महाराष्ट्रातील उत्तुंग आणि बेलाग दुर्गांसाठी नगर जिल्हा ओळखला जातो.नगर जिल्ह्यात असलेल्या दूर्गखजिन्यांत हरिश्चंद्रगड , बितनगड , पट्टागड तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई ह्यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.शिवाय सांदण व्हॅली हा निसर्गनिर्मित चमत्कार तर आहेच.ह्या सर्वांसोबत आपल्या आसपास भंडारधरा धरणाच्या साथीनं प्रवरा नदीचा उगमस्थान असलेला किल्ला रतनगड इतिहासाची अजोड साक्ष घेऊन दिमाखात उभा आहे.कोजागिरी पौर्णिमाच्या सुंदर मुहूर्तावर किल्ला पाहण्याचा योग आला.परंतु मानवाने निर्मित केलेल्या “नियमित” प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल “अनियमित'”झाला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून ऑक्टोबर महिन्यातील माझा ट्रेक पावसाळी ट्रेक झाला.पण त्याची सल नाही कारण सह्याद्री ऊन असो , वारा असो किंवा पाऊस असो निसर्गाच्या सौंदर्याची उधळण कायम करतच असतो.त्यामुळे ट्रेक अतिशय उत्तम झाला.
आदल्यादिवशी रात्री घोटी मार्गे साम्रद गावाअलीकडे चेकपोस्ट च्या आधी गावातीळ गॅरेजच्या शेडखाली मस्त टेन्ट लावून थोडा वेळ विश्रांती घेतली.सकाळी बरोबर ६ वाजता चेकपोस्ट सोडून साम्रद गावात पोहोचलो.हा संपूर्ण परिसर वनविभागाकडे असल्याने चेकपोस्ट पहाटे ५ वाजता उघडते. गावात पोहोचल्यावर ऑक्टोबर महिना असून सुद्धा पाऊस धो धो पडत होता.पावसाचा जोर इतका होता कि सर्वानी मिळून शेवटी साधारण ८ च्या सुमारास असे ठरवले कि किल्ला उद्या एका दिवसात सर करावा आणि आज अम्रुतेश्वर मंदिर आणि काही आजूबाजूचा परिसर पाहता आला तर पाहायचा.त्या नुसार साधारण ८.३० वाजता सकाळी अमृतेश्वर मंदिर पहायला निघालो.अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावाच्या पायथ्याशी आहे. रतनगडावर साम्रद तसेच रतनवाडीतून जाता येते. साम्रद ते रतनवाडी साधारण ८ किलोमीटर चे अंतर आहे.साम्रद ची वाट वाटाड्या असल्याशिवाय जाऊ नये.साम्रद ते रतनवाडीचा रस्ता अत्यंत खराब आहे.अमृतेश्वर मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा पावसाचा जोर कमी झालेला.अमृतेश्वर मंदिर अत्यंत देखणे आहे.१० – ते ११ व्या शतकातल्या झांज राजांनी हे मंदिर बांधले. मंदिराला दोन प्रवेशद्वारे आहेत. चालुक्य शैलीतील हे असे मंदिर उत्कृष्ट शिल्पशैलीचा नमुना आहे.मंदिरावरील देव देवतांच्या मुर्त्या , मैथुन शिल्पे तसेच समुद्रमंथनाचा देखावा तर निश्चित पाहण्यासारखा आहे.मंदिराबद्दल ऐतिहासिक माहिती सविस्तर ब्लॉगद्वारे लिहीनच.मी गेलो तेव्हा गाभाऱ्यात जाता आले नाही कारण गाभारा संपूर्ण पाण्याने भरलेला होता. मंदिरात शिरण्याआधी खूप सुंदर मोठी पुष्करणी आहे. पुष्करणीच्या कडेने तसेच मध्ये छोटेखानी देवकोष्टके कोरले आहेत. प्रत्येक देवकोष्टकांवर कळस आहे ज्यावर नक्षीकाम केले आहे. देवकोष्टकांत विविध देवतांच्या मुर्त्या आहेत.



मंदिर पाहून आम्ही परत साम्रद गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला कारण तोपर्यंत पाऊस थांबलेला होता आणि आम्ही विचार केला कि पूर्ण पाऊस थांबला असेल तर रतनगड अजूनही चढून गडावर राहता येऊ शकते.साम्रद गावात परत आलो तेव्हा पावसाची रीप रीप चालूच होती. परंतु आम्ही किल्ला सर करण्याचा निर्णय घेतलेलाच आणि तोहि साम्रद मार्गेच. साधारण १२ वाजता चढाईला सुरुवात केली. साम्रदवरुन किल्ल्यावर जाणारी वाट सरळ सोट नाही आहे. त्यामुळे मी आधी सांगितल्याप्रमाणे वाटाड्या अवश्य न्यावा. सुरुवातीला मुख्य जंगल लागण्याआधी आपण साधारण एक ते दीड किलोमीटर चालत राहतो. इथून पुढे जंगलातून खडा चढ सुरु होतो. पाऊस सतत पडत असल्याने वातावरण थंड होते.साधारण तासाभरानंतर एक पठार लागते तिथून पुन्हा सरळ खडा चढ सुरु होतो.आम्ही जात होतो तेव्हा एक मिनिटेही पावसाची रीपरीप बंद झाली नव्हती.साम्रद ते रतनगड च्या वाटेत २ शिड्या लागतात, ह्यातील दुसरी शिडी चढली कि आपण चिंचोळ्या मार्गावर पोहोचतो. येथून डावीकडची वाट हि रतनवाडीकडून किल्ल्याकडे येणारी वाट साम्रदच्या वाटेला येऊन मिळते.बरोबर दोन ते सव्वा दोन तासांनी आम्ही आरामात दुसरी शिडी चढून वर आलो. इथून खरं तर बाण सुळका पहायला मिळतो. परंतु मी आधी सांगितल्याप्रमाणे एकही मिनिटे पाऊस न थांबल्याने आजूबाजूचे डोंगर अजिबात दिसत नव्हते


