सफर बिदर- बसवकल्याणची भाग २

बिदरचा पहिला दिवस मनसोक्त फिरल्यावर दुसऱ्यादिवशी सकाळी बसवकल्याणच्या दिशेने मार्गस्थ झालो. बसवकल्याण हे प्रामुख्याने ओळखले जाते ते महात्मा बसवेश्वर ह्यांच्यासाठी आणि तसेच इथे राज्य केलेल्या कल्याणी चालुक्य आणि कलचुरी कल्याणी ह्या दोन शाह्यांसाठी.सर्वात पहिले जवळच असणारे एक महादेव मंदिर पाहिले आणि महात्मा बसवेश्वरांच्या १०८ फुटी पुतळ्याला भेट द्यायला पुढे निघालो. बिदर पासून ८३ किलोमीटर वरती हा पुतळा आहे. पुतळ्याकडे जाण्याआधी खाली बसवेश्वरांची ध्यान गुहा आहे. ह्या गुहेत त्यांच्या सर्व शिष्यांच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत. गुहेतील वातावरण थंडगार होते. गुहेतून बाहेर आल्यावर तिकीट काढून पायऱ्यांच्या साहाय्याने आपण पुतळ्याच्या पायथ्यापाशी येतो.पुतळ्यासमोर खाली एका छोट्या तलावात कमळ उमललेले होते.पुतळा अतिशय रेखीव आहे. ह्या पुतळ्याच्या पायथ्याशी खाली भुयारात आणखी एक समाधी मंदिर बांधले आहे. ह्या समाधी मंदिरात सुद्धा बसवेश्वरांची मूर्ती स्थापित केली आहे.मला हा पुतळा पाहून नाशिकच्या अण्णा गणपतीची आठवण झाली.पुतळा पाहून पुन्हा खाली आलो आणि बसवकल्याण किल्ल्याकडे प्रस्थान केले.

बसवेश्वरांची ध्यान गुहा

बसवेश्वरांची गुहेतील मूर्ती

गुहेत असणाऱ्या इतर मूर्तींपैकी एक मूर्ती

बसवेश्वरांचा पुतळा

बसवेश्वरांच्या पुतळ्यापासून बसवकल्याणचा किल्ला फक्त दीड किलोमीटर वर आहे. किल्ल्याच्या गेट जवळ पोहोचलो आणि कळले कि किल्ला पुढचे ६ महिने नूतनीकरणासाठी बंद आहे. थोडा हिरमोड झाला. परंतु तेथील अधिकाऱ्यांना थोडा वेळ किल्ला पाहू द्यावा अशी विनंती केली. तसेच किल्ल्याला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवणार नाही अशी खात्री आम्ही दिली आणि किल्ल्यात शिरलो. हा किल्ला सुद्धा बिदरच्या किल्ल्याप्रमाणे मोठा आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यावर वरती तीन आणि एका बाजूला एक अशा दोन असे एकंदर ५ कमानी असलेले झरोके आहे.दरवाजाच्या वर फार्सीत शिलालेख कोरला आहे. तसेच झरोक्यांच्या वरती ४ मिनार आहेत. पुढे आत शिरल्यावर उजव्या कोपऱ्यात एक मजली इमारत आहे आणि ह्या इमारतीला लागून सलग कमानी असलेल्या भिंती आहेत.डाव्या बाजूला लाकडाचे खांब आणि छप्पर असलेली इमारत आहे. ह्या इमारतीस बरगाम- इ-हुसेन असे म्हंटले जाते.

बसवकल्याण किल्ला मुख्य प्रवेशद्वार

बरगाम- इ-हुसेन

इथून पुढे उजव्या बाजूला वळल्यावर मुख्य किल्ल्याची तटबंदी , तटबंदिभोवतीचा खंदक दिसू लागतो. त्याच बरोबर समोर किल्ल्याचे बुलंद बुरुज दिसू लागतात. तुम्ही जर नीट न्याहाळले तर असे दिसते कि बुरुजांमध्ये नेहमी दिसणारी शरभ शिल्प तर आहेतच, परंतु देवगिरी किल्ल्याप्रमाणे इतर वास्तूंची शिल्पं , जसे कि कमळपुष , साखळ्या इत्यादींच्या दगडांचा वापर नंतर बुरुज दुरुस्ती करताना केला आहे. दुरून बुरुजांवर तोफा लावलेल्या दिसल्या. पुढे दरवाज्यातून किल्यात प्रवेश करण्याआधी खंदकावरील दगडी पूल पार करावा लागतो. आत शिरल्यावर उजव्या बाजूस काही छोट्या इमारती आहेत. त्यातील एका इमारतीला जेल खाणा असे नाव दिलेले. पुढे आणखी एका दरवाज्यातून आत वळल्यावर उजवीकडे किल्ल्याच्या गाभ्यात प्रवेश करायला एक छोटा दरवाजा आहे आणि त्याच्या जोडीला मोठा बुरुज आहे. ह्या बुरुजासमोर मोठे वटवृक्ष आहे. परंतु आमचे दुर्दैव आम्ही आत नाही जाऊ शकलो. कारण किल्ल्यावर असणाऱ्या अधिकाऱ्याने पुढची परवानगी आम्हाला विनंती करून पण नाकारली. थोडा हिरमोड झाला , परंतु त्याला इलाज नव्हता. असो पुन्हा किल्ल्याला नीट भेट द्यायची हे मनात ठरवून पावले नाईलाजाने मागे वळवली. कुठेतरी पुन्हा वाटले कि काही हुल्लडबाज लोकांमुळे ज्यांना लांबून येऊन किल्ला पाहायचा आहे ते पाहू शकत नाही.

