किल्ले तिकोना उर्फ वितंडगड

शहाजी राजे आदिलशाह व शहाजहान ह्यांच्याबरोबर झालेल्या तहानुसार जेव्हा विजापूरला निघून गेले तेव्हा दूरदृष्टीनुसार त्यांनी आपल्या एका मुलाला अर्थात शिवरायांना जिजाबाईंमाँसाहेबांसोबत त्यांच्या पुणे – सुपे जहागिरीवर ठेवले.ह्या जहागिरीवर असतानाच शिवराय जसे जसे मोठे होत होते तसे त्यांना आजूबाजूच्या परिसराचा विशेषतः संपूर्ण मावळ परिसराचा सहवास लाभला. शिवरायांनी हेरले कि स्वराज्याची सुरुवात करताना मावळ परिसराचा तसेच येथील किल्ल्यांचा खुप मोठा फायदा होऊ शकतो.अर्थात ह्या सर्व कार्यात महाराजांना दादोजी कोंडदेवांची खूप मदत झाली. स्वराज्याचे रोपटे वाढत असताना जे प्रमुख किल्ले पवन मावळ परिसरातील महाराजांनी घेतले त्यातील एक प्रमुख किल्ला म्हणजे तिकोना अर्थात वितंडगडाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
नवख्या ट्रेकर ने ट्रेकिंग ला सुरुवात करण्यासाठी जे उपयुक्त किल्ले आहेत त्यात लोहगड , विसापूर , तुंग आणि तिकोना ह्यांचा प्रामुख्याने नेहमी उल्लेख होतो. शिवाय हे किल्ले फिरत असताना पवन मावळचे विहंगम दृश्य पहायला मिळते ते निराळेच. ट्रेकक्षितिज संस्थेसोबत मी १० जुलैला तिकोना आणि बेडसे लेण्यांचा ट्रेक केला. बरेच जण तुंग- तिकोना असाही ट्रेक करतात.आद्ल्यादिवशी रात्री ३ वाजता गडाच्या पायथ्याचे गाव तिकोनापेठेत पोहोचलो.सकाळी साधारण ८ वाजता ट्रेक ला सुरुवात होणार होती.आणि विशेष म्हणजे ८ ला सुरुवात झाली सुद्धा.

तिकोना किल्ला पायथ्यापासून

किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून किल्ल्याच्या डाव्याबाजूकडून म्हणजे समोर दिसणारा तिकोना आपल्या उजवीकडे ठेवत वरती जाण्यासाठी मळलेली वाट आहे.वाट चुकण्याची अजिबात शक्यता नाही तरी नवखे असल्यास गावातून गाईड घेऊ शकता.सुरुवातीच्या १० मिनिटांच्या सोप्या चढाईनंतर छोटेखानी पठार लागते.ह्या पठारावर मेट म्हणजे किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वीची पहिली चौकी लागते.पठारावर पावसाळ्यातले दृश्य अतिशय विहंगम दिसते शिवाय पवना डॅम परिसराचे सौंदर्य मनाला सुखावून जाते . हे पाहून सरळ चालत राहायचे आणि उजव्या बाजूकडे वळल्यावर किल्ल्याचा पहिला मुख्य दरवाजा लागतो. ह्या दरवाज्याला नव्याने लाकडी दरवाजे बसवला आहे.प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस देवड्या आहेत.पुढे सरळ चालत राहिल्यावर उध्वस्त प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराच्या खुणा आज अस्तित्वात नाहीत परंतु प्रवेशद्वाराला लागून असलेले खंदे बुरुज सुस्थितीत आहेत. बुरुज पाहून सरळ चालत राहिल्यावर बालेकिल्ल्याच्या मार्गावर आपण चालू लागतो.वाटेत सर्वात पहिले मारुतीची दगडात कोरलेली मूर्ती पहायला मिळते.मारुतीची मूर्ती वीरश्री स्वरूपातील आहे.मारुतीने पायाखाली दैत्याला अथवा ज्याला पनौती देखील म्हंटले जाते त्याला मारलेले दिसते.ह्या मारुतीला चपेटदान मारुती म्हणतात.पुढे आल्यावर बालेकिल्ल्याला जाण्याआधी डाव्या बाजूला कड्यात छोटेखानी लेणे कोरले आहे. सध्या ह्या लेण्यात तळजाई देवीची स्थापना केली आहे.गुहेत देवीचा तांदळा प्रतिष्ठापित केला आहे.तळजाई मंदिराच्या समोर सदरेचे अवशेष आहेत.ह्या सदरेला सध्या रामाची गादी असा फलक लावला आहे.इथून दोन वाटा फुटतात. डावीकडची वाट बालेकिल्ल्याकडे घेऊन जाते तर उजवीकडची वाट किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाज्याकडे घेऊन जाते. शक्यतो तिसरा दरवाजा किल्ला उतरताना पहावा.

