“दिसते तसे नसते म्हणून जग फसते” हि उक्ती ज्या किल्ल्याला चपखल बसते तो किल्ला म्हणजे सरसगड. मी असे म्हणण्याचे कारण म्हणजे पायथ्यापासून दिसणारा किंवा यूट्यूब वर पाहिलेल्या व्हिडीओ मधील सरसगड आणि प्रत्यक्ष दर्शनी जेव्हा आपण पाहतो तेव्हा जमीन-आसमानाचा फरक जाणवतो.खालून दिसणारा छोटेखानी किल्ला हा प्रत्यक्ष पाहिल्यावर किल्ल्याला छोटा समजण्याचा अंदाज आपला साफ चुकतो.असो …. पाली ला सर्वजण बल्लाळेश्वराचे दर्शन घेतात मात्र बल्लाळेश्वराचा पाठीराखा असणाऱ्या सरसगडाकडे मात्र बऱ्याचदा कोणी फिरकत नाही.मंदिराच्या बरोबर पाठीमागील बाजूस सरासगडाचा डोंगर आहे.नुकताच ट्रेकक्षितिज संस्थेमार्फत मी किल्ला फिरून आलो.सरसगडला जायचे असल्यास अर्थात रायगड जिल्ह्यातील पाली गाव गाठावे.पालीत पोहोचल्यावर मंदिरापासून साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावर सरसगडाच्या चढाईचा रस्ता सुरु होतो.जिथून गड चढायला सुरुवात होते तिथे खाली माहितीफलक लावला आहे.

किल्ल्याची वाट मळलेली आहे.कुठेही चुकण्याची शक्यता नाही . वाट पकडल्यावर सरळ चालत रहायचे साधारण २० मिनिटाने आपण छोटेखानी पठारावर येतो.पठारावरून पाली गावाचे विहंगम दृश्य दिसते.किल्ला चढत असताना किल्ल्याची घळ अथवा प्रवेशद्वारापर्यंत जाणारी खिंड सतत नजरेसमोर असते.किल्ल्यात जाताना वाटेत पाण्याचे कोरडे टाके लागते.मुख्य किल्ल्याच्या खाली किंचित डाव्याबाजूला खोबणीत पायऱ्या कोरल्या आहेत.खोबणीत कोरलेल्या पायऱ्यांच्या सहाय्याने आपण जिथून किल्ल्याचे प्रवेशद्वार गाठण्यासाठी ९६ पायऱ्या चढाव्या लागतात तिथे पोहोचतो.पायऱ्या चढण्याआधी डाव्या बाजूला भुयार आहे. भुयारात टॉर्च लावून आत जावे कारण सरपटणारे प्राणी असण्याची शक्यता जास्त आहे.आत चिंचोळ्या मार्गाने गेल्यावर चिंचोळ्या मार्गापेक्षा मोठी खोली पाहायला मिळते. हे भुयार किल्ल्याच्या प्राचीनत्वाची साक्ष देते.भुयाराची रचना हा उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे.साधारण ४५ मिनिटे ते तासाभरात आपण पायऱ्यांजवळ पोहोचतो. थोडे थकून आल्यावर गुडघाभर उंचीच्या ९६ पायऱ्या खरं तर दम काढतात. पण माझा अनुभव ह्या बाबतीत वेगळा होता, अगदी हरिश्चंद्रगडाच्या जुन्नर दरवाजाची घळ हळू हळू चढताना घळ कधी सर केली हे कळाले नाही तसेच ह्या ९६ पायऱ्या मोजून १० मिनिटांत अगदी आरामात चढून दिंडी दरवाज्यापाशी पोहोचलो.पायऱ्या कातळात तासून कोरल्या आहेत. पायऱ्या कोरताना पूर्ण घळीचा वापर केला गेला नाही आहे. उजव्या बाजूस जागा मोकळी ठेवलेली पाहायला मिळते.पायऱ्या चढताना समोर मोठा बुरुज दिसत असतो आणि त्यावरून दरवाज्याची गोमुखी बांधणी आपल्याला स्पष्ट दिसते.गडावर राजा शिवछत्रपती परिवार संवर्धनाचे काम करत आहे असे मला इतिहास अभ्यासक व जाणते ट्रेकर श्री महेश पाटील ह्यांच्याकडून कळले. दिंडी दरवाज्याला नव्याने लावलेला लाकडी दरवाजा हा बहुदा त्या कामाचा पुरावा आहे.अर्थात गडावर फेरफटका मारताना इतर ठिकाणीहि संवर्धन केलेले दिसले.



दिंडी दरवाजा सुबक कोरलेला आहे.दरवाज्याच्या कमानीवर ३ पाकळ्यांचे शिल्प कोरले आहे.दरवाजातून आत गेल्यावर पहारेकरांच्या देवड्या लागतात.देवड्या पाहून साधारण १० ते १५ पायऱ्या चढून आपण मुख्य बालेकिल्ल्याचा पायथ्याला पोहोचतो. दिंडी दरवाज्याचे बुरुज आणि तटबंदी स्पष्ट दिसते.येथून दोन वाटा बालेकिल्ल्याला जायला फूटतात . दोन्ही बघून गडावर असलेला सुळका जो आपणास पायथ्यापासून दिसतो त्याला प्रदक्षिणा घालता येते. शक्यतो उजव्या बाजूने जावे म्हणजे किल्ला व्यवस्थित फिरता येतो.