पठारावरील दृश्य (दाट धुक्यामुळे आजूबाजूचे काही दिसत नव्हते)

दुसरी शिडी चढून रतनगडावरून येणाऱ्या वाटेवर पोहोचताना
इथूनपुढे संपूर्ण वाटेवर रेलिंगज लावलेले आहेत. पुढे बराच वेळ सरळ चालत राहिल्यावर आपण नंतर डावीकडे वळून डोंगराला वळसा घालतो आणि डावीकडून परत उजवीकडे थोडे वळल्यावर किल्ल्याच्या त्र्यंबक दरवाजायापर्यंत जाणाऱ्या खिंडीत पोहोचतो. पुढे गुढघाभर उंचीच्या ६० पायऱ्या कोरलेल्या आहेत. वाटेत लाल रंगाच्या खेकड्यांचे कळप च्या कळप पायाखाली फिरत होते. त्यामुळे त्यांना चुकवून नीट जावे लागत होते. तसेच रेलिंग्ज अथवा कातळावरून हात ठेवताना अशा वेळेस जपून ठेवावा खेकडा किंवा अन्य पावसाळी किडे हाताला लागण्याची शक्यता असू शकते. पायऱ्या व्यवस्थित चढून गोमुखी धाटणीच्या देखण्या त्र्यंबक दरवाज्यापर्यंत पोहोचलो.

त्र्यंबक दरवाजा
त्र्यंबक दरवाजा पाहून आत शिरलो . नेहमी आपल्याला जशा देवड्या दिसतात तश्या पहारेकरांच्या देवड्या इथेही पाहायला मिळतात. देवड्या पाहून पुढे गेल्यावर गडावर कारवी फुलली होती. असे म्हंटले जाते हि कारवी दर वर्षी नाही फुलत ठराविक वर्षांनी ती फुलते.पुढे डावीकडे वळून गडाला फेरी मारायला सुरुवात केली. पाऊस पडतच होता त्यामुळे गडावर हिरवळ होती.काही पाण्याची टाकी वाटेत लागली त्यातील एका टाक्यात शिवलिंग आणि छोटा नंदी कोरला होता. हे पाहून पुढे आल्यावर एका पडक्या बुरुजाचे अवशेष पाहायला मिळतात .स्थानिक ह्यास राणीचा हुडा म्हणतात.बुरुजाची रचना बहुदा किल्ल्याच्या अंतर्गत भागावर लक्ष ठेवण्यासाठी केली असावी.बुरुज पाहून आपण किल्ल्यावर उत्तम अवस्थेत असणाऱ्या आणखी एका दरवाजातून प्रवेश करतो.ह्या दरवाज्यावर मत्स्यावतारातील विष्णू , गणेश ,रिद्धी – सिद्धि आणि हनुमानाचे शिल्प कोरले आहे.इथूनच उजव्या बाजूने खाली उतरल्यावर गडाचा तिसरा गणेश दरवाजा लागतो. दरवाज्यावर सुरेख गणेश मूर्ती कोरली आहे.हा दरवाजा रतनवाडी गावात जातो. ह्या वाटेत सुद्धा दोन शिड्या लावल्या आहेत. गणेश दरवाजा चढून पुन्हा वर आलो आणि ज्या दरवाज्याने अर्थात ज्यावर मी आधी सांगितल्याप्रमाणे शिल्प कोरली आहेत त्या दरवाजाच्या पुढे डाव्याबाजूस कोनाड्यात दोन टाकी कोरली आहेत स्थानिक गावकरी त्यामधील एका टाक्यातुन प्रवरा नदीचा उगम झाला आहे असे सांगतात.टाक्यांच्या पुढे छोट्या गुहेत रत्नादेवीचा तांदळा आहे आणि त्यापुढे मोठी प्रशस्थ गुहा आहे .ह्या गुहेत आम्ही खरंतर राहणार होतो परंतु आधीच एक समूह आल्याने आणि आम्हाला उशीर झाल्याने आम्ही जेवून लगेच अर्ध्या तासात पुन्हा गडउतार होण्याचा निर्णय घेतला.कारण एव्हाना दुपारचे ३ वाजलेले. पुन्हा आल्या वाटेने त्र्यंबक दरवाज्याकडे निघालो, फक्त वाटेत एक ठिकाण राहिले होते ते सांगतो. त्र्यंबक दरवाजाच्या वरील बाजूस एक निसर्गनिर्मित नेढे आहे ते जरूर पाहावे. आमच्यातील काही जणांनी ते परतताना पाहिले.मी थोडा थकवा जाणवत होता म्हणून नाही पाहिले. त्र्यंबक दरवाजाच्या मार्गाने पुन्हा उतरून जिथे साम्रद आणि रतनवाडीची वाट मिळते तिथे पोहोचलो आणि उतरताना रतनवाडीच्या वाटेने उतरलो. कारण उतरताना कदाचित अंधार होणार होता आणि अशा वेळेस साम्रद गावाची वाट हि दाट जंगलाची आहे तेव्हा ती टाळण्याचा निर्णय घेतला गेला.रतनवाडीच्या वाटेने उतरायला संध्याकाळचे ६.३० ते ७ झाले.पाऊस काय थांबायचे नाव घेत नव्हता. रतनवाडी ते साम्रद गावातील राहण्याच्या ठिकाणी पोहोचताना वाटेत इतके धुके होते कि ट्रॅक्स चालवणाऱ्या माणसाला समोरचे दिसतही नव्हते.पण हि लोकं इतकी पारंगत असतात त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी.चालकाने व्यवस्थित सुखरूप साम्रद गावात पोहोचवले.

