किल्ले तोरणा उर्फ प्रचंडगड (Torna Fort Aka Prachandagad)

मी हा ब्लॉग लिहायला घेतला आहे तो शिवजयंतीचा दिवस आहे ,अर्थात हा निव्वळ योगायोग आहे कि ज्या किल्ल्यावर ब्लॉग लिहायला सुरुवात केली आहे तो लिहिण्याचा दिवस शिवजयंतीचा आणि तोरणा हा पहिला किल्ला आहे जो महाराजांनी घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.दिनांक १७ एप्रिल १६४५ साली दादाजी नरसप्रभू देशपांडेंना लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज म्हणत आहेत कि ” हे राज्य व्हावे हे श्रीं चे मनात फार आहे “. त्याच पत्रात महाराज हे हि म्हणत आहेत कि तुमचे खोरियातील आदीकुलदेव (बहुदा रायरेश्वरचा उल्लेख असावा) तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रीलगत स्वयंभू आहे. त्यांनी आम्हास यश दिले व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पूर्वनिनार आहे “.

हा संदर्भ देण्यामागचे कारण असे कि शिवरायांनी मनात पक्के केलेले हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न १६४५ साली लिहिलेल्या पत्रात आपल्याला दिसते आणि त्याची प्रत्यक्ष सुरुवात १६४६ साली अवघ्या वयाच्या १६ वर्षी तोरणा किल्ला जिंकून केली हे सर्वश्रुत आहे. दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर मी नुकतीच पुनःश्च ट्रेकिंग ची सुरुवात केली आणि तोरणा किल्ला पाहून आलो.पाहताक्षणी ह्या किल्ल्याचे नाव महाराजांनी प्रचंडगड का ठेवले गेले हे स्पष्ट होते.निवडक मित्र मैत्रिणींसह डोंबिवलीहुन आदल्या रात्री तोरण्याच्या पायथ्याचे गाव असलेल्या वेल्हे साठी कूच केले आणि पहाटे ३.३० ला वेल्हेला पोहोचलो.गावात चिटपाखरू हि नव्हते. मस्त गार वारा अंगावर घेत सकाळ होईस्तोवर विश्रांती घेण्यासाठी जवळच असलेल्या मंदिरात अंग टाकले आणि साडे तीन तासाची झोप घेऊन सकाळी साडेसात ला उठून आवरून सव्वा नऊ च्या आसपास गड चढायला घेतला.गडाच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडीरस्ता झाल्याने अर्धी चढाई वाचते पण तरीही उरलेली अर्धी चढाई सुद्धा दमछाक करणारी आहे. गडाची चढण सुरुवातीच्या छोट्या चढणीनंतर पूर्णपणे खडी सरळसोट आणि वळ्णावळणाची होत जाते. वाटेत रेलिंग्स लावल्याने चढायला पुरेसा आधार आहे.शक्यतो लवकर गड चढायला सुरुवात करावा कारण ना गडाच्या वाटेत जास्त झाडी आहेत ना किल्ल्यावर जास्त झाडी आहेत त्यामुळे उन्हाचा त्रास होऊ शकतो.भरपूर दिवसांच्या विश्रांतीमुळे किल्ल्याची खडी चढण हळू हळू पार करत बरोबर सव्वा तासात किल्ल्याचा पहिल्या बिनी दरवाज्यापाशी पोहोचलो.

अर्ध्या वाटेवरून दिसणारा “प्रचंड” तोरणा व त्याची सरळसोट चढण

बिनी दरवाजा

बिनी दरवाज्या नंतर उजवीकडे थोडे वळण घेतले कि किल्ल्याचा दुसरा दरवाजा कोठी दरवाजा लागतो. ह्या दरवाज्याची रचना गोमुखी पद्धतीची आहे.कोठी दरवाजातून आपण मुख्य बालेकिल्ल्यात प्रवेश करतो.कोठी दरवाज्याला लागून असलेल्या बुरुजावर पायऱ्यांच्या सहाय्याने वर जाता येते.इथून वेल्हे गाव आणि तोरणा किल्ल्याच्या आसपासच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.बुरुजावरून खाली उतरून बुरुजाच्या डावीकडून छोटी वाट गेली आहे तिथून जावे म्हणजे आपण तोरणजाई देवी मंदिरापाशी पोहोचतो.मंदिरात देवीची सिंहावर आरूढ झालेली मूर्ती ठेवली आहे, ह्याच मूर्तीबरोबर आणखी एक मूर्ती ठेवली आहे परंतु ती कोणाची आहे ते नीट कळत नाही.आता इथून पुढे किल्ल्याचे दोन भाग पडतात डावी बाजू झुंजार माची आणि उजवी बाजू बुधला माची कडे जाते.मी किल्ला जसा फिरलोय त्या प्रमाणे लिहित आहे. मी प्रथम बुधला माची केली आणि शक्यतो प्रथम बुधला माचीच करावी कारण बुधला माची मुख्य बालेकिल्ल्यापासून लांब आहे आणि वाटेत एकही झाड नाही आहे त्यामुळे तुमच्या डोक्यावर सतत सूर्य आग ओकत असतो.

