बागलाण रेंज ट्रेक भाग ४ – (किल्ले मुल्हेर – मोरागड)

किल्ले हरगड उतरून उद्धव महाराजांच्या आश्रमात राहून ट्रेक मधला शेवटचा टप्पा पार करण्यासाठी उत्साहाने सकाळी लवकर उठलो. थंडीचा जोर कायम होता.उठून शुक्ल काकांकडे नाश्ता करून लगेच पुन्हा मुल्हेर च्या पायथ्याकडे निघालो. मुल्हेर किल्ल्याकडे जाताना मी हरगडच्या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे अर्ध्या रस्त्यानंतरचा रस्ता खचल्याने पुढे चालत जावे लागते. मुल्हेर आणि मोरा गड एकमेकांना लागून आहेत. हे दोनही भाऊ एकमेकांपासून डोंगर सोंडेने विलग झालेले आहेत. सर्वात पहिले मुल्हेर कडे मोर्चा वळवला. हरगडाप्रमाणे मुल्हेरला जाताना मुल्हेर माचीपर्यंत जावे तिथून समोर गणेश मंदिर आणि तळे लागते परंतु आता तिथे न जाता डावीकडे वळायचे आणि सरळ चढायला घ्यायचे, चढत असताना कायम डोंगरावर एक शेंदूर फासलेला मारुती दिसतो .आपल्याला त्या मारुतीपर्यंत पोहोचायचे असते.चढताना वाटेत देवीचे मंदिर पहायला मिळते. सप्तशृंगी देवीची मूर्ती मंदिरात ठेवली आहे .मंदिराला छप्प्पर नाही. पुढे वाटेत एक बुजलेले टाके लागते. साधारण मुल्हेर डोंगराच्या समांतर आल्यावर डावीकडे मारुतीच्या दिशेने वळावे आणि एक सोपा चढ चढल्यावर आपण दीड तासांत मारुतीच्या मूर्तीपर्यंत पोहोचतो. मूर्ती व्यवस्थित पाहता येते, परंतु डोंगरात खोदल्याने गर्दी करू नये सावकाश तीन ते चार जणांनी एक एक करून जावे.

सप्तशृंगी देवीचे मंदिर

पायथ्यापासून दिसणारा मारुती

मारुतीची मूर्ती पाहून सरळ गेल्यावर आपल्याला किल्ल्याचा पहिला मुख्य दरवाजा लागतो. दरवाज्याला लागूनच तटबंदी आणि बुरुज आहेत.आत डाव्या बाजूला कड्यावरती एक आयताकृती रेखीव गुहा खोदली आहे आणि त्याच्या बरोबर समोर पाण्याचे टाके लागते.हे पाहून थोडे मागे गेल्यावर गुहांचा संच पहायला मिळतो. गुहांचे खांब पाहता आणि एकंदर खोदण्याचा प्रकार पाहता गुहा प्राचीन असाव्यात असे वाटते. गुहा पाहून पुढे गेल्यावर गोमुखी धाटणीचा दुसरा दरवाजा लागतो. मुल्हेर चे दरवाजे पाहताना त्यांच्या कमानी वेगळ्या भासतात.दुसऱ्या दरवाज्यापाशी बरीच पडझड झालेली दिसते.दरवाजा पाहून सरळ गेल्यावर समोर अतिशय उत्तुंग बुरुज आणि गडाचा तिसरा दरवाजा पाहायला मिळतो. आधीच्या दोन दरवाजांपेक्षा हा दरवाजा थोडा वेगळा आणि शिवकाळातील धाटणीचा वाटतो . तिसऱ्या दरवाजातून आपण मुख्य बालेकिल्ल्यावर प्रवेश करतो.बालेकिल्ल्यावर प्रवेश केल्यावर सर्वप्रथम उजवीकडे वळल्यावर छोटा तलाव लागतो. तलावाच्या समोर साल्हेर-सालोटा व त्यांच्या सानिध्यातील डोंगर रांगा दिसतात. तलाव पाहून पुढे गेल्यावर ५ पाण्याची टाकी कोरली आहेत .टाकी पाहून डावीकडे पाहिल्यावर कमान आणि दरवाजा सदृश्य वास्तू आमच्या नजरेस पडली म्हणून आम्ही तिथे गेलो. हि कमान अथवा दरवाजा एखाद्या वाड्याचा असावा असा अंदाज वाटतो . दरवाज्याच्या खांबावर अतिशय उत्तम नक्षीकाम केले आहे ,तसेच दरवाजाच्या दोन्ही बाजूस कमळपुष्प कोरला आहे. कमळपुष्पाच्या खाली दोन छोटे कोनाडे कोरले आहे. हा शिल्लक असलेला दरवाजा आणि कमान अभूतपूर्व ऐतिहासिक वास्तूची साक्ष देत उभी आहे. कमान पाहून सरळ मोरा गडाच्या दिशेने चालत राहायचे वाटेत कोरडे पाण्याचे टाके आणि मारुतीची मूर्ती पहायला मिळते.