गुहेतील नंदी आणि शिवलिंग

पडका बुरुज अथवा राणीचा हुडा

गडावरील देखणा दुसरा दरवाजा (दरवाज्यावरील शिल्प सुद्धा दिसत आहेत)

गणेश दरवाजा

गणेश शिल्प

रत्नादेवीचा तांदळा

प्रशस्थ गुहा
अशाप्रकारे कोजागिरी स्पेशल ठरलेला ट्रेक पावसाळी ट्रेक झाला. रतनगड प्रसिद्ध आहे तो आजूबाजूला दिसणाऱ्या बेलाग दुर्ग सौंदर्यामुळे. दुर्दैवाने एका सेकंदासाठीपण आम्हाला अलंग,मदन,कुलंग म्हणा अथवा बाण सुळका ह्यामधील काही पहायला मिळाले नाही. आणि गम्मत म्हणजे दुसऱ्या दिवशी सर्व वातावरण पाऊस आणि धुके नसल्याने स्वछ दिसत होते. पण असो, हा अनुभव सुद्धा माझ्या दृष्टीने सुखद होता.पावसाळ्यातला रतनगड पाहायला मिळायला आणि विशेष म्हणजे भर पावसात तो मी साम्रद च्या वाटेने केला ह्यात वेगळाच आनंद होता. तेव्हा रतनगड नावाचे रत्न तुम्ही सुद्धा पाहून या.
गडाच्या इतिहासाबद्दल- रतनगडाचा फारसा उल्लेख शिवकाळात आढळत नाही.गॅझेट मध्ये १७६३ साली हा किल्ला महादेव कोळी सरदार जावजी ह्याने ताब्यात घेतला असा उल्लेख आला आहे.नानासाहेबांच्या कारकिर्दीत सण १७४८-४९ मधे रतनवाडीच्या मंदिरासाठी काही रक्कम मिळाल्याचे उल्लेख सापडले आहेत.हि रक्कम किल्लेदार बालोजी कराळे ह्यांनी किल्ले रतनगड घेण्यासमयी काही नवस केलेला त्या प्रमाणे दिली गेली.इ. स १८२० साली कॅप्टन गोड्डार्ड ने किल्ला घेतल्याची नोंद आढळते परंतु परत १८२४ साली आधीचा किल्लेदार गोविंदराव ह्याने किल्ला परत हस्तगत केला.ह्यासाठी रामजी भांगरे ह्यांचा त्याला पाठिंबा होता.परंतु रतनगड पुन्हा इंग्रजांकडे गेला आणि त्यांनी शिरस्त्याप्रमाणे पुन्हा किल्ल्याच्या मुख्य वाटा सुरुंग लावून उडवल्या. रामजी भांगरेंनी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले होते परंतु त्यांना पकडल्यावर काळ्या पाण्याची शिक्षा झाली.पुढे रामजींचा मुलगा राघोजींनी सुद्धा वडिलांचा वारसा पुढे चालवत इंग्रजांवर असंतोष आपल्या कार्यातून धगधगत ठेवला. दुर्दैवाने हा वीर शेवटी २ जानेवारी १८४८ साली पकडला गेला व पुढे खटला चालून ठाण्याच्या तुरुंगात ह्या आद्य क्रांतिकारकाला फाशी देण्यात आली. ठाणे कारागृहात ह्या वीराचा पुतळा आजही आहे.
संदर्भ- सातारकर व पेशव्यांची रोजनिशी भाग २ बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे) खंड २ पृष्ठ – १०१,Gazetteer Bombay Presidency Ahmadnagar Vol-i (1884) Page 735,736. WWW.Durgbharari.in
👌👌
LikeLike