कोठी दरवाजा
तोरणजाई देवी मंदिर

मंदिर पाहून पुन्हा मुख्य वाटेवर आले कि सरळ जायचे वाटेत धर्मशाळे सदृश्य इमारत दिसते तिला लक्कडखाना असे नाव दिले आहे.हे पाहून पुढे चालत गेल्यावर पुन्हा एक वास्तू दिसते जे धान्य कोठार कदाचित असू शकते नक्की सांगता येणार नाही.इथून थोडं उजव्या बाजूला वळले कि प्रथम लागते ते तोरणेश्वर मंदिर.मंदिराबाहेर दोन शिळा ठेवल्या आहेत त्या दोन्ही पण कदाचित समाधी शिळा असाव्यात.एका शिळेवर सैनिकाचे ढाल आणि तलवार घेतलेले शिल्प कोरलेले आहे.तोरणेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला मेंगाई देवी मंदिर आहे.मेंगाई मंदिर पाहून जी उजवी वाट पकडली आहे त्याच बाजूला सरळ चालत राहायचे वाटेत एक चोकोनी पाण्याचे टाके पहायला मिळते.पुढे थोडं खाली उतरले कि उजव्या बाजूला कोकण दरवाजा लागतो.शेवटी उतरेपर्यंत कळत नाही कि खाली दरवाजा आहे.कोकण दरवाज्याचे बुरुज उंच आहेत.ह्या दरवाज्याची बांधणी सुद्धा गोमुखी पद्धतीची आहे.कोकण दरवाजा उतरल्यावर समोर लांबलचक जी वाट दिसते ती बुधला माचीची वाट आहे.बुधला माची नक्की कुठे आहे ह्याची खूण ओळखायची असेल तर समोर छोटेखानी सुळका आपल्याला दिसतो तो नजरेच्या टप्प्यात ठेवावा त्या सुळक्याच्या उजव्या बाजूला बुधला माची आहे आणि दुसरी खूण म्हणजे डाव्या बाजूला दिसणाऱ्या राजगडावरून तोरणा वर येणारी वाट जिथे संपते तेथील दरवाज्यावर बुधला माची आहे. मुख्य बालेकिल्ला ते बुधला माची अथवा झुंजार माची असो राजियांचा गड अर्थात राजगड डाव्या बाजूला त्याचे दर्शन सतत आपलयाला देत असतो.साधारण पाऊण ते एक तासात आपण बुधला माचीवर पोहोचतो.बुधला माचीवरील वाटेत रेलिंग्स लावून वाटा सुरक्षित केल्या आहेत परंतु एका पॅच वर रेलिंग्स असले तरी वाट छोटी झाल्याने थोडे जपून जावे घाई करून नये.

तोरणेश्वर मंदिर
मेंगाई देवी मंदिर
कोकण दरवाजा
गोमुखी रचना कोकण दरवाजा
बुधला माचीची वाट (सुळक्याच्या खाली डावीकडचा बुरुज दिसतो आहे तिथे बुधला माची आहे)

बुधला माचीच्या वाटेत उजव्या बाजूला एक वाट उतरत जाते तिथे वकंजाइ दरवाजा आहे मात्र तो बालेकिल्ल्याकडे येताना करावा.बुधला माचीवर प्रचंड दोन मोठे बुरुज बांधले आहेत एका बुरुजाखाली शिडी लावली आहे येथून राजगड वरून येणारे ट्रेकर तोरणा वर प्रवेश करतात.खरं तर इथे सुद्धा दरवाजा असावा पण तश्या काही खुणा अस्तित्वात नाहीत.बुधला पाहून मुख्य वाटेवर आल्यावर डावीकडे वळून सरळ चालत जावे साधारण अर्ध्या तासावर चित दरवाजा लागतो.ह्या दरवाज्याला कमानी वगैरे नाहीत बुरुज मात्र आहे.मी स्वतः चित दरवाजा थकल्याने आणि पुन्हा बालेकिल्ल्यावर चढुन जायचे असल्याने केला नाही.तसेच मी वर सांगितल्याप्रमाणे बुधलच्या वाटेत वकंजाइ नावाचा दरवाजा आहे हे मला बालेकिल्ल्यावर गेल्यावर समजल्याने मी तिथेहि गेलो नाही. परंतु सहकारी ट्रेकर तिथे जाऊन आल्याने त्यांनी काढलेली छायाचित्र देत आहे ज्याने वाचकांना दोन्ही दरवाजे जसे दिसतात हे पाहायला मिळेल.

बुधला माची
बुधला माचीवरून दिसणारा राजगड आणि राजगड ते तोरणा येणारी वाट
चित दरवाजा
वकंजाई दरवाजा

बुधला पाहून १० मिनिटे आराम करून आम्ही निम्मे ट्रेकर बालेकिल्ल्याकडे निघालो आणि निम्मे चित दरवाज्याकडे गेले.पुन्हा पाऊण तासाच्या दमवणाऱ्या वाटेने कोकण दरवाज्यावर पोहोचलो.

