सफर सातारा-फलटण मधील गढ्यांची-भाग १

महाराष्ट्राला किल्ल्यांचा अभूतपूर्व इतिहास आहे.शिवरायांच्या पत्रात उल्लेख हि आलेला आहे कि, “माझा एक एक गड एक एक वर्ष शत्रूला झुंजवत ठेवेल”.इतिहासात तसे घडले सुद्धा.परंतु जसा काळ बदलला तसेच किल्ल्यांबरोबर छोटे कोट , गढ्या , वाडे जन्माला आले.ह्या गढ्या ,वाडे मराठेशाहीतील महत्वाच्या सरदारांनी बांधले आणि त्यांचा विस्तार त्यांच्या वंशजांनी केला. शिवछत्रपतींच्या काळात वतन देण्यावर बंदी होती त्यामुळे शिवकाळात काही ठराविक सरदार सोडता ह्या वास्तूंचे प्रमाण कमी होते.परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या दुःखद निधनानंतर जेव्हा राजाराम महाराजांच्या हातात सत्ता अली तेव्हा महाराजांना काळाच्या गरजेप्रमाणे वतने देणे गरजेचे पडले आणि ह्यातूनच सरंजामशाहीचा जन्म झाला. राजाराम महाराजांना त्या काळात शिवकाळापासून जीवाला जीव देणारे मराठे आणखी जवळीक होऊन जोडले गेले तर काही नव्याने सामील झाले.माझ्या मते इथूनच दुर्ग कोटांच्या आणि गढ्यांच्या बांधकामात वाढ झाली असावी.इतिहासाच्या दृष्टीने वारसा म्हणून ह्या गढ्या तश्या दुर्लक्षितच झाल्या.अर्थात त्याला काही कारणेही आहेत, जसे कि सर्वभक्षी काळाने त्यांना भक्ष्य केले तर काही आज स्वतःची एक एक भिंत सावरून इतिहासाची साक्ष देत आहेत. मी तुम्हाला अशाच इतिहासाची साक्ष देणाऱ्या गढ्यांची ओळख करून देणार आहे.मी सातारा ते फलटण भागातील बऱ्याच गढ्या फिरलो.फलटण आणि सातारा भागात प्रमुख सरदारांचे वास्तव्य असायचे जसे कि, फलटणचे निंबाळकर घराणे , औंधचे पंतप्रतिनिधी घराणे इत्यादी.त्यांमुळे इथे भरपूर गढ्या पाहायला मिळतात.

सातारा पोहोचून सर्वप्रथम गाठले ते भुईंज गाव. भुईंज गावात राजे लखुजीराव जाधवांची एक शाखा अजूनही नांदत आहे.इथे जाधवांचे वंशज रायाजीराव जाधव ह्यांचा राहता वाडा आहे. हा वाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या राणूअक्का ह्यांचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. गावात शिरताच समोर वाड्याची दगडी भिंत आणि गोलाकार बुरुज नजरेत बसतो.आत शिरल्यावर आपल्याला चौसोपी पूर्ण वाडा दिसतो. येथील दरवाजे लाकडी आहेत.वाड्यातील अंतर्गत भाग फक्त एका बाजूचाच पाहता येतो. इथे आत शिरल्यावर पूर्वीच्या वाड्याचे स्वरूप असलेला दिवाणखाना लागतो. दिवाणखान्याच्या उजव्या बाजूस देव्हारा आहे.देव्हाऱ्यात प्रभू श्री रामाची प्रसन्न मूर्ती आहे. खाली शिवलिंग सुद्धा ठेवले आहे.प्रसन्न मूर्ती पाहून बाहेर आलो आणि वाड्याला न्याहाळले.छत्रपतींच्या कन्येचा पदस्पर्श झालेला हा वाडा पाहून बाहेर आलो आणि समोरच एक उत्तम कोरीवकाम असलेली वास्तू दिसली.हि वास्तू म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात प्रसिद्ध झालेले रायाजीराव जाधवांची समाधी होय. समाधी वर इतके सुंदर कोरीव काम केले आहे कि त्याचे वर्णन मी करू शकत नाही. दुर्दैवाने समाधीच्या अवतीभोवती बांधकामे खूप असल्याने नीट फोटो काढता नाही आले. समाधीवर साखळबंद हत्ती , कुस्ती खेळणारे मल्ल , मारुती, शरभ , राधा कृष्ण असे कित्येक शिल्पांचे कोरीव काम केले आहे. समाधीच्या आत शिरल्यावर उजव्या बाजूने चिंचोळ्या मार्गाने वरती जाता येते.हि समाधी सिंदखेडमधील लखुजीराव जाधवांच्या समाधीची आठवण करून देते.

