ट्रेकर्स ची पंढरी किल्ले हरिश्चंद्रगड भाग १(Harishchandragad Fort Part-1)

साधारण बाराव्या शतकापासून किंवा त्या पूर्वी सुद्धा महाराष्ट्रात किल्ल्यांचे महत्व प्रचंड वाढले होते. बाराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने पहिले दिल्ली आणि मग दक्षिणेत स्वारी केली तेव्हा किल्ल्यांची महाराष्ट्राला पर्यायाने देशाला किती गरज आहे हे जास्त अधोरेखित झाले.बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे कि किल्ले फक्त शिवकाळापासून अस्तित्वात आहेत परंतु तसे नाही किल्ले हे फार पूर्वीपासून अस्तित्वात आहेत .आज अशाच एका किल्ल्याला आपण भेट देणार आहोत ज्या किल्ल्याला साडे तीन हजार वर्षाहूनही जास्त पौराणिक पार्श्वभूमी आहे.हा किल्ला म्हणजे अर्थात ट्रेकर्स ची पंढरी किल्ले हरिश्चंद्रगड !!!

हा किल्ला इतका खास आहे त्याचे कारण म्हणजे किल्ल्यावर जायला जवळपास तब्बल १८ वाटा आहेत.किल्ल्याला नैसर्गिक तसेच भौगोलिक सौंदर्य लाभले आहे.माझ्या नशिबाने मी राजदरवाज्याची वाट अर्थात जुन्नर दरवाजाच्या वाटेने किल्ला चढलो आणि खिरेश्वर अथवा टोलार खिंडीतून उतरलो.हरिश्चंद्रगड अनुभवायचा म्हणजे एक दिवसाचा मुक्काम हा हवाच आणि आता तर किल्ल्यावर भाड्याने टेन्ट मिळतो त्यामुळे राहणे सुलभ होते.आम्ही ५ जण ठरल्याप्रमाणे आदल्या रात्री म्हणजे २५ फेब्रुवारीला कल्याणहुन खिरेश्वर ला जायला निघालो. रात्री दीड ला पोहोचून गाईड च्या घरी जरा ताणून दिली.फेब्रुवारी चा शेवटचा आठवडा असल्याने थंडी तशी कमी होती मात्र पहाटे ३ नंतर कमालीचा गारठा वाढला.दिवस महाशिवरात्रीच्या आधीच्या आठवड्यातला असल्याने गावाजवळील मंदिरात हलक्या आवाजात कीर्तन जागरण चालू होते त्याचे स्वर छान कानावर पडत होते.पहाटे बरोबर ५.३० ला उठून सर्व आवरून बरोबर ६.३० ला सकाळी जुन्नर दरवाज्याकडे पाय वळवले. हरिश्चंद्रगडाच्या सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर कायम लक्षात ठेवावे गड चढायला लवकरच सुरुवात करावी.६.३० हि अगदी योग्य वेळ आहे मग तुम्ही सर्वात सोप्या पाचनईच्या मार्गाने गेलात तरीही.

सुरुवातीची २० मिनिटे ज्या डोंगर सोंडेवरून जुन्नर दरवाज्याची वाट आहे त्या डोंगराचा पायथा येईस्तोवर जातात आणि मग सुरु होतो तो खडा चढ.झाडाझुडपांची साथ असल्याने हा खडा चढ आपण आरामात पार करतो आणि वरती सांगितल्याप्रमाणे सकाळी लवकर निघाल्यामुळे आपल्याला कशाचीच घाई नसते.जुन्नर दरवाज्याने किल्ल्यावर चढताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात , एक म्हणजे गाईड बरोबर घेऊनच जावा वाट लगेच कळून येणारी नाही आहे आणि दुसरे म्हणजे सकाळी ९ च्या सुमारास आपण जुन्नर दरवाज्याच्या खिंडीत आलोच पाहिजे.मी वेळा मुद्दाम ह्या साठी देतोय कारण नंतरचे लागणारे ऊन त्रास देऊ शकते. पहिला सोपा चढ चढून आपल्यासमोर एक डोंगर दिसतो ज्याला छोटेखानी सुळका आहे त्या डोंगरामागे जुन्नर दरवाजाच्या खिंडीची वाट आहे. डोंगराच्या उजव्याबाजूस मोठे जलाशय दिसते. इथून सरळ जाऊन पुन्हा वळसा घालून आपण थोडे वर येतो आणि डोंगराच्या खालच्या बाजूने कडेने चालत चालत एका उंचवट्यावर येतो.इथून पुढे नंतर बालेकिल्ल्याच्या पठारावर पोहोचेस्तोवर नाणेघाट , भैरवगड , हटकेश्वर , रोहिदास शिखर , तारामती शिखर हे सतत दृष्टीसमोर राहतात. ह्या शिखरांची रांग पाहताना मन प्रसन्न होते.थोड वर आल्यावर आपण कायम इंग्रजी V शेप च्या खिंडीतूनच वर जातो असे वाटत राहते कारण एका बाजूला तारामती आणि दुसऱ्या बाजूला दुसरा डोंगर असतो ज्याला नैसर्गिक नेढे आहे.पुढे अरुंद खडा चढ लागतो आणि थोडे स्क्री असल्याने हळू जावे लागते. हरिश्चंद्र गडाच्या जंगलात खूप दुर्मिळ भाज्या आहेत, आमचा गाईड तो स्वतः बरेचदा भाज्या आणि लाकूड फाटा आणायला ह्या वाटेवर येत असतो असे सांगत होता.

