किल्ले त्रिंगलवाडी

नाशिक (अथवा नासिक) शहर आणि आसपासच्या प्रदेशाला भौगोलिक , ऐतिहासिक तसेच अध्यात्मिक पार्श्वभूमी लागली आहे .त्यामुळे ह्या परिसरात भरपूर किल्ले , मंदिरं , लेण्यांची मांदियाळी आहे. इगतपुरी जवळील त्रिंगलवाडी गावात १२ व्या शतकातल्या जैन लेण्या कोरलेल्या पहावयास मिळतात.ह्या जैन लेण्यांच्या मागे त्रिंगलवाडी नावाचा छोटेखानी किल्ला इतिहासाची अभूतपूर्व साक्ष घेऊन उभा आहे.त्रिंगलवाडी व त्र्यंबकगड हे दोन वेगळे किल्लेआहेत, बऱ्याच जणांना ह्या दोन किल्ल्यांबाबत संभ्रम निर्माण होतो.त्रिंगलवाडी किल्ला गाठण्यासाठी अर्थात पायथ्याचे त्रिंगलवाडी गाव गाठावे.त्रिंगलवाडी गाव इगतपुरी पासून ७ किलोमीटर अंतरावर आहे. स्वतःची ४ चाकी गाडी असल्यास लेण्यांच्या अगदी जवळ पर्यंत गाडी जाऊ शकते. बस साठी मात्र गावातील हनुमान मंदिरापर्यंतच जाता येते.मी ट्रेकक्षितिज संस्थेमार्फत ट्रेक करत असल्याने आमची बस गावातील हनुमान मंदिराजवळ थांबवली गेली. मंदिरापासून लेण्यांपर्यंत जाण्यासाठी लेण्यांच्या मागे असलेल्या डॅम ला समांतर चालून पुढे डाव्या बाजूने सरळ साधारण ३ किलोमीटर चालून लेण्यांपर्यंत पोहोचता येते.चालताना लेणी परिसर आणि किल्ला समोर दिसत राहतो.लेण्यांच्या परिसरात पोहोचल्यावर लेण्यांच्या डावीकडून किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे.सहसा चुकण्याची शक्यता नाही परंतु पहिल्यांदा जात असाल आणि ट्रेकिंग चा अनुभव कमी असेल तर गावातून वाटाड्या घेऊन जाऊ शकता.डावीकडून थोडे वर चढल्यावर विस्तृत पठार लागते.पठारावर एक घर आहे आणि आजूबाजूला सोनकीची तसेच बोराज जातीची फुले पावसाळ्यात उमललेली दिसतात.पठार मोठे असल्याने गुरे चरण्यासाठी सोडलेली पहावयास मिळतात.

डॅम वरून चालताना त्रिंगलवाडी किल्ल्याच्या उजवीकडे असणाऱ्या डोंगराचे टिपलेले छायाचित्र .

विस्तृत पठार आणि त्रिंगलवाडी गाव परिसर

पठारावर पोहोचल्यावर छोटा सुळका लागतो , सुळक्याच्या उजवीकडून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. इथून सरळ आपण डोंगरसोंडेवरुन चालत राहतो व ह्या डोंगरसोंडेवरुनसमोरच किल्ल्याची कातळटोपी दिसते.कातळटोपीच्या दोन्ही बाजूने किल्ल्यावर जाता येते.पण किल्ल्याच्या उत्कृष्ट पायरी मार्गाने प्रवेश करावयाचा असल्यास डावीकडील मार्ग निवडावा आणि उतरताना उजव्या बाजूने उतरावे.डाव्या बाजूने डोंगराच्या कोपऱ्याने आपण चालत राहिल्यावर शेवटी उजव्या बाजूस वळल्यावर खिंडीत कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. गुडघाभर उंचीच्या साधारण ६० पायऱ्या चढून किल्ल्याच्या कोकण दरवाज्यातून गडावर प्रवेश होतो.दरवाजाच्या शेजारी हनुमानाची पायाखाली पनोती चिरडलेली वीररूपातील मूर्ती कोरली आहे.दरवाज्याच्या दोन्ही बाजूला शरभ तसेच त्याखाली सूर्य चंद्र कोरले आहेत.दरवाजा उत्तम अवस्थेत आहे.दरवाजाच्या दोन्ही बाजूस पहारेकरांसाठी अर्धवट देवड्या कोरल्या आहेत.इथून पुढे सरळ चालत राहिल्यावर उजव्या बाजूने थोडे वर गेल्यावर बालेकिल्ल्याच्या खाली येऊन पोहोचतो.इथून थोडा वळसा घालून वर आल्यावर बालेकिल्ल्यात प्रवेश होतो.बालेकिल्ल्याच्या खाली सपाटीवर किल्ल्याचे बरेचसे अवशेष आहेत.