भुईंज येथील सरदार रायाजीराव जाधवांचा वाडा

दिवाणखाना

देव्हाऱ्यातील प्रभू श्री रामाची मूर्ती

रायाजीरावांची समाधी

भुईंज सोडून पुढे कोपर्डे गावाचा रस्ता धरला. साधारण पाऊण तासात कोपर्डे ला पोहोचलो. गावाच्या वेशीची कमान ओलांडली आणि समोरच गढीचे उध्वस्त प्रवेशद्वार दिसले.वाड्याचा उतुंग बुरुज नजरेस पडला . आत शिरल्यावर पुढे खूप मोठी जागा आहे. परंतु पुढे न जाता उजवीकडे वळायचे आणि दगडी पायऱ्यांच्या साहाय्याने वरती मुख्य वाड्यात जाता येते. ह्या वास्तुव्यतिरिक्त कोपर्डे येथील वाड्याचे विशेष अवशेष शिल्लक नाहीत. ह्या वाड्यात आजही गुण्यागोविंदाने शिंदे कुटुंबीय नांदत आहेत . वाडा उतरून थोडे पुढे गेल्यावर दगडी बांधीव बारव पाहायला मिळते.हा वाडा पानिपत वरून शिंदे मंडळींपैकी परत आलेल्या काही मंडळींचे वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य होते त्यापैकी काही शिंदे मंडळी कोपर्डे गावात स्थायिक झाले आणि ह्या गढ्या त्यांच्या आहेत. गावात आणखीसुद्धा बुरुज सदृश्य इमारती इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.गावात वेशीच्या जवळ भैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिराचे खांब त्याच्या पुरातन असण्याचा पुरावा आजही देत आहेत.

कोपर्डे सोडून पुढचा वाडा पाहण्यासाठी २२ किलोमीटर वरील बिबी गाव गाठले. गावात पोहोचल्यावर कोपर्डे प्रमाणेच गढीचे उध्वस्त प्रवेशद्वार नजरेत पडले. आत शिरल्यावर भिंतींच्या अवशेशांशिवाय आणखी काहीही पाहायला नाही आहे. परंतु ह्या भिंती सुद्धा आपल्याला इतिहासाची साक्ष देऊन जातात.गावात काही वीरगळी आणि धेनूगळी ठेवलेल्या पाहायला मिळतात. गढीचे विद्यमान वंशज बोबडे-पाटलांशी थोड्या गप्पा मारल्या त्यांच्याकडून गढीच्या देखभालीसंबंधी चर्चा केली आणि बिबी गावाचा निरोप घेतला.

कोपर्डे गढीचा बुरुज

कोपर्डे गढी – आतील भाग

बिबी गढी प्रवेशद्वार

बिबी गढी आतील भाग

पुढची गढी तडवळे गावात होती.बिबी गावापासून साधारण १५ किलोमीटर वर हि गढी आहे. ह्या गढीचे उतुंग बुरुज आपल्याला उध्वस्त अवस्थेत पाहायला मिळतात. ह्या गढीचे प्रवेशद्वार त्याच्या कमानीसकट शाबूत आहे.दरवाजाच्या सर्वोच्च भागावर शिल्पकाम केले आहे.गढीच्या आत सध्या नव्याने बांधकाम केलेले आहे.गढीमध्ये एक विहीर सुद्धा आहे. नव्याने बांधकाम झाल्याने गढीचा पूर्ण आवाका समजून येत नाही. परंतु हि गढी तशी मला मोठी भासली.