पहिला दरवाजा – मुल्हेर

दुसरा दरवाजा – मुल्हेर

तिसरा दरवाजा – मुल्हेर

तलाव

संभाव्य राजवाड्याचा शिल्लक राहिलेला दरवाजा

इथून पुढे गेल्यावर उजव्या बाजूलाच सर्वात मोठा पाण्याचा तलाव लागतो जो आम्ही पाहिला तेव्हा कोरडा होता आणि ह्या तलावात सुद्धा पाण्याची पातळी मोजण्याचा खांब रोवला होता. पाण्याची पातळी मोजण्याचा खांब हा समान धागा हा ट्रेक करताना जाणवला.तलाव पाहून पुन्हा मोरा गडाच्या दिशेने चालू लागलो तेव्हा एका झाडाखाली उध्वस्थ दगडी चौथऱ्यावर भडंगनाथाचे मंदिर दिसले. मंदिरात पितळी मुखवटा ठेवला आहे. तसेच चौथऱ्याच्या खाली एक शिलालेख कोरला आहे. शेंदूर लावल्याने तो अस्पष्ट झाला आहे.मंदिर पाहून कडेने सरळ जायचे आणि थोडे खाली उतरल्यावर कडा कोरला आहे आणि त्या कड्याच्या कपारीत पायऱ्यांच्या साहाय्याने भुयारी दरवाजा अथवा छोटा दरवाजा कोरला आहे. दरवाजा उतरायला सोपा आहे परंतु घाई करू नये.उतरण्याच्या जागी दरवाजा ते जमीन हे अंतर जास्त असल्याने सावकाश उतरावे. उतरल्यावर आपण बरोबर मुल्हेर आणि मोराच्या नैसर्गिक पुलावर अथवा दोन्ही किल्ल्यांना जोडणाऱ्या वाटेवर येतो. दरवाजा उतरल्यावर दरवाज्याच्या मागे दोन पाण्याची टाकी आहेत. त्यातील एका टाक्यातील पाणी अतिशय थंडगार आणि पिण्यालायक आहे.

भडंगनाथ मंदिर

मुल्हेर वरून उतरुन मोराकडे जाताना लागणार शेवटचा दरवाजा

मुल्हेर च्या शेवटचा दरवाजा आणि त्याच्या मागे खोदलेल्या तटाचे मोरा किल्ल्यावरून टिपलेले विहंगम दृश्य

मुल्हेर उतरून लगेच मोरा चढायला सुरुवात केली. मोरा किल्ल्याच्या सुरुवातीच्या पायऱ्या बहुदा इंग्रजांनी उध्वस्त केल्या असाव्यात त्यामुळे इथे सुद्धा एकमेकांची मदत घेऊन चढावे अर्थात कठीण असे काही नाही. साधारण २० ते २५ पायऱ्या चढून आपण मोरागड च्या पहिल्या दरवाजाजवळ पोहोचतो.दरवाजा अत्यंत व्यवस्थित अवस्थेत आहे. दरवाजाला उजव्या बाजूने बुरुजाची जोड आहे. दरवाजाच्या कोनाड्यात गणेश आणि मारुती मूर्ती कोरली आहे. सरळ चालून वळसा घेतल्यावर एक कोरडा टाके लागते ते पाहून परत वळल्यावर किल्ल्याचा दुसरा दरवाजा लागतो. हाही दरवाजा सुस्थितीत आहे आणि हा दरवाजा पार करून आपण मोरा किल्यात प्रवेश करतो.