हा किल्ल्याचा कातळटप्पा , इथूनच डाव्या बाजूने किल्ला चढावा व उजव्या बाजूने किल्ला उतरावा

कातळात कोरलेल्या पायऱ्या

हनुमानाची मूर्ती

कोकण दरवाजा

वरती आल्यावर आम्ही सर्व सपाटीवरील अथवा गडमाचीवरील अवशेष पाहायला सुरुवात केली. पाऊस पडून गेल्यामुळे गडावर संपूर्ण हिरवळ होती.सरळ खाली उतरत गेल्यावर सर्वप्रथम पाहिले ते भवानी मंदिर.इथे मला एक सांगावेसे वाटेते कि किल्ला फिरताना किल्ल्याचा माथा लंबगोलाकार असल्याने गडफेरी डावीकडून उजवीकडे हि करता येते अथवा उजवीकडून डावीकडेहि करता येते.किल्ल्याच्या उजव्या बाजूने ज्यांना उतरवायचे असल्यास त्यांनी डाव्याबाजूने किल्ला पाहावा.डाव्या बाजूने पहात असताना सर्वप्रथम भवानी मंदिर आणि मग पुढील खांब टाके , गुहा इत्यादी अवशेष पाहावे. आणि ह्या उलट क्रम उजवीकडून गडफेरी सुरुवात केल्यास लागतो. भवानी मंदिरात शेंदूर फसलेल्या भवानी माता, गणपती, आणि भैरोबाची मूर्ती ठेवली आहे.मंदिराच्या समोर उघड्यावर शिवलिंग ठेवले आहे.इथून पुढे सरळ चालत गेल्यावर पाण्याचे एक छोटे टाके तर त्या पुढे एक मोठे अथवा लांब टाके पहायला मिळते.टाकी पाहून पुढे चालत राहिल्यावर पाणी असलेली गुहा लागते.गुहा पाहिल्यावर थोडेसे पुढे गेल्यावर ढासळलेल्या वाड्याचे अवशेष पहायला मिळतात.वाड्याच्या बरोबर डाव्या बाजूला किल्ल्याच्या टोकावर चौकीचे अवशेष दिसतात.

पाण्याचे टाके

गुहा

ढासळलेल्या वाड्याचे अवशेष

चौकीचे अवशेष

सर्व अवशेष पाहून किल्ल्याच्या उजव्या बाजूने अर्थात पूर्वाभिमुख दरवाज्याने उतरावयास सुरुवात केली.किल्ल्याचा पूर्वाभिमुख दरवाजा उध्वस्त अवस्थेत आहे.केवळ तुरळक तटबंदी शिल्लक आहे.इथून सरळ खाली उतरल्यावर आपण पुन्हा डोंगरसोंडेवर येतो जिथून किल्ल्याची कातळटोपी आपणास सर्वप्रथम गड चढताना दिसते.इथून आल्या वाटेनेच आम्ही सर्व परत पठारामार्गे लेण्यांच्या परिसरात आलो.

गडाच्या इतिहासाबद्दल – गडाखालील जैन लेण्यांनुसार कदाचित गडाची निर्मिती इसवी सणाच्या १०व्या शतकात झाली असावी. मराठ्यांकडे हा किल्ला कधी आला ते समजत नाही.कदाचित मोरोपंतांच्या नाशिक मोहिमेत हा किल्ला स्वराज्यात आला असावा.१६८८ च्या शेवटी किंवा १६८९ च्या सुरुवातीला मोगलांनी हा किल्ला फितुरीने घेतला अशी नोंद आढळते.फेब्रुवारी १६८९ मध्ये औरंगजेबाने मातबरखानास लिहिलेल्या फर्मानात लिहिले आहे कि “त्र्यंबकचा किल्ला जिंकून तुम्ही त्रयंगलवाडीच्या किल्ल्याला वेढा घातला आहे.”फितुरीच्या नोंदीला ह्या फर्मानाने पुष्टी मिळते.नानासाहेबांच्या रोजनिशीत इ.स १७५०-५१ मधील नोंदीत कावनाई किल्ल्याचा सरदार अथवा किल्लेदार बहिर्जी बाळकवडे ह्यास आज्ञा केली आहे कि “किल्ले त्रिंगडी (अर्थात त्रिंगलवाडी) येथील कारखाननीसी सदाशिव खंडोकडे ७ रूपये शाही शिरस्त्यावर (महिना ७ रुपये पगारावर असावे ) होती.त्याला ती कमी वाटल्याने तो काम सोडून घरी राहिला आहे तेव्हा त्यास काढून कारखाननीसी गोविंद कृष्ण ह्यास १०० रुपये वार्षिक शिरस्त्यानुसार दिली आहे.तेव्हा किल्याची कारखाननीसी त्याच्याकडे द्यावी.: ह्या नोंदीवरून एक तर कारखाननीस कोण त्याचा पगार किती आणि तसेच किल्ला मराठ्यांकडे होता हे समजते.कॅप्टन ब्रिग्ज ने सण १८१८ साली त्रिंबकगड घेतल्यावर त्रिंगलवाडी सुद्धा ताब्यात घेतला आणि त्याने किल्ल्याला भेट दिल्याच्या नोंदी तसेच किल्ल्याला दोन बाजूंनी जाता येते असे लिहिले आहे.

संदर्भ -शिवपुत्र संभाजी – डॉ.कमल गोखले पहिली आवृत्ती (पृष्ठ २३०,२३३,३१४), Selections from the Satara Rajas and the Peshwa’s Diaries III ,Balaji Bajirav Peshwa पृष्ठ- १९१,The Gazetteers Of The Bombay Presidency- Nasik District Volume XVI,1883 Page 660

One thought on “किल्ले त्रिंगलवाडी

Leave a reply to Rajashree Cancel reply