वरती चढून आल्यावर आपण खिंडीच्या उजव्या डोंगराला (आपली डावी बाजू ) ट्रॅव्हर्स मारून साधारण २० एक मिनिटांत जुन्नर दरवाजाच्या खिंडीच्या पायथ्याला पोहोचतो.मला ह्या वाटेने जाण्याआधी असे वाटलेले कि हि खिंड दम काढणार , परंतु खरं सांगतो उलट हि खिंड चढायलाच एवढी मजा येते कि जे शब्दांत सांगू शकत नाही.खिंड चढताना कायम अगदी शेवटचा दगड चढे पर्यन्त सुसह्य असा गारवा असतो. हि खिंड आणि इथले दगड माझ्या मते ज्यांना दगडांच्या संरचनेचा अभ्यास करायचा आहे त्यांच्या साठी एक सुवर्ण संधी आहे. खिंड चढताना काही दगड सुटे झालेले आहेत त्या ठिकाणी फक्त लक्ष द्यावे आणि दोन जणांच्या मध्ये गॅप असू द्यावा. एकदम आरामात व्यवस्थित १ तास घेऊन हि खिंड चढावी.खिंड चढताना वाटेत पायऱ्या लागतात ह्या पायऱ्या किल्ल्याच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत. दुर्दैवाने हि वाट दुरलक्षित राहिल्याने बरेचसे अवशेष काळाच्या ओघात गडप झाले असावे. वाटेत एक शिवपिंडीचे शिल्प पाहायला मिळते .

जुन्नर दरवाजाच्या खिंडीतून दिसणारी दुर्गसंपदा (छायाचित्र – कुशल देवळेकर)

खिंडीतून वर आल्यावर आपण डाव्या बाजूला वळायचे आणि इतका वेळ दिसणारे डोंगर आता मोकळ्या आभाळाखाली आपल्याला पूर्णपणे दिसू लागतात. हा नजारा डोळ्यात साठवण्यासारखा आहे.इथून पुढे सरळ चालत किंचित वर आलो कि बालेकिल्ला दिसू लागतो. बालेकिल्ल्यावर आणि पर्यायाने किल्ल्यावर असणारी तटबंदीची एकमेव खून आपल्याला इथे दिसते आणि नुकतंच शिवरायांच्या पुतळ्याची कोणा संस्थेने बालेकिल्ल्यावर स्थापना केली आहे. बालेकिल्ल्याला वळसा घालून उजव्या बाजूने आपण मुख्य हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या रस्त्याला लागतो.हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि त्या पुढील अनुभव आपण पुढील भागात पाहू.मी मुद्दाम हा एक अक्खा भाग किल्ल्याच्या चढणीच्या अनुभवावर आणि वाटेच्या माहितीवर लिहिला आहे ह्याचे मुख्य कारण म्हणजे हि वाटच भुरळ घालणारी आहे. ह्या एका वाटेने मला किल्ल्याच्या इतर वाटा देखील किती विलोभनीय असतील ह्याचा अंदाज आला.खरचं हरिश्चंद्रगड हा सह्याद्रीने आपल्याला दिलेला दागिना आहे तो पाहावा आणि अनुभवावा तितका कमी आहे.
(क्रमशः)

खिंड चढून वरती आल्यावर दिसणारा डोंगरांचा नजरा
किल्ल्यावरील तटबंदीच्या खुणा (वर्तुळाकार भाग पाहावा)

6 thoughts on “ट्रेकर्स ची पंढरी किल्ले हरिश्चंद्रगड भाग १(Harishchandragad Fort Part-1)

  1. छायाचित्रण आणि वर्णन दोन्हीही सुरेख

    Like

Leave a reply to Meghan Petkar Cancel reply