मोरा पहिला दरवाजा

मोरा किल्ला दुसरा दरवाजा

मोरा किल्ल्यावर आल्यावर आपल्याला काही पाण्याची टाकी पाहायला मिळतात .टाकी पाहून टोकाला गेल्यावर मोठा खोदीव तलाव पाहायला मिळतो. एकंदरीत ह्या पूर्ण पट्ट्यात गडांवर पाण्याची व्यवस्था उत्तम असलेली दिसली. थोडे तटबंदीचे अवशेष वगळता आणखी काही मोरागडावर पाहण्यासारखे नाही. गडाच्या दुसऱ्या दरवाज्यातून म्हणजे बालेकिल्ल्यात ज्या दरवाज्यातून आपण शिरतो तिथल्या तटबंदीवर उभा राहिलो आणि संपूर्ण प्रदेशाचे विहंगम दृश्य अनुभवले. साथीला वारा होताच. मन आनंदाने न्हाऊन निघाले कारण आयुष्यातला अप्रतिम ट्रेक पूर्णत्वास जात होता.

दुसऱ्या दरवाजाच्या तटावरून दिसणारा मुल्हेर आणि परिसर

तलाव

तलाव पाहून किल्ला उतरायला घेतला. किल्ला उतरताना जिथे मोरा आणि मुल्हेर ची वाट एक होते तिथून खाली उतरावे. उतरताना भक्कम तटबंदी आणि बुरुज पाहायला मिळतात. उतरण्याची वाट मळलेली आहे. साधारण पाऊण तासात उतरलो आणि सोमेश्वर मंदिराजवळ पोहोचलो. ज्या वाटेने आपण मोरागड उतरलो त्याच वाटेने आपण चढूही शकतो. सोमेश्वर मंदिराला १२ कमानी आहेत. हे मंदिर साधारण इसवी सण १४८० साली बागुल राजांनी बांधले असे म्हंटले जाते. ह्या मंदिराची एक गमतीदार बाजू आहे. साधारण महादेव मंदिरात सरळ आपण गाभाय्रात जातो ह्या मंदिरात मात्र अंधारात चिंचोळ्या वाटते पहिले डावीकडे मग उजवीकडे काटकोनात वळून उतरावे लागते. गाभाऱ्यात जाताना डोके सांभाळावे कारण वाट एकदम निमुळती आणि कमी उंच असलेली आहे.मंदिराच्या आसपास काही पुरातन शिवपिंडी ठेवल्या आहेत.मंदिराच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर गणेशाची शेंदूर फासलेली मूर्ती ठेवली आहे.मंदिर पाहून मुल्हेरमाचीकडे जायला निघालो तेव्हा वाटेत बागुल राजांच्या मुल्हेर किल्ल्याच्या किल्लेदारांची नावे लिहिलेला फलक आढळला. थोड्याच वेळात मुल्हेरमाचीजवळ पोहोचलो.आणि दुपार पर्यंत गड उत्तर झालो. दुपारी अक्षरशः कडकडून भूक लागलेली. शुक्ल काकांच्या घरी पुन्हा घरगुती जेवणावर ताव मारला आणि परतीच्या प्रवासाला मार्गस्थ झालो. परतीच्या प्रवासात संपूर्ण तीन दिवस आठवले आणि मित्रांशी छान गप्पा मारल्या. परत रात्री ९.३० च्या सुमारास घर गाठले.मंडळी काही क्षण तुम्हाला अक्षरशः सुखावून जातात, माझ्या आयुष्यातल्या सुखाच्या क्षणांमध्ये बागलाण ट्रेक चे खूप महत्वाचे स्थान असेल जे मी कधीच विसरू शकत.तुम्ही पण ते क्षण अनुभवा आणि समृद्ध व्हा.