किल्ल्याचे बुलंद तटबंदी आणि बुरुज

दुसरा दरवाजा

तिसरा दरवाजा

किल्ल्याच्या मुख्य भागात प्रवेश करण्याचा दरवाजा (इथून पुढे आम्ही जाऊ शकलो नाही)

किल्ला पाहून पुढच्या प्रवासाला निघालो.इथून पुढे आम्ही शक्यतो आपण जास्त न ऐकलेले असे वीरभद्राचे मंदिर पाहायला उतरलो.हे मंदिर सुद्धा तसे जुनेच परंतु रंग दिल्याने कळून येत नाही. वीरभद्राची मूर्ती अतिशय सुंदर होती.वीरभद्र मंदिर पाहून पुढे आम्ही हुमनाबाद ला पोहोचलो आणि तेथील दत्तावतार म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. माणिकप्रभू महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले. माणिक प्रभू महाराजांचे त्यांच्या अवतारकार्यात बिदर मध्ये खूप मोठे प्रस्थ होते. अतिशय ऐसपैस जागेत आणि शांत वातावरणात महाराजांचे मंदिर वसलेले आहे.

वीरभद्र

माणिकनगर सोडून एक अतिशय सुंदर देखणे असे ईश्वरा जलसांघवी महादेव मंदिर पाहायला आम्ही पुढे निघालो . बिदर पासून ४५ किलोमीटर तर हुमनाबाद पासून साधारण १० किलोमीटर वर हे मंदिर आहे.हे मंदिर चालुक्य राजांच्या काळातील विक्रमादित्य- सहावा ह्या राजाच्या काळात बांधले गेले आहे.मंदिराची शैली चालुक्य काळातलीच आहे. मंदिराला समोर १२ खांब आहेत. मंदिरावर विविध सुरसुंदऱ्या , तसेच गणेश , नरसिंह इत्यादींच्या मुर्त्या आहेत. गाभाऱ्यातली शिवपिंड हि मात्र पुरातन काळातली वाटत नाही. मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे शहासना सुंदरी चे शिल्प.ह्या सुंदरीच्या हातात एक संस्कृत शिलालेख कन्नड अक्षरांत कोरला आहे.विकिपीडिया ह्या संकेत स्थळावर ह्या शिलालेखाबद्दल दिलेली माहिती पुढील प्रमाणे- “चालुक्यांच्या विक्रमादित्याने सात बेटांचे हे राज्य जिंकले आहे आणि तो ह्या बेटांवर राज्य करतो आहे” असा ह्या शिलालेखाचा अर्थ आहे.
ह्या मंदिरावर अभ्यास करून स्वतंत्र लेख होऊ शकतो.असे हे सुंदर मंदिर पाहून आम्ही परतीच्या वाटेवर लागलो.प्रवास सुरु करण्या आधी महमूद गवानचा मदरसा पहिला. मदरसा खूप मोठा आहे आणि त्याचा काही भाग उध्वस्त झाला आहे. मदरश्याच्या उजव्या बाजूला कुतुब मिनार सारखा मिनार बांधला आहे.मदरश्यावर असणाऱ्या पर्शिअन टाईल्स आकर्षक वाटल्या.मदरसा पाहून स्टेशन कडे जाण्या आधी वाटेत बिदरमधील हाताने कलाकुसरी केलेल्या भांडी , फ्रेम विकायला ठेवलेल्या दुकानात गेलो.वस्तू खरच सुंदर होत्या परंतु हातकाम असल्याने तेवढ्याच महाग होत्या.

अशा प्रकारे २ दिवसांची बिदर – बसवकल्याण ची सफर पूर्ण झाली. पहिल्या भागात म्हंटल्याप्रमाणे हा भाग ऐतिहासिक वास्तूंनी आणि तसेच प्रेक्षणीय स्थळांनी भरलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इथे येण्याचे ठरवून आणि दोन दिवसाच्या सुंदर आठवणी घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो.

ईश्वरा जलसांघवी मंदिर

शहासना सुंदरीचे शिल्प (हातात धरलेला शिलालेख दिसतो आहे)

महमूद गवान चा मदरसा

4 thoughts on “सफर बिदर- बसवकल्याणची भाग २

  1. Frendaaaa…. Well written..👌👌 Eagerly waiting for next.. 😀😀😀 many wishes for next writings…👍👍

    Like

Leave a reply to Mayuresh Ghosalkar Cancel reply