तडवळे गढी बुरुज

तडवळे गढी प्रवेशद्वार

तडवळे चा निरोप घेऊन आता मुख्य ठिकाण फलटण साठी मार्गी लागलो.फलटण ला आमचा आजचा मुक्काम होता.फलटण शहरात शिरल्यावर नाईक निंबाळकर संस्थांनचे सुंदर असे राम मंदिर पाहिले. जुना लाकडी सभामंडप आणि दगडी गर्भगृह अशी मंदिराची रचना होती. हे मंदिर मुधोजी मनमोहन राजवाडा अथवा फलटणचा राजवाडा ह्याच्या शेजारीच आहे. हा राजवाडा रीतसर परवानगी घेऊन पाहता येतो. आम्हाला दुर्दैवाने परवानगी नाही मिळाली. मंदिरामध्ये राम,सीता , लक्ष्मण आणि हनुमंताची सुंदर मुर्ती आहे. मंदिरात कोरलेल्या शिलालेखावरून असे समजते कि शके १६९६ अर्थात १७७४ साली मातुश्री सगुणाबाई निंबाळकरांनी श्री रामाची स्थापना आणि सभामंडप बांधला आणि जो नंतर जीर्ण झाल्यामुळे शके १७९७ म्हणजे १८७५ साली त्यांचे पणतू मुधोजी नाईक ह्यांनी नवा केला अर्थात जीर्णोद्धार केला. अतिशय रम्य वातावरणात पूर्ण मंदिर न्याहाळले. राजवाड्याच्या बाहेर आल्यावर समोर दोन बुरुज आणि तटबंदी दिसते हि सुद्धा पूर्वीच्या काळची एक गढी होती. फलटण राजवाड्याच्या समोर पुरातन जरबेश्वर महादेव मंदिर आहे.भूमिज शैलीतील हे उत्कृष्ट मंदिर आहे.हे मंदिर १२ व्या शतकातील असून मूळचे जैन मंदिर होते परंतु कालांतराने शिव मंदिरात रूपांतरित झाले. मंदिरावर धार्मिक जीवनातील दृश्य तसेच अष्टदिगपाल वगैरे कोरले आहेत.जवळपास अर्धा ते पाऊण तास मनसोक्त घालवल्यावर आम्ही वाठार निंबाळकर येथील गढ्यांचा समूह पाहायला पुढे निघालो.

श्री राम मंदिर , नाईक निंबाळकर संस्थान

मंदिराचा सभामंडप

फलटणचा राजवाडा

जरबेश्वर महादेव मंदिर,फलटण

फलटण म्हंटले कि निंबाळकर घराण्याचा उल्लेख येणार नाही असे होणारच नाही.वाठार निंबाळकर (वाठार आणि वाठार निंबाळकर हि दोनही वेगळी गावे आहेत )ह्या गावात ६ गढ्यांचा समूह आहे. ह्यातील काही गढ्या ह्या शेवटचा घटका मोजत आहेत.ह्या सहाही गढ्या मुख्य तटबंदीत बांधल्या आहेत.सर्वात पहिली गढी आम्ही पाहिली त्यात निंबाळकरांचे विद्यमान वंशज राहत आहेत. त्यांची रीतसर परवानगी घेऊन आम्ही गढीचा खालचा भाग आणि पहिला मजला पाहिला. इथे सध्या विद्यमान वंशज राहत असल्याने वाड्याच्या काही भागाचा फोटो काढण्यास परवानगी नाही आणि तेवढा मान आपणही ठेवला पाहिजे.विद्यमान परिवाराने वाडा आधुनिकतेची साथ धरून तसेच वास्तूचे ऐतिहासिकपण तसेच ठेवून जपला आहे. वाड्यात राहणाऱ्या वंशजांसोबत आम्ही गप्पा मारल्या , अगदी आपुलकीने त्यांनी आमची चौकशी केली आणि वाडा बघण्यास सहकार्य केले.पहिली गढी पाहून सरळ गेल्यावर दुसरी गढी दिसली.हि गढी उध्वस्त अवस्थेत आहे. दर्शनी तटबंदी, बुरुज ढासळलेल्या अवस्थेत आहे.आत पूर्वीच्या लाकडी बांधकामाचे अवशेष शिल्लक आहेत.पहिल्या मजल्यावरील थोडे बांधकामाचे अवशेष शिल्ल्लक राहिले आहे.थोडे सरळ पुढे गेल्यावर गढ्या ज्या मुख्य तटबंदीच्या आत आहेत तो दरवाजा पाहायला मिळतो. दरवाजा पार केला कि भली मोठी दगडी विहीर पहायला मिळते.विहीर पाहून मागे यायचे आणि वाटेत तिसरी गढी पाहायला मिळते.ह्या गढीचा अंतर्गत भाग पूर्णपणे ढासळला आहे.परंतु मुख्य दरवाजा आणि बाजूचे ३ खंदे बुरुज आजही दिमाखात उभे आहे. गढीच्या आत शिरल्यावर आतील वास्तूंची जोती शिल्ल्लक राहिली आहेत.तसेच अंतर्गत खोल्यांच्या काही दगडी भिंती पाहावयास मिळतात.

