाजीराव तसेच चिमाजी अप्पा ह्या आपल्या दोन कर्तबगार पुत्रांच्या अकाली निधनाने होणाऱ्या वियोगाला सामोरे जाणे असो.राधाबाई वेळोवेळी बाजीरावांना परामर्श देत असत अशी काही पत्र उपलब्ध आहेत त्यातल्याच एका पत्राचा आपण आढावा घेऊ.

हे पत्र १७३३ च्या सुमाराचे आहे ह्या वेळी बाजीराव जंजिरा मोहिमेवर होते.राधाबाई आपल्या पत्रात लिहीत आहेत“राजपुरी व राजकोट व बलाराजा व खोकरी ऐशी हस्तगत जाली म्हणून लिहिले,तरी ते गोष्ट उत्तमच झाली.सेखजी येऊन भेटला म्हणून लिहिले तरी ते गोष्ट उत्तमच जाली.त्याचे बहुता रीतीने समाधान रक्षून पुढे आपले कार्य सिद्धीस पावें ते गोष्ट करणे. परस्थळी जाणे जाहले आहे,कोण्हाचा विश्वास न धरावा.बहुत सावधतेने असणे.शरीररक्षण करून सावधतेने असत जाणे.बहुत काय लिहिणे हे आशीर्वाद.”
आता खरे पाहता ह्या पत्रात त्यांनी राजकारणावर चर्चा केलेली दिसत नाही परंतु पत्रातील काही वाक्य खूप काही सूचित करून जातात.जसे कि सेखजी म्हणजे सेखोजी आंग्रे कान्होजी आंग्रे ह्यांचे चिरंजीव त्यांचे बहुत रिता समाधान करून आपले कार्य सिद्धीस पावावे. आता असे म्हणण्याचे कारण काय असेल ?… तर आपण सर्वजण जाणतो मराठी आरमाराचे राजे आंग्रे होते.समुद्र म्हणजे आंग्रे हे समीकरण होते आणि जंजिरा मोहीम म्हणजे आरमारी लढाई आलीच त्यामुळे राधाबाई बाजीरावांना हेच सूचित करत आहेत कि सेखोजींना समाधानी ठेवून कार्य सिद्धीस न्या कारण सेखोजींची कर्तबगारी हि कान्होजींप्रमाणे उत्तुंग होती.तसेच परस्थळी जाणे जाहले आहे तर परस्पर कोणाचा विश्वास धरू नका हे मातोश्री सांगायला विसरत नाही कारण बाजीरावांनी तोवर शत्रूला अक्षरशः लोळवले होते. त्यांच्या पराक्रमाचा सूर्य हा तेव्हा प्रखरतेने तळपत होता त्यामुळे कुठूनही दग्याची शक्यता होती.त्याच बरोबर बाजीरावांच्या हालचाली ह्या वेगवान असाव्यात आणि म्हणूनच बहुदा शरीररक्षण करावे असेहि सांगायला त्या विसरत नाहीत.

तसेच आणखी एक पत्र आहे हे बहुदा निजामाची भेट बाजीराव घेणार होते त्या दरम्यान चे आहे. पत्रात राधाबाई म्हणत आहेत कि “तुम्हास भेटीचा मनसबा मोडावयाचा विचार कि, राजश्री आनंदराऊ सोमवंशी सरलष्कर व शंभुसिंग जाधवराव हे दोन्ही सरदार बरोबर नाहीं (त) आणि आम्ही येकलेच यावेसे काय आहे ? ऐसे राजश्री आनंदराऊ सुमंत यांस सांगोन भेटीचा मनसुबा मोडे ते गोष्ट करणे.” थोडक्यात मुख्य सरदार नसताना तुम्ही निजामाची भेट घेऊ नका असे सांगून मातोश्री बाजीरावांना सावध करत आहेत आणि अर्थात आई म्हणून असलेली स्वाभाविक काळजी पत्रातून दिसून येते.

तसेच राधाबाईंना सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांनी एक पत्र पाठवले आहे त्यात कान्होजी म्हणत आहेत कि “सांप्रत तुमचे पत्र येत नाही ऐसे तर नसावे.आपले सर्वदा कुशल वर्तमान लिहीत जाणे.” ह्यावरून पेशवे आणि आंग्रे घराण्याचा घरोबा, तसेच मातोश्रींबद्दलचा आदर व्यक्त होतो.ह्या एका छोटेखानी पत्राने कुठेतरी असे वाटते कि राजकारणात काय चालले ह्याचा अंदाज घेण्यासाठी राधाबाई काही प्रमुख सरदारसोबत सुद्धा पत्र व्यवहार करत असाव्यात.

थोडक्यात, हि पत्रे वाचल्यावर आपल्या मुलाप्रती असलेली काळजी तसेच वेळोवेळी दिलेल्या सल्ल्यांवरून मातोश्रींना असलेली राजकारणाची जाण प्रखरतेने दिसून येते.शिवाय बाजीराव आणि चिमाजी अप्पांच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी राधाबाईंनी समर्थपणे पेललेली दिसते.बहुत काय लिहिणे मातोश्रींना त्रिवार वंदन!!!

संदर्भ – पेशवे दफ्तरातून निवडलेले कागद खंड ९ – बाजीराव कौटुंबिक. पत्र क्रमांक ७,५२
पेशवे दफ्तरातून निवडलेले कागद खंड ३ – जंजिराच्या सिद्धीवर शाहूंची मोहीम पत्र क्रमांक २

लेखात नमूद केलेली पेशवे दफ्तारातील पत्रे

पत्र क्रमांक १
पत्र क्रमांक २
पत्र क्रमांक ३

2 thoughts on “ऐतिहासिक पत्रांतून होणारे मराठ्यांच्या इतिहासातील कर्तबगार राजस्रीयांचे दर्शन (मातोश्री राधाबाई)

  1. छान लिहीले आहेस . नवीन माहिती मिळाली .

    Like

Leave a reply to Meghan Petkar Cancel reply