डाव्या बाजूने फिरायला सुरुवात केल्यावर तटबंदीलगत असणारा मोठा बुरुज लागतो. बुरुजाला जंग्या आणि तोफेसाठी झरोके खोदले आहेत.येथून संपूर्ण परिसर न्याहाळता येतो. समोर असलेले तैलबैला आणि सुधागड बुरुजावरून स्पष्ट दिसतात. पुढे गेल्यावर सरळ जाण्याआधी डाव्या बाजूला गुहा आहेत ह्या गुहेत शिवपिंड ठेवली आहे. पुन्हा मुख्य वाटेवर येऊन सुळक्याला प्रदक्षिणा घालायला सुरुवात करावी.सर्व प्रथम पाण्याचे मोठे टाके लागते.पुढे एक हौद लागतो ज्याला ऐनाचा हौद असे नाव दिले आहे.इथून पुढे उजव्या बाजूस टप्प्या टप्प्या वर ३ बुरुज आहेत आणि सुळक्याच्या खाली काही गुहा , कोठी, पाण्याचे हौद कोरले आहेत. एका गुहेला संभाव्य शस्त्रागार असावा असे वाटल्याने शास्त्रागाराची पाटी लावली आहे.आधी उल्लेख केल्याप्रमाणे किल्ल्याच्या पायथ्याला जशी छोटेखानी गुहा आहे जी किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा पुरावा देते तशीच परंतु बऱ्यापैकी मोठी दोन मोठे खांब असलेली प्राचीन गुहा सुळक्याला वळसा घालण्याआधी पाहायला मिळते. या गुहेचे प्रयोजन मात्र समजत नाही.गुहेत उतरायला पायऱ्यांची सोय आहे. एकंदर गुहेत तासलेल्या भिंती आणि खांब पाहता ती प्राचीन असावी असा अंदाज वाटतो. पुढे सरळ गेल्यावर वळसा घालण्यापूर्वी पाण्याचे टाके लागते, पाण्याच्या टाक्यावर जाण्यासाठी पायऱ्यांची सोय आहे.टाके पाहून ह्याच पायऱ्या उतरून थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला वळल्यावर किल्ल्याचा चोरदरवाजा पाहायला मिळतो. चोर दरवाज्यातून खाली उतरून आल्यावर तटबंदी लगत असणारा मोठा बुरुज दिसतो ह्या बुरुजाला खंदकाच्या रचनेप्रमाणे पाण्याचे टाके बुरुजापुढे कोरले आहे.इथून समोर किल्ल्यावर येणारी प्रचलित दुसरी वाट दिसते जी महादरवाज्याला येऊन मिळते.इथेच बुरुजासमोर तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूला तिहेरी बुरुज आणि तटबंदीची रचना बघायला मिळते.दुर्दैवाने बराचसा भाग ढासळल्याने संपूर्ण रचना नीट पहायला मिळत नाही.परंतु जे पहायला मिळते तेही काही कमी नाही.






चोर दरवाजा पाहून पुढे चालत आल्यावर बरोबर उजव्या बाजूस पायऱ्या उतरून गेल्यावर मुख्य महादरवाजा पाहायला मिळतो.दरवाजा सुस्थितीत आहे आणि दिंडी दरवाज्याप्रमाणे ह्या दरवाज्यालापण नव्याने लाकडी दरवाजा लावण्यात आला आहे.पायऱ्या उतरून खाली गेल्यावर सरसगडावर येणारी मुख्य वाट आपणास पहायला मिळते.बहुदा हा गडाचा मुख्य दरवाजा असावा, परंतु हि वाट आता प्रचलित नाही.दरवाजा उतरून गेल्यावर उजव्या बाजूला बुरुजाखालच्या भिंतीत खोबणी आणि पायऱ्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहायला मिळते.ह्या खोबणींची रचना बुरुजाखालील भिंतींवर वाढणारे गवत अथवा शेवाळी काढण्यासाठी असावी असा एक तर्क आहे.महादरवाज्या समोर पहाऱ्याच्या चौकीच्या चौथऱ्याचे अवशेष दिसतात.चौकी पासून पुढे उजव्या बाजूला अजून एक दिंडी दरवाजा लागतो. हा गडावरील तिसरा दरवाजा होय.ह्या दरवाज्यातून उतरून वरती बालेकिल्ल्याची तटबंदी न्याहाळता येते.दरवाजा बघून वर चढून आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो.सर्वप्रथम बालेकिल्ल्यावर एक कबर अथवा समाधी पाहायला मिळते.ती कोणाची आहे ते मात्र अज्ञात आहे.हे पाहून सरळ चालत गेल्यावर केदारेश्वर मंदिर लागते.मंदिराचे मूळ बांधकाम आता अस्तित्वात नाही परंतु पत्र्याची शेड लावून मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.मंदिरात नक्षीकाम असलेले दगड तसेच वीरगळी ठेवल्या आहेत. मंदिराच्या मागे मोठा पाण्याचा दगडी तलाव आहे. ह्या तलावावरून आपण अंदाज बंधू शकतो कि सरसगड हा निव्वळ टेहळणी म्हणून लक्ष्य देण्यासाठी उभारलेला किल्ला नव्हे, निश्चित ह्या किल्ल्यावर जास्त शिबंदी असणार.तलावाच्या बाजूला शिवछत्रपतींची छोटी मूर्ती नव्याने काचेच्या पेटित बसवली आहे. तलावाला वळसा घालून आपण सरळ चालत राहिल्यावर गडाच्या पहिल्या दिंडी दरवाज्यापाशी येतो.इथे आपली गडफेरी संपते. म्हणजे अर्थात आपण सुळक्याभोवती फिरून गोल प्रदक्षिणा घालून गडफेरी करत असतो.