किल्ल्याचा पहिला दरवाजा
दुसऱ्या दरवाजाला लागून असलेले बुरुज

चपेटदान मारुती
तळजाई देवी मंदिराची गुहा

तळजाई देवी मंदिर पाहून सरळ बालेकिल्ल्याकडे कूच करायचे.वाटेत चुन्याचा घाणा पहायला मिळतो.पुढे डावीकडे वळल्यावर किल्ल्याचा बुरुज आणि छोटेखानी प्रवेशद्वार दिसते. पायऱ्यांच्या साहाय्याने आपण प्रवेशद्वार पार करतो.इथून वरती पाहिल्यास उजव्या बाजूला किल्ल्याची तटबंदी दिसते.एवढे अंतर पार करूनदेखील आपला बालेकिल्ल्यात प्रवेश झालेला नसतो, कारण पुढे सरळसोट कातळात कोरलेल्या गुडघाभर उंचीच्या पायऱ्या पार करून आपल्याला मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचावे लागते.पायऱ्या चढण्याआधी उजव्या बाजूला खांब टाके पहायला मिळते.मुळात हि टाकी नसून साठा करण्याची जागा असावी परंतु पावसाळयात होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे ह्या जागेचे टाक्यात रूपांतर झाले असावे असे रचनेमुळे वाटते. पायऱ्या चढल्यावर बऱ्यापैकी सुस्थितीत असलेले किल्ल्याचे देखणे प्रवेशद्वार पाहायला मिळते.प्रवेशद्वाराच्या डावीकडच्या खालच्या बाजूच्या खांबाचा भाग तसेच वरती कोरलेले फुलाचे शिल्प ढासळले आहे. परंतु मुख्य कमान आणि उजवीकडे कोरलेले फुलाचे शिल्प शाबूत आहे.प्रवेशद्वाराला लागून दोन मोठे बुरुज आहेत. बुरुजांमध्ये तोफा ठेवण्यासाठी जंग्याची सोय केलेली आहे.प्रवेशद्वारातून आत गेल्यावर बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. डाव्या बाजूला वळल्यावर बुरुजांच्या वरती आपण बरोबर उभे असतो.इथून संपूर्ण पवण मावळाचा नजारा तसेच तुंग, लोहगड हे किलले वातावरण स्वछ असेल तर दिसतात.इथून डावीकडून दगडी पायऱ्या चढून किल्ल्याच्या माथ्यावर आपला प्रवेश होतो. माथ्यावर जास्त अवशेष शिल्लक नाहीत. सर्वप्रथम माथ्यावर दिसते ते शिवमंदिर. मंदिरासमोर दोन भग्न झालेली नंदी ठेवले आहेत. विशेष म्हणजे मंदिराच्या बरोबर खाली चार खांब असलेले पाण्याचे टाके आहे.मंदिरासमोरून ताटावरून खाली पाहिल्यास प्रवेशद्वाराचे बुरुज आणि तटबंदीची रचना पाहून मला लोहगडाची आठवण झाली आणि ती तुम्हालाही येणार यात शंका नाही.

चुन्याचा घाणा
बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी वाटेत लागणाऱ्या पायऱ्या
बालेकिल्ला प्रवेशद्वार
शिवमंदिर
मंदिराखालील खांब टाके
लोहगड सदृश्य दिसणारा नजारा