राजघराण्याचे वास्तव्य असलेली पहिली गढी

दुसरी गढी

तिसरी गढी

पुढे चौथी गढी पाहायला आत शिरलो. ह्याही गढीचा लाकडी दरवाजा शिल्लक आहे. थोडीफार तटबंदी आणि दरवाजा पार करून आत गेल्यावर दरवाज्या नंतर केलेले लाकडी बांधकाम नजरेस पडले.काही खोल्यांचे लाकडी खुंटे , अथवा दिवे वगैरे लावण्यासाठी केलेल्या छोट्या कमानी पाहायला मिळाल्या.ह्याच गढीच्या एकदम बाजूला भिंत आणि मध्ये लाकडी दरवाजा दिसतो. हि ह्या समूहातील पाचवी गढी.ह्या गढीत दोन मंदिरे आहेत.हि दोन मंदिरं अतिशय उत्तम अवस्थेत आहेत. ह्यातील एका मंदिरात रामाची, लक्ष्मणाची आणि सीतेची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. मंदिरात दोन शिलालेख कोरले आहेत.शिलालेखावरून मंदिर बांधण्याचा काळ शके १७७४ म्हणजे १८५२ असा कळून येतो. मंदिराचे गोपुर बघण्यासारखे आहे.ह्याच मंदिराच्या समोर दोन काळ्या पाषाणातील घुमटी आहेत.ह्या मंदिरांच्या आवारात पायऱ्या असलेली उत्तम विहीर आहे.विहीर पाहून वाड्याबाहेर आल्यावर ह्या गढी समूहातील सर्वात मोठी आणि बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत असणारी सहावी गढी पाहायला मिळते. ह्या गढीचे उत्तुंग बुरुज तसेच प्रवेशद्वार आपले स्वागत करतात, हे पाहताच आपल्याला शनिवार वाड्याची आठवण झाल्यावाचून राहत नाही.आत शिरल्यावर मुख्य दरवाजाच्या वरती नगारखान्याच्या पद्धतीप्रमाणे बांधकाम केलेले वाटले. इथून उजव्या बाजूने पायऱ्यांच्या सहाय्याने तटबंदीवर जाऊ शकतो. पुढे समोर डाव्या बाजूला पायऱ्यांची विहीर आहे. बाकी मुख्य प्रवेशद्वाराच्या नंतर उरलेले बांधकाम आणि भिंतींचे अवशेष सोडता आणखी काहीही अवशेष शिल्लक नाहीत. तटबंदीवर फिरून थोडा वेळ विसावलो आणि फलटण मध्ये परत येऊन दिवसाचा समारोप केला.(क्रमशः)

चौथी गढी

पाचवी गढी

सहावी गढी

सहाव्या गढीचा अंतर्गत भाग

इतिहास साभारhttps://durgbharari.in/

4 thoughts on “सफर सातारा-फलटण मधील गढ्यांची-भाग १

Leave a reply to Meghan Petkar Cancel reply