गड पाहून साधारण २५ मिनिटांत आरामात उतरून पालीच्या बल्लाळेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शन घेऊन माझे सहकारी मित्र श्रीकृष्ण दादांबरोबर गुळाच्या चहाचा आस्वाद घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो.पाली तसे माझ्या आजोळचाच एक भाग पण कधी किल्ल्यावर जाणे झाले नाही.पायथ्यावरुन दिसणारा किल्ला प्रत्यक्ष असंख्य वास्तूंचा खजिना घेऊन तुमची वाट पाहत उभा आहे.तेव्हा ह्या किल्ल्याला जरूर भेट द्या आणि थोडा अनुभव आहे म्हणून सांगतो यूट्युब चे व्हिडिओ पाहून फक्त गडाच्या पायऱ्या आणि मुख्य दरवाजा पाहून मागे फिरू नका. संपूर्ण गड पाहत जा. गडाची एक एक वास्तू ,पाण्याची टाकी पाहून त्याची नोंद करणे खूप महत्वाचे आहे त्याने तुमच्या ऐतिहासिक ज्ञानात भर पडतेच परंतु संवर्धनाला हि त्याचा फायदा होतो.

गडाच्या इतिहासाबद्दल – सरसगडाबद्दल इतिहासात फारश्या नोंदी सापडत नाही. शिवाजी महाराजांकडे हा किल्ला बहुदा आदिलशहा कडून आला असावा. सण १६७१-७२ च्या जाबिता तहाप्रमाणे महाराजांनी जे १,७५,००० होन किल्ल्यांच्या बांधकामाकरिता वेगवेगळ्या किल्यांसाठी मंजूर केलेले त्यात सरसगडासाठी २,००० होन मंजूर केल्याची नोंद आहे.ह्या नोंदीवरून सरसगडाचे महत्व दिसून येते.छत्रपती शाहू महाराजांच्या रोजनिशीत केलेल्या किल्ल्यांच्या यादीत सरसगडाचा उल्लेख १३४ व्या क्रमांकावर आलेला दिसतो.एक महत्वाची नोंद गडाबद्दल दुसरे बाजीराव पेशवे ह्यांच्या रोजनिशीत सापडते. सण १८०४-०५ मधे किल्ल्यावरील मामलेदारांना मागील १० वर्षात किल्ल्यांवरील दारूगोळ्याचा आणि इतर महत्वाच्या सामानाचा साठा किती आणि कसे ठेवला गेला आणि सध्याची स्थिती काय आहे त्याचे तपशील सनद पाठवून मागवले गेले. हा तपशील म्हणजे एक प्रकारचे आजच्या काळातले रिटर्न्स फाईल करण्यासारखे वाटते.सरसगडाची सनद केसो बाळकृष्ण ह्यास पाठवल्याची नोंद सापडते. ह्या नोंदीवरून एक नक्की होते कि सण १८०४-०५ मध्ये किल्ला मराठ्यांकडे होता आणि शिवाय गडावरील साठ्यांच्या नोंदी मागवण्याची पद्धत त्या काळातील लष्करी खात्याची व्यवस्था दर्शवते. काही काळानंतर किल्ला भोर संस्थानकडे गेला आणि अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत किल्ला भोर संस्थानाच्या अधिपत्याखाली होता.
संदर्भ-शिवछत्रपतींची पत्रे खंड २, अनुराधा कुलकर्णी पृष्ठ ८५,
Selections from the Satara Rajas and the Peshwa’s Diaries I Shahu Chatrapati , पृष्ठ- १२८,
Selections from the Satara Rajas and the Peshwa’s Diaries V Bajirao Peshwa II , पृष्ठ १९१
ट्रेकक्षितीज संस्था संकेतस्थळ http://www.trekshitiz.com
मस्त…. अप्रतिम लेख….. सुरेख वर्णन. !!!!
LikeLike
धन्यवाद 🙏
LikeLike
खूप सुंदर.. 👌👌
LikeLike
धन्यवाद
LikeLike
👍👌
LikeLike
👍👍
LikeLike