थोडा वेळ देवडीत आराम केला तोपर्यंत आमची निम्मी टीम चित दरवाजा पाहून परत आली. थोडं अजून थांबून लगेच उजवी बाजू पकडून तटबंदी लगत म्हणजे तटबंदीवर चालत चालत झुंजार बुरुज गाठला.झुंजार बुरुजासमोर झुंजार माची आहे.रायगड च्या पद्मावती आणि सुवेळा माचीची आपल्याला झुंजार माची बघून आठवण येते.अतिशय विलोभनीय दृश्य होते ते , मी ५ मिनिटे तळपत्या उन्हात झुंजार माची पाहत बसलो.झुंजार माची बघण्यासाठी शिडी उतरून जावे लागते.परंतु आम्ही पोहोचलो तेव्हा दुपारचे २ वाजत आलेले त्यामुळे खूप गर्दी झालेली शिडीजवळ आणि खरं सांगायचे तर थोडा थकवा अजून असल्याने आणि ती गर्दी पाहून आमच्यातला निम्म्या जणांनी हळू हळू गड उतरायचा निर्णय घेतला. तसे पण झुंजार बुरुजावरून झुंजार माची अगदी व्यवस्थित दिसते त्यामुळे माझे मन सुद्धा भरले होते.भर उन्हात गड उतरायला घेतला.गडावर माकडांचा वावर खूप आहे कृपया करून सर्वाना एक विनंती आहे त्यांना काही खायला देऊ नका त्यामुळे माकडांचा त्रास इतर जणांना होतो. हे सर्व वन्यजीव आपल्याकडील चिप्स , वेफर्स वर जगत नाहीत ते नैसर्गिक स्रोतांवरच जगतात हे कायम लक्षात ठेवावे. होते काय त्यांना जास्त खायला देण्याने विनाकारण ट्रेकर्स ची बॅग ओढणे आणि त्यांवर हल्ला होणे हे प्रकार घडत आहेत त्यामुळे कृपया काळजी घ्यावी ही ह्या ब्लॉग च्या निमित्ताने मी सूचना करेल.संध्याकाळी ४ ला पायथ्याला पोहोचून मग पुढे जेवून तोरणा गडाच्या आठवणीत रमत रात्री १२ वाजता घरी पोहोचलो.गड पाहून विलक्षण समाधान वाटले.ज्या किल्ल्याने हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली असा हा प्रचंडगड अर्थात तोरणा गरुडाच्या विशाल पंखांसारखा पसरलेला आहे.किल्ला जरूर पहा आणि हे वैभव सर्वांपर्यंत पोहोचवा.

गडाच्या इतिहासाबद्दल – शिवरायांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून ह्या किल्ल्याचे नाव तोरणा ठेवले अशी एक सर्वसामान्य आख्यायिका आहे परंतु ह्याला ठोस आधार नाही. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडे असल्याने किल्ल्याला तोरणा नाव पडले असे मूळ कारण आहे.हा किल्ला इ.स १४७० ते १४८६ च्या काळात बहामनी राजवटीकडे होता पुढे तो निजामशाहीत गेला व निजामशाहीतून १६४६ साली महाराजांनी घेतला.इ.स १६७१-७२ मधील जाबीता तहात ५,००० होण तोरणा किल्ल्याच्या डागडुजीसाठी महाराजांनी मंजूर केल्याची नोंद आहे.संभाजी महाराजांच्या वधानंतर तोरणा मुघलांकडे गेला पण तो शंकराजी पंत सचिवांनी पुन्हा तो स्वराज्यात आणला.पुढे इ.स १७०१-०२ पासून औरंगजेबाने मराठ्यांचे किल्ले घेण्याचा सपाटा लावला त्यानुसार १० फेब्रुवारी १७०४ ते साधारण १० मार्च १७०४ ह्या दरम्यान तोरणा किल्ला हस्तगत केला गेला. किल्ला घेण्याच्या कामी औरंगजेबाचा प्रसिद्ध सरदार तरबियतखान खपत होता. दिनांक १० मार्च १७०४ ची अखबारातील नोंद पुढील प्रमाणे आहे “तरबियतखानाचा झेंडा किल्ल्याच्या दरवाज्यावर लावण्यात आला.किल्ल्याच्या बंदोबस्ताची खबरदारी घेण्यात येत आहे.” पुढे ४ वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे ह्यांनी किल्ला स्वराज्यात आणला आणि मग तो स्वराज्यातच राहिला.औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय.

इतिहास संदर्भ- ट्रेकक्षितीज संस्था संकेतस्थळ http://www.trekshitiz.com, शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड १ व २ एकत्र लेखांक ५०४ पृष्ठ १०८ , मोगल दरबाराची बातमीपत्रे खंड ३ संपादक सेतुमाधवराव पगडी.शिवछत्रपतींची पत्रे खंड २, अनुराधा कुलकर्णी पृष्ठ ८४,

4 thoughts on “किल्ले तोरणा उर्फ प्रचंडगड (Torna Fort Aka Prachandagad)

  1. छान ,
    माहिती वाचून संपूर्ण गड फिरून आल्याचा अनुभव मिळाला।

    Like

Leave a reply to Amit Samant Cancel reply