मंदिर पाहून तटबंदी लगत उजव्या बाजूने चालल्यावर कड्यावरील बुरुजावर भगवा फडकावलेला दिसतो. मी बुरुजावर उभा असताना माझ्या नशिबाने ढग वरती येतानाचे अभूतपूर्व दृश्य मला पाहायला मिळाले.ढग वरती आल्यामूळे काही क्षण समोरचे काही दिसत नव्हते आणि धो धो पावसाचीही सुरुवात झाली.पाच मिनिटांनंतर पुन्हा सर्व पुर्वव्रत झाले. निसर्गाचा हा खेळ पाहून आणि अनुभवून गडावरिल शेवटचा अवशेष असले तळे पहायला गेलो.तळे कड्यावरील बुरुजाच्या डाव्या बाजूला आहे. तळे पाहून आपली गडफेरी संपते परंतु मी मागे सांगितल्या प्रमाणे उतरल्यावर तळजाई देवी मंदिराच्या उजव्या बाजूने (उतरताना डावी बाजू) उतरून किल्ल्याचा आणखी एक महादरवाजा पहायला गेलो.खरंतर हि गडावर येणारी आणखी एक वाट परंतु जंगल वाढल्याने हि वाट प्रचलित नाही.दरवाजा सुस्थित आहे. दरवाज्यातून ५ पायऱ्या उतरून खाली गेल्यावर डावीकडे किल्ल्याची तटबंदी बुरुज पाहायला मिळतो. पुढे मात्र वाट बंद होते.दरवाजा पाहिल्यावर खऱ्या अर्थाने गडफेरी संपली. किल्ला चढून उतरेपर्यंत सतत पाऊस पडत होता. मी अशा पावसात पहिल्यांदाच ट्रेक केला.डोळे भरून पावसातील सह्याद्रीचे गोमटे रूप पाहून मन विलक्षण सुखावले.तिकोनाची आठवण मनात साठवून बेडसे लेण्या पाहण्यासाठी पुढच्या प्रवासाला लागलो.बेडसे लेण्यांचा अनुभव आणि त्याचा इतिहास त्याबदल ब्लॉगवरील इतिहास सदरात लवकरच लिहीन.निजामशाही , आदिलशाही ,मुघलशाही, शिवकाळ तसेच इंग्रज राजवट पाहिलेला तिकोना किल्ल्याचे अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्व आहे व ते आपण जपायला पाहिजे

कड्यावरील बुरुज आणि आपला भगवा ध्वज
पाण्याचे तळे
किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरून दिसणारे विहंगम दृश्य
बालेकिल्ल्याआधी लागणारा किल्ल्याची दुसरी वाट जिथे येते तेथील दरवाजा

गडाच्या इतिहासाबद्दल – तिकोना किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवन मावळावरती लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे . किल्ला बांधला कोणी हे तरी सध्या अज्ञात आहे परंतु आजूबाजूचा परिसर पाहता आणि येथील आसपासच्या डोंगरात खोदलेल्या लेण्यांचा आढावा घेता किल्ला नक्कीच जुना असावा असे वाटते. निजामशाहीचा सरदार मलिक अहमद ह्याने इ.स १५८५ साली तिकोना किल्ला निजामशाहीत आणला.निजामशाहीचा अस्त झाल्यानंतर आदिलशहा व शहाजहान ह्यांच्यात झालेल्या तहाप्रमाणे तिकोना इ.स १६३६ साली आदिलशाहीत आला.बॉम्बे गॅझेट मध्ये इ.स १६४८ साली तुंग, तिकोना, राजमाची महाराजांनी ताब्यात आणल्याचा उल्लेख आहे.दिनांक ४ सप्टेंबर १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेऊन त्याचे नाम कारण वितंडगड केले.इ.स १६६० साली नेताजी पालकरांनी तिकोना किल्ल्याच्या भागावरच्या संरक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली.पुरंदरच्या ऐतिहासिक तहात इ.स १६६५ साली किल्ला मुघलांकडे गेला. परंतु पुन्हा १६७० साली महारांजानी किल्ला स्वराज्यात आणला. १६८२ साली संभाजी महाराज व अकबर ह्यांच्या ऐतिहासिक भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहायला आला होता परंतु त्याला किल्ल्यावरील हवा न मानवल्याने त्याला जैतापूरला धाडण्यात आले.पुढे औरंगजेबाने जेव्हा मराठ्यांचे एका पाठोपाठ किल्ले घ्यायला सुरुवात केली तेव्हा इ.स १७०२ मध्ये किल्ला मुघल सरदार अमानुल्लाखानाने घेतला.औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून “अमनगड” ठेवले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर किल्ला स्वराज्यात आला तो अगदी शेवटपर्यंत म्हणजे इ.स १८१८ पर्यंत ताब्यात राहिला. इ.स १८१८ मध्ये इंग्रजांबरोबर झालेल्या लढाईत किल्ल्याचे नुकसान झाले आणि किल्ला कर्नल प्रॉथर ने जिंकून घेतला.

इतिहास माहिती संदर्भ – ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ६ – औरंगजेबाच्या दरबारातील अखबार त्यातील १४ सप्टेंबर १६८२ चा अखबार , शिवपुत्र संभाजी – डॉ.कमल गोखले पृष्ठ १०७,Gazetteer of the Bombay Presidency: Poona, Vol. XVIII, Pt. II (Refer History Part),

One thought on “किल्ले तिकोना उर्फ वितंडगड

Leave a comment