सोमेश्वर मंदिर

गाभाऱ्यात उतरण्याची चिंचोळी वाट

गडाच्या इतिहासाबद्दल – मुल्हेर किल्ल्याचा इतिहास पुराणकाळाशी संबंधित आहे. प्राचीनकाळी रत्नपूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या नगरात मयूरध्वज नावाचा राजा राज्य करत होता व त्याच नावाने नगराला मयूरपूर व किल्ल्याला मयूरगड नाव पडले. पुढे अपभ्रंश होऊन किल्ल्याचे नाव मुल्हेरगड पडले. मुल्हेर चा इतिहास तारिख इ फिरोझशाही ,ऐन इ अकबरी ,तसेच तारीख इ दिलखुशा ह्या फारसी ग्रंथांमध्ये विपुल आढळतो.साधारण इ. स १३४० साली बागुल राजांनी इथे सत्ता स्थापन केली आणि ती जवळपास १६३८ पर्यंत टिकून होती. म्हणूनच ह्या पट्ट्याला बागलाण पट्टा बोलले जाते. इ.स १६१० मध्ये मुल्हेरवर बागुल राजा प्रतापशाह ह्याची सत्ता असताना इंग्रज प्रवासी फिंच ह्याच्या वर्णनात मुल्हेर येथे टांकसाळ असून त्यात गुजरातच्या सुलतान महमूद ह्याचा महमूद रुपया पाडला जातो.

औरंगजेबाने किल्ला घेतल्यावर किल्ल्याचा किल्लेदार महंमद ताहिर होता. ह्या ताहिरनेच किल्ल्याजवळ ताहीर नावाचे गाव बसवले. पुढे ह्याच गावाचे नाव ताहाराबाद असे झाले. महाराजांनी औरंगजेबाशी आग्रा भेटीनंतर केलेला तह झुगारुन लावून जेव्हा एक एक किल्ले घ्याययला सुरुवात केली त्यानुसार मुल्हेर किल्ला मोरोपंत पेशव्यांनी १८ फेब्रुवारी १६७२ साली घेतला.परंतु किल्ला १६८० साली पुन्हा मोगलांकडे गेला. त्या नंतर भालकीच्या तहानुसार १७५२ साली किल्ला मराठ्यांकडे आला.माधवराव पेशव्यांच्या रोजनिशीत दादासाहेब अर्थात राघोबादादा ह्यांच्या रोजकीर्दीनुसार बाळाजी बाबुराव किल्ले मुल्हेर ह्यास आज्ञा केली होती कि किल्ल्यात प्राचीन राजे प्रतापशाह व हरीशहा ह्यांच्या कारभाऱ्यांची जिथे हवेली होती त्या हवेलीच्या भूमीत द्रव्याचा साठा आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी राघो अनंत कारकुनास पाठवले आहे. आता तो साठा खरंच होता का त्या बाबतीत इतिहास मौन धारण करून आहे.सरतेशेवटी किल्ला दिनांक १२ जुलै १८१८ रोजी प्रतिकार न करता इंग्रजांच्या हवाली करण्यात आला.ह्या वेळी किल्ल्यावर फत्तेलश्कर, रामप्रसाद , शिवप्रसाद व मार्कण्डेय ह्या ८ फुटीच्या ४ लांब तोफा होय पैकी मार्केंडेय इंग्रजांनी विझवली.बाकीच्या २ तोफा आज आपल्याला दिसतात.बहुदा त्या सद्यस्थितीत सोमेश्वर मंदिराजवळ ठेवलेल्या तोफा असाव्यात.अजून एका तोफेचा पत्ता लागत नाही.

इतिहास संदर्भ- https://durgbharari.in/ , सातारकर महाराज व त्यांचे पेशवे ह्यांच्या रोजनिशीतील उतारे भाग ९ – माधवराव पेशवे भाग १- गणेश चिमणाजी वाड , पृष्ठ ३६२

2 thoughts on “बागलाण रेंज ट्रेक भाग ४ – (किल्ले मुल्हेर – मोरागड)

Leave a comment